
चार लोकं एकत्र येतात
चहाच्या टपरी वर जमतात
चहा पिता पिता
जगाच तत्वज्ञान सांगून जातात…..
पहिला…..
सिगारेट ओढत नाकातून धूर सोडतो
राजकारणावर व्यक्त होतो
धर्म जात महत्वाची पटवून देतो
वर्णव्यवस्थेचे गुणगान गात
अंधश्रद्धेवर प्रवचन झाडतो
धर्म टिकाला पाहिजे
जात जपली पाहिजे
महागाई, बेरोजगारी, शैक्षणिक धोरण
राखडलेला विकास, स्त्री शोषण
दंगल विषय येताच गप्प होतो
चहाचा कप तोंडाला लावत
सिगरेटच्या धुरा सोबत
सर्व हवेत सोडून देतो….
दुसरा….
तोंडातल्या गुटख्याची पिचकारी
पचकन लोकशाहीवर थुंकतो
धर्मांध सत्तेच पाणी तोंडात घेऊन
हुकूमशाहीचा गुळणा करतो
कट्टरतेचा कडक चहा मागवतो
जातीच्या आगीवर तापल्याने
जरा फुंकून पितो
समता, मानवता, स्त्री समानता
शांतता, बंधूता म्हणताच
“ये भैय्या चहा खूपच पांचट” म्हणतं
अंधभक्तीची तंबाखू चोळत
तोंडात ठेवतो…..
तिसरा….
हा मात्र चहा पिता पिता
स्वतःच नशीब पीत असतो
चहा मध्ये संसाराचा गोडवा शोधत असतो
जबाबदारीच्या ओझ्याने
पत्ती सारखा हा उकळलेला असतो
महिन्याचा पगार याला
दुधा सारखा असतो
घर खर्च, शाळेचा खर्च
आजारापण, पै पाहुणे
याच प्रश्नांच्या मंद आचेवर
हा शिजतं राहतो….
चौथा….
हा चहाला इथली व्यवस्था समजतो
अन्याय अत्याचार विरुद्ध लढतो
प्रथा रिवाज अमानवी ठरवतो
विज्ञानाला प्रमाण मानतो
पुरोगामी बनून महापुरुषांना फॉलो करतो
डोक्यला कफन बांधून
घराबाहेर सत्य सांगायला
असत्या विरुद्ध लढत राहतो
याचा कधी दाभोलकर होतो.
कधी कलबुर्गी होतो. कधी हा पानसरे
तर कधी गौरी लंकेश होतो
हा कधी जेलात अर्बन नक्षलवादी म्हणून
मुक्कामी असतो
तर कधी याला देशद्रोही पुरस्कार बहाल होतो….
हेच ते चार लोकं….
चार लोकं काय म्हणणार ?
हेच प्रश्न सर्वांना पडलेला असते
अन हेच चार लोकं
तुमच्या तिरडीला खांदा देते….
हेच ते चार लोकं
एकत्र जमतात….
चार लोकं….

बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी
9172291448
