
माणूस जन्मतः कोणत्याही विचारसरणीचा नसतो;तो ज्या विचारांच्या सहवासात वाढतो,त्या विचारांप्रमाणे त्याचे जीवन घडत जाते.म्हणूनच इतिहासात विचारांचे युद्ध हे शस्त्रांच्या युद्धापेक्षा अधिक प्रभावी ठरले आहे.भारतीय समाजात मनुवादी व्यवस्था आणि समतावादी आंबेडकरी विचार यांच्यातील संघर्ष हा केवळ राजकीय नाही,तर सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक संघर्ष आहे.मातंग समाजही या मनुवादी व्यवस्थेचाच बळी ठरला.अंधश्रद्धा,पोतराजपण, गावगाड्यातील कनिष्ठ भूमिका,दारोदारी भिक्षा मागण्याची व्यवस्था या मातंग समाजाच्या संस्कृती नव्हत्या.त्या त्याच्यावर लादलेल्या गुलामगिरीच्या साखळ्या होत्या. या व्यवस्थेतून बाहेर पडण्याचा मार्ग शिक्षण,स्वाभिमान आणि संघटन हाच होता.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या आंबेडकरी अनुयायांनी मातंग समाजाला या अंधश्रद्धेच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी मातंग वस्त्यांमध्ये जाऊन जयंती, सामाजिक कार्यक्रम,व्याख्याने आणि जनजागृतीच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेले आरक्षण आणि घटनात्मक अधिकार हे केवळ एका जातीसाठी नसून संपूर्ण अनुसूचित जातींसाठी आहेत,” हा संदेश मातंग वस्तीत जाऊन बौद्ध बांधवांनी सातत्याने पेरला.त्याचा परिणामही दिसू लागला.अनेक मातंग बांधव अंधश्रद्धेपासून दूर जाऊ लागले. पायातील चाळ काढून टाकत स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करू लागले.गावोगावी भिक्षा मागण्याची परंपरा सोडून शिक्षणाकडे वळू लागले. बौद्ध बांधवांचे शिक्षण,स्वाभिमान आणि सामाजिक प्रगती पाहून अनेक मातंग युवक प्रेरित झाले. आंबेडकरी चळवळीतून त्यांनी संघर्ष,संघटन आणि स्वाभिमानाचे धडे गिरवले. काहींनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला, तर अनेकांनी आंबेडकरी विचार आपल्या जीवनाचा मार्ग बनवला.गावगाड्यात मातंग समाजाची संख्या तुलनेने कमी असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय-अत्याचार झाल्यास अनेक ठिकाणी बौद्ध आंबेडकरी कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावून गेले.सामाजिक संघर्षात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची परंपरा निर्माण झाली.या सहवासातून मातंग समाजात शिक्षणाची आणि परिवर्तनाची नवी चेतना निर्माण झाली.

परंतु सामाजिक परिवर्तनाला विरोध करणाऱ्या मनुवादी प्रवृत्ती स्वस्थ बसल्या नाहीत. समाज एकत्र आला तर अन्यायकारी व्यवस्था कमकुवत होते,हे त्यांना ठाऊक होते. म्हणूनच त्यांनी मातंग समाजाला पुन्हा हिंदुत्वाच्या भावनिक चौकटीत अडकविण्याचा प्रयत्न सुरू केला.मनुवाद्यांनी वैश्विक बौद्ध व आंबेडकरी विचारांपासून दूर नेण्यासाठी त्याच्यासमोर लहूजी साळवे आणि अण्णाभाऊ साठे यांचा असा पर्याय उभा करण्यात आला.प्रत्यक्षात बौद्ध परंपरा आणि आंबेडकरवादी विचार हे सामाजिक न्याय व मानवी मुक्तीच्या परंपरेतील आहेत.मनुवादी व्यवस्थेकडून काही मातंग पुढाऱ्यांना हाताशी धरून आंबेडकरी चळवळी पासून समाजाला दूर नेण्याचा प्रयत्न झाला.ज्या चळवळीतून संघर्षाचे बाळकडू मिळाले,त्याच चळवळीविरुद्ध बोलण्याची मानसिकता तयार करण्यात आली.ज्या विचारांनी समाजाला स्वाभिमान दिला,त्याच विचारांविरुद्ध संशय निर्माण करण्यात आला.
मनुवादी प्रवृत्तीने फूट पाडण्यासाठी नवे हातखंडे वापरले.ज्यांच्या सहवासातून मातंग समाज शिक्षणाकडे वळला, त्यांनाच त्याचा शत्रू म्हणून दाखविण्यात आले. मनुवादी देव आपला भाऊ वाटू लागला आणि स्वतःच्या दुःखाचा इतिहास विसरून पारंपरिक शोषकच मित्र वाटू लागला. “बौद्धांनी मातंगांचे आरक्षण खाल्ले” अशा प्रकारचा प्रचार करून काही नेत्यांच्या माध्यमातून समाजात विष पेरण्याचे काम अनेक वर्षे चालू राहिले.त्याची परिणती आज अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनापर्यंत येऊन पोहोचली.वास्तव मात्र असे आहे की ज्या बौद्ध समाजाने शतकानुशतके अस्पृश्यता,जातीय अत्याचार आणि सामाजिक बहिष्कार सहन केला, त्याच समाजाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी शिक्षण,संघटन आणि स्वाभिमानाचा मार्ग स्वीकारून प्रगती साधली.त्या विचारांच्या प्रभावामुळे अनेक मातंग बांधवही पुढे आले.परंतु दुर्दैवाने काही जणांनी मनुवादी शक्तींनाच मित्र मानले आणि आपल्या ऐतिहासिक सहप्रवाशांनाच विरोधक समजण्यास सुरुवात केली.आरक्षण उपवर्गीकरण हा अत्यंत गंभीर आणि दूरगामी परिणाम करणारा विषय आहे. त्याचा विचार भावनेने नव्हे,तर घटनात्मक आणि सामाजिक परिणामांच्या दृष्टीने व्हायला हवा.अनुसूचित जातींची सामूहिक शक्ती कमी होणार नाही का? परस्परांमध्ये कायम स्वरूपी वैमनस्य निर्माण होणार नाही का? भविष्यात आरक्षण अधिक कमकुवत करण्याचा मार्ग मोकळा होणार नाही का? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे समाजाने शोधली पाहिजेत.
आजही शासन,प्रशासन,मंत्रालये,विद्यापीठे,न्यायव्यवस्था,सचिव,उपसचिव,कुलगुरू, उच्च प्रशासकीय पदे आणि निर्णयप्रक्रिया यांमध्ये कोणाचे वर्चस्व आहे, हा मूलभूत प्रश्न आहे.सर्वांचेच आरक्षण कोणी खाल्ले आहे? अनुसूचित जातीतील समाजांनी एकमेकांविरुद्ध संघर्ष करण्यात वेळ घालवण्याऐवजी या व्यापक वास्तवाकडे पाहिले पाहिजे. अन्यथा आरक्षणाची व्याप्ती संकुचित होत जाईल आणि भविष्यात केवळ काही मर्यादित साफसफाई कर्मचारी,शिपाई क्षेत्रांपुरतेच ते उरेल,अशी भीती व्यक्त केली जात आहे.
आजही बौद्ध समाज संख्येने मोठा असूनही अनेक ठिकाणी संयमाने मातंग बांधवांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण त्यांचा विश्वास आहे की गैरसमज कायम राहत नाहीत.संवादातून हृदयपरिवर्तन घडू शकते.म्हणूनच मातंग समाजाने कोणत्याही भावनिक प्रचाराला बळी न पडता,आरक्षण उपवर्गीकरणाच्या प्रश्नाचा सखोल विचार करावा.सरकार जर व्यापक चर्चा घडवून आणत नसेल,तर अनुसूचित जातीतील सर्व समाजांच्या परिपक्व नेतृत्वाने एकत्र येऊन साधक-बाधक चर्चा करावी. कारण विभाजनात कोणाचाही दीर्घकालीन फायदा नाही; तर एकात्मता, शिक्षण आणि घटनात्मक संघर्षातच सर्वांचा भविष्यकाळ सुरक्षित आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे.शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या संदेशात कोणत्याही एका जातीचा नव्हे,तर संपूर्ण वंचित समाजाच्या मुक्तीचा मार्ग सामावलेला आहे.
डॉ.प्रदीप शिंदे- ७३८५६३५५०५ ,सातारा

