
विशेष प्रतिनिधी – श्री वनलक्ष्मी कृषी पर्यटन केंद्र (आपलं गाव) व श्री नंदलाल गोशाळा, मुक्काम पोस्ट बेलदरे, ता. कराड, जि. सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक २५.०७.२०२६ रोजी वृक्षारोपण व गोसंवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आषाढी एकादशीचे पावन पर्व, मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त “जनसेवा सप्ताह” अशा विविध औचित्यांचा संगम सदर कार्यक्रमात साधण्यात आला.

या कार्यक्रमांतर्गत मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी,दीर्घायुष्यासाठी गोपूजन करण्यात आले. शाळकरी विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढून पर्यावरण संरक्षण, ग्रामीण विकास आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश दिला. यानिमित्त ३,००० वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करून महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं व समुह पुनर्विकास प्राधिकरणचे अध्यक्ष मा. आमदार श्री. प्रवीणभाऊ दरेकर यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. “हरित महाराष्ट्र – समृद्ध महाराष्ट्र” अभियाना अंतर्गत परमेश्वर, निसर्ग आणि समाज यांना साक्षी मानून सामूहिक पर्यावरणाची शपथ घेण्यात आली. तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिवस” साजरा करण्यात आला. त्यानुषंगाने देशी गोवंशाचे जतन व संवर्धन, नैसर्गिक शेती याबाबत प्रबोधनात्मक चर्चासत्र आयोजित करण्यात आले, त्यास पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला. तसेच आरोग्यग्राम पंचकर्म केंद्राचे वैद्य नचिकेत वाचासुंदर यांच्यामार्फत मोफत आयुर्वेदिक संधिवात उपचार शिबिराचे देखील आयोजन कार्यक्रमाच्या अनुषंगाने करण्यात आले होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री वनलक्ष्मी कृषी पर्यटन केंद्र (आपलं गाव) करमणुक, पर्यटनाबरोबरच पर्यावरण, नैसर्गिक शेती व रिसायकलिंगचे आदर्श मॉडेल आहे, असे प्रतिपादन मा. आमदार श्री. प्रवीणभाऊ दरेकर यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे उपाध्यक्ष व आपलं गाव कृषी पर्यटन केंद्राचे संस्थापक श्री. नंदकुमार काटकर यांनी स्व. अजितदादा पवार यांना अभिप्रेत पर्यावरण संरक्षण, देशी गोवंश संवर्धन आणि ग्रामीण विकासाचा संकल्प कृतीत उतरविला असल्याचे मत श्री. दरेकर यांनी व्यक्त केले. शहरातून गावाकडे जाऊन ‘आपलं गाव नावाची संकल्पना गती घेण्याची काळाची गरज आहे. आगामी अधिवेशनात ‘आपलं गाव’ ही संकल्पना राज्य सरकारने तालुकास्तरावर राबवावी, अशी आग्रही मागणी करणार असल्याचे प्रतिपादन आमदार श्री. प्रवीणभाऊ दरेकर यांनी केले. तसेच कार्यक्रमाची सांगता पसायदान म्हणून झाली.

यावेळी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री. सिद्धार्थ टी. कांबळे, ज्येष्ठ संचालक श्री. शिवाजीराव नलावडे, संचालक श्री. पुरुषोत्तम दळवी, श्री. आनंदराव गोळे, श्री. अनिल गजरे, श्री. नितीन बनकर, श्री. विष्णू घुमरे, श्रीमती जयश्री पांचाळ, श्रीमती कविता देशमुख, श्रीमती शिल्पा सरपोतदार, माजी आमदार श्री. आनंदराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य श्री धनंजय ताटे, पंचायत समिती सदस्य श्री. दिनेश कुंभार, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. एन. डी. पवार, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. एम. बी.चव्हाण , डॉ. धांडोरे, डॉ. तासगावकर, डॉ. सतीश पाटील, डॉ. विलास पाटील, बेलदरे गावचे उपसरपंच श्री. अरुण शिंदे, म्होप्रे गावचे उपसरपंच श्री. विकास संकपाळ, तळबीड गावचे मा. जयवंत मोहिते, मा. जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रदीप पाटील, पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. रविंद्र घोरपडे, महाकाली डेरीचे चेअरमन श्री सुनील पाटील, कोयना बँकेचे संचालक श्री.तुकाराम डुबल, श्री.निवास शिंदे, श्री.रघुनाथ नलावडे, ॲड.संभाजीराव संकपाळ, बेरोजगार फेडरेशनचे अध्यक्ष श्री.विजय केदारे, ॲड.प्रमोद तायडे, ॲड.चंद्रकांत खर्डे यांच्यासह परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– नंदकुमार मा. काटकर
उपाध्यक्ष, मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस
मुख्य विश्वस्त – श्री वनलक्ष्मी कृषी विकास प्रतिष्ठान (श्री नंदलाल गोशाळा)

