अस्पृश्य महारांचे धर्मांतर झालेले आहे; रक्तांतर झालेले नाही.

बातमी शेअर करा.

श्रीकृष्णाष्टमीचा सण आला रे  आला की, जवळपास धर्मांतरीत बौद्ध आपल्या निरागस बालकांना बालकृष्णाची वेशभूषा व रंगरंगोटी करुन नटवतात कुणी हातात पावा देतात तर कुणी डोक्यावर मुकुट लावतात,गळ्यात नकली मोत्यांच्या माळा घालतात, हातापायात नकली सोन्याचे दागिने घालतात, सोबत दह्याचे मडके असते आणि असेच रुपांतर करुन बालिकांनाही राधा करतात.माझ्या माहितीनुसार मुस्लिम व ख्रिश्चन धर्मातील ही लोक कृष्ण व राधेची सजावट आपल्या मुलांना करीत नाहीत.एवढेच नाहीतर जैन व शीख धर्मातील लोकही अशी आपल्या बालक व बालिकांचे रुपांतर करीत नाहीत.
   महार समाजातील लोकांच्या नावातच हिंदू धर्मातील अनेक हिंदू  देवांची नावे आढळतात.रामचंद्र भंडारे,रामकृष्ण गवई,रामदास आठवले,जोगेंद्र कवाडे,राजाराम ढाले,नामदेव ढसाळ इत्यादी नावे बौध्द समाजातील नेतेमंडळी, प्रख्यात लेखक शंकरराव खरात कवी वामन कर्डक, लक्ष्मण राजगुरू संगीतकार विठ्ठल शिंदे,गायक कृष्णा शिंदे, प्रल्हाद शिंदे,विठ्ठल उमप ह्या बौध्द कलावंताचीसुध्दा हिंदू धर्मातील देवांची आहेत.धर्मांतर पूर्वी ठीक होते.पण,आता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणाच्या सवलतींवर जगणारे अनेक नवश्रीमंत पूर्वाश्रमींचे अस्पृश्य महार आपल्या मुलांना हिंदू  धर्मातील देव देवतांची नावे देत आहेत. ह्यामध्ये कट्टर स्वयंघोषित आंबेडकरवाद्यांची संख्या अधिक आहेत. आपल्या मुलांना काय नाव द्यावे हा ज्याचा त्याचा हक्क आहे त्यावर कुणी आक्षेप घेऊ शकत नाही. परंतु,आपण आपल्या मुलांची नावे काय ठेवतो ह्यावरून त्याची मानसिकता, आवड, निवड व एकंदरीत कल लक्षात येतो.मला तर असं वाटतं की,  ‘आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं’ असली गाणी ऐकणाऱ्या नवश्रीमंत नव्या प्रस्थापितांचा कदाचित असा गैरसमज झालेला असावा की, आम्ही जीवनात यशस्वी झालेलो आहोत, Income Tax भरत आहोत, ते हिंदू देवतांचा पूजापाठ केल्यामुळे म्हणून हे नवश्रीमंत काॅकटेल आपल्या मुलांना हिंदू देव देवतांची नावे देत असावेत.


  डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मुलाचे नाव यशवंत ठेवले, यशवंत हा महात्मा फुले यांचा मानसपुत्र होता. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या सगळ्या संस्थांची नावे बौध्द इतिहास व संदर्भातून प्रेरीत होऊन घेतलेली आहेत. उदाहरणार्थ राजगृह, सिध्दार्थ काॅलेज,मिलिंद महाविद्यालय,आनंद भवन,प्रबुध्द भारत इत्यादी
   इंदिरा गांधी यांनी आपल्या नातवाचे नाव राहुल ठेवलेले आहे.ह्यावरून इंदिरा गांधी यांची मानसिकता व वैचारिक कल लक्षात येतो आणि राहुल नावाची थट्टा करण्यासाठी मनुवाद्यांनी राहुलची पप्पू अशी बालिश प्रतिमा करण्यासाठी मोठी मोहीम आखली. नेहरू व इंदिरा गांधी यांची बुद्धीवादी विचारसरणी मनुवादी सनातन्यांना नष्ट करायची असल्यामुळे त्यांनी काँग्रेसमुक्त भारताची मोहीम सुरू केलेली आहे.ज्या राजीव गांधींनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना न्याय मिळण्यासाठी Autrocity Act १९८९ साली लागू केला, त्यांच्याच मुलावर उत्तराखंडमधील हल्द्वानी पोलीस ठाण्यात काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अमित कुमार नावाच्या एका अनुसूचित जातीच्या तरुणाच्या तक्रारीच्या आधारे, ह्या एफआयआरमध्ये गांधींवर अनुसूचित जातींच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.  एफआयआरमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ च्या कलम ३(१)(Q) चा समावेश करण्यात आला आहे


   जसे मुस्लिम व ख्रिश्चन धर्मातील लोक कोणत्या धर्माचे आहेत हे त्यांच्या नावावरूनच आपोआपच लक्षात येते. तसे धर्मांतरीत बौध्द कोणत्या धर्माचे आहेत हे पटकन लक्षात येत नाही. आपण कितीही हिंदू देव दैवतांना नाकारले तरी बौध्द समाजाच्या बंधू भगिनींच्या अनेक नावांत हिंदू धर्मातील देव देवता दडलेल्या आहेत. त्यामुळे बावीस प्रतिज्ञा अभियान बंद करुन सामाजिक सलोखा राखला पाहिजे. उगाच बावीस प्रतिज्ञा पालनाची जबरदस्ती करुन सध्याच्या सणासुदींच्या दिवसात सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये.विनोदी कलावंत कदम प्रकरणांची पुनरावृत्ती करू नये.कारण, तमाम बौध्दांना शासनकर्ती जमात बनायचे आहे. त्यासाठी हिंदू धर्मातील अठरापगड जातीतील महापुरुषांच्या अनुयायांसोबत हिंदू दैवतांना मानणाऱ्या लोकांच्याही मतांची गरज तथाकथित आंबेडकरी राजकीय पक्षांना हवीच आहे. धर्मांतरीत बौध्दांच्या आचार व विचारात कधीही शंभर टक्के बदल होणार नाही.कारण, पूर्वाश्रमींच्या महारांचे धर्मांतर झालेले आहे; रक्तांतर झालेले नाही.

शरद आढाव,9833175669,भांडुप,मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *