“आई” मँक्झिम गोर्कीच्या पावेलची व शरद पाटलांची! :——स.वा.राजाराम तुळसाबाई सूर्यवंशी.

बातमी शेअर करा.

 मी १९७९ साली धुळ्याला असतांना, गरुड वाचनालयातून हि कादंबरी प्रथम वाचलेली होती. तेव्हाही मला ही “आई ” भावली होती.आता पुन्हा मी ती कादंबरी वाचली. वाचनाचा पुर्नप्रत्यय आला. व त्याच बरोबर ही पावेलचीआई  मला प्रत्येक चळवळ्यांच्या आई मध्ये दिसू लागली. अगदी सत्यशोधक कॉम्रेड शरद पाटलांच्या आईतही मॅक्झिम गोर्की यांची ‘आई’ हि प्रकाशित कादंबरी रशियन क्रांतीच्या पार्श्वभूमीवर १९०६ साली लिहिली गेली आहे.आज १२० वर्षांचा कालावधी लोटला गेला आहे. मात्र जागतिक पातळीवरील “आई ” ही तशीच आहे. पावेलची आई मला सर्वत्र दिसते. ही गोर्की च्या लेखणीची ताकद आहे.यातील आई ; पेलागेया नीलोव्ना हि एक साधी, घाबरट आणि वर्षानुवर्षे सोशिक पणे जगणारी, गरीब कामगारांची विधवा पत्नी आहे. तर तिचा तरुण मुलगा पावेल हा कामगार चळवळीत  सर्वहारा आणि क्रांतिकारी संघटनेमध्ये सहभागी झालेला दाखवलेला आहे.


   मुलाच्या क्रांतीकारी चळवळीतील सहभागाने सुरवातीला घाबरलेली आणि संभ्रमित असलेली आई (पेलागेया) हळूहळू आपल्या मुलाच्या संघर्षामागची उदात्त भूमिका समजून घेतांना दिसते.पावेल हा जुलमी झारशाहीचा अंत करुन कामगार वर्गाच्या समाजवादी राज्याची उदात्त स्वप्न पाहणारा क्रांतिकारी चळवळ्या युवक आहे.मुलाची शोषण मुक्तीची, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आणि समाजवादी राज्य उभारण्याची वैचारिक भुमिका समजता समजता तिला मुलाचे विचार पटू लागतात.तिच्यात काही काळ मानसिक द्वंद चालू रहाते.भावना व मनातील प्रस्थापित परंपरेची जागा हळूहळू विवेक घेतो.व तिच्यात वैचारिक परिवर्तन घडून येते.
   मुलाची क्रांतीकारी मानसिकता लक्षात आल्यावर, पुढे ती केवळ मुलाला साथच देत नाही, तर स्वतःही एका धाडसी आणि जागृत क्रांतिकारी चळवळीत -पिकेटिंग-संदेशवाहक म्हणून काम करु लागते.व मुलाच्या कार्यात- चळवळीत- सहभागी होते.अशी ती एक क्रांतीकारी प्रेमळ माता या कादंबरीत मॅक्सिम  गोर्की नी रंगवली आहे.
जागतिक पातळीवर ही कादंबरी ‘समाजवादी वास्तववादी’ साहित्याचा उत्तम नमुना मानण्यात आली आहे.एका सामान्य स्त्रीचा मुलासोबत घडत गेलेल्या वाद- विवादातून, तिचे झालेले आंतरीक परिवर्तन, त्यातून तिचा झालेला क्रांतीकारी प्रवास म्हणजे “आई’ ही कादंबरी होय.


   मुलाला अटक झाल्यावर मुलाचे अपुर्ण कार्य पुर्ण करण्यासाठी क्रांतीची मशाल ती हाती घेते आणि संघटनेतील नेतृत्वाची पोकळी भरुन काढते. पावेल ची आई सर्व क्रांतीकारकांची आई बनते. व संघर्षभूमीवरच आपला शेवटचा श्वास घेते.पावेलच्या आईची सुरवातीला मानसिक अवस्था काय झाली असावी?
त्यात ती पुन्हा विधवा. मुलगा हाच तिचा एकमेव असा जीवनाचा आधार होता. आणि तो चळवळीत काम करत होता, म्हणजे त्याने आपले घर वादळात बांधल्यासारखेच होते.अशावेळी पावेल च्या आईची जी मानसिकता होती, ती मॅक्सिम गोर्कींनी अतिशय तरल शब्दात या कादंबरीत मांडलेली आहे.व तिच्यात झालेला बदलही मनाला उभारी देऊन जाणारा ठरला आहे.
अशीच आई शपांचीही होती.
शरद पाटील उर्फ शपा सुध्दा असेच ऐन विशीत असतांना चळवळीत पडले होते.मुंबईत जे. जे. मध्ये कलेच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आले, मात्र नाविकांच्या संपाचे निमित्त झाले नि ते चळवळीत ओढले गेले.प्रदिर्घ काळाने – सुमारे सात वर्षांनी- गावी गेले ते कट्टर परिवर्तनवादी चळवळे बनून. कम्युनिस्ट बनून.त्यावेळी त्यांची आई, मंदोदरीची मानसिक अवस्था ही अशीच मोठी बिकट होती.तिची इतर दोन मुलं – शपांपेक्षा मोठा नरवीर आणि दुसरा शपांपेक्षा लहान वसंत – ही शिक्षण- नोकरी- लग्न करुन संसाराला लागली होती.शपा उर्फ आप्पा मात्र भणंग जोगी बनून आदीवासींमध्ये, दर्‍या- खोर्‍यांमध्ये फिरत होते.चळवळ करत होते.जीवंत रहायला जे मिळेल ते पोटात ढकलत होते व आदिवासींचे क्रांतीकारी प्रबोधन व संघटन करीत होते.उपाशी- तापाशी राहत होते. दगडा- ढेकळांवर झोपत होते.
शरद माता आई मंदोदरी चे मन तीळतीळ तुटत होते.
एका खानदानी, भरल्या घरातला तरुण, सिध्दार्थ गौतमासारखा घर सोडून बाहेर पडलेला पाहून, शपांच्या मातेला अतिव दु:ख झाले होते.शपांचे सारे जीवन वादळ- वार्‍यांनी वेढलेले होते.कामगार,दलित,आदिवासींचे, स्त्रीयांचे आर्थिक,सामाजिक व जातीय शोषण त्यांना मान्य नव्हते. शेतकरी – कुणब्यांचा शेतीचा कर्जबाजारीपणा त्यांना अस्वस्थ करत होता.त्यांचा सारा दिवस, महिने वर्ष आंदोलने, मार्चे, सभा, परिसंवाद चर्चासत्रे व पुस्तकाचे लिखाण  व जेलच्या  वार्‍या यात खर्ची पडत असत.सरकार, शासन, व पक्षातील नेतृत्वाशी त्यांचा उभा संघर्ष चालला होता. दलित, वंचित, शोषितांच्या वर्गिय- जातीय मुक्तीसाठी ते विश्वाविरुध्द लढाईसाठी स्वत:ला सिध्द करत होते.
लग्न लावून दिल्यावर त्याच्या पूरोगामी कर्मठपणाला आळा बसेल असे शपांच्या आईला वाटत होते.शपांचे लग्न एका सत्यशोधक कन्येशी- सुशिलाताई शी-झाले.वादळाचा संसार सूरु झाला.तीन लहान लहान बालके  झालीत.त्यांना पत्नी सुशिलाताईंच्या पदरात टाकून शपा पुन्हा घर सोडून बाहेर पडले होते. सुशिलाताई यशोधरेच्या भूमिकेत शिरल्या होत्या.
शपा आता केवळ व्यक्ती नाही तर समष्टी बनले होते.संसाराचा गाडा एकट्या सुशिलाताई ओढत होत्या.कोणतीही कुरबूर न करता.मंदोदरामाईला सुनेची ओढाताण बघवली गेली नाही.मुलाच्या प्रेमापोटी, नातवांच्या लळेपोटी व सुनेच्या जिव्हाळ्या पोटी माता मंदोदरी कापडणे व धुळ्यातील भरती घरे व सत्यशोधक पतीच्या आदेशाविरुध्द बंड करुन साक्रीच्या आदिवासी भागात मुलाच्या संसारासोबत गरीबीत राहू लागल्या होत्या.सुशिलाताई जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या.पगार अगदीच तुटपुंजा होता. हाता तोंडाचा मेळ साधण्यासाठी त्या शिकवण्या घेऊ लागल्या होत्या.
   शरद पाटलांवरच्या राजकीय आकसेपायी शाळा प्रशासन सुशिलाताईंची वारंवार बदली करत असत.अशावेळी शपांची आई इतर दोन मुलांकडे न राहता, शपा- सुशिलाताई च्या मुलांच्या संगोपनासाठी जीव मुठीत धरुन त्यांच्यासोबत  राहत होत्या.तीन लहान नातवाचा सांभाळ करतांना या मातेचा जीव शपांच्या काळजीने झुरत असे.शपांचे वडील वारले तेव्हा शपा चिंचपाड्याला एका सभेला संबोधित करीत होते.त्यावेळी त्यांची माता त्यांच्या सोबत होती.सभा चालू असतांना वडिलांच्या मृत्यूची तार त्यांच्या हातात पडली.शपा तार वाचतात.डोळ्यातली दोन टिपं तारेच्या कागदावर पडतात.तीच त्यांची वडीलांना दिलेली अखेरची श्रध्दांजली ठरते.


   शपा कागद खिशात घालतात.सभा पुढे चालू रहाते.सभा संपल्यावर शपा कोणाशीही काहीही न बोलता, आईला घेऊन धुळ्याकडे रवाना होतात.आईला सर्व समजते.तो पर्यंत ती मुलाच्या चळवळीत मनाने सामिल झालेली असते.मुलाचे सामाजिक क्रांतीचे ध्येय तिचेही ध्येय बनलेले असते.कारण ती ही एका लढाऊ सत्यशोधकाची आई आणि पत्नी असते.आईचा करारी बाणा व पत्नीचा त्याग शपांना आयुष्यभर क्रांती प्रवण राहाण्यास मदतगार ठरला होता.जड अंत:करणाने शपा आईला वडिलांच्या शवाजवळ नेतात.आसवांचा बांध फुटतो……!
  सिध्दार्थ गौतमासारखे शपा स्थीतप्रज्ञ असतात.आई मंदोदरींची अवस्था मात्र घायाळ हरणीसारखी झाली होती.पतीच्या निधनाने नि मुलाच्या भणंग योगी, प्रखर ध्येयवादी वृत्तीने ती घायाळ असते. तिच्या दोन्ही नयनांतून आश्रू ढळू लागतात.नव्हे तिचे सोसलेले, साचलेले मन मोकळं होऊ लागते.क्षणार्धात माता मंदोदरी ; माता महामाया बनते.
अतिव दु:ख व करुणाची सरीता बनते.त्या ह्रदयद्रावक दृष्याचे आम्ही साक्षीदार बनतो.क्षणार्धात शपांची आई मॅक्झिम गोर्कीच्या पावेलच्या आईसोबत तादाम्य पावते.
   शपा पुन्हा आपल्या ध्येयाच्या दिशेने वळतात.माता आई मंदोदरी व पत्नी सुशिलामाई त्यांना सावलीसारखी साथ देतात.अशीच मानसिक अवस्था चळवळीत गेलेल्या  प्रत्येक मुलांच्या आईंची असते.माझी आईसुध्दा या मानसिक अवस्थेतून गेलेली आहे!मॅक्झिम गॉर्कीची आई कादंबरीच्या निमित्ताने जगभरातल्या सामाजिक कार्यकर्त्यांची, चळवळ्यांची एक क्रांती प्रवण जागतिक आई चितारली आहे. अशा लेखकाला व त्यांच्या अजरामर साहित्यकृतीला शतश: नमन!

स. वा. राजाराम तुळसाबाई सुखदेव सूर्यवंशी.भ्रमणध्वनी : 9503867602.

This image has an empty alt attribute; its file name is 1794987254157-787x1024.jpg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *