रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ट कोणते ?.

बातमी शेअर करा.

३ ऑक्टोबर २०२५ रोजी,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या स्थापनेला ६८ वर्ष पुर्ण होत आहेत.त्यानिमित्याने विशेष लेख 

आजच्या तरुणांना रिपब्लिकन पक्ष कोणाचा आहे असे विचारले तर काय उत्तर मिळेल?.ते ऐकण्याची तयारी कोणाचीच नसणार,कारण त्यांच्या आजू बाजूच्या नगरातील विभागातील कार्यकर्ते नेते दररोज सकाळी कुठे भेटतात आणि संध्याकाळी काय करतात.त्यांचे उधोगधंदे व उत्पन्नाची साधन व मार्ग कोणते यांची पूर्ण कल्पना विभागातील समाजाच्या लोकांना असते.त्यांनी जर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला तर लोक त्यांच्याकडे तिरक्या नजरेने पाहतात.कारण क्रांतिकारी विचाराचे आचारण कुठेच दिसत नाही.दलाली,गुलामगिरी आणि लाचारी नसानसात भरलेली माणस जेव्हा स्वाभिमानाची गोष्ट करतात,तेव्हा जवळची लोकच त्यांच्याकडे संशयाने पाहतात.ते तसे जगण्यासाठीच एकाच नगरात एकाच गटाशी प्रामाणिक राहत नाही,तथागत बुद्ध वाचनालय काढतील पण त्यावर बुद्ध आंबेडकर यांच्या फोटो पेक्षा राष्ट्रवादी नेत्याच्या भाऊ,वहिनी,आईचा फोटो किती महत्त्वाचा आहे हे नगरातील विभागातील लोकांना दाखवुन देतील.त्याला स्वाभिमानी, आंबेडकरी विचारांचे माणस विरोध करण्याचे धाडस कधीच करत नाहीत.मागे जरूर बोलतील पण समोर नाही.मूर्ख आहे तो! त्यांच्या कशाला नादी लागावे असे म्हणूनच त्याला सोडून देतील.पुढे जयंतीला,वर्षावास समारोप,महापरिनिर्वाण दिनाला भोजन दान व बॅनर त्यांच्या कडुनचं आर्थिक मदत मात्र न चुकता घेतील.त्यामुळे नगरात विभागात रिपब्लिकन कार्यकर्ता नेता जातीने व कार्याने ओळखला जातो.आज माझी मुले विचारतात रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ट काय होते?. ते कुठे दिसते काय ? प्रत्येक नेत्याचे समाजा बाबत काय मत आहे हे जर ऐकले तर लढावे की रडावे हाच प्रश्न पडतो.क्रांतिकारी विचाराचा शब्द “रिपब्लिकन” आणि बहुसंख्येने असलेला समाज म्हणजे “हत्ती” सारखी शक्ती तीच आपली निशाणी.कुठे आहे?.अडूसट (६८) वर्षात आम्ही हा इतिहास किती वाचला,समजला आणि आचरणात आणला?.

भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत नाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे आहे.भारतीय रिपब्लिकन पक्ष हा भारतातील शोषित पिडीत आदिवाशी मागासवर्गीय समाजाचा म्हणजे बहुजन समाजाचा रिपाई म्हणूनच ओळखला जातो.तसा भारतातील सर्वात मोठी संख्या असणाऱ्या समाजाचा हा राजकीय पक्ष आहे. डॉ.भिमराव आंबेडकरांनी सुरू केलेल्या  शेडूयूल्ड कास्टस फेडरेशन या सामाजिक संघटनेतून हा पक्ष उदयास आला.या पक्षाचे मुख्य बलस्थान  महाराष्ट्र होते.शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन या सामाजिक संघटनेने राजकारणात उतरून निवडणुकीत भाग घेतल्यामुळे अनेक समाजाचे समीकरण बदललेले होते. त्याचमुळे त्याची राजकीय पक्षात गणती होत होती.आज तो सत्ता मिळवुन देणारा समाज म्हणूनच ओळखला जातो.  शेडूयूल्ड कास्टस फेडरेशन या सामाजिक संघटनेतून राजकीय पक्ष.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही संकल्पना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची होती.

त्याच्या महापरी निर्वाणा नंतर ३ ऑक्टोबर १९५७ रोजी त्यांच्या निष्टावंत अनुयायांनी रिपाईची स्थापन केली.पण सुरवात पासूनच या पक्षाचा संपूर्ण इतिहासच अहंकाराचा आणि फाटाफुटींनी भरलेला आहे. तेव्हा पासून आज पर्यंत दररोज “रिपब्लिकन” हा शब्द असलेला एक राजकीय पक्ष (गट) स्थापन होतो आणि पुढे तो फुटतो,असे या ऐतिहासिक रिपाई प्रक्रियेचे एकूणच वर्णन करता येईल.त्यामुळेच रिपब्लिकन पक्ष त्यांच्या अंतिम उद्धिष्ठा पर्यंत पोचला नाही.भारताला आणि भारतीयांना कठीनातील कठीण प्रश्न,समस्या सोडविण्यासाठी बाबासाहेबांनी लोकशाही दिली.संविधानाची योग्य अमंलबजावणी केली तर कोणत्याही समस्या सुटू शकते.हे त्यांनीच आत्मविश्वासाने सांगितले होते.पण रिपाई ने त्याला महत्व न देता स्वार्थ व अहंकार या शब्दाला यांनी खूप महत्व दिले आहे.म्हणून आज ही यांची संपूर्ण इमारत त्यावरच उभी आहे.बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ बौद्ध धम्माची दिक्षा देताना त्यात त्यांनी त्रिसरण,पंचशील,आणि बावीस प्रतिज्ञा दिल्या होत्या हे सर्वच कार्यकर्ते नेते विसरले आहेत.म्हणून रिपाई किंवा इतर समाजिक,धार्मिक संघटना नेहमी अहंकारा पायी फुटतात असे म्हटले तर चूक ठरणार नाही. त्यांनी संविधान मान्य केले असते तर आज रिपब्लिकन समाज रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ठ गाठण्याच्या स्पर्धेत असता.     

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष म्हणून ओळखणारा रिपाई पहिल्यांदा फुटला तो १९५८ साली.म्हणजे पक्ष स्थापने नंतर एक वर्षांच्या आतच.तेव्हा ही नेतृत्व कुणी करायचे,यावरूनच पक्ष फुटला होता.त्यातून खोब्रागडे -गायकवाड आणि कांबळे-रूपवते असे दोन गट निर्माण झाले.१९६४ मध्ये गायकवाड गटातून आर.डी.भंडारे बाहेर पडले तर १९६५ मध्ये कांबळे गटात फूट पडून रूपवते बाहेर पडले आणि गायकवाड गटाशी त्यांचे ऐक्य झाले.म्हणजे ज्यांना विरोध केला त्यांच्या कडेच गेले.पुढे आर.डी.भंडारे आणि रुपवते कॉंग्रेसवासी झाले.त्यानंतर आजपर्यंतचा या पक्षाचा संपूर्ण प्रवास फाटाफूट आणि ऐक्य यांनी रंगलेला आहे.वारंवार झालेल्या या फाटाफुटी व ऐक्यामुळे ‘फूट’ आणि ‘ऐक्य’ या दोन्ही शब्दांचे रिपब्लिकन चळवळीच्या संदर्भातले गांभीर्यच नष्ट झाले आहे.आता पर्यंत या पक्षाची ५० हून अधिक छकले झाली आहेत, आणि अशा प्रत्येक छकलाचा एक स्वतंत्र राजकीय पक्ष झाला.रिपाई नांवा शिवाय हे स्वताचे अस्तित्व दाखऊ शकत नाही.क्रांतिकारी विचारांच्या आंबेडकर अनुयायाची आत्मपरीक्षण करण्याची तयारी नसल्यामुळे मी बरोबर बाकी सर्व चूक हे सिद्ध करण्यात या नेत्यांनी आपली “व्यापक रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात येऊच शकत नाही ?. “अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आंबेडकरी चळवळ संपली आहे पुस्तकरुपी निष्कर्षा नंतर त्यांनी आंबेडकरी विचारांचे चळवळीचे काम करणे सोडून दिले आणि डाव्या विचाराच्या विविध गटांना जवळ करून नक्षलवादी विचाराच्या तरुणाना जाहीर पाठिंबा दिला त्यातूनच महाराष्ट्र लोकशाही आघाडी निर्माण झाली होती.आता तर सर्व समाज आणि कार्यकर्ते नेते विचारापासून वंचित झाले आहेत.आणि त्यांची वंचित घटकांची वंचित बहुजन आघाडी राज्यात एक वेगळे राजकीय पटावर स्थान निर्माण करीत आहे.

प्रा.जोगेंद्र कवाडें सारखा प्रामाणिक नेता खासदाराचे मागच्या दराने आमदार झाले. आणि रिपाई मधील उरला सुरला प्रामाणिकपणा संपवला.रिपब्लिकन चळवळ नावापुरती शिल्लक राहली असा धोक्याचा गंभीर इशारा देणाऱ्या बाळासाहेबांनी आंबेडकरी चळवळीच्या वाताहताची शोधून काढलेली कारणे आणि मांडलेले निष्कर्ष पाहता त्यावर सविस्तर चर्चा खूप झाली.पण ते केवळ कार्यकर्त्याच्या लेवलवर,ती बुद्धीजीवी वर्गाच्या पातळीवर झाली असती तर समाजाला नेमकी दिशा देता आली असती.परंतु बहुसंख्य बुद्धीजीवी भिती पोटी सत्य मांडण्याचे धाडस करीत नाही. अनेकांनी आंबेडकरी चळवळ संपली नसल्याचे दावे केले,पण तिच्या जीवंतपणाची लक्षणे कोणती ह्याबाबत ठामपणे स्पष्टीकरण दिले नाही.आज आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले संपूर्णपणे उध्वस्थ झालेले (वैचरिक पातळीवर) स्पष्ट दिसतात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल एक पत्र १ ऑक्टोबर १९५७ रोजी ‘प्रबुध्द भारत’ मध्ये भारतीय जनतेला उद्देशून प्रसिद्ध झाले होते. हे पत्रच रिपब्लिकन पक्षाची घटना मानली जावी असा सर्व नेत्याचा आग्रह होता.त्यात न्याय,समता,स्वातंत्र्य आणि बंधुता हि पक्षाची ध्येय असतील,पक्षाच स्वरुप प्रादेशिक न राहता ते देशव्यापी असेल असे स्पष्ट करुन,आपल्या अनुयायांना बाबासाहेब सांगतात, ‘हा पक्ष देशातील सर्व कष्टकरी मागासवर्गीय समाजातील शोषित,वंचित,पिडीत जनतेच्या हिताचा रक्षणकर्ता असेल.अनुसूचित जाती-जमाती,बौद्ध आणि मागासवर्गीय लोकांच्या हितासाठी प्रयत्न करण्याची बांधिलकी स्विकारलेला असेल.शासनकर्ती जमात बनतांना जो पक्ष आपल कल्याण करील,त्यांच्याशी हातमिळवणी करावी. दुस-या पक्षाशी सहकार्य करतांना आपला पक्षाच्या तत्वज्ञान,ध्येय आणि उदिष्ट यांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी.नेता एकच असावा आणि पक्षही एकच असावा.पक्षाच चिन्ह हत्ती हे बुद्ध संस्कृती मधिल प्रतिक तर,अशोक चक्रांकित निळा झेंडा हे निशाण असे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या पक्षाबद्दलचे मत स्पष्टपणे मांडलेले होते.हा इतिहास आजचा तरुण वाचायला तयार नाही.म्हणून तो इतिहास वाचून इतिहास घडविण्यास तयार नाही.तो दिशाहीन झाला आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर ३ ऑक्टोबर १९५७ साली बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची नागपूर दिक्षा भूमीवर स्थापना झाली होती.त्यानंतरच्या सार्वत्रिक निवडणूकात पक्षाने दैदिप्यमान, नेत्रदिपक यश संपादन केले होते.त्यावेळी त्याची राजकीय शक्ती प्रभावशाली आणि सर्व समाजाचे लक्षवेधनारी होती,त्यात सतर टक्के असंघटीत कष्टकरी मजूर,शेतमजूर, कामगार होता.त्यांचा नेत्यावर विश्वास होता. पण त्यानंतरच्या काळात बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचाराचा नेत्यांना विसर पडला आणि युती आघाडी वर भर देण्यात आला.त्या काळी एका मान्यताप्राप्त नेत्याचा एक मंत्र होता गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली.बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केलेली पोलादी, प्रभावशाली,बलाढ्य एकसंघ असलेली संघटना,रिपब्लिकन पक्षाची चळवळ सामाजिक,राजकीयदृष्ट्या सक्षम नेतृत्वा अभावी,मतभेद,अहंकार,स्वार्थी राजकीय महत्त्वकांक्षापोटी फुटत गेली. इतर राजकीय पक्षांशी तडजोड करीत.प्रत्येक गटाचे नेतृत्व बेफिकीर,दिशाहीन बनत गेले.गटा तटाच्या निच राजकारणामुळे आपल्या समाजातील अनेक लोक इतर राजकीय पक्षात कार्यरत होत गेले.या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवणारा फार मोठा बुद्धिजीवी वर्ग अलिप्त राहिला.आज आमचे काही दैनिक आहेत पण त्या दैनिकाच्या संपादकाचे आंबेडकरी चळवळी बाबत कोणत्याही विषयावर एक मत होत नाही.राजकीय नेत्या सारखे ते एकमेकाच्या जवळ बसून किमान एक कार्यक्रम बनवून समाजा समोर भूमिका मांडण्याची हिंमत दाखवत नाही. त्याच बरोबर आंबेडकरी विचारांची एक राष्ट्रीय ट्रेंड युनियन “स्वतंत्र मजदूर युनियन” अजून मान्यताप्राप्त नाही जे देशातील तमाम कामगार,कर्मचारी आणि अधिकारी यांच्या दबावाखाली काम करेल.मग देशातील ९३ टक्के असंघटीत कामगार मजुरांचे समाज प्रबोधन कोण करेल?.   

१९२७ ते १९५६ पर्यंत मागासवर्गीय शोषित वंचित समाज जो असंघटीत कामगार शेतमजूर होता तो असुशिक्षित अज्ञानी मोठ्या प्रमाणत होता.तरी तो डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक जनआंदोलनात अक्षरशः आपले जीवन कुर्बान करीत होता, समाजातील असंघटीत कामगार मजुरांच्या ध्येय धोरणांशी,कार्याशी आपण जितके प्रामाणिक राहू,तितकी बाबासाहेबांची चळवळ आपल्यात जीवंत राहिल.रिपब्लिकन पक्षाच्या गटा तटांना अनेकदा भावनिकतेवर आधारित ऐक्य करावे लागले आणि ते करण्यास भाग पडणारा कोणी पदवीधर प्राध्यापक,डॉक्टर,वकील,इंजिनियर नव्हता. आंबेडकर चळवळ संपली या छोट्या पुस्तकात लेखक बाळासाहेब आंबेडकर यांनी ऐक्यासाठी उपोषण करणारे कोण आहेत आणि त्याचे शिक्षण व रोजगार काय आहे हे नांवासह दिले आहे.सर्व असंघटीत कामगार मजूर होता.हे लक्षात घ्या.आताही त्यांनाच पुढाकार घ्यावा लागेल.कारण समाजात असंघटीत कामगारंचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत आहे. त्यांच्या पाठीवर कोण कधी हात ठेऊन आपले करेल हे सांगता येत नाही.

रिपाईच्या सर्व बालेकिल्ले कुठे आहेत हे शोधावे लागेल.अहंकार,मतभेद, प्रलोभन,अमिषापायी आंबेडकरी चळवळीतील सामाजिक,राजकीय निष्ठा गौण ठरत आहे.आज आपला सामाजिक,राजकीय पाया काय आहे?. ज्या क्रांतिकारी चळवळीला तत्वज्ञान आहे, क्रांतिकारी सामाजिक बांधिलकी असलेले कार्यकर्ते आहेत,परंतु त्याच समाजासमोर,चळवळीसमोर पर्याय नसल्याने आज अनेक प्रश्नचिन्ह आहेत.अत्याचार आणि भावनिक प्रश्नापुरती चळवळ फक्त लढते आहे.पण निकाल काय ?. संविधाना नुसार ग्रामपंचायत ते राष्ट्रपती पर्यंत निवडणुका होऊन निकाल लागतो.त्याकरिता भारतीय नागरिक म्हणून नांव नोंदणी झाली तरच मतदानाचा अधिकार असतो, ग्रामपंचायत सदस्य ते आमदार,खासदार कोण कोणाला कसे निवडून देते हे उठता बसता भारतीय घटनेच्या शिल्पकारांचे नांव घेणाऱ्या समाजाला सांगणे मला शोभणारे नाही.   

डॉ.बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या राजकीय पक्षाची आपण काय अवस्था करुन ठेवली आहे ? पक्षाची राजकीय मान्यता,निवडणूक चिन्ह ही आपण केव्हाच गमावून बसलो आहोत.अत्याचार,अन्याय,भावनिकता आणि बाबासाहेबांच्या नावाचे भांडवल करुन अजून किती सोयीच राजकारण आपण सर्व करणार आहोत?. राजकारणात बेरीज चालते,आपण तर वजाबाकी व भागाकार करीत आहोत.आपली निर्णायक बलाढ्य शक्ती असतांना,आपण राजकारणात अदखलपात्र का ठरु लागलो ? आंबेडकरी चळवळ राजकीय,सामाजिक चळवळीचे होत असलेले पतन आंबेडकरी अनुयायांना अभिमानास्पद आहे का ? प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रत्येक गटा तटाचा फायदा इतर राजकीय पक्षांना होणार असेल तर?. राजकारण कशासाठी,कोणासाठी आणि का करायचे ?. 

३ ऑक्टोबर २०२५  रोजी,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या स्थापनेला ६८ वर्ष पुर्ण होत आहेत.काही रिपाई गटाची मान्यता रद्ध करण्यात आल्याचे आपण वाचले असेलच.कारण त्यांनी रीतसर हिसाब ठेवला नाही आणि सादर केला नाही.तीच परिस्थिती सामाजिक धार्मिक शौक्षणिक संस्था,संघटना यांची आहे.मग आता कोणता रिपाईचा गट बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचाराचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे.   राज्यात आणि देशात एका रिपब्लिकन गटाचे नांव सतत चर्चेत असते.ते म्हणजे नामदार खासदार रामदास आठवले देशातील एकमेव नेता ज्यांना भेटण्यास कोणतीही वेळ व जागेचे बंधन नाही.वैचारिक शत्रूच्या कळपात जरी असले तरी त्यांनी आपला ठसा सर्व समाजात ठेऊन आहेत.त्यांच्या सोबत जो फौजफाटा आहे तो सर्वच क्षेत्रात संघर्ष आणि नेतृत्व करण्यास तयार असतो.रामदास आठवले यांची बहुजन समाजात रिपब्लिकन नेते म्हणून ओळख समाजमान्य आणि लोकमान्य आहे. हे माझे मत काहीना पटणार नाही. हे वाचून ते काही लोक हमखास शिवीगाळ करतील,हातपाय तोडण्याची भाषा करतील.कारण सध्या सत्य बोलायचे नाही,लिहायचे अशा विचाराची  मानस तयार केली जात आहेत.रिपब्लिकन पक्षाचा वर्धापनदिन अधिकृत पणे साजरा करणारा एकमेव गट रामदास आठवले जरी असला.तरी तो रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ट गाठण्यास असमर्थ आहे.कारण त्यांच्याही गटाला संविधान किती मान्य आहे हे त्यांच्या कार्यप्रणाली आणि जाहीर सभेच्या स्टेजवरील नेत्याच्या गर्दीवरून लक्षात येते. सर्वच रिपब्लिकन गटाचे नेतृत्व करणारे एक नंबर नेतृत्व सोडल्यास राज्यात दोन,तीन चार पाच नंबर राज्याचे नेतृत्व करणारे नेते नाहीत. प्रशिक्षित कार्यकर्ते नाहीत.लेटर हेड वर जगणारे कार्यकर्ते समाजाला स्वाभिमानी बना! सांगु शकत नाही. सरकारी योजनांची अभ्यासपूर्ण माहिती नाही.समाजाचा आणि जनतेला कसा लाभ मिळवुन द्यावा यावर जनांदोलन उभे न राहता स्वतःला किती कमिशन अथवा दलाली भेटलं यावर सर्व लक्ष केंद्रित असलेले कार्यकर्ते,नेते पक्षाला कोणती दिशा दाखवून पुढे नेतील?. त्यामुळेच असंघटीत कष्टकरी कामगार,मजूर,शेतमजूर मोठ्या संख्येने इतर पक्ष संघटने कडे वळतो आहे.महाराष्ट्र 

इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या रोजगार व सेवाशर्तीचे नियमन करण्यासाठी व त्यांच्या सुरक्षा,आरोग्य व कल्याणासाठी उपाययोजना करण्याकरीता अधिनियम,नियम केंद्र व राज्य शासनाने निर्गमित केले आहेत.त्याद्वारे खेड्या पड्यात इमारत बांधकाम कामगारांची नांव नोंदणी मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यात आपला पक्ष,त्यांचे कार्यकर्ते नेते कुठे आहेत.याचा सर्वच जागृत कार्यकर्ता,बुद्धीजीवी,साहित्यिकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.   रिपब्लिकन विचारधारा किती हि चांगली असली तरी तिचे आचरण करणारे अनुयायी नसतील तर रिपाई रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ट गाठूच शकत नाही.लोकशाहीचे बंधन मान्य नसणारे कार्यकर्ते लगेच पन्नास शंभर लोक सोबत घेऊन पक्ष संघटना काढत राहिले म्हणजे काय होईल?.तालुक्यात जिल्ह्यात संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष निर्माण होत राहतील.ते कोणाचे चमचे,दलाल,गुलाम असतील हे सांगता येणार नाही.

म्हणून सर्व गल्लीबोळातील तरुणांनी प्रथम आपल्या विभागातील स्वार्थी, अहंकारी कार्यकर्ते संपविण्याची जबाबदारी घ्यावी. आणि आपल्या परीसारतील आंबेडकरी समाज एकसंघ करण्याचा प्रयत्न करावा.भारताला दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने नेता निवडावा जो लोकशाही मान्य करीत असेल आणि लोकशाहीने पक्ष संघटना चालवीत असेल तोच रिपाईचा नेता असेल.रिपाईच्या ३ ऑक्टोबर वर्धापन दिना निमित्य एक संकल्प तरुणानी केला पाहिजे. रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ट कोणते ? ते ठरवुन काम केले पाहिजे.ते करण्यासाठी आत्मचिंतन आत्मपरीक्षण करून तरुणांना संधी दिली पाहिजे.  

सागर रामभाऊ तायडे,भांडूप मुंबई,९९२०४०३८५९.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *