
काँग्रेसमधून भाजपमध्ये आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या नेत्यांचे आम्हाला फारसे नवल नाही. हे दोन्ही पक्ष एकाच विचारधारेचे आहेत. इतकेच काय भारतीय कम्यूनिस्ट,तृणमूल आणि आप चे नेते इकडून तिकडे उड्या मारत असतील तर त्याचाही आमच्यावर परिणाम होणार नाही. कारण हे पक्ष सुद्धा एकाच माळेचे मणी आहेत. नैतिकता, सिद्धांत आणि मूल्यांशी यांचे काही देणे घेणे नाही. सत्तेसाठी काहीही तयार असलेली ही राजकीय जमात म्हणावी लागेल. मात्र जो नेता फुले – शाहू – आंबेडकरी विचाराचा आहे. आहे असे सांगतो आणि ही विचारधारा स्थापित व्हावी यासाठी प्रयत्नशील असतो आणि सिद्धांत मूल्यांच्या बाता मारतो,तो जेव्हा काँग्रेसमध्ये,भाजपमध्ये किंवा इतर ब्राह्मणी पक्षांमध्ये प्रवेश करतो, त्यांच्या सतरंज्या उचलतो तेव्हा मात्र वेदना होतात. अशा नेत्याला आंबेडकरवादी म्हणावे काय ? निश्चितच नाही. सुरुवातीला आपल्या समाजासाठीही काम करत असताना त्याचा प्रामाणिक उद्देश असेलही पुढे मात्र त्याने ती विचारधारा का सोडली ? आणि शत्रू सोबत का गेला ? याचा विचार होणे आवश्यक आहे. सुरुवातीला फुले – आंबेडकरांचे नाव घेऊन लोकांचे लक्ष वेधावे,व्यवस्थेत बसलेल्यांनी दखल घ्यावी, असे कृत्य करावे आणि पुढे प्रस्थापितांच्या छावणीत शिरावे,हा नवा ट्रेंड अलीकडे जोमात सुरु आहे. उदितराज,रामदास आठवले,जोगेंद्र कवडे अलीकडे जिग्नेश मेवाणी,प्रा.रतनलाल आणि असे कितीतरी पायलीचे पन्नास सांगता येतील.काहींची तर ढाण्या वाघ,पँथर म्हणून ओळख होती.उड्या जावून मात्र मांजर बनून म्यावं म्यावं करत आहेत.ओबीसीच्या नेत्यांवर तर आम्ही फारसे बोलणार नाही. दोन चार अपवाद सोडले तर सगळे प्रतिगामी पक्षांच्या दावणीला बांधलेले आहेत. तामिळनाडू मध्ये जी आज सत्ता आहे ते पेरियार रामासामी यांच्या आंदोलनाचे फलीत आहे. फुले – शाहू – आंबेडकरांच्या भूमीत महाराष्ट्राच्या एससी,एसटी आणि ओबीसी नेत्यांना जमले नाही. संख्याबळ असूनही नवा पर्याय देण्याची धमक नाही. म्हणून सर्वांचे आयत्या पीठावर रेघोट्या मारणे सुरु आहे.
बरे, ही आताच किड लागली आहे काय ? बिलकुल नाही. दुसरे असे की यांच्याशिवाय प्रतिगाम्यांचे पक्ष चालत नाहीत काय ? असेही नाही.या पक्षांना राखीव मतदार संघासाठी प्रतिनिधी हवे असतात.जेवढा नालायक नेता असेल तेवढे त्या पक्षाच्या फायद्याचे. नेत्यांनाही सत्तेची फळे पाहिजेत.अशा वेळी अपमान झाला तरी चालेल.ही परंपरा अगदी बाबू जग जीवनराम पासून सुरु आहे.मात्र ज्यांनी काँग्रेस आणि भाजपच्या ऑफर ठोकरीने उडवल्यात ते धन्यवादाचे पात्र आहेत.अशा प्रामाणिक आणि त्यागी नेत्यांचीही मोठी परंपरा आहे, जी समाजात सातत्याने ऊर्जा निर्माण करते,समाजाला आंदोलीत करते.अशा लोकांची संख्या मात्र कमी आहे.
राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 झाली. त्याआधी राष्ट्रपिता जोतिराव फुले यांनी 1873 ला सत्यशोधक समाजाची निर्मित केली होती. सत्याचा शोध घेणाऱ्य या संघटनेत शूद्र – अतिशूद्र आणि महिलांना विशेष स्थान होते. पुढे काँग्रेस स्थापन झाल्यानंतरही कोणी काँग्रेसकडे ढुंकूनही बघत नव्हते.कारण त्या संघटनेत त्याकाळचे भांडवलदार, संस्थानिक आणि उच्च जातीचाच भरणा होता.काँग्रेसच्या संदर्भात राष्ट्रपिता जोतीराव फुले प्रश्न करतात,” ज्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मांगा – महारांना स्थान नाही,ती काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस कशी असू शकते ?” फुलेंची बुद्धी,अभ्यास, दरारा आणि तर्कशक्ति पुढे काँग्रेसच्या नेत्यांचे शहाणपण टिकले नाही. पुढे मात्र त्यांच्या निधनानंतर 20 – 30 वर्षात सत्यशोधक समाजाचा प्रभाव कमी झाला.राजाश्रय देणाऱ्या शाहू महाराजांचेही निधन झाले.तिथूनच खऱ्या अर्थाने वाताहत सुरु झाली. सत्यशोधक समाजाचे बिनीचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सामील झालेत.शेवटी बाबासाहेबांना म्हणावे लागले की, “आता मी एकटा फुलेंचा अनुयायी म्हणून बाकी आहे.” आताच्या तथाकथित फुलेंच्या अनुयायांची लाचारी खूपच टोकाला गेली आहे. समता परिषदेच्या छगन भुजबळांच्या माकड उड्या तर बघवत नाहीत.
राजकारणामध्ये राष्ट्रपिता फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छ.शिवाजी महाराज हे महानायक ब्रँड बनले आहेत.अगदी विषमतवादी – प्रतिगामी पक्षांच्या स्टेजवर या महापुरुषांचे फोटो असतात.या सर्व पक्षांना संविधानाचा अचानक पुळका आला आहे.जो तो पक्ष संविधान वाचवण्यासाठी पुढे सरसावला आहे.आमचा सवाल आहे, आतापर्यंत तर तुम्हीच सत्तेत आहात.मग याच संविधानाची अमलबजावणी का केली नाही ? ते त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या चुकीची आम्ही माफी मागायला तयार आहेत.हा खोटा आव असला तरी मात्र ते सत्तेसाठी माफी मागत आहेत.काँग्रेसने आपला अजेंडा बदललेला आहे.सांगायचे फुले – आंबेडकरांचे विचार मात्र करायचे तेच जे त्यांच्या नेहरू गांधी,वाजपेयी नेत्यांनी केले. देशभर हातात संविधान घेऊन राहुल गांधी फिरतो तेव्हा आमच्या तथाकथित नेत्यांचा ऊर भरून येतो ही व्यक्ती पूजेची परिसीमाच म्हणावी लागेल.जी लोकशाहीस घातक आहे.
स्वतःला राष्ट्रवादी,लोकशाहीवादी,फुले – आंबेडकरवादी म्हणवून घेणारे पक्षातील प्रमुख डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगीतलेल्या बुद्ध कालीन संसदीय लोकशाही प्रक्रियेबाबत अनभिज्ञ आहेत असे नाही. त्यांना ती संपूर्ण प्रक्रिया माहित आहे.मात्र त्यांच्या आचरणात ती नाही. ते सुद्धा लोकशाहीच्या आडून फुले – आंबेडकरांच्या विचाराशी बेईमानी करत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,”जगात इतर कोणत्याही देशापेक्षा भारतात विभूतीपूजेचे फार माजले माजविले जाते.धार्मिकदृष्ट्या भक्ती हा मोक्षाचा मार्ग असू शकेल,परंतु राजकारणात भक्ती किंवा विभूतीपूजा हा अखेर हुकूमशाकडे जाणारा धोक्याचा मार्ग आहे.”
एखाद्या व्यक्तीचे कर्तुत्व फार मोठे असते ते आपण मान्य केले पाहिजे. नाही तर तो आपला करंटेपणा ठरेल. परंतु कर्तुत्वाची नेमकी परिभाषा आम्हाला ठरविता आली पाहिजे. जे देशासाठी समाजासाठी कार्य करतात, ते धन्य होत. परंतु काही व्यक्ती देशविघातक,लोकशाही मारक,नैतिक मुल्यांचे उल्लंघन करून विषमतावादी पक्षांसोबत घरोबा करत असतील तर ते घातक आहे.आपण वेळीच सावध असले पाहिजे, नाहीतर आपल्या शेकडो पिढ्या बरबाद होतील आणि अशा अधोगतीस या नेत्यांबरोबर आपणही तेवढेच जबाबदार असणार आहोत.
जीवन गावंडे,7350442920,नागपूर.

