
इतिहास म्हणजे केवळ राजसत्ता बदलण्याची नोंद नव्हे. इतिहास म्हणजे त्या सत्तांमागे उभे राहिलेले घराणी, कुटुंबे,त्याग,निष्ठा,पराक्रम आणि स्वाभिमान यांचा अखंड प्रवाह होय.महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या इतिहासात अनेक सरदार,देशमुख, पाटील,आणि वजनदार घराणी पुढे आली, परंतु काही घराणी अशी असतात की त्यांचे योगदान केवळ युद्धभूमीपुरते मर्यादित राहत नाही,तर ते राजकीय,सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर इतिहास घडवतात.अशाच एका तेजस्वी आणि गौरवशाली घराण्याचे नाव म्हणजे – बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड गावातील इंगळे घराणे.हे घराणे शिवपूर्व काळापासून ते शाहू महाराजांच्या काळापर्यंत अखंडपणे इतिहासाच्या केंद्रस्थानी राहिले.आदिलशहाच्या दरबारात वजनदार स्थान मिळवूनही स्वराज्यवादी विचारांशी निष्ठा राखणारे,आणि शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्यासाठी तलवार उचलणारे हे घराणे आजही “शिवरायांची सासुरवाडी” या गौरवपूर्ण ओळखीने ओळखले जाते. करवंड गाव : इतिहासाने नटलेली भूमी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात वसलेले करवंड हे गाव विदर्भाच्या पश्चिम सीमेवर वसलेले एक प्राचीन व ऐतिहासिक केंद्र आहे.पूर्वी या गावास बावन बुर्जी असे संबोधले जात असे.याचे कारण म्हणजे गावाभोवती उभारलेले ५२ बुरुज,आणि त्या बुरुजांच्या संरक्षणाखाली असलेली इंगळे घराण्याची गढी.या ५२ बुरुजांशी संबंधित ५२ गावांची वतनदारी इंगळे घराण्याकडे होती,ही बाब या घराण्याच्या राजकीय व सामाजिक सामर्थ्याची साक्ष देते.आज जरी अनेक बुरुज ढासळलेल्या अवस्थेत असले, तरी त्यांचे भग्नावशेष अजूनही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.करवंड हा परिसर अहमदनगर आणि बीजापूर (आदिलशाही) सत्तांमधील संघर्षाच्या सीमारेषेवर होता.त्यामुळे येथे गढ्या,वाडे,सैनिकी तळ आणि सरदारांचे निवासस्थान उभारले गेले. इंगळे घराण्याची गढी ही त्याच लष्करी परंपरेचा जिवंत पुरावा आहे.

शासनाची उदासीनता : एक गंभीर वास्तव
इतका मौल्यवान ऐतिहासिक वारसा असतानाही, दुर्दैवाने आज इंगळे गढी आणि बावन बुर्जी परिसर शासनाच्या दुर्लक्षामुळे उपेक्षित राहिला आहे.गेल्या दोन–तीन वर्षांपासून आपण आणि आपले सहकारी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहोत. निवेदने,भेटी,वृत्तपत्रातील बातम्या,प्रत्यक्ष पाहणी सर्व प्रयत्न करूनही आजतागायत कोणतीही ठोस कृती शासनाकडून झालेली नाही.ही उदासीनता केवळ एका गावाबाबत नाही,तर संपूर्ण स्वराज्य इतिहासाबाबतची अनास्था दर्शवते.इंगळे घराण्याची उत्पत्ती व सामाजिक स्थान.करवंडचे इंगळे घराणे शिवपूर्व काळापासून अस्तित्वात होते.आदिलशाही काळात हे घराणे “वजनदार घराणे” म्हणून ओळखले जात असे.राजकीय, सामाजिक व लष्करी क्षेत्रात या घराण्याचे वर्चस्व होते.त्यांना देशमुखी,पाटीलकी,सरदारकी आणि “जंगबहाद्दूर” ही गौरवशाली उपाधी प्राप्त झाली होती.परंतु या घराण्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे स्वराज्यनिष्ठा.आदिलशाही दरबारात पदे भूषवतानाही त्यांनी शहाजीराजे भोसले यांच्याशी प्रामाणिक निष्ठा ठेवली आणि पुढे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी आपले सर्वस्व अर्पण केले.
इंगळे घराण्याचा लष्करी पराक्रम शहाजीराजे भोसले आणि पुढे शिवाजी महाराजांच्या मोहिमांमध्ये इंगळे घराण्यातील अनेक सरदारांनी आपले पराक्रम गाजवले.इतिहासात उल्लेखनीय ठरलेली काही नावे सरदार शिवाजीराव इंगळे, बहीरजी नाईक इंगळे,कात्याजी (काटुजी) इंगळे,
विशेषतः प्रतापगडावरील अफजलखान वधाच्या प्रसंगी,इंगळे सरदारांनी दाखवलेला पराक्रम स्वराज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला आहे.शिवाजी महाराजांनी स्वतः अशा निष्ठावंत योद्ध्यांचा गौरव केला.ही बाब इंगळे घराण्याच्या विश्वासार्हतेची साक्ष देते.
राजवंशीय नाती : शिवरायांची सासुरवाडी इंगळे घराण्याचा इतिहासातील सर्वात गौरवशाली अध्याय म्हणजे गुणवंताबाईसाहेब शिवाजी महाराजांच्या पत्नी दीपाबाईसाहेब व्यंकोजीराजे (शिवरायांचे सावत्र बंधू) यांच्या पत्नी या दोन विवाहांमुळे करवंड गाव थेट भोसले राजघराण्याशी जोडले गेले.यामुळेच करवंडला “शिवरायांची सासुरवाडी” ही ऐतिहासिक ओळख प्राप्त झाली.ही नाती केवळ कौटुंबिक नव्हती,तर त्यातून राजकीय,लष्करी आणि सामाजिक ऐक्य निर्माण झाले,ज्यामुळे स्वराज्य अधिक बळकट झाले.
इंगळे गढी : इतिहासाचे जिवंत स्मारक करवंड येथील इंगळे गढी ही मराठा काळातील लष्करी वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.पाषाण व चुन्याच्या बांधकामातील ही गढी केवळ निवासस्थान नव्हे, तर एक सशक्त सैनिकी ठाणे होती.आजही तटबंदीचे अवशेष भक्कम दरवाजे,अंगणातील जलाशय,गुप्त मार्गांचे चिन्ह हे सर्व इतिहासाची साक्ष देतात.आजची पिढी आणि पुढील दिशा आज इंगळे घराण्याचे वारस राजे हरीरुद्र इंगळे तंजावरहून आपल्या मूळ गावी करवंड येथे वास्तव्यास आले असून, वारशाचे जतन करण्यासाठी कटिबद्ध आहेत.अरविंद बापू इंगळे यांची या कार्यातील धडपड विशेष उल्लेखनीय आहे.
बावन बुर्जी बचाव कृती समितीच्या माध्यमातून लवकरच राजे हरीरुद्र इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन पुढील आंदोलनात्मक व संवर्धनात्मक दिशा ठरवली जाणार आहे.अंतिम शब्द करवंडची माती इतिहासाने ओथंबलेली आहे,इंगळे घराण्याने स्वराज्याला आधार दिला आहे,आणि त्या गढीच्या भग्न भिंती आजही सांगतात “इथेच शिवरायांची सासुरवाडी होती!” आज हा इतिहास जतन करणे म्हणजे स्वराज्याच्या स्मृती जिवंत ठेवणे होय.
सुनीलराव जवंजाळ पाटील-7038894078
बावन बुर्जी बचाव कृती समिती,बुलढाणा.

