
माननीय संपादक आपल्या लोकप्रिय दैनिकांत प्रसिद्धी द्यावी ही विंनती.
वर्गणीतून जयंती की जयंतीतून विचार…
जयंती साजरी होत असताना..??? वर्गणी शब्द आला की त्याचा थेट संबंध लोकांसोबत येतो.त्याचा अर्थ लावायला गेलो तर हिताचे सुद्धा आहे आणि त्याचे दुष्परिणाम होताना सुद्धा दिसतात.वर्गणी गोळा करून त्यातून सण उत्सव साजरा केला जातो त्यातून लोकांना आनंद मिळतो.परंतु महापुरुषांची जयंती साजरी करत असताना भान असावे लागते.वर्षातून एकदाच जयंती येते आणि त्यातून वस्ती मध्ये उत्साह निर्माण होत असतो.चांगले कपडे,गोड पदार्थ, घराला रंगरंगोटी,साफसफाई हे सर्व ठिक आहे.परंतु काळ बदलतोय.त्याचबरोबर जयंतीचे स्वरूप सुद्धा बदलताना दिसत आहे.लहान असताना आठवतंय की वर्गणी ५ किंवा १० रुपये घेतली जात होती.आज घडीला १००० रुपये पर्यंत घेतली जाते.
जयंती साजरी होते.विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केली जातात.संपली जयंती.मग चावडीवर चर्चा होते.मस्त कार्यक्रम झाला ना.लायटिंग सुद्धा मस्त होती. कपडे आपण मस्तच घातले होते.मिरवणुकीत मस्त मजा आली रे.आता परत वर्षभर वाट बघावी लागेल.मग आपापल्या फुटपाथवर बसून दिवस संध्याकाळ घालावयाची हेच चालू आहे.वायफळ चर्चा.आणि पुढे काय काहीच नाही.कोणताही कार्यक्रम घेत असताना त्याचा उद्देश असावा लागतो.त्याचबरोबर त्याचा परिणाम सुद्धा काय पडणार याचा ही विचार मंथन करणे आवश्यक आहे.आज २१ व्या शतकात बरेच काही बदल झालेला दिसून येत आहे विशेष म्हणजे सोशल मीडिया…? किती चांगले किती वाईट?.परिणाम भोगावे लागतातच.असो…
जयंती साजरी का केली जाते.हा प्रश्न.महत्त्वाचा आहे.कारण त्याचा उद्देश नसेल तर मात्र त्याला केवळ चंगळवाद असेच म्हणावे लागेल.आमचे पूर्वज करत होते म्हणून आम्ही जयंती साजरी करतोय.ह्या सगळ्या गोष्टी आपण बारकाईने निरीक्षण केले तर मात्र पैसा,श्रम,वेळ,वस्तू सगळेच वाया गेलेले असतात.वर्गणी जमा करताना दमछाक होतेच.परंतु त्या वर्गणीतून काय खर्च केले जातात.डेकोरेशन,लायटिंग,स्टेज,खुर्ची, पाहुणे खर्च,फुले हार,बक्षीस,विशेष करून ज्याच्यासाठी वर्गणी गोळा केली जाते ते आहे गायन….? गायन मध्ये कोणाला बोलावले जातात तर तो गायक करोडपती झालेला आहे.आणि त्याची जयंती मध्ये येण्याची बिदागी ३ ते ६ लाख ठरलेले असतात.गायकाचे गाणे ऐकण्यासाठी केलेला हा सर्व हट्टहास आहे का? विचार करण्यासारखी बाब आहे की वरील प्रमाणे लाखो रुपये गायकांना देण्यासाठी वर्गणी काढली जाते.मग वर्गणी एकूण जमा किती होत असावी.हा चिंतनाचा विषय आहे.जयंती साजरी करण्यास विरोध नाही किंवा तो असणारच नाही.परंतु ज्यांच्या नावाने जयंती साजरी केली जाते त्यांच्या विचारांचे काय….
मी अनेक वेळा सांगत आलेलो आहे की,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा, पुतळा यांची विटंबना झाल्यावर आपणच आंदोलने,मोर्चा काढतो,स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये जाऊन निवेदन देतो फोटो काढायला विसरत नाही आणि सोशल मीडियावर पोस्ट करायला सुद्धा विसरत नाही.परंतु एवढे सगळे करत असताना.जेव्हा महामानवाच्या विचारांची विटंबना होते तेव्हा मात्र आपण कुठेच निवेदन देताना दिसत नाहीत.जयंती विचारांची साजरी झाली पाहिजे धांगडधिंगा,डी जे,लाऊड स्पीकर, फटाके वाजवून,साजरी न होता.स्थानिक लोकांमध्ये कोणी दीर्घ आजाराने ग्रस्त असेल त्यांना आर्थिक सहकार्य केले पाहिजे.विद्यार्थी आहेत त्यांना पुस्तके दिली पाहिजे.वर्गणीतून जयंती साजरी करताना.लोकांसाठी आणि लोकांना उपयोग होईल असे उपक्रम राबविले पाहिजे.
एखादा नावाजलेला गायक बोलावून त्यांना लाखों रुपये देऊन.समजाचा पैसा वर्गणीतून गोळा करून त्या गायकाला कशाला पोसायचे.वर्गणी देणाऱ्यांना सुद्धा वाटतं की आपली वर्गणी ही सत्कर्मी लागली पाहिजे.परंतु तसे होताना दिसत नाही.जेव्हा आपण मोठमोठ्या गप्पा मारतो देशाचा पैसा हा लोकांच्या उपयोगी पडला पाहिजे वगैरे वगैरे तेव्हा आपण देशाचा विचार करतो आणि देशाला आर्थिक मजबूत करण्यासाठी विचार करत असतो.तोच विचार आपण जयंती मधून वर्गणी गोळा करताना का नाही करू शकत.

महापुरुषांच्या विचार काय आणि आपण वारसदार म्हणून काय करतोय यांचा विचार केला असता.असे दिसते की,केवळ मौज मनोरंजन व नाच गाणी करण्यासाठी जयंती साजरी केली जाते की काय? वैचारिकता वाढविण्यासाठी कोणतेही उपक्रम जयंती निमित्त साजरी होतांना दिसत नाही.या वर्षी या मोठ्या गायकाला बोलावलं की पुढच्या वर्षी त्यापेक्षा जास्त पैसे मोजावे आणि दुसरा गायक बोलावयाचा गाण्याच्या तालावर मस्त झिंगायचे आणि मोठमोठ्याने परमपुज्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणायचं असा कार्यक्रम होतांना दिसते.यात ही एक मेकामध्ये चढाओढ लागली असते आमची जयंती तुमच्या पेक्षा खूप चांगली आहे.लाख रुपये किंमतीची मोठं मोठी डिजे लावून नाचणं या कर्कश डिजे चे आवाजामुळे लहान मुले वयस्कर मंडळी यांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसतोय तरीही मोठ मोठ्या ने वाजविली जातात म्हणजे बाबासाहेबांची जयंती साजरी करणं इतकं आमच्या पिढीला माहिती आहे.बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्यासाठी आपणं काय करतोय हा प्रश्न कधी आम्हाला पडत नाही ते पडू नये म्हणून हा जयंती इव्हेंट होत आहे.इव्हेंट संपलाय की बारा महिने आम्हाला बाबासाहेब आठवत नाही.मग कसे बाबासाहेब आंबेडकर यांचें स्वप्न पुर्ण करणार.? आंबेडकरी अनुयायी आपल्या कष्टातून जमा केलेलीं रक्कम समाजातील सामुदायिक उत्सव साजरा करावा म्हणून आपली जबाबदारी म्हणून १००० रुपयाचे पुढेच देतात आपल्या बाबासाहेबांची जयंती साजरी करणे करिता त्या पैशातून काय केलं जातं यांचा कोणीही हिशोब देत नाही.वर्गणी चे नावाने जबरदस्तीने वसूली केली जाते.समोरच्या ची काही अडचणी विचारात न घेता एकप्रकारे खंडणी वसूल करावी तशी जयंती ची वर्गणी वसूल करावी हा कुठला प्रकार प्रचलित चालत आहे.यावर अंकुश ठेवलाय पाहिजे.समाजातिल सर्व स्तरातील लोक आप आपला परिने पैसे देतात कुणी देत नाही असे नाही.परतू तो पैसा चांगल्या कामा करता अथवा समाजकामी खर्च झालाय तर कुणाचं काही म्हणणं नसते, केवळ धांगडधिंगा करणे अना आवश्यक बाबींवर खर्च करणे जे सुरू आहे.ते कुठेतरी थांबायला पाहिजे.या कडे समाजाने लक्ष दिले पाहिजे.आधी जयंती साजरी करणेसाठी समाजातील सामुदायिक जबाबदारी स्विकारु इच्छिते अशाच कर्तबगार लोकांना पुढे करुन त्यांना समाजातील लोक वर्गणी गोळा करून घ्यायची.हल्ली कोणी ही अगदी शिक्षणाचा गंध नसलेली बाबासाहेब आंबेडकर आमचा बाप आणि बापाची जयंती साठी वर्गणी गोळा करतात अशा मुलांच्या हातात समाजाने पैसे देणं खरंच योग्य आहे का?. याचा विचार करणं आज प्रकर्षानं गरजचे आहे. वैचारिक प्रगल्भता आणि बाबासाहेब आंबेडकर यांचें वाचन तथा आचरण करणारी समाजातील जाणकार लोकांकडून जयंती उत्सव समिती मध्ये आवश्यक आहे.आपण आजतागायत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कमावलेल्या संपत्तीतून जयंती साजरी करतोय त्यांना आपणं आज त्यांचे वारस म्हणून काय दिले ? यांचे आत्मपरीक्षण प्रत्येक बाबासाहेबचे अनुयायीने करावे आणि हा जयंतीच्या नावे चाललेला गाणे नाचणे आणि मनोरंजन करणे हे बंद करून जयंती उत्सव हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वर सोपविण्यात आलेल्या जबाबदारी पुर्ण करण्यासाठी असायला हवा. महापुरुष हे नाचून नाही तर वाचून समजून घ्यायचे असतात. बाबासाहेब म्हणाले होते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते प्राशन करेल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. परंतु आज बाबासाहेबांच्या जयंती मध्ये मोठ्या जल्लोषात नाचणारे वाघिणीचे दूध पिऊन नाही तर दारू पिऊन येत आहेत हे बाबासाहेबांचे अनुयायी कधीच होऊ शकत नाहीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे बदललेले बीभत्स स्वरूप हे निश्चितच स्वागतार्ह नाही ! अशी जयंती साजरी झाल्यास त्यातून महामानव बाबासाहेबांचा गौरव होण्याऐवजी त्यांच्या कार्याची पायमल्ली होईल त्यासाठी तरुणांनी आणि त्यांच्या मार्गदर्शकांनी म्हणजे जयंतीच्या आयोजक संयोजकांनी भारतरत्न संबोधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोणतीही मिरवणूक काढून साजरी करण्यापेक्षा तीन दिवस व्याख्यानमाला आयोजित करून १८ /१८ तास अभ्यास इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करून येणाऱ्या पिढीला योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे अन्यथा महाकवी वामनदादा कर्डक यांनी म्हटल्याप्रमाणे “भीमा तुझ्या मताचे जर पाच लोकं असते !!तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते.वाणीत भीम आहेकरणीत भीम असतावर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते..!डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनो,भावांनो आणि बहिणींनो बाबासाहेब वाचून अभ्यास करून स्वतःच्या जीवनाचे परिवर्तन घडवूया आणि बाबासाहेब घराघरात रुजवूया असे होणे म्हणजे खरी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होणे होय,अन्यथा केवळ देखावा.ऍड.अस्मिता टिपले- ८४५९०९२७८८,वर्धा.
