देवाच्या मंदिरातील व्यवस्थापक पूजाऱ्यांची ‘नियत आणि नियोजन’

बातमी शेअर करा.

माणूस आणि धर्माची देवळे यांचा संबंध प्राचीन आणि जटील आहे, जिथे देवाची मंदिरे ही माणसासाठी मार्गदर्शक, आधार आणि नैतिकतेचे साधन म्हणून काम करतात.धर्म व मंदिर मात्र ती मानवनिर्मित असल्याने त्यात वैविध्य आढळते. खरा धर्म माणुसकी, प्रेम आणि सेवेवर भर देतो,तर ‘माणुसकी हाच खरा धर्म’ मानणे ही काळाची गरज आहे.धर्म माणसाला मानसिक शांतता,जीवनाचा उद्देश आणि संकटात आधार देतो.धर्म माणसासाठी बनलेला आहे,माणूस धर्मासाठी नाही.जात,पंथ किंवा संप्रदायापेक्षा माणुसकी,दया आणि एकमेकांना समजून घेणे हाच खरा धर्म आहे.धर्म अनेक संस्कृतींमध्ये परंपरा आणि ओळखीचा भाग आहे,परंतु तो काही वेळा मतभेद आणि संघर्षाचे कारणही बनू शकतो.धर्म मानवी वर्तनासाठी नैतिक चौकटी निश्चित करतो.थोडक्यात सांगायचे तर,धार्मिक असणे म्हणजे केवळ पूजा-अर्चा करणे नसून, माणुसकी जपून राहणे आहे.माणसासाठी धर्म नाही तर धर्मासाठी माणूस आहे म्हणजेच प्रत्येक माणसाजवळ माणुसकी हा धर्म हवाय मग जातं कोणती ही असो, वा धर्म कोणताही ठरलेला असो,शाळा, महाविद्यालय आणि मंदिराचे व्यवस्थापन इमानदार प्रामाणिक असेल तर काय करू शकते.याची उत्तम उदाहरण वृतवाहिन्यावर पाहण्यास मिळाले.
     माणूस कोणत्या धर्मात जन्माला आला हे महत्वाचं नाही तर धर्माने वागणारा माणूस कोण आहे हे महत्वाचं आहे त्यासाठी तर माणूस महत्वाचा म्हणजे धर्म जगेल व तो सांगू शकेल की मी अमुक एक धर्माचा आहे आणि माझा धर्म असं सांगतो वं मी स्वतः माझ्या धर्माचे पालन करतो,म्हणून माझा धर्म मला फार आवडतो कारण त्यात माणुसकी चे उदाहरण व अनुभव खूप सांगण्यासाठी वं ऐकण्यासाठी आहेत,धर्माला जातं नाही तर फक्त माणूस हा माणसासारखा माणसासंगे माणूस बनून माणुसकीने वागणारा, त्यामुळे माणसासाठी एकच धर्म माणूस म्हणून माणुसकीचे कर्म करावे वं धर्माला चीरतरून ठेवावे म्हणून माणूस धर्मासाठी आहे आणि माणूस असेल तर त्याच्या आचरणातून धर्म दिसेल.धर्म आणि त्याच्या देवाची मंदिर यावर लिहण्याची गरज आज का वाटली?.  

    १९ मार्च २०२६ रोजी टीव्हीवर वृतवाहिन्याच्या दोन बातम्या पाहिल्या.आणि त्या पाहताना मन एक भावनिक होऊन खूप अंतर्मुख झाले.गॅस टंचाईमुळे कुठे कुठे कपात होईल,कुठे काय बंद होईल यांच्या बातम्या १२ मार्च पासून वेगवेगळ्या वृतपत्रात सुरूच होत्या. वृत्तवाहिन्या ही बेकिंग न्यूज दाखवत होत्या. अशा वेळी ज्यांच्यावर शंभर टक्के विश्वास श्रद्धा ठेऊन बहुसंख्य लोक भक्त बनून मंदिरात दान देतात. त्याचा त्यांना व्यक्तिगत फायदा कधीच होत नसतो. पण त्यातून अनेकांना खूप मोठा सहारा मिळत असतो.एकीकडे अफाट उत्पन्न असलेल्या शिर्डी संस्थानाने गॅस टंचाईचे कारण देत भक्तांना मिळणाऱ्या लाडू प्रसादात कपात केल्याची बातमी दिसली.तर दुसरीकडे त्याच परिस्थितीत सौर ऊर्जेच्या (Solar Energy) साहाय्याने कोणतीही कपात न करता पूर्वीइतकाच महाप्रसाद देणारे असे शेगाव संस्थानने जाहीर केले.ही केवळ दोन देवस्थानांची तुलना नाही.तर ‘नियत आणि नियोजन’ यातील फरक अधोरेखित करणारे उदाहरण आहे.

   देशातील शिर्डीचे साईबाबा मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील (राहता तालुका) एक प्रमुख हिंदू तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.ते साईबाबांच्या ‘श्रद्धा व सबुरी’ या शिकवणी साठी प्रसिद्ध आहे. १९२२ मध्ये स्थापन झालेले हे मंदिर, इटालीयन संगमरवरातील साईबाबांच्या मूर्ती आणि त्यांच्या समाधीसाठी ओळखले जाते.श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट मंदिराचे व्यवस्थापन करते.साईबाबांनी १५ ऑक्टोबर १९१८ रोजी शिर्डी येथे समाधी घेतली.मंदिराचे खास आकर्षण: समाधी मंदिर, द्वारकामाई (ज्या मशिदीत बाबा राहायचे), गुरुस्थान आणि लेंडी बाग,श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट भक्तांसाठी निवास,भोजन आणि प्रसादाची सोय करते.साईबाबांनी आपल्या आयुष्यात “सबका मालिक एक” असा संदेश दिला आणि सर्वांना ‘श्रद्धा व सबुरी’ (विश्वास आणि संयम) बाळगण्याचा महामंत्र दिला.दानपेटी,ऑनलाइन देणग्या,आणि भक्त निवास व प्रसादालयातून हे उत्पन्न मिळते.गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ३१.६२ कोटींची वाढ झाली असून, हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक म्हणून ओळखले जाते.

   थोडे आकडेही पाहिले तर डोक्यात मेंदू असणारा बुद्धिजीवी माणूस थोडा विचार करून अधिक गंभीर होतो. शिर्डी संस्थानचे वार्षिक उत्पन्न साधारण ९०० कोटी रुपयांच्या आसपास आहे. तर शेगाव संस्थानचे उत्पन्न केवळ १५० कोटी रुपयांच्या आसपास आहे.म्हणजे उत्पन्नाच्या बाबतीत शिर्डी शेगावपेक्षा अनेक पटीने मोठे आहे.तरीही भक्तसेवा, सुविधा,पारदर्शकता आणि व्यवस्थापनाच्या बाबतीत अनेक भाविकांना शेगावचा अनुभव अधिक समाधानकारक वाटतो.यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे देवस्थानाचे उत्पन्न किती आहे यापेक्षा ते चालवणारे संचालक मंडळ कसे आहे,त्यांची नीयत काय आहे आणि त्यांचे नियोजन किती दूरदृष्टीचे आहे यावर सर्व काही अवलंबून असते. व्यवस्थापनातील प्रत्यक्ष फरक पाहिला तर तो आणखी स्पष्ट दिसतो.

गजानन महाराज संस्थान हे विदर्भातील सर्वात मोठे मंदिर ट्रस्ट असून शिस्तबद्ध, प्रामाणिक,आध्यात्मिक,वैद्यकीय आणि सामाजिक कार्यांसाठी सुप्रसिद्ध आहे. मंदिरात सेवेकरी म्हणून काम करू इच्छिणाऱ्या भक्तांची प्रतीक्षा यादी असून त्यासाठी काही वर्षेसुद्धा तिष्ठत राहावे लागते.मंदिराचे व्यवस्थापन प्रामाणिकपणा,अत्यंत साधेपणा आणि यात्रेकरू अथवा वारकरी यांच्याविषयी आदर बाळगणारे आहे. सेवाधारी भक्त आपल्या गुरूप्रेमासाठी नम्रपणे स्वयंसेवक म्हणून काम करतात. कायम नोकरी करणारे लोक नाहीत.आसपासच्या खेड्यापाड्यातून तीसच्या गटांमध्ये स्वयंसेवकांची नोंदणी करून एक महिना क्रमावर्तन तत्त्वावर, निस्वार्थीपणे विनामूल्य सेवा प्रदान करण्याची प्रथा आहे. २०२० साली कोव्हीड च्या महामारीच्यावेळेस या संस्थेने रुग्णवॉर्ड आणि बेड ची निर्मिती केली होती. आणि हजारो लोकांना मोफत अन्न वाटप केले होते. भारतात SAP तंत्रज्ञान आत्मसात करणारे हे देशातील पहिले मंदिर आहे. श्री.गजानन महाराज संस्थान हे शेगावला दर्शनासाठी येणाऱ्या यात्रेकरूंची अथवा वारकऱ्यांची उत्तम काळजी घेणारे संस्थान म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. तीन दिवसांपर्यंत निवासाची व्यवस्था हे संस्थान करते.श्री गजानन महाराजांच्या भक्तांसाठी भक्तनिवास,आनंदसागर-संकुल,विसावा इत्यादी ठिकाणी राहण्याची उत्तम सोय,स्वच्छ सुविधा आणि भोजन माफक दरामध्ये पुरवते.सकाळी ९ पासून रात्री ९ पर्यंत रेल्वे स्टेशनहून मंदिरापर्यंत बसने मोफत वाहतूक भक्तांना दिली जाते.मंदिर परिसरात महाराजांच्या भक्तांना दररोज बारीमध्ये महाप्रसाद दिला जातो. लोकसेवा ही ईश्वरसेवा या तत्वावर अनेक समाजसेवा उपक्रमसुद्धा श्री गजानन महाराज संस्थान चालवते. भक्तांकडून मिळणाऱ्या देणग्या,दानपेटी आणि भक्तनिवासाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते,जी प्रामुख्याने अन्नछत्र,मंदिर व्यवस्थापन आणि सामाजिक कार्यावर खर्च केली जाते.

     थोडक्यात,श्री गजानन महाराज संस्थान शेगाव हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आणि शिस्तबद्ध देवस्थानांपैकी एक आहे.शेगावचे अत्याधुनिक पार्किंग पाहिले की कोणीही आश्चर्यचकित होईल.मुंबई-दिल्लीसारख्या महानगरांतही क्वचितच दिसेल अशी व्यवस्था तिथे आहे.एकमेकांच्या विरुद्ध २५ पार्किंग लेन,कुठल्या लेनमध्ये जागा रिकामी आहे हे सांगणारे डिजिटल डिस्प्ले,आणि येण्या-जाण्याचे स्वतंत्र मार्ग ही संपूर्ण व्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध आणि पूर्णपणे मोफत आहे.याउलट शिर्डीत अनेक ठिकाणी खाजगी पार्किंगवाले एका तासाचे २०० रुपये किंवा त्याहून अधिक पैसे घेताना दिसतात. श्रद्धेने आलेल्या भाविकांकडून अशा प्रकारे पैसे उकळले जातात, हे खरोखरच विचार करायला लावणारे आहे.मोफत सेवांचे मॉडेल हा शेगाव संस्थानचा आणखी एक आदर्श आहे. रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकापासून मंदिरापर्यंत पूर्णपणे मोफत बस सेवा तिथे उपलब्ध आहे. त्यामुळे वृद्ध, महिला आणि दूरवरून आलेले भाविक कोणत्याही त्रासाशिवाय मंदिरात पोहोचू शकतात.शिर्डीसारख्या अफाट उत्पन्न असलेल्या देवस्थानानेही अशा सेवाभावी योजनांचा विचार करणे अपेक्षित आहे.

     भक्तनिवास आणि स्वच्छता या बाबतीतही शेगावचा अनुभव वेगळाच असतो.तिथे गेल्यावर जाणवणारी स्वच्छता अनेकांना युरोपियन दर्जाची वाटते.अत्यल्प दरात मिळणाऱ्या स्वच्छ खोल्या,शिस्तबद्ध व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांची नम्रता ही पंचतारांकित हॉटेललाही लाजवेल अशी असते.याउलट शिर्डीत अनेक वेळा सामान्य भक्तांना निवास मिळवताना अडचणी येतात. कधी राजकीय शिफारसी,कधी ओळखी या गोष्टींमुळे भाविकांचा अनुभव कधी कधी कडू होतो.सामाजिक शिस्त ही शेगावची आणखी एक मोठी ताकद आहे.मंदिर परिसरात भिकाऱ्यांची गर्दी दिसत नाही,कोणीही भक्तांकडे हट्टाने दान मागत नाही.भाविकांनी दिलेला प्रत्येक पैसा हा अत्यंत पारदर्शक पद्धतीने समाजकार्यासाठी वापरला जातो.शेगाव संस्थानने मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज,शैक्षणिक संस्था आणि विविध लोकसेवा प्रकल्प उभे केले आहेत. म्हणजेच भक्तांनी दिलेल्या पैशांचा उपयोग केवळ मंदिरापुरता न राहता समाजाच्या उन्नतीसाठीही होताना दिसतो.
    देवस्थानाचे संचालन करणाऱ्या मंडळाने हे लक्षात घ्यायला हवे की “भक्त सेवा हीच खरी ईश्वर सेवा” आहे.जेव्हा संचालक मंडळ निस्वार्थी असते, दूरदृष्टीने काम करते आणि त्यांचे लक्ष केवळ भक्तांच्या सोयीवर असते, तेव्हा गॅस टंचाईसारखी अडचण प्रसादात अडथळा ठरत नाही. उलट त्यावर उपाय शोधले जातात.जसे शेगावने सौर ऊर्जेचा वापर करून केले.म्हणूनच शेगाव संस्थानचे स्वयंपूर्ण, शिस्तबद्ध आणि पारदर्शक मॉडेल आज भारतातील प्रत्येक मोठ्या देवस्थानासाठी एक आदर्श आहे. देवस्थानाचे वैभव त्याच्या सोन्या-चांदीत नसते,तर भक्तांना दिलेल्या सन्मानात, सोयींमध्ये आणि व्यवस्थेच्या प्रामाणिकपणात असते. भारतातील सर्व मंदिर व्यवस्थापन समित्यांनी शेगाव संस्थानचा हा आदर्श मनापासून स्वीकारावा.कारण शेवटी मंदिर हे केवळ देवाचे घर नसते,तर ते भक्तांच्या विश्वासाचे केंद्र असते.संकट काळात लोक भक्त मंदिरातील मूर्तीवरच शंभर टक्के विश्वास ठेऊन जगत असतात.म्हणून मंदिराच्या व्यवस्थापनाने भक्तांनी दिलेले दान स्वरूपातील पैसचे चांगले नियोजन करावे. त्यात खोटी स्वार्थी नियत नसावी. हीच अपेक्षा. सर्वाचे मंगल हो!!!.

सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.

User Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *