
दि.६-२-२०२६ सुशिलाताई शरद पाटील यांना १४ व्या स्मृतीदिनाप्रित्यर्थ विनम्र अभिवादन.अभिवादक : राजाराम सूर्यवंशी.
कालची तारीख ६ फेब्रुवारी;त्यागमूर्ती सुशिलाताई शरद पाटील यांचा १४ वा स्सामृतीदिवस होता.सुशिलाताईंना आदरांजली वाहण्यासाठी कालच हा लेख यायला हवा होता,मात्र सततच्या लिखाणामुळे गेल्या एक आठवड्यापासून माझा उजवा खांदा लॉक झाल्यामुळे लेख वेळेत पुर्ण करू शकलो नाही.म्हणून आज देत आहे.
सुशिलाताई या नासिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एका शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्याची;कॉ.नारायण नागो पाटीलां यांची पुतणी.एक सत्यशोधक घरातील सत्यशोधक कन्या.कर्मवीर दादासाहेब गायकवा़डांच्या आंदोलनाच्या निमित्ताने शरद पाटील त्यांच्या एका वकील परंतु फुलटाईमर मित्रासोबत काहीकाळ नासिक -इगतपुरी पट्ट्यात भुमिहिनांची चळवळ करीत असतांना श्री.नागूजी गणपतराव पवार हे त्यावेळी कळवण तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचे काम करत होते. व ते त्या परिसरात मोठे नावाजलेले ही होते.त्यांनी चळवळी दरम्यान शरद पाटलांना पाहिले होते. त्यांना ओळखले होते.त्यांनी शरद पाटलांची हुशारी व त्यांच्यातला हून्नरपणा जोखला होता. त्यावेळी एकत्र कुटुंब पध्दती होती. व घरचा कर्ता पुरुष घरातील सर्व लग्नकार्यादी निर्णय स्व:ता घेत असे.त्या नात्याने त्यांनी आपल्या भावाला मुलगी; सुशिलाताई ही शरद पाटलांशी विवाहास योग्य असल्याचे जाणून हा विवाह घडवून आणला होता.त्या आगोदर त्यांनी आपल्या पुतणीला बजावले होते की, “की मुलगा चळवळ्या आहे.त्याचा संसार तुला करायचा आहे.तो हुन्नरी आहे,खुप नाव कमावेल. मात्र तुला श्रीमंतीत ठेवणार नाही;पण सुखात नक्कीच ठेवेन!.” आज्ञाधारक व संस्कारी सुशिलाताई चळवळ व चळवळ्या माणसांची किंमत जाणत होत्या.त्यांना सामाजिक जाणीव होती.त्या आपले जेष्ठ वडिल अर्थांत चुलत्यांना निर्धाराने म्हणाल्या की, “मी नोकरी करेन,अर्थाजन करण्यासाठी कष्ट करीन,व त्यांना आयुष्यभर पोसेल,त्यांना हवं ते सामाजिक काम करु देईन.तुम्हाला माझ्याकडून अजिबात तक्रार येणार नाही.तुम्ही माझ्याबाबतीत निश्चिंत रहा! मी या लग्नाला तयार आहे!!” हा निर्धार व चुलत्याला दिलेला शब्द सुशिलाताईंनी आयुष्यभर पाळला होता. लग्नाआधीच सुशिलाताईंना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली होती. आता प्रश्न शरद पाटलांचा होता.कॉम.नागो गणपत पाटलांनी एकेदिवशी शरद पाटलांना “भविष्यात लग्नाविषयी काय निर्णय घेतला आहे?” असा थेट प्रश्न केला.
शरद पाटलांचा स्वभाव लहाणपणापासून थट्टेखोर होता. त्यांनी कॉम.नागो पाटलांना उलट सवाल केला.. “तुम्ही माझ्याकरता मुलगी शोधली का काय?, मी असा चळवळ्या.भणंग महादेव. लग्न बिग्न काय नाय.आधी लगीन चळवळीचं!”
नागो पाटीलही काही कच्च्या गुरुचे चेले नव्हते. ते शरद पाटलांना म्हणाले.. “कॉम शरद, तुम्ही बरोबर बोललात! आधी लगीन चळवळीचं. आहो; तुम्ही म्हणजे एक चळवळ आहात. ही चळवळ सांभाळणारा कोणीतरी ट्रस्टी हवा की नको? तुमचा ट्रस्टी मी शोधला आहे.माझी पुतणी आहे,सत्यशोधक कन्या आहे.ती तुम्हाला आयुष्यभर चळवळ करायची मुभा देणार आहे. कारण ती जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे व सर्वाथाने तुमच्यासाठी योग्य आहे.”
‘मुलीवर सत्यशोधक संस्कार आहेत.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवते व तिला आपण कम्युनिस्ट पक्षाचे फुल टाईमर असल्याने तीला काही फरक पडत नाही.संसार करण्यास तयार आहे. या गोष्टी शरद पाटलांना भावल्या.’ व शपा लग्नास तयार झाले.

सत्यशोधक पध्दतीने साधा विवाह झाला.
शरद पाटील हे प्रगल्भ बुध्दीचे धनी होते.प्रगल्भ बुध्दीच्या माणसाला तेवढ्याच ताकदीची दुसरी व्यक्ती जीवनसाथी म्हणन हवी असते.सुशिलाताई सर्वगुण संपन्न होत्या.सुशिलाताई मध्ये प्रचंड समजूतदारपणा व सहनशिलता होती. आयुष्यभर त्या शपांच्या ट्रस्टी बनून राहिलेल्या. ‘शरद पाटील’ नावाचं विद्यापीठ त्यांनी आयुष्यभर चालवलं.या शपा नामक युनिव्हर्सिटी च्या प्रमुख असूनही त्यांनी कायम दुय्यम भुमिका स्विकारली व शपा्ंना सर्व विभागात संचार करण्यास अवकाश दिला.शरद पाटील हे खर्या अर्थाने वादळ होते.
शरद पाटीलरुपी वादळाची झळ. सुशिलाताईंना लग्नानंतर बसायला लगेच सुरवात झाली होती.कारण ; शरद पाटील पडले कट्टर कम्युनिष्ट! काँग्रेस विरोधी.!! व जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व झे.पी.च्या शाळा काँग्रेसच्या ताब्यात.परिणामी सुशिलाताईंना कम्युनिस्टाबरोबर लग्न केल्यामुळे सतत बदल्यांचा भयंकर त्रास सहन करावा लागला.सुशिलाताईंच्या माध्यमातून शरद पाटलांच्या कम्युनिस्ट कार्यकर्त्याला लगाम घालण्याचा प्रयत्न झाला.परंतु सुशिलाताई डगमगल्या नाहीत.बदल्या स्विकारल्या परंतु शरद पाटलांना झुकू दिले नाही.
शरद पाटलांच्या विद्वेत्तेसाठी त्यांनी खुप खस्ता खाल्ल्या.लहान लहान तीन मुलांना सांभाळण्याची पुर्ण जबाबादारी त्यांच्या शीरावर घेतली.शरद पाटील तर सतत आंदोलने,जेलच्या वाऱ्या करण्यात किंवा लिखाणात मग्न असत.
चि.सुजाता,नचिकेत व सर्मद या तिन्ही मुलांच्या जन्माच्यावेळी शरद पाटील कोणत्या न कोणत्या आंदोलनापायी जेल मध्ये असत.अशावेळी सुशिलाताईंचे मातृह्रदयावर किती आघात झाले असतील?.परंतु त्यांनी आपल्या भावना विवेकाने दाबल्या! आपल्या भावना व्यक्त झाल्यातर हा डोंगराएवढा माणूस उन्पमळून पडेल ही भिती त्यांना होती ! या आशंकाने त्या सतत निर्धाराने वागत.कुठलीही हौस-मौस करीत नसत.त्यांचे साधे राहाण्यावर व हौस-मौस न करण्यावर कोणी विचारु नये म्हणून त्या इतर नातेवाईकांमध्ये व शेजारीपाजारी बायकांमध्ये मिसळत नसत.हा सुध्दा मोठा त्याग होता. चुलत्याला शब्द दिल्यामुळे मन हालकं करायला कुठेच जागा नव्हती! ना माहेरी ना सासरी!ना शाळेत ना शेजारी!सुशिलाताईंचे जीवन आकलना पलिकडचे होते!
शरद पाटलांसाठी ग्रंथाची जमवाजमाव करणे हे ही एक अतिरिक्त काम सुरवातीच्या काळात त्यांनाच करावे लागे.कधी धुळे कारागृहात तर कधी येरवड्यात पुण्यापर्यंत जावे लागे.लहान मुलं व पुस्तकांचं गाठोडं घेऊन! मुलांच्या लग्नाच्या बाबतीतही सुशिलाताईंनाच पुढाकार घ्यावा लागत होता.शरद पाटील याबाबतीत टोकाचे कर्मठ होते. ते कोणाच्या लग्नात जात नसत.सजातीय लग्नाला त्यांचा विरोध होता.जातिव्यवस्थेच्या अंतासाठी सजातीय लग्ने ही बाधा आहे,असे त्यांचे स्पष्ट मत होते.त्यामुळे स्व:ताच्या मुलांच्या लग्नातही शपा सुशिलिताईंच्या पाठीशी उभे राहिले नाहीत.
सुशिलाताईनी हा भारही उचलला मात्र तोंडातून ब्र शब्द काढला नाही!….
चुलत्याला दिलेल्या शब्दात त्या अडकल्या होत्या!
अशावेळी शपांचे मित्र सहानूभूतीदार वा सहकारी सुशिलाताईंचा त्याग व त्यागापायी होणारी त्यांची होळपड पाहून मदतीला धावून येत.
परंतु शपांची भुमिका किंचितही लवचिक होत नसे.
चि.सुजाताताईंचे कन्यादान डॉ.रावसाहेब कसबेसरांनी केले होते….!
चि. नचिकेतच्या लग्नासाठी संगमनेरचे मुलीचे स्थळही डॉ.रावसाहेब कसबेंनी शोधून आणि लग्न लावून दिले होते!
शरद पाटील पुढे प्राच्यविद्यापंडित बनलेत.चळवळीसाठी आयुष्य खर्ची घातले. जातिव्यवस्थाअंताचे तत्वज्ञान मांडण्यासाठी देशातली सर्व ग्रंथालये पालथी घातली ते केवळ सुशिलाताईंच्या त्यागावर जिवंत राहून!
मात्र,शरद पाटीलही सुशिलाताई चा त्याग जाणून होते! म्हणून “दासशूद्रांची गुलामगिरी” या महत्तम ग्रंथाची १९८२ साली प्रसिध्द झालेली पहिली आवृत्ती शरद पाटीलांनी खालील शब्दात सुशिलाताईंना अर्पण केली होती.सुशिलेस “तिच्या त्याग व प्रेमाने हे शक्य झाले !” आणि ज्यादिवशी सुशिलाताईंनी या जगाचा निरोप घेतला व शपा नामक विद्यापिठाचे ट्रस्टीपद त्यागले;त्यारात्री हा शपा नामक भलामोठा महावृक्ष कोलमडून पडला व रात्रभर सुशिलाताईंच्या चेतनाहीन शरीराच्या मस्तकाशी,मस्तकाला हाताशी धरुन बसून राहिला…
निशब्द…
शांत…
श्रांत…!
आश्रुंना आवर घालून,त्यावेळी शपांनी सुशिलाताईंच्या नेणिवेशी संवाद साधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता..!!
अशा या जिगरबाज सत्यशोधकाच्या सत्यशोधक पत्नीला त्यांच्या १४ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !…..
राजाराम सूर्यवंशी ९५०३८६७६०२.

