
बुद्धभूमीचा तिढा वाढत चालला आहे. ज्यांना या जमिनीबद्दल काडीची माहिती नाही ते लोक वादग्रस्त वक्तव्य करून हा वाद सुटूच नये असा प्रयत्न तर करीत नाहीत ना….. असा संशय येतो.
दिवंगत दिगंबर कांबळे यांनी प्रथम ही जमीन सांभाळली त्यात अनेक सातबारा होते.सदरच्या जागेवर सन १९९४ साली शासनातर्फे नियुक्त केलेल्या संचालक,नगररचना (आयु.थुल साहेब) यांनी शहर विकास योजना तयार केली.या डी.पी.Plan नुसार वेगवेगळ्या प्रयोजनासाठी विविध आरक्षणे या जागेवर टाकण्यात आली होती.तसेच या जागेतून काटेमानिवली ते रोशन पेट्रोल पंप पर्यंत ब्रिज दर्शवण्यात आला होता. सदरचा डीपी प्लान हरकती नोंदवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला होता मात्र त्यावेळेस कोणीही त्याला हरकत नोंदवलेली नाही.त्यामुळे शासनाने सदरचा डीपी नकाशा मंजूर केला.सन २००९-२०१२ च्या दरम्यान ताकतवार व राजकिय लांगेबांधे असलेल्या लोकांनी सदरची आरक्षित जागा महापालिकेकडे हस्तांतरीत करुन या जागेचा टी.डी. आर.घेतला.या इतिहासात घुसण्याची फार आवश्यकता नाही.आज भन्ते गौतम रत्न यांच्या ताब्यात फक्त ही जमीन आहे.कायद्याच्या भाषेत कब्जेदार.त्या व्यतिरिक्त काही नाही.सर्व जमीन खाजगी सात बारा असलेल्या लोकांचा टि डी आर घेतल्याने सर्व जमीन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नावावर असल्याने आता सरकारी जागा झालेली आहे.ही चांगली गोष्ट झाली आहे.त्यामुळे मंत्रालय लेव्हल वर पाठपुरावा करून जमीन मिळवता येऊ शकते.त्यासाठी मंत्री संत्री सर्व सरकारी यंत्रणा यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करूनच या संपूर्ण जमिनीवर सरकारच्या मदतीने त्यांच्याच पैशाने भव्य दिव्य योजना आखून करून घ्यावे लागेल.
या जागेवर उड्डाणं पूल करण्यासाठी 1994 सालीच प्ल्यान तयार केलेला होता. आणि आता त्याचे काम सुरु झालेले आहे. जेव्हा पहिला खांब (पिल्लर) उभा राहिला तेंव्हा भन्ते गौतम रत्न भन्ते यांनी विरोध केला पाहिजे होता. किंवा त्या अगोदरच एम एम आर डी यांनी नकाशा तयार केला तेंव्हा त्याचा आराखडा (प्ल्यान) बदलून नदी किनाऱ्यावरून घेण्यासाठी आंदोलन केले पाहिजे होते.तशी जागृती समाजात केली पाहिजे होती.जशी आपण आज करीत आहोत. आता साप निघून गेल्यावर काही उपयोग होणार असे वाटत नाही.
सातबारा आणि कोणाला टीडिअर दिला त्याची चौकशी करण्याची मागणी केली तर विषय भलती कडेच जाईल. कारण टी डि आर घेणारे लोक निघून गेले आणि ते लोक राजकीय सत्ताधारी लोकांशी संबंधित आहे. यांच्या चौकशीत ही जागा विकसित करण्याचे लांबनीवर जाईल.आणि या जागेवर जे अपेक्षित आहे ते कधीच पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.सत्ताधारी लोक मजबूत आहेत.त्यांनी सत्ता खेचून मिळवलेली आहे.केंद्रात आणि महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी मजबूत सरकार आहे. बौद्ध गयाचे आंदोलन ते दाबु शकतात. (जे बौद्ध गया हेरिटेज. इंटरन्ँशनल आहे.) आपल्या कडे आहे काय…? भन्ते गौतम रत्न आणि त्यांचे अंगावर असलेले चिवर…..

या जोरावर आंदोलन यशस्वी होईल असे वाटत नाही. कारण कागदोपत्री आपण कमकुवत आहोत.आणि त्यात आपलेच आपल्या विरोधात….आंदोलनाचा जनाधार किती दिवस मिळणार..?
भन्ते गौतम रत्न यांना माझी विनंती आहे.सरकारी यंत्रणा तुमच्या मताशी सहमत आहेत.हर्षदीप कांबळे सर आपल्याला मदत करीत आहेत. निधी सर्व कामासाठी मिळत आहे. तर दोन पावले मागे येऊन सरकारला सहकार्य करा.जर ते तुम्हाला प्राधिकरणात बरोबर घेऊन बुद्ध भूमी सरकारी जमिनीवर विकास करून देत आहेत तर त्यांना सहकार्य करून लोकांसाठी हे भव्य स्मारक होऊ द्या. यात विजय तुमचाच आहे.संघर्ष करण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत.हे समजून घ्या.तुमची आणि लोकांची शक्ती वाया घालवू नका.आता मी असे लिहील्यावर माझ्यावर सर्व स्तरातून टीका होणार याची मला खात्री आहे. आपलेच लोक विषारी टिका करतील.याची मला कल्पना आहे. कारण….
में.अशोका बिल्डकॉन याच्याशी रुक्मिणीबाई हॉस्पीटलच्या जागेवर मल्टीफ्लेक्स थियेटर आणि मॉल बांधकाम विरोधात जेंव्हा मी एकट्याने संघर्ष केला तेंव्हा आपले लोक माझी थट्टा करत होते.पण मी संघर्ष केला आणि त्या कामावर स्टे मिळवला.त्याचे काम थांबवले.त्या वेळी उच्च पदस्थ व्यक्तीला मध्ये टाकून मला मोठी ऑफर दिली ती ऑफर बरोबर घेऊन पण आले होते.पण ज्या हॉस्पिटल मध्ये माझा माझ्या भावाचा माझ्या बहिणीचा जन्म झाला.ते हॉस्पीटल उध्वस्त होतांना पाहून मला प्रचंड चीड आली होती. मी त्या अशोका बिल्डकॉन याची ऑफर धुडकावून लावली.मी ती स्वीकारली असती तर आज तेथे मॉल उभा झाला असता.आणि मी मालामाल झालो असतो.ती जागा वाचवली म्हणून मी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची जागा वाढवू शकलो. आज त्या जागेवर भलतेच लोक दावा सांगतात…डॉ.बाबासाहेब उद्यान जेंव्हा माझ्या वडिलांनी बनवले तेंव्हा ज्यांचा उदय ही झाला नव्हता. ते म्हणतात मी उद्यान बनवले…असो.
माझी भन्ते गौतम रत्न यांना विनंती आहे.आपली बाजू कमजोर आहे.आपला फक्त ताबा आहे.आणि जागेचा सरकारने तपास केला तर आपल्या हाती काही लागणार नाही.समंजस पणा घ्या.भगवान गौतम बुद्धाना राजे लोक पाहिजे तेव्हडी जमीन द्यायला तयार होते.पण ते आयुष्यभर धम्म प्रचार करीत फिरत राहिले.लोकांच्या मध्ये राहिले त्यांचे दुःख निवारण करीत राहिले.आपणही धम्माचे प्रचारक आहात.म्हणून समाजात तुमचा सन्मान आहे.लोकांना तुम्ही प्रेमाने जिंका.त्यांचा द्वेष करून काही साध्य होणार नाही.पोलीस,कोर्ट कचेरी,सरकारी कार्यालयात फिरणे.हे आपले काम नाही.
आपल्याच लोकांच्या विरोधात तक्रार दाखल करणे योग्य आहे का…..?. आपल्याच लोकांच्या कडून तुमच्या जीवाला धोका कसा काय असू शकतो…..? ज्यांच्या विरोधात आपण तक्रार केली.त्यातील बऱ्याच लोकांनी समाज सेवेत आपले आयुष्य घालवलेले आहे.तरी सर्वाना घेऊन बसा. (मिस गाईड करणारे लोक सोडून) आणि सरकारशी सहकार्य करून या जमिनीवर लोकांसाठी विविध वास्तू कशा उभ्या राहतील. सरकारचा निधी जास्तीत जास्त कसा मिळेल याचा विचार करा. संघर्ष करण्यात वेळ घालवू नका ही नम्र विनंती.बाकी निर्णय तुमचाच आहे.
पत्रकार बाबा रामटेके ८०९७५४०५०६,कल्याण,जिल्हा ठाणे.

