आदरणीय प्रभाकर जाधव यांचा 82 वा वाढदिवसानिमित्त जीवन प्रवास

मी प्रभाकर जाधव यांचा बालपणापासूनचा मित्र.मित्र शब्द आमच्या नात्याला अपूरा आहे.आम्ही आजपर्यंत बंधू म्हणून वागलो.त्यांचे जीवन मी लहानपणापासून पाहिले.ते आणि मी बौद्धजन पंचायत समिती भोईवाडा येथील पंचायत समितीच्या हॉलमध्ये बसून रात्रीचा अभ्यास करायचो.त्या हॉलमध्ये बाबासाहेबांची बसण्याची खुर्ची आणि टेबल होते.ती आमची प्रेरणा होती.ज्या विद्यालयात भालचंद्र मुणगेकर शिकले त्याच नवभारत विद्यालयात ते शिकले.आणि मॅट्रिकची परीक्षा पास झाले.मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर त्यांनी सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.त्यांचे आई-वडील म्हणायचे सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकल्यावर माणूस विद्वान होतो.त्यांचे हे विधान सत्यात उतरले. त्यांना लाभलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कांबळे) या पक्षाचे संस्थापक,माजी खासदार,घटनातज्ञ,कायदे पंडित ॲड.बापूसाहेब कांबळे यांचा सहवास म्हणजे परिपूर्ण ज्ञानाचा सहवास.
बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ त्यावेळी इंग्रजी भाषेत होता.वयाच्या 22 व्या वर्षी चळवळीमध्ये आले तेव्हा इंग्रजी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे मराठी भाषांतर झाले नव्हते.त्यांनी इंग्रजी ग्रंथ वाचून मराठीत अनेक प्रवचने संपूर्ण महाराष्ट्रात केली आहेत.ती प्रवचने देखील जाण्या येण्यासाठी प्रवासाची सोय नसताना देखील स्वतः चालत जाऊन केलेली आहेत.त्यामुळे त्यांचे जीवन बौद्धमय झाले होते.ते आयुष्यभर बौद्ध धम्मानुसार जीवन जगले.इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकात एक कविता होती.चाक फिरवतो गरागरा मडकी करतो भराभरा.मी कोण ? कुंभार.
अशा आशयाची लहान मुलांवर जातीचे संस्कार करणारी कविता होती. त्याविरुद्ध आवाज उठवून त्यावेळचे शिक्षण मंत्री या एन.एम.जोशी यांना भेटून पुस्तकातून काढून टाकायला लावली.तसेच खेड येथे 1970 मध्ये मध्ये विहिरीच्या पाण्याचा वाद निर्माण झाला होता.राज्याचे एक मंत्री त्याचवेळी खेडमध्ये येणार होते.असे प्रभाकर जाधव यांना समजताच स्वतः जाऊन त्या मंत्र्यांची गाडी अडवली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली आणि त्याचा अर्जही दिला त्यावेळी कायदामंत्री हुसेन दलवाई यांनी स्वतः त्या विहिरीची बंदी उठवण्यास सांगितली.चिपळूण मध्ये ते चिपळूण तालुका बौद्धजन हित संरक्षक समितीचे अध्यक्ष असताना मुलांच्यासाठी वसतीगृह सुरू केले.मी स्वतः त्या वसतीगृहाचा सुप्रीटेंडन होतो.मुलांची सोय केलेली होती. ती संकल्पना त्यांचीच होती.

1991 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा चिपळूण शहरात व्हावा अशी मागणी केली.त्यासाठी त्यांनी 26,27,28 जानेवारी 2005 ला त्यांच्या पाच सहकाऱ्यांसह आमरण उपोषण केले.आज डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्रातील एक सुंदर पुतळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक बहादुर शेख नाक्यावर उभा आहे.त्याचे शिल्पकार विजय शिरगावकर आज हयात नाहीत.
चिपळूण तालुका बौद्धजन हित संरक्षक समितीच्या चिपळूण येथील सभागृहाकडे जाणारा रस्ता बंद केला होता.तो रस्ता खुला करण्यासाठी चिपळूणच्या प्रांतासमोर त्यांनी केलेला युक्तिवाद आजही आठवतो.तो रस्ता आज राजमार्ग झाला आहे.खेड तालुक्यातील अजगणी गावचा रस्ता,असुर्डे बौद्ध वाडी चा रस्ता,रामपूर रोहिदास वाडी चा रस्ता,आणि मार्ग ताम्हाणे चा रस्ता,अशी अनेक कामे त्यांनी केलेली आहेत.आणि अनेक रस्ते लोकांना रहदारीसाठी बंद होते.ते रस्ते खुले करून देण्यासाठी शांततेच्या मार्गाने संघर्ष करून लोकांना खुले करून दिले आहेत.

आद.प्रभाकर जाधव यांचे जीवन,तथागत भगवान बुद्ध यांच्या तत्त्वज्ञानाशी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला वाहिलेले जीवन आहे. तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी रात्रीचा दिवस करून लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले.त्यांनी आपल्या आयुष्यात सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी अनेक लढे दिलेले आहेत. अतिशय शांततेच्या मार्गाने चिपळूण तालुक्यात समाजाच्या मागण्यांसाठी व हक्कांसाठी अनेक मोर्चे देखील काढले आहेत.आणि ते आजतागायत वयाच्या 82 या वर्षी देखील लढत आहेत.असे संघर्षमय लढत देत असताना प्रामाणिकपणे,नियोजन पूर्व आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता लढे दिलेले आहेत.अशा या लढवय्या,समाज प्रिय आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कांबळे) च्या वतीने शुभेच्छा देऊन हा लेख पूर्ण करीत आहे.
आयु.माधवराव पवार – 9373646109,खांडोत्री,जिल्हा रत्नागिरी.

