
कालच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात आमचा जीवलग मित्र नितीन चंदनशिवे याने त्याची ‘कांबळे’ नावाची कविता म्हटली.त्यात त्याने,कांबळे भगवा हातात घेऊन शिवसैनिक झाला,असं तिथलं वातावरण बघून म्हटलं. कवितेच्या आधी बोलताना तो असंही म्हटला की,पुन्हा बाळासाहेब ठाकरे जन्माला आले पाहिजेत.थोड्या दिवसापूर्वीच वंचितच्या स्टेजवर पुरस्कार्थी चंदनशिवे उपस्थित होता.त्याच स्टेजवर दलित पँथरचे आद्य शहिद भागवत जाधवचे बंधू सुमेध जाधवही चंदनशिवेच्या सोबत उपस्थित होते.शहिद भागवत जाधवांचं अकाली मरण,त्यांच्या डोक्याचा झालेला चेंदामेंदा, त्यांचा रक्ताच्या थारोळ्यात भिजलेला देह, हे सगळंच्या सगळं जणू काही कालच घडल्यासारखं आम्हाला आजही आठवतय.अर्थात चंदनशिवेंला हा इतिहास माहित असता तर चंदनशिवे शिवसेनेच्या मेळाव्यात हे असं बोललाच नसता. भागवतबद्दल त्याला जर हे माहित असतं तर मला वाटतं,चंदनशिवे शिवसेनेच्या मेळाव्यातच गेलाच नसता.पण चंदनशिवे हा वयाने लहान असल्याने पँथरच्या काळात शिवसेनेने दलितांवर किती,कुठे आणि कसे अत्याचार केलेत, याची त्याला माहितीच नाही. ज्या गवई बंधूंचे डोळे फोडण्यात आले,त्या गवई बंधूविषयी चंदनशिवेंला कोणीतरी सांगायला हवे होते. मला माहित आहे, चंदनशिवे हे अत्यंत गरीब परिस्थितीतून वर आला आहे. त्यामुळे त्याला गरिबीची चांगलीच जाणीव आहे.
नामांतर आंदोलनात हेच बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, ज्यांच्या घरात नाही पिठ, त्यांना कशाला हवय विद्यापीठ? चंदनशिवेंसकट दलित समाजाच्या गरीबीची एवढी क्रूर चेष्टा आजवर कोणी केली नसेल. असे बाळासाहेब ठाकरे परत यावेत, असे चंदनशिवेला खरच वाटते काय? आज ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर आंबेडकरी पक्षांनी एक स्ट्रॅटेजी म्हणून राजकीय युती करणं हा एक वेगळा भाग असू शकतो. पण स्वतःला आंबेडकरी कवी म्हणणार्यांनी भगवा झेंडा हातात घेऊन स्वतःच शिवसैनिक होणं, हे कोणत्याही तत्वात बसत नाही. तसं पाहिलं तर चंदनशिवे हा माझा अत्यंत आवडता कवी आहे. त्याच्या कविता तशा बर्या जरी असल्या तरी त्याचं सादरीकरण मात्र खुपच भारी असतं. पण त्याची इतर कविताबाह्य बडबड मात्र सगळीच मान्य करावी, असे अजिबात नसते. अगदी उदाहरणच द्यायचं तर नुकताच वंचितच्या स्टेजवर चंदनशिवे सुजात आंबेडकरांना उद्देशून असं म्हणाला की, “तुम्ही शाळेचे मुख्याध्यापक आहात आणि मी तुमचा ‘ना-या’. तुमच्या शाळेत किती पँथर हवेत, ते मला सांगा. ते पुरवायची जबाबदारी माझी.” जणू काही सगळे पँथर्स आपल्या खिशातच आहेत,अशा थाटात चंदनशिवे बोलत होता. मुळात पँथरच्या काळात म्हणजे ७१ – ७२ मध्ये चंदनशिवेंचं वय काय होतं, हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. तमाम पँथर्स खिशात घालणारा चंदनशिवे त्याचवेळेस, “मनगटात शिवाजी महाराज घट्ट….” असे जेंव्हा म्हणतो, त्यावेळी पँथर कवी मनोहर अंकुश काय म्हणून गेलेत हे त्याला सांगावेच लागेल. पँथर कवी मनोहर अंकुश म्हणतात,….
“उंगली कटवानेसे शहिद नही हुआ करते,
शहिद होनेके लिये सर कटवाना जरुरी होता है.”
या शेरचा अर्थ काय होतो आणि तो कुठे जाऊन भिडतो, हे ज्यांना समजायचे ते समजले असतीलच. त्यामुळेच मी ते उकलून सांगत नाही. असो.
पँथर्स हा कुणाच्या तरी खिशात खुळखुळावा इतका तो चिल्लर व खुळा कधीच नव्हता. पँथर म्हणजे विशिष्ट आंबेडकरी विचारसरणी घेऊन जगणारं एक स्वतंत्र असं लढाऊ व्यक्तिमत्व होय. पण हे चंदनशिवेंला कोण सांगणार? थोडक्यात सांगायचं तर मी वर सांगितल्याप्रमाणे एक कविता सोडल्यास त्याच्या कविताबाह्य बडबडीकडे फारसे गांभिर्याने लक्ष द्यायची गरज नाही. चंदनशिवेची माझी पहिली ओळख करुन दिली ती पुण्यातील माझा कवीमित्र आकाश सोनावणेनी. त्यावेळेस माझ्या सोबत बबन सरवदेही होता. त्यावेळेस चंदनशिवे हा अगदी पोरगेलासा तरुण माझ्यासमोर होता. आकाशच्या “तरी आम्ही बोलू नये!” या कवितेच्या कार्यक्रमात तो एक कवी म्हणून सहभागी होता. आकाशने पुण्यातल्या अशा अनेक तरुण कवींना पहिल्यांदा स्टेज मिळवून दिला आहे आणि आजही आकाशचा हा कारखाना अव्याहत चालूच आहे. तर सांगायचा मुद्दा हा की, अगदी तेंव्हापासून ते आत्तापर्यंत आम्ही चंदनशिवेच्या काव्यप्रवासाचे साक्षीदार आहोत, मित्र आहोत. तो कवी म्हणून खुप मोठा आहेच. पण त्याने अजून आणखीन मोठं व्हावं, ही आमची त्याला सदिच्छा आहेच. फक्त मोठं होताना त्याने आपला व्यासंगही तितकाच वाढवावा ही त्याला कळकळीची विनंती. शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना चंदनशिवे म्हणाला की, आम्हाला तीस, चाळीस वर्षापूर्वीची शिवसेना हवेय. हे ऐकून तर माझ्या अंगावर काटाच आला. चाळीस वर्षापूर्वीची शिवसेना का नको, हे सांगणारी त्या काळातली माझी एक शिवाजी महाराजांना उद्देशून लिहलेली जुनी कविता चंदनशिवेच्या माहितीसाठी येथे मांडतो आहे. कवितेचे नाव आहे…

क्षमा करा राजे!
राजे क्षमा करा!
बोलू नये ते बोलावं लागत आहे म्हणून
क्षमा करा राजे!
पण आता हे कोणीतरी बोललच पाहिजे.
राजे,
तुमच्या जयंती निमित्ताने दोन वर्षापूर्वी जळगावजवळील पालघी गावात आमच्यावर हल्ला करण्यात आला.
त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर, त्यांनी आम्हाला धडा शिकविला.
आमच्या आयाबहिणींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले,
त्यांच्या साड्या फेडून टेंभे करण्यात आले त्या फलटणमध्ये!
ते ही तुमच्या नावाचा जल्लोष करुन?
आव्हाणेच्या शामराव सपकाळेला जीवंत जाळण्यात आलं,
कितीतरी आयाबहिणींना बेदम झोडपण्यात आलं.
लिंबोणीला तर एका माईवर बलात्कार केला जाणार होता,
पण ऑपरेशन झालय म्हणून तिच्यावर दया दाखविण्यात आली?
राजे,
आम्ही खरच इतके गांडू झालो आहोत का?
हा उभा महाराष्ट्राचा मुलुख पायदळी तुडवून आपल्या स्वराज्याची शान राखली ते आम्ही,
राजे ते आम्ही खरच इतके गांडू झालो आहोत का?
स्वतःचे शीर तळहातावर घेऊन दिल्लीच्या तख्ताला टक्कर दिली ते आम्ही,
राजे ते आम्ही खरच इतके गांडू झालो आहोत का?
ज्या मस्तवाल औरंगजेबाची मस्ती जिरवणारे आम्ही,
कुठल्यातरी नाठाळांकडून आमच्या मायबहिणींची बेअब्रू सहन करण्याइतके,
राजे ते आम्ही खरच इतके गांडू झालो आहोत का?
नाही राजेऽऽऽऽ!
कल्याणच्या सुभेदाराची सुन सन्मानाने परत करणाऱ्या छत्रपतींचा अनादर आम्हाला मुळीच करावयाचा नाही.
तरी पण राजे,
आता हे सारं सहनशक्तीच्या पलिकडे चाललं आहे.
तुमचा जयघोष करुन कुठले तरी फालतू गुंड आमच्यावर चाल करुन येतात,
हे आता कदापी सहन केलं जाणार नाही.
राजे,
तुमच्या चरणाची शपथ घेऊन सांगतो,
आता पुन्हा जर त्यांनी….
आमच्या मायबहिणींच्या पदराला हात घातला तर,
त्यांचे हात मुळासकट छाटून टाकू आम्ही!
तुमच्या जयघोषात चालून येणाऱ्या त्या नराधम ××× सैतानी नांग्या ठेचून टाकू आम्ही!
मग तेथे आमचे रक्त चाटणाऱ्या तलवारींचीही गय केली जाणार नाही!
कदाचित आपल्याही ××× ×× ×××× ××× ××× ××
म्हणून राजे क्षमा करा!
बोलू नये ते बोलावं लागतं आहे म्हणून…
क्षमा करा राजे!
– विवेक मोरे-८४५१९३२४१०. मुंबई.

