“बाबासाहेब म्हणजे दूरदृष्टी असणारा आदर्श नेता”

बातमी शेअर करा.

 माझा आदर्श कोणी जर असेल तर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहे. मी बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श का? मानतो.असा जर कोणी प्रश्न केला तर मी उत्तरा दाखल सांगेन की,त्याच्यात प्रज्ञा होती,शील ही होते आणि करुणा ही होती, त्याग करण्याची प्रवृत्ती होती.निर्भीडता होती.आणि आकलन शक्ती होती. कोणता प्रश्न कशाप्रकारे हाताळायचा याची जाण आणि भान ही होते. त्यांनी गरिबी अनुभवली,जातीयतेचे चटके अनुभवले,आई लवकर वारल्या मुळे,आईच्या प्रेमापासून ही दूर राहिले. देशात जातीभेद,धर्म वाद,अस्पृश्यता,हिनतेची भावना,अस्पृश्याना शिक्षणास मनाई, परक्याचे राज्य आणि स्वकीयामध्ये प्रचंड जातीभेद, काही मानवता वादी माणसे होती. सयाजी राव गायकवाड महाराज, छत्रपती शाहू महाराज, केळुस्कर गुरुजी, यांच्या मानवता वादी प्रवृत्ती मुळे आणि सहकार्याच्या भावनेमुळे, आणि रामजी बाबा आंबेडकर यांच्या प्रचंड त्याग आणि दृढ संकल्पामुळे, आणि शिस्थीमुळे, आणि ज्ञान हे सर्व श्रेष्ठ आहे. शिक्षणा शिवाय आपल्याला सत्य कळणार नाही याची जाणीव रामजी बाबांना असल्यामुळे आणि ते स्वतः सैनिक शाळेमध्ये मुख्याधापक असल्याने त्याना शिक्षणाचे महत्व समजत होते त्यामुळे त्यानी भीमराव ला शिक्षणा बद्दल सांगून त्याच्यात शिक्षणाविषयी आवड निर्माण केली. 

    भीमराव यांना जातीय तेचे चटके बसले होते त्यामुळे त्याला जाणीव होती.या सर्व कारणामुळे भीमराव मध्ये जिद्द निर्माण झाली आणि त्यानी प्रचंड अभ्यास करून शिक्षण घेण्याचा निर्धार केला. रामजी बाबांना तेच अपेक्षित होते. अगदी त्या दिशेने भीमराव आंबेडकर यांची वाटचाल सुरु होती. रामजी बाबांनी त्याच्यात, पहिल्यांदा शिक्षण, शिस्त, स्वावलंबन, स्वाभिमान, आणि कठोर प्ररिश्रम घेण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे तर आपण पुढे जाऊ शकतो हे भीमराव यांच्या डोक्यात लहान पणा पासूनच ठासून भरले. या सर्व कारणामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रचंड परिश्रम घ्यायला लागले, प्रचंड अभ्यास करायला लागले. एकदा जर माणसाचे ध्येय आणि उद्धीष्ट ठरले असेल आणि त्याची दिशा निश्चित असेल तर तो आपले निश्चित पणे उद्धीष्ट पूर्ण करतो हे मात्र निश्चित आहे.बालपण, शिक्षण, विवाह,तरुणपण,नोकरी,सामाजिक कार्य,राजकीय वाटचाल आणि धार्मिक कार्य, या सर्व बाबतीत त्यानी यश संपादन केले. प्रचंड शिक्षण घेतले.आर्थिक अडचण, प्रचंड जातीयता,तरीही त्यानी त्यावर मात करून प्रचंड अभ्यास करून दलित,शोषित, पीडित लोकांना न्याय मिळवून दिला,आणि भारतीय संविधानाचा खरा शिल्पकार ही ठरला.आज जागतिक विद्वान म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जगात गणना होते आहे. ही खूप मोठी आमच्या भारतासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे आमचा आदर्श डॉ.बाबासाहेब आंबेडकर असले पाहिजे. माझे ते आदर्श आहेत.
    मुंबई येथील बहिस्कृत हित कारणी च्या सभेत जुलै 1924 मधील सभेत मार्गदर्शन करतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा असे सांगतात.ते यासाठी की शिक्षण घेतल्यामुळे आपल्याला खऱ्या आणि खोट्याची जाणीव होते.संघर्ष कोणत्या दिशेने करायचा,आपला दृष्टीकोण कोणता असला पाहिजे याची कल्पना आपल्याला येते.म्हणजे आपण यात यशस्वी होणार अथवा नाही याची जाण आपल्याला असते.आपण नियोजन कशाप्रकारे केले पाहिजे, आपल्याला,कोण, कोणती अडथळे येऊ शकतात. ते निपटविण्यासाठी काय? काय? करावे लागेल. आणि त्या आंदोलनात किती लोकांचा सहभाग असेल, त्यात प्रमुख कार्यकर्ते,निष्ठावंत कार्यकर्ते किती असतील, त्याच्या वर जबाबदारी दिली तर ती चोख पणे पार पाडू शकतील काय? याची सारी कल्पना, सारे नियोजन, कायदेशीर बाबी आपल्याला समजल्या पाहिजे. त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिका असे म्हणाले. त्या शिकलेल्या माणसाने मानवाच्या कल्याणसाठी संघर्ष करण्यास पुढे असले पाहिजे अशी माणसे तयार झाली की सहज चांगले न तुटणारे संघटन तयार होईल आणि तुम्ही लोकांना न्याय मिळवून देऊ शकाल. 

   हा डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचा शिका,संघर्ष करा आणि संघटित व्हा हा संदेश देण्यामागील हेतू होता. उद्देश होता.समता सैनिक दल हे लोकांना न्याय देण्यासाठी, समता प्रस्तापित करण्यासाठी जी,जी विषमतावादी,जातीवादी प्रवृत्ती आड येईल अशा लोकांना कायदेशीर धडा शिकविण्यासाठी,म्हणजे सर्व बाजूने बुद्धीने,ताकतीने, न्यायाने लढण्यास सज्ज असणारे संघटन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 मार्च 1927 ला तयार केले.बहिस्कृत हितकारणी सभा होती.पण ते बहिस्कृत हे नाव बाबासाहेब आंबेडकर यांना योग्य वाटले नसेल त्यामुळे त्यानी कदाचित समता सैनिक दल हे नावाचे संघटन उभारले. त्यात मिल्ट्री मध्ये असणारे आणि सेवानिवृत झालेले सैनिक स्वयं स्फूर्तीने या बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या समानतेच्या आंदोलना साठी समता सैनिक दलात सहभागी झाले. आणि मग 20 मार्च 1927 ला महाड येथील चवदार तळ्याचा मानव म्हणून अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सर्वांचा सारखा पाण्यावर अधिकार आहे. हे शासन,प्रशासन,आणि जातीवादी प्रवृत्तीना दाखवून देण्यासाठी महाड येथील चवदार तळ्याचा,समान न्यायासाठी,पाण्यासाठी, सत्याग्रह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केला.प्रचंड विरोध झाला, पाणी प्याले, अस्पृश्य बांधवानी पाणी पिले,त्यामुळे अस्पृश्य बांधावा मध्ये स्वाभिमान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या आंदोलनातून निर्माण केला.दुसऱ्या दिवशी जातीवादी, विषमतावादी लोकांनी हे तळे अस्पृश्य यांनी पाणी पिल्या मुळे बाटले म्हणून त्या तळ्याचे शुद्धीकरण करण्याचे ठरविले.मग त्यानी शेण आणि गोमूत्र टाकून त्याच्या तंत्र, मंत्राने शुद्धीकारण केले असे झाले.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सनदशीर मार्गाने जाऊन कोर्टातून न्याय मिळवून घेतला आणि ते तळे सर्वांसाठी खुले झाले. म्हणून शिका,संघर्ष करा,आणि संघटित व्हा या तिन्ही बाबी त्या चवदार तळ्याच्या आंदोलनातून आपल्याला जाणवते.आणि ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी करून दाखविले. त्यावेळी इंग्रजाचे राज्य होते आणि मनुवादी प्रवृत्ती जास्त प्रमाणात अग्रेसर होती. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. तेव्हा आपण त्यानी दिलेला संदेश किती घेतला आणि उपयोगात आणला त्यावर यश,अपयश अवलंबुन आहे.
     डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक सत्या ग्रह केले.अमरावती मध्ये असेल, नासिक मधील काळाराम मंदिरात अस्पृश्य यांना काळाराम चे दर्शन घेता यावे यास्तव प्रवेश मिळावा,यास्तव सत्याग्रह होता.तेही माणसे आहेत,म्हणून सत्याग्रह असेल,असे अनेक सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. सत्याग्रह म्हणजे जे सत्य आहे, पण काही जातीवादी प्रवृत्ती मान्य करायला तयार नाही यासाठी न्यायिक मार्गाने, शासन, प्रशासन यांना सत्य सांगून न्याय मिळवून देणे, त्यासाठी आग्रह धरणे म्हणजे सत्याग्रह होय. पण सत्य असतांना कोणीही मान्य करायला तयार नाही म्हणजे नासिक येथील काळाराम मंदिरात हिंदू धर्मातील हिंदूच पण अस्पृश्य म्हणून माणसे असणारे, पण जुलमी, जातीवादी प्रवृत्तीने,व्यवस्थेने बहिस्कृत केल्यामुळे जातीभेदाची भावना तयार झाली आणि हिंदू, हिंदू धर्मातच भेदभाव तयार झाला.पाच वर्ष काळाराम मंदिराचा सत्याग्रह चालल्या नंतर स्पृश्य लोकात परिवर्तन होत नाही हे लक्षात आल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवले मुक्कामी महार परिषद मध्ये 13 ऑक्टोबर 1935 ला प्रतिज्ञा केली, संकल्प केला की,मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही. ती प्रतिज्ञा त्यानी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर या ठिकाणी बुद्ध धम्मा ची दिक्षा घेऊन पूर्ण केली आणि हिंदू धर्म सोडला आणि बावीस प्रतिज्ञा स्वतः घेतल्या, केल्या.त्यात एकोणवीसव्या प्रतिज्ञात ते असे म्हणतात आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो आणि बावीस व्या प्रतिज्ञात ते असे म्हणतात इत्तपर बुध्दाच्या शिकविणे प्रमाणे वागेन अशी ते प्रतिज्ञा करतात.आणि बुद्ध विचारा समोर नतमस्तक होतात. त्या बुद्ध विचारात,प्रज्ञा,शील,करुणा,पंचशील,असटांग मार्ग,आणि दहा पारमिता आवश्यक असल्याचे आहे.

    एकंदरीत चांगला माणूस होण्यासाठी ती आचार संहिता आहे. आम्हाला तो बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार किती कळला आणि त्याची अंमल बजावणी केली यावर प्रगती अवलंबून आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्पन्नाचा विसावा भाग समाजाच्या हितासाठी दान करा असे म्हटले होते.याचा अर्थ जी दान प्रवृत्ती,ती दानाची भावना ज्यांच्या मनात असते,येते. ती माणसे कदापिही लोकांवर अन्याय करणार नाही. भ्रष्टाचार करणार नाही.आचरण चांगली असणारी माणसे समता वादी असेल,आणि जर ती शिकलेली असतील तर ती कोणत्याही माणसाची फसवणूक करणार नाही.फसवणूक होऊ देणार नाही.म्हणजेच चांगला समाज निर्माण करण्यासाठी ती सदोदित प्रयत्न करेल.असा आदर्श समाज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना निर्माण करावयाचा होता.त्यासाठी त्यानी समता सैनिक दल, भारतीय बौध्द महासभा,आणि राजकीय क्षेत्रात रिपब्लिकन पक्षाची निव ठेवली होती.ज्यामुळे सत्तेत चांगल्या विचाराची माणसे जातील.जे वैज्ञानिक दृष्टीकोण जपणारी असेल.त्यासाठी भारतीय संविधान मध्ये कलम 51 मध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण कर्तव्या मध्ये संविधानात दिल्या गेला आहे.आम्ही बौध्द, इतर लोकांना त्याच्या कर्तव्याची किती जाणीव करून देतो, आणि स्वतः तत्पर राहतो त्यावर आपले आणि जनतेचे हित अवलंबून आहे. अलीकडे नासिक येथील भोंदू बाबा अशोक खरात हा लोकांना जादू, टोना, तंत्र, मंत्र सांगून किती फसवीत होता. लैंगिक शोषण करीत होता. आर्थिक लुबाडणूक करीत होता. त्याकडे अनेक,आमदार गेल्याचे सांगितले जाते, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर या तर सतत जात असल्याचे स्पष्ट दिसते. 

    अशोक खरातनी निर्माण केलेल्या ट्रस्ट मध्ये त्या सदस्य आहेत. त्या रुपाली चाकणकर म्हणतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले.त्यात अधिकार,आणि कर्तव्य सांगितली गेली आहेत ते वाचा,तुम्हाला तुमचा अधिकार आणि हक्क कळेल, कोणीही फसवणूक करणार नाही.आणि या त्या अशोक खरात लोकांची फसवणूक करणाऱ्या ला आध्यात्मिक गुरु मानतात. खरच यांचे शिक्षण कामाचे असेल का? हा प्रश्न प्रामुख्याने जनते समोर उभा राहतो आहे. “डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दूरदृष्टी असणारा आदर्श नेता” आहे.त्यानी दिलेला संदेश शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, किती डोक्यात घेतला आणि वाटचाल केली त्याच बरोबर बुद्ध विचार किती समजला आणि लोका पर्यंत आम्ही किती पोहचविण्याचा प्रयत्न केला त्यावर यश, अपयश अवलंबून आहे, त्यामुळे आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजून उमजून डोक्यात घेतले पाहिजे आणि त्याचा आदर्श जपला पाहिजे.

अविनाश टिपले- 9970917389,चंद्रपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *