सरन्यायाधीशांवर हल्ला हा लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा :- तेजराव वानखेडे.

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी वाशिम :भारतीय लोकशाही फारच धोकादायक वळण घेत आहे. ज्यांनी देशाला एकत्रित ठेवले ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय राज्यघटनेवरच हल्ले चालवले जात आहेत. सरन्यायधीशांच्या कक्षात बूट उगारली जाणे व त्यांच्या दिशेने भिरकावणे ही घटना एखाद्या वेडसर व्यक्तीचे करामत नसून त्यावर खोलवर रुजलेली जातीय,धर्मांध मानसिकता दिसत आहे.लोकशाही व्यवस्थेत मतभेद असणे जितकी अपेक्षित आहे तितकेच ते मतभेद संविधानिक मार्गाने व्यक्त होणे अपेक्षित आहे.मात्र संविधानाने घालून दिलेल्या मर्यादा ओलांडून जेव्हा मतभेद हिंसक किंवा विकृत मार्गाने होऊ लागतात तेव्हा लोकशाही मूल्यावर प्रश्नचिन्ह उभे झाल्याशिवाय राहत नाहीत असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले.
भाषा,संस्कृती,जाती,धर्म अशा अनेकत्वातून एक देश म्हणून भारत उभा झाला असेल तर त्यामागे या देशाने स्वीकारलेल्या लोकशाही मूल्य हीच एक कारण आहे.याला गालबोट लावण्याचे कोणीही धाडस करू नये.न्यायपालिका ही लोकशाहीचा प्राण आहे.संविधानाचा प्राण आहे.सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला हा लोकशाहीच्या प्राणावर केलेला हल्ला असून हा हल्ल्याचा प्रकार राष्ट्र द्रोह ठरवला पाहिजे व हल्लेखोरांना राष्ट्रद्रोही समजून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी रिपाईचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी आपल्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती यांना केली आहे.

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांच्यासह रिपाईचे नेते प्रकाश गवई,जिल्हा युवा अध्यक्ष गजानन वानखेडे,हिरामण साबळे,संतोष वानखेडे,सचिन गुडदे,सचिन भालेराव,दिलीप कांबळे,सिद्धार्थ पाटील,रामदास भगत,परिवर्तन कला महासंघाचे जिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *