धम्माच्या आचरणातूनच सुसंस्कृत समाज घडतो -भदंत बुद्धघोष महास्थवीर

बातमी शेअर करा.

शिरजगाव बंड (जमापूर) अमरावती येथे सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशीय संस्था आणि सिद्धार्थ नवयुवक मंडळातर्फे भिक्खू संघाची जाहीर धम्मदेशना आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना भदंत बुद्धघोष महास्थवीर यांनी धम्माचे आचरण केल्यास माणूस सुसंस्कृत बनतो,असे प्रतिपादन केले.यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की,धम्मराज्य निर्माण करणे हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. परंतु आज समाजात अपेक्षित अशी एकता दिसून येत नाही. महामानवांच्या जयंतीच्या कार्यक्रमांमध्ये काही तरुण डीजेच्या तालावर मद्यप्राशन करून सहभागी होताना दिसतात, ही बाब चिंताजनक असून धम्माच्या शिकवणीला साजेशी नाही. धम्म संयम, शील आणि सदाचार शिकवतो, त्यामुळे समाजातील तरुणांनी योग्य दिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे.
  भदंत बुद्धघोष महास्थवीर पुढे म्हणाले की,काही राजकीय नेते आपल्या मुलांना दारूपासून दूर ठेवतात आणि उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवतात; मात्र हेच नेते बहुजन समाजातील तरुणांना मद्यसंस्कृतीत अडकवण्याचे काम करतात.याकडे समाजाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.आजच्या तरुणांनी शिक्षणासोबत व्यवसायिक दृष्टीकोन स्वीकारून स्वावलंबी बनावे,असेही त्यांनी आवाहन केले.या कार्यक्रमाला छत्रपती संभाजी नगर येथील पूज्य भदंत करुणानंद महाथेरो,भदंत धम्मबोधी थेरो,भदंत एन.धम्मानंद थेरो,भदंत पूर्ण सुमेध थेरो,भिक्खू सीलवंसलंकार,भंते राजरत्न तसेच आर्या संघशीला आर्या अनुला यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शिरजगाव बंड (जमापूर) येथील संविधान चौकातून धम्म रॅली काढून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी भदंत करुणानंद महाथेरो यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, धम्मपरिवर्तनाला ६९ वर्षे पूर्ण झाली असली तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले विचार आपण कितपत स्वीकारले आहेत, याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. तसेच आपण २२ प्रतिज्ञांचे कितपत पालन करतो, याचाही समाजाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.मंचावर उपस्थित इतर भिक्खू संघातील मान्यवरांनीही धम्म,शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन याविषयी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन भिक्खू सीलवंसलंकार यांनी केले.या कार्यक्रमास परिसरातील हजारो बौद्ध उपासक-उपासिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

भिक्खू अमरावती सीलवंसलंकार 7507894203

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *