
समाजवादी चळवळीचे प्रखर पुरस्कर्ते,तत्त्वनिष्ठ कार्यकर्ते आणि राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा हे महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचे नाव होते.त्यांचे संपूर्ण आयुष्य हे लोकशाही मूल्यांची जपणूक,सामाजिक न्यायाची चळवळ आणि राष्ट्रसेवेची अखंड साधना या त्रिसूत्रीवर आधारलेले होते. न्याय, समता, स्वातंत्र्य आणि मानवतेवरील त्यांची श्रद्धा ही त्यांच्या प्रत्येक कृतीतून प्रकट होत राहिली होती.त्यांचा जन्म बुलढाण्यातील परांडा येथे ९जुलै १९३३ रोजी झाला होता.
राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून युवा शक्तीला लोकशाही मूल्यांचे आणि सामूहिक शिस्तीचे शिक्षण देणे हे त्यांचे एक महत्त्वाचे योगदान होते.राष्ट्र सेवा दलाच्या सांस्कृतिक,शैक्षणिक आणि सामाजिक प्रशिक्षण शिबिरांमधून त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना समाजकारणाची नवी दृष्टी दिली होती. दलाच्या कार्यक्रमांतून स्वच्छता, पर्यावरण संरक्षण,आपत्ती व्यवस्थापन,लोकशाही साक्षरता आणि राष्ट्रीय एकता या विषयांवर त्यांनी सातत्याने काम केले होते. त्यांचे नेतृत्व सदैव विनम्र, संवादप्रिय आणि प्रेरणादायी राहिले होते. सामूहिक प्रयत्नांवर, सहकार्यावर आणि विचारांतील भिन्नतेचा आदर करण्यावर त्यांनी अपार भर दिला होता. किल्लारी भूकंपानंतर “आपलं घर “च्या माध्यमातून त्यांनी निराधार बालकांसाठी केलेले काम मोठे होते.
मानवी हक्क, धार्मिक-जातीय सौहार्द आणि संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला होता.लेखन,व्याख्याने, चळवळी आणि संघटन या साऱ्यांतून पन्नालाल सुराणा यांनी तरुण पिढीला समाजवादी मूल्यांच्या दिशेने प्रेरित केले होते. देशातील बदलत्या राजकीय वातावरणातही ते तत्त्वनिष्ठ समाजवादी राहिले होते.लढाऊ पण संयत, कठोर पण मानवतावादी.आमूलाग्र बदलासाठी आवश्यक असलेली दीर्घकालीन कार्यपद्धती, लोकांवरील विश्वास आणि नैतिकता यांचा आदर्श त्यांच्या जीवनातून दिसून येत होता.पत्रलेखनातून देशभरातील कार्यकर्त्यांशी एक वेगळाच ऋणानुबंध निर्माण केला होता. त्यांनी आपल्या आयुष्यात चाळीस पुस्तकांचे लेखन केले होते.तत्वासाठी संघर्ष,मानवी मुल्यांवर गाढ निष्ठा व सामाजिक लोकशाहीचे संवर्धन ही पन्नालाल सुराणांची त्रिसुत्री होती.
आज समाजात वाढत चाललेल्या विभाजनकारी विचारांच्या काळात सुराणा यांचे कार्य अधिक महत्वाचे भासते.त्यांच्या जाण्याने समाजवादी लोकशाहीचा अजून एक बुरुज आज ढासळला आहे.काल रात्री 2 डिसेंबर रोजी मध्यरात्री वयाच्या 93 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी मरणोपरांत देहदानाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सिव्हिल मेडिकल कॉलेज,सोलापूर येथे देहदान करण्यात येणार आहे.
राजाराम सूर्यवंशी.यांस कडून
