
संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकरासारखा नेता प्रत्येक मागास जातीस मिळावा.त्यांच्या नेतृत्वाखाली जशी प्रगती आजच्या बौद्ध बांधवांनी केली तशीच प्रगती स्त्रिया ओबीसी एससी एसटी यांनी केली तर समतेच्या तत्वाचा संविधानिक भारत आपण निर्माण करू शकतो.साऱ्या देशात मागासवर्गीय जातींच्या उत्कर्षासाठी आंबेडकरी चळवळ आज अपरिहार्य पर्याय म्हणून यशस्वी होत आहे.देशातील हा वैचारिक पर्याय ओबीसी एससी एसटी यांच्यासमोर कधीच येऊ नये. यासाठी बौद्ध विरुद्ध मातंग वाद, वैदिक हिंदुत्ववादी भाजपा संघपरिवाराने उभा केला आहे.”मुक्ती कोण पथे”हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण, हा लेख वाचणाऱ्या लोकांनी तात्काळ युट्यूबवर ऐकावे. अशी मी विनंती येथे करतो.याच भाषणात केवळ बौद्ध बांधवांचीच नाही. तर देशाच्या एकूण लोकसख्येच्या पन्नास टक्के स्त्रिया ,ओबीसी एससी एसटी यांच्या सर्वांगीण प्रगतीची दिशा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी छोट्याशा भाषणात म्हणजे केवळ पंधरा रुपयात, चैत्य भूमी दादर येथे मिळणाऱ्या पुस्तकात सांगितली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा बालपणात प्रत्यक्ष सहवास लाभलेले आगरी ओबीसी नेते ज्येष्ठ विद्दिन्य ॲड दत्ता पाटील यांनी एका मुलाखतीत “मुक्ती कोण पथे?”या भाषणाबद्दल जे सांगितले ते ओबीसींच्या प्रत्येक जातीने समजून घेतले पाहिजे.हे भाषण आणि छापील पुस्तक माझे सर्वात आवडते पुस्तक आहे .असे ते म्हणाले होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आदरणीय नारायण नागू पाटील (जागतिक कीर्तीचा कोकणातील चरी अलिबाग शेतकरी संपाचे), नेते यांचे ज्येष्ठ चिरंजीव ॲड. दत्ता पाटील होते.कोकणात चालविलेली खोत सावकार जमीनदारी विरोधातील भूमिहीन कुळ म्हणून आगरी कोळी कराडी कुणबी भंडारी या ओबीसी शूद्र जातींची चळवळ ही भौतिक सत्ता संपत्ती जमीन पाणी जंगल हक्कांची चळवळ नव्हती .तर मानव मुक्ती चळवळ होती.ही मुक्ती विषमता वाद पेरण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या वैदिक ब्राह्मणी धर्मापासून स्त्री शूद्र अतिशूद्र यांना मुक्ती देणाऱ्या महात्मा जोतिबा फुले,माता सावित्रीमाई फुले यांची चळवळ होती.यावर फारसे लिखाण अजून झालेले नाही.मी ॲड दत्ता पाटील यांच्या सोबत आणि ओबीसी नेते दि बा पाटील यांच्या सोबत काम केले आहे.दोघांचेही ध्येय हे आगरी समाजाबरोबर समस्त ओबीसी बांधवांना मनुस्मृतीच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्ती देण्याचे ऐतिहासिक कार्य होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली जमीन पाणी जंगल शिक्षण आरक्षण यांची आंदोलने काटेकोरपणे दत्ता पाटील आणि दि बा पाटील यांनी स्वातंत्र्यानंतर चालविली .त्यामुळेच इथल्या ठाणे रायगड पालघर मुंबई मधल्या भूमिपुत्र ओबीसींचे अस्तित्व अखंड संघर्षातून टिकले आहे.हा संघर्ष उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी निर्माण केलेल्या “अस्तित्वहीन” देव स्वर्ग नर्क आत्मा चमत्कार यांच्या विरोधातला आहे. देशातील वर्तमानात घडलेल्या अनेक घटना ओबीसी एससी एसटी यांना सतत जाग्या करीत असतात.ओबीसींच्या जमीन हक्कांची आंदोलने ,ब्राम्हणी धार्मिक आंदोलने उभी करून संपवण्याचे षडयंत्र पूर्वीचे खोत ब्राह्मण कोकणात करीत आहेत.राम जन्म भूमी आंदोलननाणे,ओबीसी मंडळ आयोगात जागे झालेल्या,ओबीसी लोकांस अक्षरशः झोपविले.यांचे अंतिम परिणाम पहा.ज्या संघपरिवाराने आपली सत्ता भाजपा मार्फत देशात आणली.त्यांनी रामाचे मंदिर हिंदू मुस्लिम दंगली घडवून बांधले.अयोध्येतील राम मंदिर हा ओबीसी एससी एसटी यांच्या,मनातील देव धर्म श्रद्धा यांच्या मार्फत पैसे जमा करण्याचा धंदा आहे.ही गोष्ट आता पोलिस न्यायालये मिडिया आणि जगाने मान्य केली.देशाच्या सऱ्या जमिनी उद्योग,विमानतळ,बंदरे,नोकऱ्या न्यायालये,निवडणूक आयोग EVM मशीन,ईडी यावर ताबा आता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचाच आहे.

दि बा पाटील हे दोन वेळा खासदार पाच वेळा आमदार झाले. रस्त्यावर हजारो आंदोलने करून. ब्राह्मणी विषमते विरोधात लढत होते.ही गोष्ट आज त्यांच्या नावासाठी लढणारे ओबीसी विसरले.मंडल आयोगाचे आंदोलन दि बा पाटील यांनी चालविले होते.ओबीसी आरक्षण,ओबीसींना आजही समजत नसेल ?तर तक्रार कुणाची करायची.?हा दोष आमच्यातील राजकीय,सामाजिक नेते,पत्रकार,साहित्यिक विचारवंत यांचा नाही का?.कुळ कायद्याने आम्हास सातबारा अधिकार जमीन मालकी मिळाली.ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आगरी नेते नारायण नागू पाटील यांच्यामुळेच ना?.कुणाविरुद्ध लढून? तर उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या जमीनदारी विरोधात लढून!. माझ्या मराठा ब्राह्मण तसेच वैश्य लोढा,अदानी या भारतीय बंधूंना माझा राग येतो.?परंतु सत्य हे आहे. माझ्या आगरी कोळी कराडी ओबीसींची गुलामी समजून घेऊन ती समजावणे हे माझे काम आहे.आपण उच्चवर्णीय जातींनी संविधान प्रक्रियेतून ओबीसींचे अधिकार मान्य केलेत .तर प्रश्न मिटू शकतो.परंतु सर्व संपत्ती आमचीच असावी ?या साम्राज्यवादात मनुस्मृती घेऊनच आजही आमची फसवणूक होतेच .
नवी मुंबई विमानतळाची जमीन आगरी कोळी कराडी ओबीसींची होती.इथल्या मराठा ब्राह्मण सीकेपी वैश्य राज्यकर्त्यांनी साडेबाविस टक्के भूखंड पॅकेज सांगून ती फसवून घेतली.माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी ही सिडको फसवणूक उघड केली.सिडको ही संस्था ओबीसी एससी एसटी यांच्या जमिनी पुन्हा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याकडे त्या जागा देण्याचे काम करते.अर्थात कुळ कायद्याने मिळालेल्या जमिनी पुन्हा जमीनदार जातींना देऊन ओबीसींना भूमिहीन करते.या विरोधात पाच हुतात्मे देऊन आम्हास साडे बारा टक्के विकसित भूखंड,सरकारी नोकऱ्या वाढीव भाव देणारे दि बा पाटील हे ओबीसींचे नेतृत्व करीत होते.त्यांनी चालविलेले आंदोलन हे ओबीसींच्या खऱ्या मुक्तीचे आंदोलन होते.ती मुक्ती आमच्या बुद्धीवर लादलेल्या ब्राह्मणी गुलामीतून साविधानिक समता स्वातंत्र्याकडे जाणारी मुक्ती होती.मागील काळात भाजपातील आगरी कोळी कराडी लोकांनी दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमान तळास मिळावे म्हणून आंदोलन केले.आता शेकाप शरद पवार गट,उद्धवजी ठाकरे गट.काँग्रेस आंदोलन करीत आहेत. त्यांचे. मनापासून आभार आहेतच.परंतु ज्या सामान्य स्त्रिया आगरी कोळी कराडी बारा बलुतेदार यांच्यासाठी दि बा पाटील यांनी आपले सारे जीवन अर्पण केले,त्यांनी स्वखर्चाने हे आंदोलन चालविले पाहिजे.

राजकीय पक्ष सत्तेसाठी दि बा पाटील यांच्या नावाचा वापर करीत आहेत.उच्चवर्णीय मराठा ब्राह्मण वैश्य हा शूद्र ओबीसी दि बा पाटील यांचे नाव कधी देणार नाहीत.असे मनुस्मृती सांगते.अर्थात निसर्गात न्याय आहे.८५टक्के ओबीसी एससी एसटी यांची नैतिक, नैसर्गिक ऊर्जा,मनुस्मृती धर्माच्या विषमते खाली दाबणे शक्य नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या साविधानिक मार्गावर ,आधुनिक विज्ञानवादी शिक्षणाच्या मार्गावर निघालेले ओबीसी नेते दि बा पाटील ,उद्याच्या तरुण पिढीला समजतील.?तेव्हा आज दि बा पाटील यांच्या नावास भाजपा काँग्रेस सर्व उच्चवर्णीय राजकीय पक्ष मनातून कसा विरोध करतात.हे सत्य समजेल.आज राजकीय नेते निवडणुकीत निवडून येईपर्यंत केवळ तोंडी आश्वासने देतात.हे सिद्ध झाले आहे.माझी विनंती तरुणांना आहे.चार्वाक बुद्ध महात्मा फुले सावित्री माई फुले राजर्षी शाहू महाराज डॉ बाबासाहेब आबेडकर यांना आदर्श मानणारे दि बा पाटील समजून घ्या.इतराना सांगा.मग आंदोलन करा.तुमची फसवणूक होणार नाही.या सर्वांनी तर्क करा.प्रश्न विचारा.असे सांगितले आहे.
राजाराम पाटील.८२८६०३१४६३.उरण जिल्हा -रायगड.

