बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणारे बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब.

बातमी शेअर करा.

अल्प परिचय:1)नाव- कांशीराम,2)वडिलांचे नाव- हरि सिंह,3)आईचे नाव – बिशन कौर,4) जन्म- 15 मार्च 1934,5) गाव- खवासपूर,जिल्हा: रोपड,पंजाब,6) शिक्षण- बी.एस.सी.(टॉपर),शासकीय महाविद्यालय,रोपड,पंजाब,7) नोकरी- संशोधन वैज्ञानिक अधिकारी,पुणे नंतर नोकरी सोडली.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 24 सप्टेंबर 1944 रोजी मद्रास येथे भाषण करताना सांगितले की बहुजनहो तुमच्या भिंतीवर कोरून ठेवा की तुम्हाला या देशाचे शासक बनायचे आहे. राजकीय सत्ता प्राप्त केल्यामुळेच बहुजनांचे सर्व प्रश्न सुटतील कारण राजकीय सत्ता ही एक गुरुकिल्ली आहे.त्यामुळेच बहुजनांचे राजकीय,सामाजिक, आर्थिक,सांस्कृतिक व शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी बहुजनांनी शासक बनले पाहिजे.आज जवळपास 80-81 वर्षे होतात तरीही आम्ही बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. 

  मान्यवर साहेब कांशीराम यांनी बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.सुरुवातीला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याचा आर.पी.आयच्या माध्यमातून प्रयत्न केला.परंतु त्यांना निराशाच हाती लागली.त्यांनी खूप चिंतन मनन केले.कांशीराम साहेबांना काँग्रेस व आर.पी.आय युतीमधून धक्का बसला.काँग्रेस व आरपीआय मध्ये युती ठरली व बोलणी सुरू झाली.या वाटाघाटीतून 521 पैकी काँग्रेसला 520 जागा व आर.पी.आय ला 1 जागा असे ठरले.म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये गांधींना 520 जागा व बाबासाहेबांना एक जागा अशी अंतिम वाटाघाटी करण्यात आली.लोकसभेच्या 520 जागा काँग्रेसला व फक्त एक जागा आर.पी.आय ला.या अन्यायपूर्ण वाटाघाटीमुळे मान्यवर कांशीराम साहेब फार दुःखी झाले शेवटी आपलेच लोक आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहेत अशी त्यांची भावना झाली.

 शेवटी नाईलाजाने मान्यवर कांशीराम साहेबांनी सर्व गोष्टीचा विचार केला.जर आपण उत्तर भारतात गेलो तर तेथील उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,पंजाब,हरियाणा इत्यादी राज्यात अस्पृश्य वर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.कांशीराम साहेबांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची कार्यभूमी नाईलाजाने सोडली व ते उत्तर प्रदेशात गेले. त्यांनी आपली सर्व सूत्रे दिल्ली येथून चालविली.कांशीराम साहेबांनी 6 डिसेंबर 1973 रोजी दिल्ली येथे बामसेफ या संघटनेची घोषणा केली. त्यांना समजले की आपल्या शोषित समाजातील कर्मचारी बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणामुळे मोठ मोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे असणारी बुद्धी व पैसा सामाजिक चळवळ चालविण्यासाठी उपयोगी पडू शकतो.

   कांशीराम साहेबांच्या हे लक्षात आले की राजकीय सत्ता स्थापन करायची असल्यास आपली सामाजिक मूळ ही मजबूत पाहिजेत.आपल्या अस्पृश्य समाजावर अन्याय, अत्याचार,जुलूम होत आहेत. कारण आपल्याला मदत करणारा असा आपला कोणीही सरकारी अधिकारी,आमदार,खासदार,मंत्री नाही.अशा अभावामुळे आपल्या समाजाची अधोगती होत आहे.6 डिसेंबर 1978 रोजी नवी दिल्ली येथे BAMCEF ची स्थापना करण्यात आली. सामाजिक ऋण फेडणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्ने साकार करणे हा बामसेफ स्थापन करण्यामागचा उद्देश होता.बामसेफचे पहिले अधिवेशन 2 ते 4 डिसेंबर 1979, दुसरे अधिवेशन 20 ते 24 नोव्हेंबर 1980 व तिसरे अधिवेशन 14 ते 28 ऑक्टोबर 1981 रोजी घेण्यात आले. अशी तीन अधिवेशने घेऊन त्यांच्या माध्यमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्यांक समाजाच्या कर्मचाऱ्यांचे फार मोठे संघटन उभे राहिले. ही कल्पकता कांशीराम साहेबांची असून त्याद्वारे ते राजकीय सत्ता संपादन करण्याकरता आपले एक एक डावपेच आखीत होते. त्यांनी आरएसएसचा सखोल अभ्यास केला होता आणि म्हणून आरएसएसच्या नमुन्या सारखीच बामसेफ ही अराजकीय संघटना स्थापन करण्यात आली.बामसेफचे कर्मचारी रस्त्यावरची लढाई लढणार नाहीत ते फक्त आतून या सर्व गोष्टींना मदत करणार आहेत.सरकारी नोकरी असल्यामुळे त्या कर्मचाऱ्यावर अनेक बंधने असतात, त्यातून वाट काढण्यासाठी बामसेफ निर्माण झाली.कांशीराम साहेबांचा राजकीय जीवनातील असे तीन टप्पे आपल्याला सांगता येतील ते असे :1) बामसेफ ची स्थापना 6 डिसेंबर 1978, 2) डी एस-4 ची स्थापना 6 डिसेंबर 1981 डीएस-4 म्हणजे दलित शोषित  समाज संघर्ष समिती. ही संघटना स्थापन करण्याचा उद्देश म्हणजे समाजावर होणारे अन्याय अत्याचार या विरुद्ध जागृती निर्माण करण्यासाठी डीएस-4 मदत करेल. डीएस-4 च्या तीन शाखा तयार करण्यात आल्या त्या अशा :1) प्रबोधन शाखा 2)महिला शाखा व 3)विद्यार्थी शाखा डीएस-4 च्या लोकांनी सर्व प्रकारची माध्यमे उपयोगात आणून समाजात जागृती निर्माण करावयाची आहे.ह्या शाखेतील सदस्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार व प्रसार करण्याचे काम करायचे आहे.तसेच अस्पृश्यांवर होणारा अन्याय, अत्याचार यांना आळा घालण्याचे काम करायचे आहे.3) बसपा या राजकीय पक्षाची स्थापना 14 एप्रिल 1984 ला करण्यात आली.

    कांशीराम साहेब जाणून होते की सर्व मनुवादी विचारसरणीची लोक त्यांच्याच पक्षाला मदत करतात. भारतामध्ये जेवढे काही राजकीय पक्ष आहेत त्यांची सर्व सूत्र ही सवर्ण लोकांच्या हाती आहेत. बसपा हा एकमेव पक्ष असा आहे की  त्याचे नेतृत्व हे  अस्पृश्याच्या हाती आहे.माननीय कांशीराम यांचे नारे? घोषणा सुद्धा फार जादू निर्माण करणाऱ्या आहेत. त्या घोषणा/ नारे ऐकून बहुजन समाजात एक प्रकारची नवी चेतना निर्माण करण्याचे कार्य कांशीराम साहेबांनी केले.कांशीराम साहेब सोप्या भाषेत  लोकांना समजावून सांगायचे की बहुजन हे 85 टक्के आहेत तरी 15 टक्केवाले बहुजनावर हुकूमत गाजवीत आहेत.ते सूत्र आता बदलले पाहिजे म्हणून त्यांनी नारा दिला की 1) “जिसकी  जितनी संख्या भारी, उतनी उसकी भागीदारी” 2) वोट हमारा राज तुम्हारा,नही चलेगा नही चलेगा’, 3) ‘जय भीम का नारा है, सारा देश हमारा है “4) “बाबा तेरा मिशन अधुरा,कांशीराम करेगा पुरा”,5) “अब बहुजन कि बारी है, इकिसवी सदी हमारी है”

    बसपा (बहुजन समाज पार्टी) राजकीय पक्षाची स्थापना 14 एप्रिल 1984 रोजी झाली. ऑक्टोबर 1987 ला बसपाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली व 1996 साली बसपाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. एवढ्या कमी काळात बसपा उच्च शिखरावर जाऊन पोहोचला.याचे श्रेय कांशीराम साहेबांच्या अहोरात्र मेहनतीला तसेच त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना द्यावे लागेल.कांशीराम साहेबांच्या पक्षाचा पायाच मुळी बहुजनांचे महापुरुष,संत जसे गौतम बुद्ध,संत कबीर,संत रविदास,गुरु गोविंद सिंह, शिवाजी महाराज,गुरु घासीदास,संत तुकाराम,संत गाडगेबाबा,नारायण गुरू,पेरियार रामास्वामी,महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,अण्णाभाऊ साठे इत्यादी महान पुरुषांच्या विचारावर स्थापन करण्यात आला.त्यामुळे बसपा हा खऱ्या अर्थाने बहूजनांचा पक्ष समजला जाऊ लागला.आजही बसपा हा पक्ष भारतात तिसऱ्या नंबरवर आहे.

    महात्मा फुलेंनी बहुजनांना शिक्षण देणे सुरू केले,छत्रपती शाहू महाराजांनी महात्मा फुलेचा वारसा पुढे चालवत बहुजनांच्या मुलांना अलग अलग समाजासाठी बोर्डिंग सुरू केले.सर्वात महत्त्वाचे म्हणजे 26 जुलै 1902 रोजी बहुजनांना 50 टक्के सरकारी नोकऱ्या देण्यासाठी आरक्षणाचा आदेश काढला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला एक अतिशय सुंदर सर्वसमावेशक असे संविधान दिले.जगातील अनेक विद्वानांनी भारतीय संविधानाची मुक्तकंठाने स्तुती केली.भारतीय संविधानाने आम्हा भारतीयांना स्वातंत्र्य समता न्याय व बंधुता ही मानवीय मूल्ये बहाल केली. बाबासाहेबांनी 1950 सालीच एक मत एक मूल्य हा मौलिक अधिकार आम्हा भारतीयांना बहाल केला.हाच अधिकार देण्याकरता अमेरिकेला 1965 सालापर्यंत  वाट पहावी लागली,तसेच तो अनेक लढ्यातून मिळवावा लागला.आम्हा भारतीयांना हा अधिकार कोणताही लढा न देता मिळाला.त्यामुळे कदाचित आम्हा बहुजनांना त्या अधिकाराची किंमत कळत नसावी.

   कांशीराम साहेबांनी बसपाद्वारे अनेक आमदार,खासदार निवडून आणले.अतिशय कट्टर व धार्मिक राज्य म्हणजे उत्तर प्रदेश,या राज्यात अस्पृश्य समाजाच्या एका महिलेने चार वेळेस मुख्यमंत्री होण्याचा मान मिळविला.हे एक न मोडणारे रेकॉर्ड आहे.जर कांशीराम साहेबांनी उत्तर प्रदेशात सत्ता स्थापन केली तर इतरही राज्यात ती मिळू शकते. हा एक सिद्धांत किंवा उदाहरण बहुजन लोकांसमोर दिलेले आहे.याचाच  आधार घेऊन जर बहुजन एकत्र आले तर देशाची सत्ता काबीज करता येते.

    इतिहासात जर आपण डोकावून पाहिले तर असंख्य राजे होऊन गेले.त्यांनी फक्त आपापली संस्थाने सांभाळण्याचे काम केले.जर सर्व राजे,महाराजे,संस्थानिक एकत्र आले असते तर परकीय देशांनी जे आपल्या भारतावर आक्रमण केले ते झालेच नसते. म्हणून इतिहासातुन धडा घेऊन बहूजनाने एकत्र यावे व सत्ता काबीज करून बाबासाहेबांचे व मान्यवर साहेब कांशीराम यांचे स्वप्न पूर्ण करावे.

     बहुजनांची जर सत्ता आली तर खालील फायदे नक्कीच मिळतील :1. कोणत्याही बहुजनावर अन्याय अत्याचार होणार नाही.2. कोणत्याही बहुजनांच्या आया- बहिणीवर,मुलीवर बलात्कार होणार नाही.3. बहुजनाला कथा वाचन करण्याचा अधिकार बहाल होईल.4. सर्व भारतीयांना केजी टू पीजी शिक्षण मोफत मिळेल.5. प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळेल हा रोजगाराचा हक्क पूर्णतः अमलात येईल.6. प्रत्येक घरातील व्यक्तीला नोकरीची हमी देण्यात येईल आज आपण पाहतो की सुवर्ण लोकांच्या एकाच घरात तीन- तीन, चार -चार लोक सरकारी नोकरी करीत आहेत हि प्रथा बंद होईल.7. वडील कलेक्टर, जज मुलगाही कलेक्टर जज अशा प्रकारच्या गोष्टीला आळा बसेल.8. प्रत्येकाला संरक्षणाची हमी मिळेल.याला दुसऱ्या भाषेत सम्राट अशोकाचे राज्य असे म्हणतात. अशाच प्रकारचे राज्य, शासन कांशीराम साहेबांना अभिप्रेत होते.असे हे महान महापुरुष दिनांक 9 ऑक्टोबर 2006 ला आपले अधुरे कार्य आपल्याला पूर्ण करण्याकरता आपल्यमधून निघून गेले. या महापुरुषाचे महापरिनिर्वाण झाले.असे होते बहुजन संघटक,बहुजन नायक मान्यवर साहेब कांशीराम त्यांना माझा कोटी- कोटी प्रणाम. 

    महादेव डांबरे-9665047153,छ.संभाजीनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *