शिक्षक भरतीतील अनियमितता व बिंदुनामावलीतील कथित घोळाच्या निष्पक्ष SIT चौकशीची मागणी; विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा.

पुणे, दि. ७ नोव्हेंबर २०२६ : महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीतील कथित अनियमितता, आरक्षण बिंदुनामावलीतील फेरफार तसेच नियुक्त्या, वैयक्तिक मान्यता, बदल्या, सेवासातत्य आणि शालार्थ नोंदींमधील तक्रारींची निष्पक्ष व सखोल चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत (SIT) करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रीय रोस्टर राईट्स जस्टिस असोसिएशन, सातारा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप निवृत्ती फणसे यांनी शिक्षण आयुक्तालय, पुणे येथे दि. ७ नोव्हेंबर २०२६ पासून उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
यापूर्वी दि. २ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत फणसे यांनी शिक्षण आयुक्तालयासमोर शांततामय मार्गाने सत्याग्रह ठिय्या आंदोलन केले. मात्र, या आंदोलनानंतरही तक्रारींच्या प्रमुख मुद्द्यांवर ठोस निर्णय व चौकशीची निश्चित कालमर्यादा मिळाली नसल्याने त्यांनी ७ नोव्हेंबरपासून उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला.या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी पाठिंबा देण्यासाठी शिक्षक संघटनेचे राज्य समन्वयक प्रकाश घोळवे (पुणे), सचिन हंगे (सांगली), अॅड. राजकुमार सरतापे (सोलापूर) तसेच मुंबई शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) चे अध्यक्ष जनार्दन जंगले हे दिवसभर आंदोलनस्थळी उपस्थित होते. त्यांनी आंदोलनात सहभागी होऊन फणसे यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.

फणसे यांनी सन २००२ पासून राज्यातील आरक्षण रोस्टर व बिंदू नामावली च्या प्रश्नांवर पाठपुरावा सुरू केला आहे. तसेच सन २०१२ ते २०२६ या कालावधीतील कथित अपात्र शिक्षक भरती व भरती प्रक्रियेतील अनियमिततां बाबत विविध शासकीय कार्यालयांकडे तक्रारी आणि कागदपत्रे सादर केली आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणासंदर्भात मोठ्या प्रमाणावर पुरावे संबंधित यंत्रणांकडे सादर करण्यात आले आहेत.
शासनाने दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन केले. या प्रकरणी फणसे यांनी दि. १५ सप्टेंबर २०२५, १० नोव्हेंबर २०२५ आणि १३ नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रारी व स्वतंत्र पोलीस सहभागाबाबत निवेदने सादर केली होती. त्यानंतर ही चौकशीच्या प्रत्यक्ष कार्यवाही बाबत पुरेशी स्पष्टता मिळाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.अलीकडे दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सादर केलेल्या तक्रार निवेदनाच्या अनुषंगाने SIT सदस्य सचिव हारुन आतार यांनी दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडे चौकशीबाबत पत्र पाठविले. त्यानुसार शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित सहसंचालक डॉ. श्रीराम पानझडे यांना तक्रारीची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

मात्र, SIT चौकशीच्या कालमर्यादा शेवटचा दिवस दि. ७ नोव्हेंबर २०२६ असल्याचे फणसे यांचे म्हणणे असून, चौकशीच्या अंतिम टप्प्यात माध्यमिक विभागाकडे चौकशी सोपविण्यात आल्याने त्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. चौकशीची प्रत्यक्ष व्याप्ती, आतापर्यंत तपासलेले अभिलेख आणि सादर केलेल्या पुराव्यांची पडताळणी याबाबत स्पष्ट माहिती मिळणे आवश्यक असल्याची त्यांची भूमिका आहे.फणसे यांनी दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सत्याग्रह ठिय्या आंदोलन थांबवून दुसऱ्या दिवसापासून उपोषण सुरू करण्याबाबत प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानुसार दि. ७ नोव्हेंबरपासून त्यांनी उपोषण सुरू केले आहे.
सन २०१२ पासूनच्या शिक्षक भरती प्रक्रियेतील जाहिरात व निवड यादीपासून नियुक्ती आदेश, वैयक्तिक मान्यता, आरक्षण बिंदुनामावली, सेवासातत्य, विनाअनुदानित शाळा किंवा तुकड्यांवरून अनुदानित शाळा किंवा तुकड्यांवर झालेल्या बदल्या, शालार्थ आयडी आणि वेतन अनुदानापर्यंत संपूर्ण प्रक्रियेची मूळ अभिलेखांच्या आधारे तपासणी करण्यात यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.तसेच संबंधित संस्थांकडील मूळ कागदपत्रे मागवून त्यांची पडताळणी करावी, चौकशीमध्ये स्वतंत्र पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग असावा, तक्रारदाराला आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी आणि पुराव्यांनुसार संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कार्यवाही करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

प्रशासनाने केवळ चौकशी सुरू असल्याचे सांगण्याऐवजी तक्रारींवर झालेली प्रत्यक्ष कार्यवाही, तपासणीची व्याप्ती, पुराव्यांची पडताळणी आणि अंतिम अहवाल सादर करण्याची निश्चित मुदत लेखी स्वरूपात जाहीर करावी, अशी भूमिका फणसे यांनी व्यक्त केली आहे.या आंदोलनाचा उद्देश कोणत्याही व्यक्तीविरुद्ध पूर्वग्रह ठेवणे नसून, मूळ शासकीय अभिलेखांची निष्पक्ष तपासणी करून सत्य परिस्थिती समोर आणणे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कार्यवाही होणे हा असल्याचे फणसे यांनी स्पष्ट केले.
“पुरावा, न्याय अन् सत्याचा ध्यास— रोस्टर हक्क हाच आमचा श्वास!”
सागर रामभाऊ तायडे यांस कडून

