“चला धम्म चळवळ अधिक गतिमान करु या” 

बातमी शेअर करा.

 कोशिंबे तालुका दिंडोरी,जिल्हा नाशिक पश्चिम येथील श्रामणेर बौध्दाचार्य आगळे-वेगळे धम्म शिबीर.

सुमंगल तथा रविंद्र अहिरे केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आपण नेहमी म्हणतो की”भारतीय बौद्ध महासभा ही मातृसंस्था खेड्यातील शेवटच्या माणसापर्यंत जाऊन धम्म समजावून सांगत आहे. त्याचबरोबर धम्म चळवळ अधिक गतिमान करीत आहे. खेड्यातील बांधवांना धम्माची गोडी लागावी यासाठी श्रामनेर शिबिराच्या माध्यमातून व महिला उपासिका शिबिराच्या माध्यमातून पायाभरणी केली जाते. त्याच अनुषंगाने दिंडोरी तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष प्रदीप गांगुर्डे गुरुजी व त्यांची कार्यकारिणी यांनी दिंडोरी पासून २२ ते २५ कि.मी.अंतरावर अतिशय दुर्गम भागात असलेल्या कोशिंबे या गावात शिबिर राबविण्यासाठी गावात स्वतः जाऊन बैठका घेतल्या. तेथील लोकांना धम्म समजावून सांगितला‌ श्रामणेर बौद्धाचार्य शिबिर आपल्या गावात घ्या.श्रामणेर शिबिर ही काय भानगड आहे ही अद्यापही त्या बांधवांना माहिती नव्हती.प्रदीप गांगुर्डे गुरुजी व सोनवणे कोषाध्यक्ष,सचिन बागुल सरचिटणीस दिंडोरी तालुका यांनी प्रयत्नाची पराकाष्टा करून कोशिंबे गावांमध्ये शिबिर लावण्यासाठी ग्रामस्थांची म्हणजेच बौद्ध बांधवांची मतपरिवर्तन केले.आणि त्या दृष्टीने गावची मंडळी कामाला लागली.  

   कोशिंबे ता-दिंडोरी.येथील संपन्न झालेले हे शिबिर वेगळ्या अर्थाने प्रसिद्ध झाले आहे. त्याचे कारण असे की या शिबिरामध्ये गावातीलच सतरा उपासकांनी भाग घेतला. घरटी एक/ दोन याप्रमाणे श्रामणेर शिबिरात उपासक बसले. बाहेरगावातील फक्त तीन उपासक या शिबिराला होते एकूण वीस उपासकांनी श्रामनेर प्रवज्जा दिक्षा घेतली. पू.भन्ते डॉ.बी.सुमेध बोधी यांच्या हस्ते प्रवज्जा ग्रहण केली.बौध्दाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबीरामुळे कोशिंबे गावात दिडोंरी तालुक्यात धम्ममय वातावरण निर्माण झाले.भारतीय बौध्द महासभा केंद्रीय प्रशिक्षण विभागांतर्गत बौध्द धम्मीय संस्कार व संस्कृती संवर्धना करिता राबविण्यात येणाऱ्या बौध्दाचार्य श्रामणेर शिबीराचे आयोजन दिनांक २२/०५/२०२६ ते ३१/०५/२०२६ पर्यंत ग्राम कोशिंबे,तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक पश्चिम येथे करण्यात आले होते.पू.भन्ते डॉ.बी.सुमेध बोधी भिख्खू संघाचे कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य,भारतीय बौध्द महासभा नाशिक जिल्हा पश्चिम चे प्रभारी अध्यक्ष कृष्णाजी सोनवणे व तालुका अध्यक्ष प्रदीप गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली शिबीर संपन्न झाले.सदर शिबीरासाठी सुमंगल तथा रविंद्र अहिरे जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा पूर्व व कृष्णाजी जगताप गुरुजी यांची बौध्दाचार्य श्रामणेर शिबीराला शिबीर प्रमुख म्हणून निवड केली.


    या शिबिराचे वैशिष्ट्य असे की गावातीलच १७ उपासक यामध्ये असून त्यांचे आई-वडील हे कंपनीत कामाला जातात काही शेती काम करतात, कंपनीमध्ये स्त्री व पुरुषाला रुपये ३००/- याप्रमाणे दररोज आहे. तर एका घरातून सहाशे रुपये रोज मिळतो.१० दिवसाचे ६०००/- रुपये होतात. तर गावातील जी मंडळी शेजारील कंपनीमध्ये कामाला जातात काही शेतात कामाला जातात त्या सर्वांनीच दहा दिवस काम न करता घरी बसून संघाची सेवा केलेली आहे, म्हणजे एका घरातून सहा हजार रुपये बुडवून संघाची सेवा केली आहे.काहींचा स्वतः चा व्यवसाय आहे.सरासरी २००० ते ४०००/- उत्पन्न आहे.पण त्यांनी १०/११ दिवस आपला व्यवसाय बंद ठेवून संघासाठी संपूर्ण वेळ दिला आहे.किती हा त्याग वरून संघासाठी अल्पपहार/ फलाहार यासाठी धम्मदान दिलेले आहे. यावरून त्या कोशिंबे गावातील उपासक आणि उपासिका यांच्या त्यागमय जीवनाला तोड नाही. विशेषता दहा दिवसांमध्ये एकही घरांमध्ये मांसाहार केलेला नाही हे विशेष आहे. कारण आपल्या गावात श्रामणेर शिबिर आहे आपली मुले या श्रामणेर शिबिरात बसलेली आहे. त्यामुळे श्रामणेर शिबिराचे पावित्र्य राखण्यासाठी कुठलाही मांसाहार गावातील म्हणजेच राजवाड्यातील एकाही घरात केलेला नाही. याबाबतीत माझेच उदाहरण मी सांगतो बुधवारचा दिवस होता आणि कोशिंबे गावाचा बाजार फार मोठा भरलेला होता. आम्हा केंद्रिय शिक्षकांना संध्याकाळचे भोजन कुठल्यातरी एका घरी मिळत असते, आणि त्यात देवसिंग खरे यांच्या कडे सुरुवातीपासून भोजनासाठी आमंत्रण असायचे माझ्या व पू.भन्ते डॉ.बी.सुमेध बोधी यांच्या सकाळच्या आंघोळीसाठी व्यवस्था देवसिंग खरे यांनीच केलेली आहे.सकाळचा पहिला चहा त्यांच्याच घरीच.आम्ही त्याबाबतीत पुण्यानुमोदन करतो.

    भोजनासाठी सुरुवातीला तीन-चार दिवस गेल्यावर एखाद्या घरातून मांसाहारी भोजनही मिळते. माझे त्यादिवशी तशीच अपेक्षा होती,परंतु माझ्या पुढ्यात पनीरची भाजी आणि अतिशय सुग्रास भोजन वाढले.मी जेवण करून तृप्त झाल.तथापि माझ्या मनात शंका निर्माण झाले मी त्या घरातील ताईलाच विचारलं की,ताई माझी अशी अपेक्षा होती की आज आपण मला मासे तरी खाऊ घालाल,परंतु माझा अपेक्षाभंग झाला त्या ताई म्हणाल्या गुरुजी कोणाला ही विचारणा करा.गुरुजी संपूर्ण गावांमध्ये दहा दिवस आम्ही मांसाहार पूर्णपणे बंद केलेला आहे.मला ही बाब ऐकून फारच आनंद झाला. श्रामणेर शिबिर आपल्या गावात असल्यामुळे राजवाड्यातील सर्वच लोकांनी मांसाहार न करणे हे जरा वेगळेच वाटले. फार आनंदही झाला की एवढी श्रद्धा श्रामणेर संघावर आहे. त्यामुळे हे शिबिर जे आहे ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. जयश्रीताई गांगुर्डे व विजय गांगुर्डे,पवार गुरुजी मोरे गुरुजी सह हे देखील संघास भेट देण्यासाठी खेडला गावी आले.जयश्रीताई गांगुर्डे यांनी सुंदर धम्मदेशना दिली.व त्यांनी संघास दान ही दिले.आनंद वाटला.मी सुरुवातीलाच म्हटलं की ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत जाऊन आपण धम्म चळवळ बळकट करायला पाहिजे परंतु प्रभारी जिल्हा अध्यक्ष यांनी ज्या ज्या केंद्रीय शिक्षकांना विषय दिलेले होते. त्यापैकी फक्त तीनच केंद्रीय शिक्षक आले एक डी.एन.वानखेडे, (त्यांनी सुंदर सविस्तर विषय दिला.फारच विनयशील व्यक्तीमत्व) पी.के.गांगुर्डे गुरुजी नाशिक,मनोज मोरे गुरुजी त्यांनीही नेमून दिलेले विषय न घेता छोटासा विषय द्या असे सुचविले. पी.के.गांगुर्डे गुरुजी विषय न देताच माझी भेट घेतली थोडेसे थांबले व नंतर विषय न देताच निघून गेले.मला त्याबद्दल फार खंत वाटली.केंद्रीय शिक्षक हा कुठलाही विषय द्यायला नेहमी तत्पर असला पाहिजे, त्याच्याकडे छोटीशीच बॅग असायला पाहिजे. त्यामध्ये दोन-चार विषय असायला पाहिजे.परंतु तसे काही मला दिसून आले नाही. जिल्हा पदाधिकारी यांनी मध्यंतरी एकही भेट श्रामणेर संघाला दिली नाही ही मात्र खंत राहील.शहरी भागात आपण जाऊन विषय देतो.परंतु ग्रामीण भागाचे काय “पांगरी व सय्यद पिंपरीच्या” शिबिराला केंद्रीय शिक्षक भरभरून गेले.समाज माध्यमातून त्यांचें फोटो पाहून मलाही आनंद वाटला,परंतु कोशिंब्याच्या शिबिराला का आले नाही? हा मला प्रश्न पडतो.

   मी जिल्हाध्यक्ष जरी असलो तरी केंद्रीय शिक्षक म्हणून सर्व परिचित आहे,परंतु जिल्ह्याचे अध्यक्ष/ सरचिटणीस/ कोषाध्यक्ष (कोषाध्यक्ष यांचा गृह तालुका असतांना)त्यांनी एकदाही फोन करून माझी किंवा संघाची चौकशी केली नाही की शिबिर बरोबर चालले आहे किंवा कसे? याबाबतीत मला नेहमीच खंत वाटत राहील. म्हणून हे जे शिबीर कोशिंबीचे आहे ते वैशिष्ट्यपूर्ण राहिलेले आहे.मी माझ्या परीने व माझ्या आधी कृष्णाजी जगताप गुरुजी यांनी त्यांच्या परीने शिबिराला जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे.पू.भन्ते सुमेध बोधी यांनी सुरुवातीला विषय घेतले.एखाद्या ग्रामीण भागात शिबिर आयोजित करणे व ते यशस्वी करणं फार जिकिरीचं काम आहे.तालुक्याचे अध्यक्ष प्रदीप गांगुर्डे गुरुजी त्यांचे सहकारी कार्यकारिणी यांनी मोलाची मदत केली. कोशिंबे गावचे आदरणीय देवसिंग खरे हे रोजगार बुडवून कायम संघा सोबत व संघाची सेवा करीत होते. विजय खरे यांचे सहकार्य लाभले,अमोल कांबळे व अनिकेत खरे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्वच पदाधिकारी यांनी फार मोलाचे सहकार्य केलेले आहे.

सहाशे रुपये रोज बुडवून घरी राहणं आणि वरून सकाळ संध्याकाळ दुपार संघाला सेवा देणे हे काम साधे नव्हते, मी सहज एका श्रामणेरला सांगितलं की उद्या आपलं चीवर उतरणार आहे. तेव्हा काहीतरी धम्मदान चिवरवर द्यावे लागेल, त्यावर ते म्हणाले की गुरुजी! मला तुम्ही सहा हजार रुपये द्या.मला आश्चर्य वाटले की हे असे कसे? तेव्हा त्यांनी सांगितले की मी शिबिरात बसलो आहे. मला तीनशे रुपये रोज आहे व माझी पत्नी देखील कामाला जाते तिलाही तीनशे रुपये रोज आहे.आमचे दहा दिवसाचे सहा हजार रुपये झाले. केवढा हा त्याग आणि त्यामुळे हे शिबिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. 

कोशिंबे गावचे सुपुत्र आनंदा नारायण खरे, प्रा.काशिनाथ नारायण खरे, प्रा.नामदेव नारायण खरे ह्या तिघे बन्धुनी त्यांचे आई-वडील स्मृतीशेष शांताबाई व नारायण सखाराम खरे यांच्या स्मृतिपित्यर्थ विहारात “बुद्धमूर्ती” दान केलेली आहे.तसेच प्रा.काशिनाथ खरे यांनी बुद्ध विहाराच्या आत मधील हालमध्ये त्रिसरण,पंचशील,भिमस्तुती,भिम-स्मरण,त्रिरत्न वंदना यांचे मोठे पोस्टर ठळकपणे बनवून कार्यक्रमाचे आदल्या दिवशी खास श्रामणेर संघासाठी बनवून घेतले व हालमध्ये लावलेले आहे. दिनांक ३०/०५/२०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता डीजेच्या मधुर तालावर “बुद्धम् सरणम् गच्छामी”, मंगलमैत्री  म्हणत पुढे पू.भन्ते डॉ.बी.सुमेध बोधी व एकाच रांगेत त्यांचा श्रामणेर संघ संपूर्ण गावातून “बुद्ध रूपाची” मिरवणूक काढण्यात आली.त्यासाठी गावातील सर्व आबाल वृध्द उपासक उपासिका बालमंडळी या मिरवणुकी सहभागी झाले.या शिबिराचं वैशिष्ट्य असे की आपल्या गावच्या लेकीबाळी,जावई,नातवंडे आपण सणाला बोलवतो त्याचप्रमाणे कोशिंबे गावातील लेकी,जावई नातेवाईक यांनी २९ तारखेला कोशिंबे गावात आले.प्रत्येक घरे भरुन गेली होती.हे मी डोळ्याने पाहिले.प्रत्येक घरामध्ये आठ/ दहा पाव्हणे होते. यावरून त्या लेकीबाळींना इतका आनंद झाला की,आम्ही पहिल्यांदाच आमच्या गावामध्ये एवढा मोठा सोहळा पाहतो आहे.कोशिंबे गावातील खरे,गांगुर्डे,कांबळे,शिंदे असे परिवार आहेत.त्यातील खरे परिवार हा फार मोठा आहे. 

     कोशिंबे गावचे भूमीपूत्र खरे परिवारातीलच डॉ.नानासाहेब खरे नाशिक येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ व त्यांच्या अर्धांगिनी डॉ.सुनीताताई खरे यांनी बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनाच्या दिवशी जी सभा झाली त्या सभेचे फार सुंदर रीतीने सूत्रसंचालन केलेले होते. सदर सभेमध्ये आद.गणेश शार्दूळ,प्रा.काशिनाथ खरे,वैशालीताई जाधव,आद.बाळासाहेब गायकवाड, व.भा.सोनवणे,बुधाभाऊ साळवे वडाळागाव,मिलिंद जाधव,चंद्रकांन्त पगारे व सुमंगल तथा रविंद्र अहिरे यांनी बुध्द मूर्ती प्रतिष्ठापना निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले.त्याचप्रमाणे डॉ.पती-पत्नी यांनी “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म” हा ग्रंथ प्रत्येक श्रामणेर यांना सप्रेम भेट म्हणून दिला.(रुपये ३००/- चा एक ग्रंथ याप्रमाणे वीस ग्रंथाचे वाटप या पती-पत्नीने केले आहे.) कोशिंबे गावातील जे उपासक उपासिका बाहेरगावी नोकरीसाठी शिक्षणासाठी आहेत ते मुद्दाम सुट्टी टाकून या कार्यक्रमासाठी मूर्ती प्रतिष्ठापना व श्रामणेर शिबिराची सांगता यासाठी गावात आलेले होते,आणि म्हणून हे शिबिर वैशिष्ट्यपूर्ण शिबिर झाले आहे.

खंत या गोष्टीची आहे.दिनांक ३०/०५/२०२६ रोजी आदरणीय डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब “सय्यद पिंपरी नाशिक येथे वर्धापन दिनानिमित्त व श्रामणेर शिबीर समारोपीय कार्यक्रमाला दुपारी आले होते,आणि त्याच दिवशी सकाळी अकरा वाजता कोशिंबे तालुका दिंडोरी या गावी “बुद्ध विहार उद्घाटन व बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना” होती. वेळे अभावी साहेबांना येता आलं नाही असेच मी म्हणेन परंतु यामध्ये जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणी यांचा समन्वय कुठे कमी पडला? असे मला आढळून आले. पू.भन्ते डॉ.बी सुमेध बोधी यांच्या हस्ते व त्यांच्या मार्गदर्शना खाली कार्यक्रम पार पडले.एकंदरीत मी शिबीरे केलीत.परंतु या कोशिंबेच्या शिबिराने मी खरोखर भारावून गेलो, विहाराच्या आवारात तंबाखू गुटखा खाऊन फिरणारा एकही तरुण मला आढळून आला नाही , किंवा मादक पदार्थ सेवन करणारा एकही राजवाड्यात मध्ये तरी मला दिसला नाही.एवढं पावित्र्य श्रामणेर शिबीराने गावामध्ये निर्माण केले. या शिबिरातून २० पैकी दहा उपासक माजी श्रामणेर हे संस्थेला बौध्दाचार्य म्हणून मिळतील याची मला पूर्ण खात्री आहे.

माझ्या परीने दिलेले विषय त्यांनी त्यांच्या परिने आपल्या वहीत नोंदवून घेतलेले आहे.शेवटी त्यांचे पेन संपले दुसरे पेन मागवावे लागले आणि शेवटी त्यांचे समाधान केल्याशिवाय मला थांबता येत नव्हते.संध्याकाळच्या प्रवचनालाही राजवाड्यातील आबालवृध्द गर्दी करत होते. हे पाहून मला फारच गहिवरून यायचं आणि त्यामुळे माझा घसा बसलेला असतानाही मी विविध विषयावर प्रवचन देत होतो.आम्ही श्रामणेर  शिबिर केले परंतु हे आगळे -वेगळे शिबिर माझ्या कायम स्मरणात राहील.श्रामणेर शिबीर समारोपीय कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष आदरणीय प्रदिप गांगुर्डे व सरचिटणीस सचिन बागुल कोषाध्यक्ष सोनवणे तसेच कार्यकारणी  उपस्थित होते.( श्रामणेर शिबीर समारोपीय कार्यक्रमाला पू.भन्ते डॉ.बी.सुमेध बोधी उपस्थित होते.तापी नाशिक जिल्हा पश्चिम विभाग कार्यकारणीतील एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता याबाबतीत मला फार वाईट वाटले.) सदर  श्रामणेर शिबीर समारोपीय दिवशी कैलास गायकवाड कार्यालयीन सचिव दिंडोरी तालुका,गणेश भडदिवे संरक्षण सचिव,नागेश गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते,पंकज गायकवाड सामाजिक कार्यकर्ते यांनी “माझी आत्मकथा” लेखक ज.गो.संत यांचा ग्रंथ (रूपये १२०/- प्रति ग्रंथ,) प्रत्येक श्रामणेर यांना भेट दिला.सदर शिबिराची काही छायाचित्रे सोबत आहेत.

सुमंगल तथा रविंद्र अहिरे केंद्रीय शिक्षक,९९२२८५१६२९ ,

जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल जळगाव जिल्हा पूर्व.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *