सहवासापेक्षा कार्य महत्वाचे

बातमी शेअर करा.

भगवान बुद्धांचा एक ज्येष्ठ शिष्य होता. तो स्वत:ला भगवानांचा सर्वोत्तम शिष्य मानत असे.काही काळाने भिक्खूंच्या संघात एक तरुण शिष्य दाखल झाला. त्याची प्रेमळ वागणूक आणि भगवान बुद्धांचा बोध आचरणात आणण्याची धडपड सर्वांच्याच मनाला प्रेरित करीत होती.
भगवानांनी त्याला एका उपक्रमासाठी प्रमुख म्हणून नेमले. या ज्येष्ठ शिष्याला हा आपला अपमानच वाटला.
संतापाच्या भरात तो शिष्य थेट भगवान बुद्धांनाच जाब विचारायला गेला. तेव्हा भगवान बुद्धांसमोर खिरीचं एक पात्र होतं.
ते खीर खाणार तोच हा शिष्य तावातावानं आपलं म्हणणं मांडू लागला. भगवान हसले आणि त्याला म्हणाले,
‘‘जरा या खिरीची चव घेऊन सांगा ती ठीक झाली आहे का?’’ त्यानं खिरीचा चमचा तोंडात टाकला आणि म्हणाला, ‘‘हो खीर चांगली झाली आहे, पण ते महत्त्वाचं नाही, आधी माझं ऐका..’’
भगवान म्हणाले, ‘‘तुम्ही येण्याआधीपासून हा चमचा या पात्रात होता पण त्याला खिरीची चव सांगता आली नाही, तुम्ही क्षणार्धात ती सांगितलीत!’’
तेव्हा सहवास म्हणजे नुसतं जवळ असणं नव्हे. आपण कुणाच्या जवळ आहोत आणि या जवळ असण्याचा हेतू काय, लाभ काय, याचं ज्ञान असणं हा खरा सहवास आहे. हा खरा समागम आहे. बुद्धांनी शिष्याला या उदाहरणातून त्याच्या अकार्यक्षमतेची जाणीव करून दिली व शिष्याला ती पटलीही.
ही कथा अडीच हजार वर्षांनंतर आजही लागू होते. मित्रांनो लक्षात घ्या, आपण ऑफिसमध्ये काम करत असताना आपल्याकडून काही नाविन्यपूर्ण कामे होत नसतील तर आपला बॉस आपल्या ज्युनियरवर जबाबदारी का सोपवणार नाही? आणि का सोपवू नये?
आपल्याकडे असणाऱ्या पदाला कवटाळून बसणे, परंतु त्या पदाबद्दल प्रेम, जाणीव नसणे अगदी त्या खिरीतील चमचासारखे, हे त्या पदासाठीच किती घातक गोष्ट आहे?
मात्र आपण सतत काहीतरी नवीन करत राहिलो, आपले कार्य उत्तम प्रकारे पार पाडत राहिलो तर तुमच्यासाठी ते यशाहून कमी नाही. अर्थात यश हे तुम्हालाच मिळणार आहे.

संकलन : धम्म उपासिका सुनिता गौतम तायडे -भांडूप मुंबई. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *