
आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा नकळत तिचे वर्गीकरण करतो. स्त्री की पुरुष? विवाहित की अविवाहित? कोणत्या जातीची? कोणत्या धर्माची? जणू माणसाची ओळख निश्चित करण्यासाठी समाजाला काही ठरावीक कप्पेच हवे असतात. मात्र, माणसाचे अस्तित्व या कप्प्यांपेक्षा कितीतरी व्यापक असते.अलीकडे विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्या आणि ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) अध्यक्षा नेहा बोरा यांनी आपल्या लिंगओळखीविषयी केलेले विधान चर्चेत आले आहे. त्यांनी स्वतःला स्त्री किंवा पुरुष या पारंपरिक चौकटींपैकी कोणत्याही एका चौकटीत बसवलेले नसून ‘नॉन-बायनरी’ (Non-binary) असल्याचे सांगितले आहे. माध्यमांनी आपल्याला ‘She/Her’ ऐवजी ‘They/Them’ या सर्वनामांनी संबोधावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. नेहा बोरा यांनी येथे आपल्या लैंगिक आकर्षणाविषयी (Sexual Orientation) नव्हे, तर लिंगओळखीविषयी (Gender Identity) भूमिका मांडली आहे. या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.

सामान्यतः समाज स्त्री आणि पुरुष अशा दोनच लिंग ओळखी गृहीत धरतो. यालाच ‘जेंडर बायनरी’ म्हणतात. परंतु काही व्यक्तींची स्वतःविषयीची जाणीव या दोनपैकी कोणत्याही एका चौकटीत बसत नाही. अशा व्यक्ती स्वतःची ओळख ‘नॉन-बायनरी’ अशी सांगतात. याचा अर्थ त्यांच्या शरीरात काही दोष आहे, त्यांना लैंगिक समस्या आहे किंवा त्यांची लैंगिक आवड विशिष्ट प्रकारची आहे, असा अजिबात होत नाही. एखाद्या व्यक्तीची शारीरिक रचना, तिची लिंगओळख आणि तिचे लैंगिक आकर्षण या तीन स्वतंत्र बाबी आहेत.
मला नेहा बोरा यांच्या विधानातील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या ओळखीपेक्षा समाजाच्या प्रतिसादाशी संबंधित वाटतो. एखाद्या व्यक्तीने स्वतःची ओळख स्पष्ट केल्यानंतर आपण तिचा स्वीकार करू शकतो का? की आपल्या पारंपरिक समजुतींच्या आधारे तिची थट्टा करणार, तिला प्रश्नांच्या पिंजऱ्यात उभे करणार?
एखाद्याला ‘ती’ म्हणायचे की ‘ते’ किंवा इंग्रजीत ‘They’ म्हणायचे, हा वरकरणी भाषेचा प्रश्न वाटू शकतो. पण त्यामागे त्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा स्वीकार किंवा अनादर दडलेला असतो.याच निमित्ताने भाषेच्या मर्यादांचा ही विचार करायला हवा. इंग्रजीत ‘He/She’ ऐवजी ‘They/Them’ या सर्वनामांचा वापर होत आहे. मात्र मराठीत ‘तो’ आणि ‘ती’ यांना पर्याय काय असावा? केवळ सर्वनामे बदलून प्रश्न सुटणार नाही; क्रियापदे आणि वाक्यरचनाही लिंगनिरपेक्ष करण्याचा विचार करावा लागेल. भाषाशास्त्रज्ञांनी यासाठी नवे शब्द आणि सहज वापरता येतील अशा पर्यायी वाक्यरचना विकसित करण्याची गरज आहे. कारण भाषा माणसांसाठी असते; माणसे भाषेच्या व्याकरणाची गुलाम नसतात.

आपण लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांविषयी बोलतो. मात्र व्यक्तिस्वातंत्र्याचा खरा कस आपल्या विचारांशी सहमत असणाऱ्यांना स्वातंत्र्य देण्यात नसतो; तर आपल्या विचारांपेक्षा वेगळी जीवनदृष्टी असणाऱ्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करण्यात असतो. भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार दिला आहे. २०१४ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या NALSA विरुद्ध भारत सरकार या ऐतिहासिक निकालाने व्यक्तीच्या स्वनिर्धारित लिंग ओळखीच्या अधिकाराला मान्यता दिली.
नेहा बोरा यांच्या राजकीय भूमिका पटोत अथवा न पटोत, त्यांच्या व्यक्तिगत ओळखीचा आदर हा स्वतंत्र विषय आहे. एखाद्याची विचारसरणी नाकारण्याचा अधिकार आपल्याला आहे; पण त्याच्या अस्तित्वाचा आणि प्रतिष्ठेचा अनादर करण्याचा नाही.शेवटी, माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्यासाठी त्याला स्त्री किंवा पुरुष या दोनच चौकटींपैकी एका चौकटीत बसवण्याची सक्ती कशाला? माणसाचे अस्तित्व त्याच्या लिंगापेक्षा मोठे आहे. त्याची प्रतिष्ठा त्याच्या ओळखीवर अवलंबून नसावी.समाज प्रगत झाला आहे की नाही, हे तंत्रज्ञानाच्या प्रगतीवरून नव्हे, तर भिन्न ओळख असणाऱ्या माणसांशी तो किती सन्मानाने वागतो यावरून ठरते!
अशोक वानखडे – ९६१९४१३१९३,कल्याण,

