कुटुंब व जीवन बरबाद करणाऱ्या व्यसना पासून दूर राहा !!

बातमी शेअर करा.


आजच्या या धकाधकीच्या युगामध्ये अनेक व्यक्ती अनेक कारणामुळे व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन बरबाद करीत आहे. व्यक्तीच नव्हे चे कुटुंबचे कुटुंब बरबाद होत आहेत. कधी कुतूहल म्हणून तर कधी मित्र-मैत्रिणीच्या आग्राहा खातर तर कधी दुःख,गम मिटवण्यासाठी,तर कधी आनंद द्विगणित करण्यासाठी तर कधी पार्टीमध्ये सहभागी होऊन आपले स्टेटस वाढवण्यासाठी माणूस दारू,सिगरेट,तंबाखू, व वेगवेगळ्या पद्धतीच्या बाजारामध्ये मिळणाऱ्या पुड्या व इतर अमली पदार्थ घेण्यास सुरुवात करतात.हे करता करता तो कधी व्यसनाधीन होतो हे त्याला सुद्धा कळत नाही.व्यसन हे कोणतेही असो ते शरीरासाठी परिवारासाठी खूपच अपायकारक आहे एवढेच नाही तर शरीरा सोबत माणसाचे मन सुद्धा बिघडून टाकते एवढ्यावर न थांबता त्या व्यक्तीची सामाजिक,आर्थिक व मानसिक घडी पूर्णतः बिघडून जाते. जवळचे मित्र, मैत्रिणी,सोयरे,आप्तपरिवार यांच्या जीवनावर सुद्धा या व्यसनी व्यक्तीचा परिणाम होत असतो.त्यामुळे समाजातील त्याचे महत्त्व सुद्धा कमी होत असते.त्याला कोणीच सिरीयसली घेत नाही.व त्याच्या जवळून दूर राहण्याचा प्रयत्न करतात.अनेक जण तर त्याच्याशी आपले संबंध असल्याचे कोणाला दाखवत नाही. एकच प्याला नाटकातील व्यक्तीप्रमाणे पहिला प्यालाच माणसाने घेतला नाही पाहिजे. एकदा सुरुवात झाली की हे व्यसन त्या व्यक्तीला कधी व्यसनाधीन बनवते हे समजत सुद्धा नाही.तो दारूला पितो की दारू त्याला पिते हे सुद्धा कळत नाही.आणि ज्या वेळेस ते त्या व्यक्तीला समजायला लागते त्यावेळेस तो खूप पुढे गेलेला असतो अशा वेळेस या व्यक्तीला व्यसन सोडवण्याकरता स्वतःची तयारी असल्यावरही सोडण्यासाठी प्रयत्न केल्यावरही सुटत नाही अशावेळी परिवाराने मित्र मैत्रिणीने नातेवाईकांनी त्याला या व्यसनापासून दूर करण्या करता सहकार्य करणे त्याला हिम्मत देणे त्याला धीर देणे हे महत्त्वाचे ठरत असते.

व्यसन हा एक आजार आहे हे प्रत्येककाने समजून घेणे गरजेचे आहे.व्यसन ही एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे व्यसनाधीन व्यक्तीचे शारीरिक,मानसिक आणि सामाजिक आरोग्य बाधित होते.या परिस्थितीत,त्या व्यक्तीच्या कुटुंबाची भूमिका महत्त्वाची ठरते.कुटुंबाचे सहकार्य,प्रेम आणि समजूतदारपणा हे घटक व्यसनाधीन व्यक्तीला पुनर्वसनाच्या प्रक्रियेतून मार्गक्रमण करण्यासाठी आधार देणारे असतात. यासाठी प्रथम आपण व्यसन म्हणजे काय,हे समजून घेऊ या.व्यसन हा एक आजार आहे.या आजारात व्यक्तीचे मन आजारी पडते.मन आजारी पडते तेव्हा नैराश्य, असाहाय्यता,भविष्याची चिंता,तीव्र राग इत्यादी तीव्र भावना जाणवतात.याचा परिणाम व्यक्तीच्या वर्तनावर होऊ शकतो जसे की,एकटे राहणे,काम टाळणे, स्वतःला इजा पोहोचविणे,खोटे बोलणे,पैशाचे आर्थिक व्यवहार बिघडने किंवा नातेवाइकांसोबत वाद घालणे तसेच व्यसन किंवा अमली पदार्थांचे सेवन जे विध्वंसक किंवा आत्मघातकी ठरू शकते.व्यक्तीच्या मनाला आजार झाला की तिला शारीरिक,मानसिक आणि सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागते.अशा व्यक्तीच्या नातेसंबंधातही तणाव आलेला असतो. व्यसनामुळे आर्थिक अडचणी, कायदेशीर समस्या, कामाच्या ठिकाणी समस्या आणि सामाजिक अप्रतिष्ठेला त्यांना सामोरे जावे लागते.रुग्णाच्या व्यसनमुक्तीच्या प्रवासात कुटुंबीयांची भूमिका ही काळजी वाहकाची असते.त्यांच्या सहभागामुळे उपचारांच्या परिणामांवर सकारात्मक परिणाम होतो. कुटुंबीयांनी याकडे एक आजार म्हणूनच पाहिले पाहिजे. यासाठी ‘हा लढा आजाराविरुद्ध आहे,व्यक्तीविरुद्ध,रुग्णाविरुद्ध नाही!’ हे आधी समजून घेतले पाहिजे.

कुटुंबातील परिवाराची काळजीवाहकांची भूमिका.व्यसनाधीन व्यक्तीला व्यसनापासून दूर करण्यासाठी खूप खूप महत्त्वाची असते त्यासाठी परिवाराने सकारात्मकता दाखवून व्यसनाधीन व्यक्तीला व्यसनापासून दूर करण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे.रुग्णाला भावनिक आधार देणे,ही कुटुंबातील काळजीवाहकांची मुख्य भूमिका असते.यात त्या व्यक्तीला सहानुभूती दाखवणे, समजून घेणे आणि निरपेक्ष प्रेम करणे या कुटुंबीयांच्या कृतींचा समावेश होतो.यामुळे रुग्णाला महत्त्व दिल्यासारखे वाटते आणि इतरांकडे मदत मागण्यासाठी प्रोत्साहन मिळते.जेव्हा व्यक्तीला ‘व्यसनी’ असे लेबल लावले जात नाही, तेव्हाच हे शक्य होते.मद्यपान मान्य करू नये,पण मद्यपान करणाऱ्या व्यक्तीला स्वीकारावे आणि सहानुभूती दर्शवावी.तरच तो त्यामधून निघण्याकरता प्रयत्न करू शकते.उपचार आणि रोगमुक्तता उपलब्ध वैद्यकीय उपचारांविषयी माहिती देणे, डॉक्टरची अपॉइंटमेंट किंवा सपोर्ट मीटिंगमध्ये सोबत करणे व्यसन सोडणाऱ्या व्यक्तीच्या सपोर्ट ग्रुप मध्ये सहभागी होणे अशा कृतींनी आपण प्रत्यक्षात त्याला साथ देत आहोत,मदत करत आहोत हे रुग्णाला दाखवून देता येईल.ह्या आजारात तज्ज्ञ व्यक्तीकडून समुपदेशन सल्ला घेण्याची गरज असते.अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्र उघडण्यात आलेली आहेत व्यसनमुक्ती केंद्रामध्ये किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडून समुपदेशन मिळाल्यास रुग्णाला मार्गदर्शन मिळते व आजार बरा होण्यास मदत होते.आश्वासक वातावरण निर्मिती घरात आश्वासक आणि पोषक वातावरण तयार करणे व्यसनमुक्तीसाठी आवश्यक आहे.व्यसन करण्यास उद्युक्त करणारे किंवा प्रलोभन देणारे घटक टाळणे,इतर व्यसनी लोकांपासून त्याला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

आरोग्यदायी दिनचर्या निश्चित करणे तसेच कुटुंबात खुल्या चर्चाना चालना देणे अशा काही कृतींतून कुटुंब रुग्णाला मदत करू शकते. व्यसनमुक्तीचा प्रवास अनेक वेळा दीर्घकालीन आणि कठीण असू शकतो.या प्रवासात कुटुंबातील सदस्यांनी धैर्य,हिम्मत आणि सातत्याने व्यक्तीला आधार दिल्यास त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते आणि ध्येय साधण्यास प्रेरणा मिळते. ह्यासाठी रुग्ण आणि कुटुंबीय दोघांसाठी ‘रोज नवा दिवस’ हे तंत्र उपयोगी ठरू शकते. आजचा दिवस आजचे ध्येय। ह्याने कुटुंबात आजार बरा होण्यास पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होते.आदल्या दिवशी झालेले वाद दुसऱ्या दिवशी विसरून जाणे खूप महत्त्वाचे असते.पहिल्या दिवशीचे वादी वाद घेऊन दुसऱ्या दिवशी त्यावर पुन्हा वादी वाद अजिबात होणार नाही हे टाळावे.स्वतः माहिती घेणे समस्या कालच्या दिवसातल्या होत्या आज नवा दिवस ! नवा राज याप्रमाणे कुटुंबांना वागणे महत्त्वाचे आहे.व्यसनाची समस्या ओळखून निदान करण्यापासून ते व्यसनाची कारणे,परिणाम, उपचारांचे पर्याय,चिकित्सा, व्यसनमुक्तीची प्रक्रिया सवय याविषयी कुटुंबीयांनी माहिती घ्यायला हवी,कुटुंबीयांनी व्यसनाचा प्रकार समजून घेतला तर रुग्णाला व्यसन सोडवण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे मदत करणे शक्य होईल.तसेच वैद्यकीय पचन तज्ज्ञांशी योग्य प्रकारे संवाद साधता व तज्ज्ञांच्या मदतीने एक व्यवस्थित कार्य योजना तयार करावी आणि वेळोवेळी पथ्य सल्ल्यानुसार त्यात बदल करत राहायला हवे. त्याकरिता लक्ष,निरीक्षण आणि मर्यादा निश्चित करणे व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेत कुटुंबाने रुग्णाच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे आणि त्याच्या वर्तनतील बदलांचे निरीक्षण करणे आवश्यक असते.

रुग्णाकडून अपेक्षित असलेले वर्तन, उपचारांमधील सहभाग तसेच व्यसन पुन्हा सुरू झाल्यास त्याचे संभाव्य परिणाम याची जाणीव कुटुंबीयांनी त्या व्यक्तीला करून देतानाच त्याला निश्चित मर्यादाही घालून द्यायला हवी. परंतु हे करताना आपण त्याचा आत्मविश्वास न हरवता,त्याच्या आत्मसन्मानाला धक्का न लावता त्याला प्रोत्साहन मिळेल असा संवाद साधणे गरजेचे आहे.ह्यासाठी आपण त्या रुग्णाला संबोधण्या ऐवजी आजाराला संबोधावे अथवा कृती सवयीला संबोधावे. ‘तू निष्काळजी आहेस,मग तू बरा कसा होणार?’च्या ऐवजी ‘काळजी न घेण्याची सवय आजार बरा कसा करेल?’ अशा परिस्थितीत संवाद कौशल्य महत्त्वाचे आहे.यासाठी आवश्यकता असल्यास समुपदेशकाची मदत घेतल्यास फायद्याचे ठरू शकते.धीर आणि सहनशीलता व्यसनाधीन व्यक्तीला सांभाळणे,हे भावनिक व शारीरिकदृष्ट्या थकवणारे असते, कुटुंबातील परिवाराने स्वतःची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. व्यसनमुक्तीची प्रक्रिया ही अनेक वेळा अपयश येणारी असू शकते.अशा वेळी स्वतःला आणि रुग्णाला पुन्हा प्रोत्साहित करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी समुपदेशन घेणे उपयोगी ठरते.पारिवारिक थेरपीमध्ये सहभागी होणे.फॅमिली थेरपी ही व्यसनाधीन व्यक्ती आणि कुटुंबातील सदस्य या दोघांसाठीही हितकारक असते.या थेरपीमुळे आतल्या आत भेडसावणाऱ्या समस्या कुटुंबापुढे मांडता येतात.एकमेकांना मदत करण्यामुळे कुटुंबातील बंध घट्ट होतात.तसेच संवाद कौशल्य सुधारण्यासही मदत होते.

पुनरावृत्ती प्रतिबंधाला साहाय्य व्यसनातून बाहेर पडण्याच्या प्रवासात पुनरावृत्ती,पुन्हा व्यसनाकडे ओढले जाणे हे एक सामान्यपणे आढळणारे मोठे आव्हान असते. व्यसनाधीन व्यक्तीला व्यसनाची तलफ ओळखण्यास मदत करणे,ही तलफ टाळण्यासाठी उपाय योजणे आणि सध्या सुरू असलेल्या औषध उपचारपद्धती उपलब्ध करून देण्याचे काम परिवाराने करायला हवे.व्यसन करणाऱ्या व्यक्तीसाठी काळजीवाहक म्हणून कुटुंबातील सदस्यांची भूमिका व्यसनमुक्तीच्या प्रवासात अपरिहार्य महत्वाचीआहे. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे व्यसनाधीन रुग्ण व्यक्तीला अनेक फायदे होतात. जसे की आत्मविश्वास वाढणे, जीवनाविषयी सकरात्मक दृष्टिकोन निर्माण होणे,भावनिक स्थैर्य,आरोग्यात सुधारणा,सामाजिक पुनर्वसन, व्यसनातून मुक्तता होण्यासाठी रुग्ण,त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि वैद्यकीय तज्ज्ञ यांच्यातील त्रिस्तरीय सहकार्य अत्यावश्यक असते. कुटुंबाच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची प्रक्रिया सुलभ होऊन रुग्णाला नवी उमेद मिळते आणि आपले जीवन नव्या दिशेने घडवण्याची प्रेरणा मिळण्यास मदत होते. ‘कुटुंबाचा पाठिंबा व्यसनाला हरवण्याचे सामर्थ्य देणारा असतो’ यावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे.अशावेळी परिवाराने,दोस्त मित्रांनी व्यसनधीन व्यक्तीला प्रेम देऊन त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी स्वतः सुद्धा सकारात्मक रहाले पाहिजे.निगेटिव्ह व्यक्ती,विचारापासून व्यसनाधीन व्यक्तीला दुरच ठेवले पाहिजे.व्यसन हे व्यक्तीला लागलेला एक महाभयंकर आजार असतो ज्याप्रमाणे आजारी व्यक्तीला आपण सर्व कुटुंबीय ज्या ताकदीने आधार देत असतो त्याच ताकदीने व्यसनाधीन झालेल्या कुटुंबातील व्यक्तीला मित्राला आधार देणे म्हणजेच त्याला व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी दूर करण्यासाठी प्रयत्न करणे आहे. अशा पद्धतीने आपण सातत्याने प्रयत्न केल्यास व्यसनाधीन व्यक्ती व्यसनापासून दूर होऊ शकतो ही सत्य बाब आपण लक्षात घेऊन त्या पद्धतीची वागणूक त्या व्यक्तीला दिल्यास तो व्यक्ती व्यसनापासून दूर जाऊन पुन्हा एक माणूस म्हणून माणसांमध्ये राहण्याची त्याची तयारी होईल त्याची गेलेली प्रतिष्ठा त्यांना पुन्हा मिळू शकते यावर आपला व त्या व्यक्तीचा पूर्ण विश्वास निर्माण होऊन तो व्यक्ती पुन्हा आपले जीवन नेहमीप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे जगून जीवनात यशस्वी होऊ शकतो जगू शकतो. हे मात्र खरे आहे त्यासाठी व्यसनी व्यक्तीची व त्याच्या परिवाराची मेहनत घेण्याची तयारी असणे फार महत्त्वाचे आहे तोच खऱ्या अर्थाने व्यसन सोडण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे.

गजानन हरणे,संवाद….9822942623.अकोला.
समाजसुधारक तथा समाजसेवक व संयोजक निर्भय बनो जन आंदोलन.
जिल्हा परिषद नगर खडकी अकोला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *