निंदा धम्माची नाही,तर मग कुणाची निंदा होते.

बातमी शेअर करा.

दैनिक मुक्तनायक गेले 10 दिवस धम्म पौर्णिमाला घडलेल्या पाच घटनांचा उत्सव साजरा करण्यासंबंधी रूपरेषा देत आहे. हे यंदाच नव्हेे तर मागील सात वर्षापासून धम्म जयंती साजरी करण्यासंबंधी रूपरेषा देवून बौध्द धम्मातील दोन नंबरच्या मोठ्या सणाची आठवण करून देत आहे. मुक्तनायक वाचणार्‍यांपैकी एक टक्का तरी धम्मचक्र प्रवर्तन दिन अर्थात स्थापना दिन अर्थात धम्म जयंती साजरी करतात का? आम्हालाही माहित आहे की किती लोकांना धम्माबद्दल प्रेम व आस्था आहे. तरीही लोक बदलतील या विश्‍वासावर धम्म जयंतीची आठवण करून देत आहे. सन 1956 नंतर जे बौध्द झालेत त्यानी धम्माला गांभिर्याने घेतले का? धम्म केवळ लग्न व मरणापुरताच मर्यादिइ्रत ठेवला. पण धम्माइतका श्रेष्ठ धर्म दुनियात नाही हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. तथागत गौतम बुध्दांनी बौध्द धम्माला धर्मशाळा करावी म्हणून धम्माची स्थापना केली नव्हती. धम्माला ब्राम्हणी धर्माची शाखा किंवा त्या धर्माच्या जातीचा करावा म्हणून जन्माला घातलेले नाही की डॉ.बाबासाहेब आंंबेडकर यानी दि.14 ऑक्टोबर 1956 रोजी धम्म दिक्षा सोहळा घेतला नव्हता. राजा बिंबिसार, राजा अजातशत्रू, राजा प्रसेन्नजीत, सम्राट अशोक, राजा कुणाल मौर्य, राजा दशरथ मौर्य, राजा सम्प्रती मौर्य, राजा शालिसुक मौर्य, राजा देववर्मा मौर्य, राजा शतधन्वा मौर्य, राजा बृहद्रथ मौर्य, राजा कनिष्क,राजा नागराजा,सम्राट कनिष्क,राजा मिलिंद,राजा शिलाहार,राजा हर्षवर्धन, राजा राजवर्धन,राजा गोपाल इ. प्रमुख राजांनी धम्माचा प्रसार केला तो धम्म बाटविण्यासाठी नव्हे. धम्म हा माणसातला माणूस जागा करतो, धम्म माणसाला निसर्गाच्या विरोधात कृती करण्यापासून रोखतो, 

    धम्म विज्ञानाने चिकित्सा करण्यास सांगतो, धम्म हा सत्याला सत्य मानण्यास शिकवतो, धम्म हा निसर्गातील अस्तित्व स्वीकारण्यास सांगतो धम्माचे, धम्म हा माणसाच्या दुःखाचे निवारण करतो. म्हणूनच अडिच हजार वर्षे ओलांडले तरी धम्म संपलेला नाही. या दरम्यान, धम्माला अनेक काच खळग्यातून जावावे लागले, अनेक संकट झेलावे लागले, लोक धम्माला सोडून गेलीत. (उदा. सम्राट अशोक काळात आजचा महाराष्ट्र बौध्दमय होता. पण सन 1956 च्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म दीक्षा घेईपर्यंत महाराष्ट्रात एकही रजिस्टर बौध्द धम्मीय नव्हता. मग सम्राट अशोक काळातील बौध्द कुठे गेले? त्यानी धम्माला ठोकरले, हे सत्य असताना धम्माची साथ सोडून पलायन करणार्‍यांचे आज कालचे वंशज म्हणतात 1956 च्या 14 ऑक्टोबरला धम्मक्रांती झाली.असे म्हणणे म्हणजे बुध्दांच्या धम्मक्रांतीला आदरांजली वाहणे.) पण धम्म संपला नाही. धम्माची गरज पुन्हा भासली म्हणून 1956 नंतर देशात धम्म दीक्षाचे कार्यक्रम होत आहेत. जगातील बहुतांशी राष्ट्रात धम्म रूजलेला आहे. पैकी भूतान, व्हियतनाम, जपान, थायलंड, श्रीलंका, उत्तर व दक्षिण कोरिया, म्यानमार, मंगोलिया, तैवान, चीन तपैई इ राष्ट्रे ‘धम्म राष्ट्रे’ म्हणून ओळखली जातात. जगात तीन नंबरची संख्या धम्मीयांची आहे. जितके वैशिष्टे सांगता येतील तितके कमी आहे. गेल्या अडिच हजार वर्षात स्वार्थी लोक धम्मापासून दूर गेलीत पण धम्माने त्याना कधीच नाकारलेले नाही याचा प्रचिती दि.14 ऑक्टोबर 1956 च्या धम्म दीक्षापासून ते आजपर्यत होत असलेल्या धम्म दीक्षा सोहळ्यावरून येत आहे. अशा माणसाला दुःखमुक्त करणार्‍या धम्माचा आज धम्मचक्र प्रवर्तन दिन अर्थात स्थापना दिन आहे अर्थात स्थापना दिन आहे. यालाच धम्म जयंती म्हटले जाते. यालाच बुद्धाची धम्मक्रांती केल्याचे म्हटले जाते. म्हणून आज धम्म क्रांती दिन आहे. धम्म पौर्णिमा आहे. गुरू पौर्णिमा आहे, भिक्खू वर्षावास प्रारंभ दिन आहे. या संयुक्त उत्सवानिमित्त सर्वाना हार्दिक मंगलकामना.
    आषाढातील शुक्ल पौर्णिमा दिवशी धम्माप्रती अनेक घटना घडल्याने त्या घटना एकत्रित साजरा करण्यासाठीच प्राचीन काळापासून आषाढ पौर्णिमाला ‘धम्म पौर्णिमा’ हा शब्द बौध्दांमध्ये प्रचलित झाला असावा. जसे की बुध्द जयंती आणि बुध्द पौर्णिमा हे दोन्ही शब्दाचे अर्थ निराळे दर्शवितात. बुध्द जयंती म्हणजे बुद्धांचा जन्म दिन. पण बुध्द पौर्णिमा या शब्दात अनेक घटना लपलेल्या आहेत. जसे की बुध्द जन्म दिन, बुध्द सम्यक संबोधी प्राप्त दिन व बुध्द महापरिनिर्वाण दिन इ. त्याचप्रमाणे आषाढातील शुक्ल पौर्णिमा काळात बुध्दांनी धम्मचक्र प्रवर्तन (धम्म स्थापना/धम्म आरंभ) केले म्हणून त्यास धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हटले जाते. धम्माची स्थापना झाली म्हणून त्या घटनेस धम्म जयंती संबोधले जाते. बुध्दांनी धम्मक्रांती केली म्हणून त्या दिवसास धम्मक्रांती दिन म्हटले जाते. बुद्धांनी आपल्या पाच शिष्यांना प्रथमच धम्म सांगितला. त्यामुळे पाचही शिष्यांनी त्यांचे गुरुत्व स्वीकारले. म्हणून गुरू-शिष्य दिन म्हटले जाते. आषाढ पौर्णिमेपासून भिक्खू वर्षावासाचा प्रारंभ होतो. म्हणून तो दिवस भिक्खू वर्षावास प्रारंभ दिन म्हणून परिचित झाला. या पाच ऐतिहासिक घटना आषाढ पौर्णिमा काळात घडल्याने त्या पौर्णिमाला ‘धम्म पौर्णिमा’ म्हणून बुध्द काळापासूनच संबोधले जाते.
  बौध्द धम्म झेपत असेल, सोसत असेल तरच आपण व आपला परिवार बौध्द असल्याचे लोकांनी सांगितले पाहिजे. ज्याना दोन दगडावर (धर्म व धम्म) हात ठेवून जगायचे आहे त्यानी धम्मावर ठेवलेला हात काढावा. डॉ.बाबासाहेबांसह वरील कोणत्याच राजाला दुग्गल वागणे मान्य झाले नसते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनाला साद घालून गेल्या 70 वर्षात ज्यानी धम्म दीक्षा घेतलीया, जे परिवार आपल्या घरातील विवाह, गृहप्रवेश, नामकरण, गृहप्रवेश विधी धम्माच्या पध्दतीने करतात अशानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी दि.15 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे धम्म दीक्षा समारंभात भाषण करताना काय म्हटले ते डोळ्यात अंजन घालून वाचावे, बाबासाहेब म्हणतात, ‘मात्र तुमची जबाबदारी मोठी आहे. तुमच्या  बद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे. म्हणून आपण उत्तमरितीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाही तर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे होवू नये म्हणून आपण दृढनिश्‍चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उध्दार करू. कारण बौध्द धर्मानेच जगाचा उध्दार होणार आहे.’ 0.1 टक्का महार वगळले तर 99.99 टक्के महारांनी धम्म निंदाजनक स्थितीस नेला आहे. लग्न बौध्द पध्दतीने करायचे आणि नंतर नव जोडप्यानी देव देव करायचे का? घुगूळ घालावा का? लग्नाचा गारवा आणण्यास नातेवाईकांना सांगितले? त्या नववधूची नजर उतरवायची का? गृहप्रवेशाच्या तसेच. गृहप्रवेशाचा विधी धम्म विधीने करायचा आणि सत्यनारायण पूजाही घालयायची, नंतर त्याच घरात काल्पनिक देवांना आणून बसवायचे. मरणोत्तर विधी धम्म पध्दतीने करायचा आणि मागच्या दाराने घरात केलेले गोडधोड नैवेद्य म्हणून कावळा, गाईला द्यायचे. नंतर 12 वी करायची.कारण त्याचा आत्मा भूत होवून मागे लागू नये. बाळाचा नामकरण धम्म पध्दतीने करायचा आणि नंतर त्या बाळाच्या पायाला, हाताला, गालाला काळी टिकली लावत राहायची. त्याच्या हातात-पायात काळा दोरा बांधायचा कारण कुणाची त्याला नजर लावू नये. हे कितपत योग्य आहे? मग बौध्द पध्दतीने विधी करताच कशाला? धम्माला बाटविण्यासाठी का? धम्माला निंदाजनक स्थितीत पोहचविण्यासाठी का? पण लक्षात ठेवा धम्माची निंदा होणार नाही तर धम्माला बदनाम कररणार्‍यांची निंदा होणार आहे. हे आजच्या लेखात दिसतेच.
    अशा पध्दतीने धम्माला नासवण्यास विवाह, गृहप्रवेश, नामकरण, मरणोत्तर इ. विधी धम्म पध्दतीने करणारे ते परिवार जबाबदार नाहीत तर विधी करणारे स्वतःला धम्म विधीकर्ता म्हणणारे आहेत. यामध्ये बौध्दाचार्य, धम्माचार्य, भिक्खू यांचाही समावेश आहे. धम्माच्या काम करणार्‍या संघटनांचे लोक आहेत. कदाचित धम्माची धर्मशाळा होईल याचा अंदाज बाबासाहेबांना आला असावा म्हणूनच त्यानी त्यांच्या धम्म दीक्षाच्या पाच वर्षापुर्वीच धम्म कुणी स्वीकारला पाहिजे यावरही भाष्य केले होते. वरळी, मुंबई येथे 14 जानेवारी 1951 रोजीच्या आपल्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘बुध्द धर्माची दीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला हिंदू धर्मातील मते आणि दैवते बुध्द धर्मात आणता येणार नाहीत. घरात खंडोबा व बाहेर बुध्द हे चालणार नाही. शिवाय ज्या हिंदू लोकांना बौध्द धम्माची दीक्षा घ्यावयाची असेल त्यानी हिंदू धर्माच्या दृष्कृत्यांचा त्याग केला पाहिजे. जातीला मानणारे लोक बौद्ध होतात व बौध्द धर्माचा ब्राम्हण धर्म बनवतात व बौद्ध धम्माचे मूळच नाहीसे करतात. सर्व वाईट चाली बरोबर घेवून तुम्हाला बौध्द धर्मात येता येणार नाही. ज्यांना सवड असेल त्यानी येथे यावे व बौध्द धर्म शिकावे व त्यानंतर त्याचा स्वीकार करावासा वाटला तर करावा. नाही तर बारा भाईची खिचडी चालायचे नाही. फक्त बौध्द धर्म पाळा इतर काही नाही.’ जातीला मानणारे लोक बौध्द होतात व बौध्द धर्माचा ब्राम्हण धर्म बनवतात हा बाबासाहेबांचा इशारा धम्माचे पावित्र्य राखण्यासाठी किती अचूक व समर्पक होता हे आज दिसून येत आहे. काही महार उघडपणे आवाहन करत आहेत की,केंद्र सरकारकडून होणार्‍या जनगणनाच्या माहिती फॉर्ममध्ये धर्माच्या कॉलममध्ये बौध्द धम्म लिहा आणि जातीच्या कॉलममध्ये महार लिहा. धम्माच्या कोणत्या त्रिपिठकाच्या पानावर दुसर्‍या धर्माची जात बौध्द धम्मात आणा म्हणून सांगितले आहे? बुध्दानी आपल्या कोणत्या धम्मोपदेशात इतर धर्मातील पंथ, जात धम्मात आणा म्हणून सांगितले आहे? डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे तर सरळपणे म्हणतात की, ‘हिंदू धर्मातील मते आणि दैवते बुध्द धर्मात आणता येणार नाहीत. घरात खंडोबा व बाहेर बुध्द हे चालणार नाही. हिंदू धर्माच्या दुष्कृत्यांचा त्याग केला पाहिजे.’ म्हणजे स्वतःला बौध्द म्हणणार्‍या महारांनी आजही हिंदू धर्माच्या दुष्कृत्यांचा त्याग केलेला नाही. त्याना त्या हिंदू धर्मातील अस्पृश्य अर्थात गुलाम जात धम्मात आणून धम्माचा सत्यानाश करायचा आहे असेच म्हणावे लागेल.
 बुध्दांनी दिलेला धम्म हा सर्वगुणसंपन्न आहे. धम्माची स्वच्छ प्रतिमा आहे. धम्मात कोणतीही भेसळ नाही, धम्माला कोणतीही अदृश्य शक्ती (देव, भूत) मान्य नाही. जे डोळ्याने दिसते ते माना असा संदेश धम्म देतो, धम्म हा कोणत्याही कर्मकांड शिवाय आचरण करायला सांगतो, धम्म हा पुण्यकर्म करायला शिकवतो. तेव्हा जर केवळ आणि केवळ धम्माप्रमाणे आचरण केले तर त्या मनुष्याचा उध्दार झाल्यशिवााय राहणार नाही. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ‘धम्मानेच जगाचा उध्दार होणार आहे’ हे बाबासाहेबांचे बोल खरेच आहे. ज्याना वरील लेखाचा प्रपंच पटला असेल तर त्यानी करा प्रतिज्ञा, करा निर्धार, करा संकल्प की आजच्या धम्म जयंतीपासून मी धम्मशिवाय कोणत्याही अन्य धर्माचे कर्मकांड, कोणतेही सण (भाऊबीज, रक्षाबंधन सह), उपवास, निसर्गात देवदेवता, भूतं आहेत असे मानणार नाही, धम्माची निंदा होईल असे माझ्या हातून दुष्कृत्य करणार नाही. धम्म जयंतीच्या सर्वांना हार्दिक मंगलकामना.

मुख्य संपादक देवदास बानकर ९२२५८०६९९० ,दैनिक मुक्तनायक कोल्हापूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *