बौद्धांनी येणाऱ्या जनगणनेत जातीचा उल्लेख न करता स्वाभिमानाने धर्माच्या रकान्यात फक्त बौद्ध म्हणूनच उल्लेख करावा!.- राजाभाऊ कदम.

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी मुंबई – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेनं बौद्ध धम्माचा स्वीकार करून शेकडो वर्षांच्या सर्वांगीण गुलामगिरीतून मुक्त झालेल्या बौद्ध बांधवांनी येणार्‍या जनगणनेत जातीचा उल्लेख न करता स्वाभिमानाने धर्माच्या रकान्यात फक्त बौद्ध म्हणूनच उल्लेख करावा असे आग्रही प्रतिपादन बौद्ध धम्माचे अभ्यासक मा. राजाभाऊ कदम यांनी केले.

    दैनिक वृत्तरत्न सम्राटच्या वतीनं सर्वोदय बुद्ध विहार टिळक नगर,चेंबूर मुंबई येथे येणार्‍या जनगणनेच्या निमित्ताने मुख्य संयोजक कृपाल बबन कांबळे यांच्या पुढाकाराने आंबेडकरी विचारांचे साहित्यिक आणि विचारवंत यांच्या एका गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी राजाभाऊ कदम बोलत होते. राजाभाऊ आपल्या भाषणात पुढे म्हणाले की,जातींचे समूळ उच्चाटन करण्यासाठी बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला कारण बौद्ध धम्मात कोणतीही जात नाही.परंतु बाबासाहेबांचे अनुयायायी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी शेड्युलकास्ट बनतात हे शहाणपणाचे लक्षण नव्हे.बौद्ध बनल्यावर बौद्धांच्या सवलती माझ्या कोटाच्या खिशात आहेत असे बाबासाहेब म्हणाले होते.परंतु त्यांच्या कोटाचा खिसा कोणता याचा शोध 70 वर्षात बाबासाहेबांचे अनुयायी लावू शकले नाहीत,ही शोकांतिका आहे.बौद्ध धम्म स्वीकारून शेड्युलकास्ट बनून राहायचे असेल तर तुम्ही हिंदू धर्मातच रहा कारण तिथे तुम्हाला शेड्युलकास्टचा दर्जा मिळलेलाच आहे.धम्म स्वीकारून धम्मात जाती आणून धम्माला जातींचा धम्म करून बदनाम करू नका. बाबासाहेबांना जातींचे उच्चाटन करून भारत बौद्धमय करायचा होता हे स्वतःच्या स्वार्थासाठी विसरू नका. त्यामुळे येणाऱ्या जनगणनेत जातीचा उल्लेख न करता फक्त स्वाभिमानाने बौद्ध लिहा.आणि धम्म स्वीकारून शेड्युलकास्ट बनण्यापेक्षा धार्मिक अल्पसंख्याक बना आणि सवलती घ्या. पूर्वाश्रमीच्या जातीचा उल्लेख न केल्याने आरक्षण मिळाले नाही तरी धार्मिक अल्पसंख्याकांसाठी असलेल्या घटनात्मक सोयीसुविधांचा लाभ आपण बुद्धिस्ट मायनॉरीटी म्हणून घेऊ शकतो असे प्रतिपादन शेवटी राजाभाऊ यांनी केले. याच आशयाची मते ॲड.विकी येवले,ॲड.किशोर कांबळे,प्रा.आनंद देवडेकर यानीही व्यक्त केली. उर्वरित बहुसंख्य वक्त्यांनी जनगणनेत महार जातीचा उल्लेख करावा असा सूर लावला होता. 

     दैनिक वृतरत्न सम्राटच्या संपादक निलिमाताई बबन कांबळे यांच्या अध्यक्षते खालील संपन्न झालेल्या या परिषदेचे उद्घाटन विपस्सनाचार्य भन्ते डॉ.राहुलबोधी यांच्या हस्ते झाले.त्यांनीही येणाऱ्या जनगणनेत धर्म बौद्ध व जातीच्या राखण्यात पूर्वाश्रमीची जात लिहा असे मत व्यक्त केले.

         या गोलमेज परिषदेमागची भूमिका विशद करणारं प्रास्ताविक दैनिक वृत्तरत्न सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल बबन कांबळे यांनी केले.या परिषदेत अच्युत भोईटे,निवृत्त सनदी अधिकारी दिनेश डिंगळे,आनंद देवडेकर,गौतम सोनावणे,ॲड. किशोर कांबळे,ॲड.विकी येवले,अरविंद निकाळजे,प्रा.आशालता कांबळे,पुष्पा धाकतोडे,मीनल बच्छाव,लता परुळकर प्रा.संजय अभ्यंकर,संतोष आठवले,विभा राही, प्रा.देवराव मनवर,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 राजाभाऊ कदम.मो.9768833811,मुंबई.यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *