
आज भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण भागात एक गंभीर सामाजिक समस्या दिसून येते ती म्हणजे गावागावातील गट-तट. एकेकाळी गाव म्हणजे एक कुटुंब, परस्पर सहकार्य आणि एकात्मतेचे प्रतीक होते.परंतु आज अनेक गावांमध्ये राजकीय, जातीय,आर्थिक आणि वैयक्तिक कारणांमुळे विभागणी वाढली आहे.ही विभागणी केवळ मतभेदापुरती मर्यादित नसून सामाजिक तणाव,विकासातील अडथळे आणि नैतिक अध:पतन याला कारणीभूत ठरत आहे.
१. ऐतिहासिक पार्श्वभूमी–
पूर्वी गावांची रचना ही सहजीवनावर आधारित होती. शेतमजूर,कारागीर,शेतकरी, व्यापारी सर्वजण परस्परावलंबी होते.सण-उत्सव,यात्रा, जत्रा हे सामूहिक स्वरूपात साजरे होत.परंतु भारतीय समाजात खोलवर रुजलेली जातव्यवस्था आणि उच्च-नीचतेची मानसिकता हळूहळू सामाजिक दुरावा निर्माण करू लागली.भगवान बुद्ध यांनी २५०० वर्षांपूर्वीच या विषमतेविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी सांगितले की,मनुष्य जन्माने नव्हे तर कर्माने श्रेष्ठ ठरतो.पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातून समानतेचा आणि बंधुत्वाचा पाया घातला. तरीसुद्धा आजही गावांमध्ये विभागणीचे चित्र दिसते.

२. गट-तट निर्माण होण्याची प्रमुख कारणे-
(१) राजकीय ध्रुवीकरण ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद,सहकारी संस्था यांसारख्या निवडणुकांमुळे पक्षीय विचारधारा गावात प्रवेशली.निवडणूक संपली तरी मतभेद कायम राहतात. “आपला गट” आणि “त्यांचा गट” अशी विभागणी निर्माण होते.(२) जातीय मानसिकता – जातीच्या आधारावर समाजाचे तुकडे झालेले आहेत. विवाह, सण,धार्मिक कार्यक्रम यामध्ये अजूनही जातपात दिसून येते. यामुळे सामाजिक सलोखा कमी होतो.(३) आर्थिक स्पर्धा- सरकारी योजना,अनुदान,शासकीय लाभ यासाठी स्पर्धा वाढली आहे.एखाद्या गटाला लाभ मिळाला की दुसऱ्या गटात असंतोष निर्माण होतो.(४) सोशल मीडियाचा दुरुपयोग- अफवा,अपप्रचार आणि भडक संदेशांमुळे गावातील वातावरण दूषित होते. (५) अहंकार आणि संवादाचा अभाव- संवादाऐवजी आरोप-प्रत्यारोप वाढतात. वैयक्तिक वैरभाव सामूहिक संघर्षात बदलतो.
३. गट-तटाचे परिणाम-
१. सामाजिक ऐक्याचा ऱ्हास सण-उत्सव वेगळे होतात.२. विकासकामांना अडथळे रस्ते, पाणीपुरवठा,शाळा यांसारख्या कामांवर राजकारण.३. तरुण पिढीचे दिशाभूल तरुणांमध्ये कटुता, द्वेषभावना वाढू शकते.
४. मानसिक तणाव गावात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होते.

४. बुद्धाच्या दृष्टिकोनातून उपाय
(१) मैत्री (Metta) आणि करुणा (Karuna) बुद्धांनी शिकवले की द्वेषाने द्वेष शमत नाही. प्रेम आणि करुणा हाच उपाय आहे.(२) सम्यक वाणी- अष्टांगिक मार्गातील “सम्यक वाणी” म्हणजे सत्य, हितकारक आणि प्रेमळ बोलणे. अफवा आणि अपशब्द टाळणे. (३) सम्यक दृष्टी- पूर्वग्रह सोडून वास्तव पाहणे.जात,पक्ष,स्वार्थ यापलीकडे जाऊन गावहिताचा विचार करणे.(४) संविधानिक मूल्यांचे पालन- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली स्वातंत्र्य,समता आणि बंधुता ही मूल्ये प्रत्यक्षात उतरवणे आवश्यक आहे.(५) सामूहिक उपक्रम-वृक्षारोपण,स्वच्छता अभियान,धम्मसभा, ग्रामसभा यांसारख्या कार्यक्रमांत सर्वांनी मिळून सहभागी व्हावे.
५. आजच्या परिस्थितीतील उदाहरणे-
अनेक गावांमध्ये मंदिर-विहार,पाणीटाकी, शाळा,रस्ता या प्रश्नांवरून गट निर्माण झालेले दिसतात.एखादा विकासप्रकल्प केवळ गट-तटामुळे रखडतो.यामुळे गावाची प्रतिमा खराब होते आणि बाहेरील लोकांमध्येही चुकीचा संदेश जातो.
६. निष्कर्ष- आज गावागावात गट-तट आहेत, ही कटू सत्यता आहे. पण ही स्थिती बदलणे अशक्य नाही. बुद्धांचे धम्ममूल्य आणि संविधानिक तत्त्वे अंगीकारल्यास गाव पुन्हा एकत्र येऊ शकते.संवाद,संयम,समता आणि बंधुता यावरच ग्रामविकासाचा पाया उभा राहू शकतो.
“द्वेषाने द्वेष शमत नाही; प्रेमानेच तो शांत होतो.” — भगवान बुद्ध
पूज्यनिय भिक्खू सीलवंसलंकार- ७५०७८९४२०३,अमरावती
(लुंबिनी बुद्ध विहार तपोवन परिसर अमरावती )

