2554 वी धम्म जयंती निमित्ताने…

धम्मातील आचरण असो धम्म इतिहास किंवा धम्मातील काढलेल्या तार्किक अनुमानासंबंधी असो जगातील बौध्द धम्मीयांमध्ये अजूनही एकवाक्यता आलेली दिसून येत नाही. प्रत्येकजण आपापल्या परिने बौध्द धम्माचा अर्थ लावून श्रेयवादाला चालना देत आहेत. कदाचित तथागत महामानव गौतम बुध्दांनी आपल्या अनुयायांना दिलेले सम्यक स्वातंत्र हे बौध्दांना स्वैराचार वाटत असावे. त्यातूनच हिनयान, महायान, वज्रयान इ.पंथ निर्माण केले. काही बौध्द राष्ट्रात बुध्दांना जगात जे रूपच नाही ते ईश्वररूप मानले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी 1956 ला नागपूर येथे धम्म दीक्षा घेवून व उपस्थितांना दीक्षा देवून बुध्दांचा धम्म दिला. त्यानी बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर घडलेल्या कोणत्याही हीनयान, महायान, व्रजयान इत्यादी पंथाचा पुरस्कार केला नसतानाही काही लोक बाबासाहेबांनी स्वीकारलेला धम्म म्हणजेच ‘आंबेडकरवादी बौध्द धम्म’, ‘नवयान पंथ’ असा अनुमान काढत आहेत. म्हणूनही बौद्धांमध्ये एकवाक्यता दिसून येत नसावी.
सन 1956 पुर्वी भारताच्या उत्तरेकडील लेह, लडाख व ईशान्य भारताकडील अरूणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम, मणीपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम इ. राज्य वगळता अन्य राज्यात बौध्द धम्म केवळ नावालाच होता. महाराष्ट्रात तर शोधूनही बौध्द सापडत नव्हते. बौध्द धम्म जवळपास एक हजार वर्षे महाराष्ट्रासह भारतातील बहुतांशी प्रदेशातून नामशेष झाला होता. नामशेष का झाला? नामशेष कोणी केला? त्याला जबाबदार कोण? याचे उत्तर धम्म शत्रूसह पुन्हा बौध्द झालेल्यांचे पुर्वजही आहेत. इंग्रज येईपर्यंत धम्माची ओळख सांगणार्या लेण्याची संस्कृती झाडा झुडपात लपवली आणि मातीत गाडली होती. दि.28 एप्रिल 1819 रोजी इंग्रज लष्कर अधिकारी जॉन स्मिथ व त्यांचे सहकारी शिकारीला गेले असता सुमारे बावीशे वर्षापुर्वीच्या अजंठा येथील बुध्दांच्या धम्म संस्कृतीचा इतिहास सांगणार्या लेणी त्यांच्या दृष्टीस पडल्या. त्यानंतर इंग्रजानी बुध्दांमुळे या देशात निर्माण झालेली धम्माची महान संस्कृती जगासमोर आणली. जमीनीत पेरलेल्या बियांचे मूळ कधी नष्ट होत नाहीत, बिया मातीशी एकरूप होतात तसे बौध्द धम्म संपणार नाही. तो इथल्या मातीशी एकरूप झाला आहे.
इंग्रज धम्माच्या मुळापर्यंत गेले आणि त्यानी अविरत प्रयत्न करून बुध्दभूमीतील धम्म संस्कृती हिच भारताची खरी संस्कृती असल्याचा अनुमान काढला. सम्राट अशोक राजा, राजा कनिष्क यानी जम्बिुद्वप भारताच्या पश्चिमकडील प्रदेशात धम्म रूजवला होता. आफगाणिस्तान हा एकेकाळी जगातील धम्माची दुसरी राजधानी मानली होती. ज्या प्रदेशात ज्याना धम्म विज्ञान झेपणे अशक्य झाले त्यानी इस्लाम धर्म जन्माला घातला. पुढे इस्लाम समर्थक झालेले बौध्दच धम्म नष्ट करण्यासाठी धम्माच्या मूळापर्यंत म्हणजेच जम्बुद्विप भारताच्या पुर्वकडील भागापर्यंत आलेत. हेच इथल्या परकीय आर्याना हवे होते. मनुवाद्यांनी त्यांचे स्वागत केले. दोघांनी मिळून धम्माची संस्कृती नावाला ठेवली. इंग्रजांनी पुन्हा धम्म संस्कृतीला चालना दिली आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी लोकांना धम्म स्वगृही आणले व आणण्याचा मार्ग दिला.बुध्द जयंतीनंतर धम्म जयंतीला प्राधान्य-गौतम बुध्दांनी जगातील मनुष्याच्या दुःखाचे कारण शोधण्यासाठी भौतिक सुखासह राजमहलाचा त्याग केला आणि दुःख निवारण्याचे उपाय शोधून काढले. म्हणूनच जगातील कोणत्याही मनुष्याने धम्माचा मार्ग अवलंबला, तर त्याचे दुःख हमखास नाहिसे होते. बुध्दांनी आपला उत्तराधिकारी धम्म असल्याचे जाहीर करून माझ्या पश्चात माझे उपदेश हे धम्मोपदेश असतील असे सांगितले. बुध्दांकडून धम्माची स्थापना झाली ती मुलतः मानवाचे दुःख निवारण्यासाठी. धम्मामुळेच मानव दुःखमुक्त जगण्यासाठी प्रयत्न करू शकतो. नसलेल्या अदृश्य शक्ती की जे देव, ईश्वर नावाने मानली जाते त्यावर विश्वास ठेवू नका असे धम्म सांगतो, स्वयंप्रकाशित होण्यास सांगतो, धम्म ‘तू तुझा शिल्पकार’ असल्याची सतत जाणीव करून देतो, धम्म मानवाला निसर्ग नियमाचे पालन करण्यास सांगून विज्ञानवादी बनवतो. धम्म निष्कारण हिंसा करू नका, निष्कारण चोरी करू नका, निष्कारण खोटे बोलू नका, निष्कारण दारू व मादक द्रव्याचे सेवन करू नका, कारण असो वा नसो व्यभिचार करूच नका म्हणून सांगतो. धम्म हा माणसाला मानवतावाद समाजवाद, समतावाद, धर्मनिरपेक्षवाद शिकवतो, धम्म हा माणसाला आपण मिळवलेले ज्ञान दुसर्याला विनामोल देणेस सांगतो. धम्म दुसर्याच्या दुःखात सहभागी होण्यास सांगतो, धम्म आपल्या आनंदात दुसर्याला सामील करून घेण्यास सांगतो, भूकेलेल्यांना अन्न, वस्त्र, निवाराची सोय करण्यास सांगतो. मग सणाचा आनंद असो. धम्म आपले ते आपले, दुसर्याचे आपले नसल्याची शिकवण देतो, धम्म मानवाला त्या त्या कालखंडात जर बदल झाला असेल आणि तो दुःखमुक्त व मानव कल्याणसाठी योग्य असेल,तर तो स्वीकारणेस मुभा देतो. धम्म स्वसंहितेत सांगितलेले अंतिम सत्य असल्याची सक्ती करत नाही, चिकित्साला प्राधान्य देतो, धम्म परिस्थितीनुसार बदल अपेक्षित मानतो, धम्म हा सत्यालाच सत्य मानतो म्हणूनच बुध्दांचा धम्म हेच अंतिम सत्य असल्याचे 2553 वर्षे दिसून येत आहे.
तत्ववेत्ता कपिल यांचा अनुमान सिध्दांत-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी आपल्या ‘बुध्द अॅन्ड हिज धम्म’ या ग्रंथात प्राचीन काळातील तत्ववेत्ता कपिल यांनी सांगितलेल्या सिध्दांताप्रमाणे सत्याची सिध्दता पटविण्यासाठी त्यांचे तत्व प्रमाण मानले आहे. सदर ग्रंथात बाबासाहेब म्हणतात, ‘कपिल यानी सिध्दतेचे दोन मार्ग मानले 1.प्रत्यक्ष ज्ञान (प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे – आपल्या समोरील वस्तूंचे आपल्या मनाला होणारे आकलन) आणि 2.अनुमान. (अनुमान तीन प्रकारचे आहेत. – 1.कारणावरून कार्य ओळखणे, जसे ढगांच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणे 2.कार्यावरून कारण ओळखणे, जसे दरीतून वाहणार्या ओहोळाला पूर आल्यावरून डोंगरावर पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे. 3. साम्य, जसे – मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो असे आपण अनुमान काढतो. त्याचप्रमाणे ज्याअर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी दिसतात त्याअर्थी त्यांना गती असली पाहिजे.).’ कपिल यांच्या सिध्दांतातील अनुमान जसे सत्यता सिध्द करणारे ठरतात त्यापध्दतीने लिखित पुरावे नसल्याने धम्म जयंती, धम्मचक्र प्रवर्तन, धम्मक्रांती, गुरू-शिष्य दिन व भिक्खू वर्षावास प्रारंभ दिन या उत्सवांचा ज्या दिवशी एकत्र संघम झाला आहे त्या दिनास धम्म पौर्णिमा म्हटले गेले हे मान्य केले पाहिजे.
धम्म जयंती- इ.स.पुर्व 534 ला अखिल मानवाच्या दुःखाचा शोध घेण्यासाठी सिध्दार्थ शाक्य यानी राजमहल व वैवाहिक संसाराचा त्याग केला. सहा वर्षानी, इ.स.पुर्व 528 ला तथागत गौतम बुध्दांच्या तपश्चर्याला यश आले. त्याना मानवाच्या दुःख निवारण्याची सम्यक संबोधी प्राप्त झाली. त्याना निसर्गातील सुप्त ज्ञानशास्त्राबरोबरच मानवशास्त्राचाही शोध लागला. ते ज्ञान म्हणजेच धम्मज्ञान. हे धम्मज्ञान पहिल्यांदा कुणाला सांगावे? हा त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला, तेव्हा त्याना आपले मार्गदर्शक बुध्दिवान आलारकलाम किंवा उद्दकरामपुत्त याना सांगावे असे वाटले. पण दोघांचेही मृत्यु झाल्याचे समजले.त्यानंतर आपल्या सोबत महानाम,अश्वजीत, वप्प, भद्दीय व कौडिण्य हे पाच परिव्रजक तपश्चर्याला बसले होते की त्यानी आपली सेवा केली,काळजी घेतली म्हणून ते आपल्या धम्मज्ञानाचे हक्कदार असल्याचे त्यानी जाणले. त्यांचा शोध घेता ते उत्तरेकडील सारनाथला इसिपतनच्या मृगदायवनात वास्तवाला असल्याचे समजले. तेथे जावून त्याना धम्म ज्ञानाचा उपदेश केला. तो दिवस आषाढ शुक्ल महिन्याच्या पौर्णिमातील आजचा दिवस. गौतमांच्या उपदेशाने ते अत्यंत प्रभावित झाले. त्याना पटले. बुध्दांचे पहिली देसना ही धम्मोपदेश असल्याचा अनुमान काढला. तो धम्मोपदेश म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन केल्याचे म्हणजेच बौध्द धम्माची स्थापना झाल्याचाही अनुमान काढला. हा अनुमान अगदीच योग्य व बरोबरच आहे. त्यामुळे धम्मात जितकेही सण (उत्सव) आहेत. त्या उत्सवाच्या अनुक्रमाणिकामध्ये धम्म जयंती उत्सव हा बुध्द जयंती उत्सवानंतर दुसर्या क्रमांकाचा उत्सव आहे.
पहिली व अंतिमतः धम्मक्रांती- गौतम बुध्दांनी त्यांच्यापुर्वीच्या इतर बुध्दां (बुध्द म्हणजे ज्ञान. जे ज्ञान प्राप्त करत होते त्याना बुध्द नावाची उपाधी समाजातून दिली जात होती. असे ज्ञानी लोक) प्रमाणे केवळ ज्ञान सांगण्याचे काम केले नाही, तर आपले ज्ञान व्यक्तीकेंद्रित न ठेवता संस्थाकेंेद्रित केले. त्यांच्या हातून पृथ्वीतलावर सर्वप्रथम बौध्द धम्म नावाची एक धार्मिक संस्था स्थापना झाली. बौध्द धम्म या संस्थाच्या माध्यमातून लोकांना ते धम्म दीक्षा देवू लागले. ज्ञान उपदेश देवू लागले. धम्माचा प्रसार होवू लागला. त्यामुळे त्यांच्या हातून धम्मक्रांती झाल्याचाही अनुमान काढला. त्यांच्या धम्मक्रांतीच्या चळवळीत लोक सहभागी होवू लागले. क्रांती यशस्वी करू लागले. याचा अर्थ त्या लोकांनी धम्मक्रांती केली असा अर्थ होवू शकत नाही. एका घटनेची एकदाच क्रांती होते. जर का घडवलेली घटना पृथ्वीवरूनच कायम स्वरूपी लुप्त झाली असेल आणि त्यानंतरच्या पुढील पिढीला त्या घटनेचा मागमोसही नसेल तर अशावेळी त्यानी ती घटना निर्माण केली तर त्या घडलेल्या किंवा घडवलेल्या घटनेला क्रांती म्हणणे योग्य ठरेल. पण धम्मक्रांती नावाची घटना गेली अडिच हजार वर्षे चालत आलेल्या मनुष्याच्या पिढ्यान पिढ्यातील लोकांना माहित असताना त्या घटनेचे अन्य कोणीतरी अनुकरण केले म्हणून त्यांच्या कृतीस क्रांती हा शब्द लागू पडत नाही. तथागत बुध्दांनी केलेली धम्मक्रांती अडिच हजार वर्षानंतर आजही लोकांच्या स्मरणात आहे. म्हणूनच ती क्रांती पहिली व अंतिमतः ठरली जाणार आहे. स्वयंम सम्राट अशोक राजा अथवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर असोत किंवा जगातील कुणीच बुध्दांनुयायांनी आपण धम्मक्रांती केली असे म्हटल्याचे इतिहासात नोंद नाही. मग डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी धम्म स्वीकारला तो 14 ऑक्टोबर 1956 हा दिन ‘धम्मक्रांती दिन’ कसा असू शकेल? किंवा बाबासाहेबांनी बुध्दांचा क्रांतिकारी निर्णयाचे अनुकरण करणे म्हणजे बाबासाहेबांनी धम्मक्रांती केले असा अनुमान काढता येणार नाही. बुध्दांनी पाच परिव्रजकांना धम्म ज्ञान देवून धम्मज्ञान देण्याच्या प्रचाराला प्रारंभ केल्याने ती घटना धम्मक्रांतीची असल्याचा अनुमान काढला आणि धम्म जयंती दिनाबरोबर धम्मक्रांती दिन म्हणूनही ओळखू लागला. जोपर्यंत सूर्य, चंद्र, तारे असतील तोपर्यंत धम्म राहिल त्यामुळे बुध्दांची धम्मक्रांती ही पहिली व अंतिमतः असेल हा अनुमान पुढील पिढीतील शहाणे लोक काढतील.
पहिले व अंतिमतः धम्मचक्र प्रवर्तन – गौतम बुध्दानी संबोधी प्राप्ती नंतर इ.स.पुर्व 528 च्या आषाढातील शुक्ल पौर्णिमाला पाच परिव्रजकांना सारनाथ येथे प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपेदश करून धम्मचक्र प्रवर्तन केल्याचा अनुमान काढण्यात आला.हा अनुमान आजही अंतिमतःही मानला जातो. मूळात प्रवर्तनाचा अर्थ मराठीत समजन घेतला पाहिजे. प्रवर्तन म्हणजे स्थापना किंवा आरंभ. धम्माची स्थापना ही बुध्दांनी केली आहे. मग पुन्हा धम्माची स्थापना पुन्हा करण्याची गरज आहे का? मग बाबासाहेबांच्या धम्म दीक्षा सोहळ्याला धम्मचक्र प्रवर्तन का म्हटले जाते? म्हणून आजच्या लोकांना तथागत गौतम बुध्दांनी प्रवर्तन केलेले धम्मचक्र हे पहिले व अंतिमतः असल्याचे तार्किकदृष्टया मान्य केले पाहिजे. भविष्यातील पिढीलाही मान्य करावे लागेल. बुध्दांशिवाय जगातील कुणालाच धम्मचक्र प्रवर्तनाचे श्रेय घेता येणार नाही व देता येणार नाही.
गुरू-शिष्य दिन – गौतम बुध्दांनी ज्या पाच परिव्रजकांना प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपदेश केल्यानंतर त्यानी बुध्दांना आपले गुरूस्थानी मानले म्हणून कालांतराने आषाढ पौर्णिमाचा दिवस गुरू-शिष्याचा दिवस असल्याचा बौध्दांनी अनुमान काढला. गुरू-शिष्य नात्याचा उत्सव साजरा झालाच पाहिजे. मुलतः वर उल्लेख केल्याप्रमाणे बुध्दांनी आपला उत्तराधिकारी धम्म असल्याचे सांगितते आहे. एखाद्या व्यक्तीचे गुरू अनेक असू शकतात पण धम्म ही संस्था अनेक होवू शकत नाही. प्रत्येक कालखंडात जन्माला येणार्या मनुष्याचे गुरू बदलत असतात किंवा अनेक गुरू होवू शकतात, शिष्यांचे अनेक गुरू होवू शकतात. त्यामुळे गुरू-शिष्य दिन मध्ये वाढ होवू शकते, पण त्यांच्यासाठी बुध्दांनी दिलेला एकच धम्म राहणार आहे. म्हणून धम्म जयंती उत्सवाला अधिक महत्व दिले पाहिजे.
धम्म पौर्णिमा की गुरू पौर्णिमा?-आषाढातील पौर्णिमाला स्थापन झालेल्या बौध्द धम्माचा प्रसार इतक्या मोठ्या प्रमाणात झाला की जे बौध्द धम्मात आले त्यानी पुढे धम्मचक्र प्रवर्तन दिन, धम्म जयंती, धम्मक्रांती दिन, गुरू-शिष्य दिन व भिक्खू वर्षावास प्रारंभ दिनाचे स्मरण व्हावे म्हणून आषाढ पौर्णिमा ही धम्म पौर्णिमा या नावाने परिचित केली. जगातील प्रत्येक धर्मियांनी पौर्णिमाला आपल्या धर्म संस्कृतीची नावे दिली आहेत. मग बौध्दांनी आषाढातील पौर्णिमा बौध्द धम्म हे नाव दिले असेल तर त्यात चूक काय? ब्राम्हणी धर्मात आषाढ पौर्णिमालाच गुरू पौर्णिमा हे नाव दिले आहे. कदाचित बौध्द धम्माची स्थापना दिनोत्सव ओळखता यावा म्हणून आषाढ पौर्णिमाला धम्माचे नाव दिले असू शकते. जसे वैशाखातील पौर्णिमाला झालेला बुध्दांचा जन्म दिन हा बुध्द पौर्णिमा व सम्राट अशोक राजा यानी अश्विनी शुक्ल पौर्णिमाच्या दहाव्या दिवशी घेतलेल्या धम्म दीक्षा दिनाला ‘सम्राट अशोक धम्म विजया दसमी’ मध्ये, ज्येष्ठ पौर्णिमा ही ‘वर सुजाता पौर्णिमा’ म्हणून परिवर्तीत केले असावे. त्यामुळे आजच्या भिक्खू, बौध्द उपासक/उपासिकांनी आषाढ पौर्णिमा ऐवजी धम्म पौर्णिमा असाच उल्लेख केला पाहिजे. पण आश्चर्य वाटते, बहुतांशी धम्म पौर्णिमा असो अथवा अश्विनी शुक्ल महिन्यातील पौर्णिमाला दिलेले नाव धम्म संस्कृतीमधील भिक्खू संघ पौर्णिमा असो. असा उल्लेखच करत नाहीत. उलट आषाढ पौर्णिमाला गुरू पौर्णिमा संबोधून धम्म पौर्णिमा आणि त्या पौर्णिमाला कोणत्या घटना घडल्यात याचे महत्व कमी केले जात आहे. बुध्दांना त्या पाच परिव्रजाकांनी गुरू मानले. म्हणून ती धम्म पौर्णिमा ऐवजी गुरू पौर्णिमा म्हणता येणार नाही. आम्हीही यापुर्वी गुरू पौर्णिमाच म्हणत होतो. पण कपिलच्या अनुमानानुसार तर्क केला असता धम्म पौर्णिमाला गुरू पौर्णिमा म्हणता येत नाही असा अनुमान निघतो. म्हणून आजच्या सुधारित लेखापासून गुरू पौर्णिमा ऐवजी गुरू-शिष्य दिन असेच संबोधले जाईल.
भिक्खू वर्षावास प्रारंभ दिनोत्सव- पावसाच्या (वर्षा) काळात भिक्खूंना धम्म प्रचार व प्रसारासाठी बाहेर पडण्यास अनेक नैसर्गिक अडचणी येत होत्या. प्रसंगी त्यांच्या जीवावर बेतले जात होते. अशावेळी भिक्खूंना पावसाच्या दिवसात गावोगावी जावून धम्म प्रचार व प्रसार करणे शक्य नसल्याने पावसाचे तीन महिने भिक्खूंनी एकत्रित एखाद्या विहारामध्ये वास (थांबून) करून तेथे धम्मावर चिंतन मनन करावे यास बुध्दांनीच मान्यता दिली. भिक्खूंच्या या ‘थांबा’लाच भिक्खू वर्षावास असल्याचा अनुमान काढण्यात आला. हा भिक्खू वर्षावास बौध्द धम्म जयंती (धम्म पौर्णिमा (आषाढ पौर्णिमा)) ते भिक्खू संघ जयंती (संघ पौर्णिमा (अश्विन पौर्णिमा)) पर्यंत चालतो. वर्षावास हा खास भिक्खू संघासाठी आहे, उपासक व उपासिकांसाठी नाही. म्हणूनच तीन महिन्याच्या निवास हा ‘भिक्खू वर्षावास’ असल्याचा अनुमान काढला गेला. तीन महिने विहारात येवून उपासक/उपासिका भिक्खू संघाकडून धम्म ज्ञान घेतात. तीन महिने भिक्खू संघाने भिक्षा मागणेस बाहेरदेखील पडायचे नाही. भिक्खू संघाला उपासक/उपासिकांनी विहारात आणून भोजन व फलाहार दान करायचे. तत्पुर्वी वर्षावास आरंभ दिवशी म्हणजे आजच्या (29 जुलै) दिवशी भक्खूंचे गावातील वेशीवर स्वागत करून सवाद्य मिरवणुकीने त्याना सन्मानाने गावातील बुध्द विहारात आणले जाते व संघ पौर्णिमाला त्याना चिवर व अन्य वस्तूंचे दान करून सवाद्य मिरवणुकीने गावातील वेशीवर आणून त्यांना सन्मानपूर्वक निरोप घ्यायचा असतो.
धम्म आणि डॉ.बाबासाहेब-सर्व घटनांचा एकत्रित सार करून धम्म पौर्णिमा उत्सव साजरा करत असताना पहिल्यांदा धम्म जयंतीला पहिले प्राधान्य दिले पाहिजे. तरच धम्म पुढे जावू शकतो. बौध्द धम्मानेच जगाचा उध्दार होणार असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ठामपणे सांगितले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी 15 ऑक्टोबर 1956 रोजीच्या नागपूर धम्म दीक्षा समारंभात भाषण करताना विशेषतः महार समाजाला एक उपदेश केला असला तरी तो उपदेश सर्वच समाजातील लोकांनी की ते धम्मात येणार असतील तर त्याना लागू पडतो. म्हणतात, ‘मात्र तुमची जबाबदारी मोठी आहे. तुमच्या बद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौध्द धर्माच्या दृृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे. म्हणून आपण उत्तमरितीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाही तर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे होवू नये म्हणून आपण दृढनिश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उध्दार करू. कारण बौध्द धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे.’
धम्मानुसार विधी करणारे धम्म जयंती साजरी करतील का?- वरील टिपण वाचता धम्म किती श्रेष्ठ आहे हे समजून येईल. पण धम्मातील दोन नंबरचा उत्सव असलेला धम्म जयंती उत्सवाबद्दल किती लोकांना उत्सुकता लागून राहिली असावी? जे आपल्या घरातील लग्न, गृहप्रवेश, नामकरण, मरणोत्तर विधी धम्माच्या विधीने करतात त्यातील एक टक्काही लोकांना धम्म जयंतीचे देणेघेणे नाही. हे लोक बौध्द पध्दतीने विधी का करतात हेच समजत नाही. विधी लावणारे विधी कर्ते, भिक्खू यांना धम्म जयंतीचे सोयरसुतक नसल्याचे भयावह चित्र आहे.
दिवाळी सण बौध्दांचा आहे म्हणणारे- हिंदू धर्मातील दिवाळी सण हा बौध्दांचा आहे, तो हायजॅक केला आहे असे लिखाण करणारे दिवाळी सणाच्या दरम्यान अवतरतात. तसेच त्यांच्या लिखाणाचा संदर्भ देवून ज्यांना ब्राम्हणी सण दिवाळी साजरी करायची असते ते देखील बौध्दांची दिवाळी असल्याचे सांगत आपल्या घरात दिवाळी सण साजरा करतात. क्षणभर मान्य करू. पण जे बौध्दांची दिवाळी आहे म्हणतात ते कधीच रविवारी विहारात दिसत नाहीत, घरात रोजची वंदना घेत नाहीत, धम्म जयंतीसह धम्मातील अन्य सण साजरे करत नाहीत धम्म जयंती साजरी करत नाहीत. जर धम्माचे उत्सव साजरे करणार नसतील तर ते बौध्द नाहीत. त्यांना दिवाळी साजरी करायची असेल तर बेशक करावी पण उगीच दिवाळी सण धम्मातील आहे असे खोटे सांगून धम्माच्या सण संस्कृतीला गालबोट लावणे कितपत योग्य आहे? बुध्द हे विष्णूचा अवतार म्हणणार्या ढोंग्यांनीही गोलबोट लावता कामा नये. धम्माची स्थापना झाली म्हणूनच इतर पाच घटना घडल्या आहेत. म्हणूनच आजच्या दिवशी प्रथमच धम्म जयंती साजरी करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. सर्वांना 2554 व्या बौध्द धम्म जयंती व धम्म पौर्णिमा, धममचक्र प्रवर्तन, गुरू-शिष्य दिन, भिक्खू वर्षावास आरंभ दिन उत्सवाच्या हार्दिक मंगल कामना.
मुख्य संपादक देवदास बानकर ९२२५८०६९९० ,दैनिक मुक्तनायक कोल्हापूर

