
विशेष प्रतिनिधी नागपूर:- स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य शाखेची वार्षिक सर्व साधारण सभा राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस पाटील,राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र जरोंडे,राष्ट्रीय उपाध्यक्ष विकास गौर यांच्या उपस्थितीत राज्याध्यक्ष सागर तायडे यांच्या अध्यक्षते खाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर कामगार प्रशिक्षण केंद्रात, प्रेरणा नगर, हजारी पहाड नागपूर येथे दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी बारा वाजता झालेली संयुक्त सर्वसाधारण सभा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.सभेत सर्वानुमते नवीन कार्यकारणी निवड करण्यात आली ती खालील प्रमाणे आहे.

अध्यक्ष मान.सागर रामभाऊ तायडे (बांधकाम विभाग, मुंबई) कामगार चळवळीतील सक्रिय नेतृत्व असंघटित कष्टकरी बांधकाम कामगारांच्या हक्कासाठी सातत्यपूर्ण सनदशीर मार्गाने लढा,संघर्ष आणि संघटनात्मक शिस्त त्यामुळे त्यांची पुन्हा निवड करण्यात आली.उपाध्यक्ष मा.धर्मपाल ताकसांडे (परिवहन,वर्धा),मा.सुनिल तेलतुंबळे (शिक्षण, हिंगणघाट),मा.प्रशांत रामटेके (बांधकाम, वर्धा),मा.रविंद्र सुर्यवंशी (वाहतूक, मुंबई) चार उपाध्यक्षांची नियुक्ती संघटनेच्या व्यापक क्षेत्रविस्ताराचे द्योतक मानली जात आहे. विविध विभागांचे प्रतिनिधित्व केल्याने कार्यकारिणीच्या निर्णयक्षमतेला सर्व बाजूंनी बळकटी मिळेल. महासचिव मा.गणेश शि.ऊके (मत्स्यव्यवसाय,नागपूर) प्रशासकीय निष्ठा,संवाद कौशल्य आणि संघटनात्मक बांधणीतील अनुभव यांच्या जोरावर महासचिवपदावर त्यांची निवड निश्चित झाली आहे.सहसचिव मा.दिनेश सि. बोरकर (डाक,नागपूर) संघटन सचिव मा.देवानंद फुलझेले (ग्रामविकास,गडचिरोली) व मा.रत्नपाल डोफे (बांधकाम,यवतमाळ) ही तिन्ही पदे संघटनेच्या प्रादेशिक विस्तारात निर्णायक भूमिका बजावणार आहेत.कोषाध्यक्ष मा. सतिश बागडे (रक्षा,नागपूर) आर्थिक पारदर्शकता,जबाबदारी आणि कार्यकुशलता या निकषांवर आधारित त्यांची निवड अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.याशिवाय संतोष हेरोडे (कल्याण), गितेश पवार (मुंबई), डी.जी.तायडे (अकोला), रोहन राठोड (नांदेड),अरुण कांबळे (पुणे), सौ.प्रफुल्लता लोणारे (हिंगणघाट), सौ. सुरेखा अथरगडे (चिमूर) यांची सदस्यपदी निवड झाली आहे.महानगरपालिका,लघु उद्योग,विद्युत,रेल्वे,अंगणवाडी,सुरक्षा रक्षक,बांधकाम,वाहतूक अशा विविध विभागातील संघटना प्रतिनिधीची निवड करण्यात आली.
स्वतंत्र मजदूर युनियन राष्ट्रीय अध्यक्ष मन.जे एस पाटील यांनी संघटना मजबूत करणे म्हणजे काय?. फुले,लोखंडे शाहू आंबेडकर विचार मानणारे कामगार कर्मचारी अधिकारी दुसऱ्या विचारधारेच्या ट्रेड युनियन मध्ये काम करतात त्यांना आपल्याकडे आणून आपली संख्या वाढवणे ही ध्येय उदिष्ट असले पाहिजे ते पूर्ण करण्यासाठी कष्ट,त्याग आणि वेळ देण्याची तयारी असली पाहिजे तरच क्रांतिकारी आंबेडकराईट ट्रेड युनियन राष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त होईल असे प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांनी सांगितले.राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र जरोंडे,राष्ट्रीय उपाध्यक्ष विकास गौर यांनी ही मार्गदर्शन केले.
सभेतील सर्व चर्चांनंतर राज्याध्यक्ष सागर तायडे यांनी युनियनच्या भविष्यासाठी काही मूलभूत दिशादर्शक मुद्द्यांवर भर दिला कामगारांच्या मूलभूत हक्कांची हमी,वेतन आणि सुरक्षा मानके सुधारण्यासाठी धोरणात्मक संघर्ष,विविध जिल्हा शाखांमधील समन्वय वाढविण्यासाठी डिजिटल माध्यमाचा वापर करून आणि प्रत्यक्ष यंत्रणा उभारणे,तसेच संघटित असंघटीत क्षेत्रातील कामगार कर्मचारी यांना संघटनेचे सदस्यत्व बनवून सभासद संख्या वाढविण्यासाठी मोहिम राबविण्याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन सागर तायडे यांनी केले.ही कार्यकारिणी पुढील दोन वर्षे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील कामगारांच्या प्रश्नांना अधिक तीव्र, परिणामकारक आणि कायदेशीर आधार देण्याच्या उद्देशाने काम करणार आहे. क्रांतीभुमी नागपूरमधील महासभेत झालेली सर्वानुमती निवड ही संघटनेतील ऐक्य, विश्वास आणि सामूहिक नेतृत्वाची ताकद अधोरेखित करणारी घटना ठरली आहे.स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्हा शाखेचे प्रतिनिधी आणि संलग्न संघटनेचे पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक डी. एम खैरे यांनी केले तर सूत्र संचालन गणेश ऊके यांनी करून दिनेश बोरकर यांनी सर्वांचे आभार मानले.

