
विद्यानंद बापट म्हणजे ब्राह्मण! आम्हा बौध्दांना त्यामुळे काही फरक पडत नाही. त्यांच्या जागी कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा माणूस असता तरी एक माणूस म्हणून आम्ही त्याला स्विकारलाच असता. बापट हे पुणेकर नसून ते मुळचे रत्नागीरीचे. आम्हा बौध्दांना हा मुद्दाच बिन महत्वाचा वाटतो. कारण बापट हे पुण्याचे असले काय किंवा रत्नागीरीचे असले काय किंवा ते पृथ्वीतलावरचे कुठलेही असले तरी आम्हा बौध्दांना त्यांच्या स्थलापेक्षा त्यांची भूमिका योग्य की अयोग्य हे पाहणे जास्त आवश्यक वाटते. बापट हे हॉलिवुडच्या विनोदी अभिनेत्या सारखे म्हणजेच मिस्टर बीन सारखे दिसतात. हा एक अत्यंत बालिश कटाक्ष आहे. बौध्दांना बापट कोणा सारखे दिसतात याच्याशी काहीच देणेघेणे नाही. आमच्यासाठी फक्त त्यांची याविषयीची भूमिका विचारात घेणे महत्वाचे आहे. ते स्वतःला डावे, निरीश्वरवादी म्हणवतात. यालाही आम्हा बौध्दांची काहीच हरकत नाही.

विद्यानंद बापटांवर ते ध्वनिप्रदूषणाविरुध्द बोलले म्हणून कोणीतरी हल्ला केला याचा मात्र आम्ही बौध्द तिव्र शब्दात निषेध करतो. विद्यानंद बापट यांनी इथल्या शासनाला जो प्रश्न केला आहे, तो प्रश्न आम्हा बौध्दांसाठी अजिबात नवीन जरी नसला तरीही आमचा विद्यानंद बापटांना जाहीर पाठिंबा आहे. अनेक जण विद्यानंद बापटांची मराठी ऐकून त्या मराठीला ‘अस्खलित मराठी’ म्हणू लागलेत. पण आम्हाला मात्र बापटांची मराठी ही अस्खलित मराठी नसून संस्कृतप्रचुर मराठी वाटते. बापट हे ब्राह्मण कुटुंबातले असून त्यांच्या मराठी भाषेवर संस्कृतचा पगडा असणे स्वाभाविक आहे. ते बोलत असताना, मला प्रसिद्धी अजिबात नको हे सांगण्याकरता त्यांनी संस्कृत भाषेतील एक श्लोक उद्धृत केला की त्या श्लोकाला सध्या भरभरून प्रसिध्दी मिळत आहे. तो श्लोक असा…..,
“घट भिन्द्यात पटं छिन्द्यात,
कुख्यात गदर्भ रोहणम।
येनकेन प्रकारेण,
प्रसिद्ध पुरुषो भवेतु॥”
याचा मराठी अर्थ….,
मडके फोडावे, वस्त्र फाडावे,
किंवा गाढवावर बसावे.
येनकेन प्रकारे प्रसिद्ध पुरुष व्हावे.
पण यात विशेष वाखाणण्याजोगे काय आहे तेच आम्हाला कळत नाही. लहानपणापासून संस्कृत भाषा अवगत असणाऱ्या ब्राह्मण कुटुंबातील मुलाला हा श्लोक तोंडपाठ असणे साहजिकच आहे. आणि अशा प्रकारचे वर्णन फक्त संस्कृत भाषेतच नसून जगातील सर्वच भाषेत आहे. आणि पाठांतराचे विचाराल तर ती एक सामान्य क्रिया आहे. अगदी पाली भाषेमध्ये सांगायचं तर धम्मपदातील बाल वग्गो (मूर्खांची लक्षणे/वर्ग) मध्ये ही अशाच प्रकारे चुकीच्या मार्गाने प्रसिद्धी मिळवू पाहणार्या व्यक्तीचे वर्णन केले आहे. ते खालीलप्रमाणे…….,
“असन्त भावना मिच्छेय्य,
पुरेखारज्च भिक्खुसु।
आव्हासेसु च इस्सारियं,
लाभं परकुलेसु चं॥”
याचा मराठी अर्थ असा की……,
मुर्ख माणूस नेहमी अशा सन्मानाची इच्छा करतो जी त्याची लायकी नाही.

तर हे सर्व सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की, आम्हा बौध्दांसाठी विद्यानंद बापट कसे दिसतात?, कसे बोलतात?, कुठून बोलतात?, कोणत्या जाती/धर्मातून येतात, ते कोणता इझम मानतात हे महत्वाचे नसून ते जे प्रश्न मांडत आहेत तो आमच्यासाठी महत्वाचा आहे. कोणत्याही उत्सवाचा मग तो उत्सव हिंदूंचा असो, मुसलमानांचा असो, ख्रिश्चनांचा असो, जैनांचा असो किंवा बौध्दांचा असो. अशा उत्सवांचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे. मग तो डीजे द्वारे असो, ढोलताशांच्या आवाजाद्वारे असो, लेझर लाईट शोद्वारे असो, मिरवणुकीत द्वारे असो, नाच धिंगाण्यांच्याद्वारे असो, हे बंद व्हायलाच हवेत. आणि विद्यानंद बापट जर यासाठी आवाज उठवत असतील तर आम्ही बौध्द म्हणून त्यांना अगदी सक्रिय पाठिंबा देत आहोत. जयभीम!
विवेक मोरे-8451932410,मुंबई

