
माझे बाबा आदरणीय जानकीराम उमाजी इंगळे गुरुजी ह्यांचा २५ वा स्मृतिदिन त्यानिमित्याने त्यांच्या जीवनातील काही ठळक प्रसंग वाचकांना सांगण्याचा प्रयत्न करतो.आमचे आजोबा उमाजी इंगळे ह्यांचा मोठा परिवार होता. ते आमच्या बेलूरा गावाचे आधाईचे वतनदार होते. महार जातीतील सोमस ही उपजात आणि टोपकर ही उप उप जात असल्यामुळे समाजाचे लग्नविधी आणि इतर कार्यें माझे आजोबा करायचे. त्यातही ते नऊनाथ पंथी असल्यामुळे साधु संतांचा राबता असायचा. गावात एखादे ढोर मेले कि, अर्धे ढोर आमच्या आजोबाच्या मालकीची असायची. एकेवेळी ३०-३५ लोक जेवायचे असे सांगतात. माझी आजी जनाबाई ही डिघीची. तीचे भाऊ नत्थू हिवराळे हे त्याकाळी ब्रिटिश राजवटीत प्राथमिक शिक्षक होते.माझ्या बाबाचे मामा नत्थू हिवराळे गुरुजी (डिघी ) हे पिंपळगाव काळे येथे मराठी शाळेवर गुरुजी होते. त्यांच्या घरी राहून आणि त्यांच्या शाळेत जाऊन माझे बाबा मराठी सातवी पास झाले. त्या आधीच माझ्या बाबाचा बालविवाह माझी आई सरस्वती, ही सुद्धा डिघीची,सोबत झाला होता.माझे बाबा शिक्षक झाल्यानंतर आमचे पहिले शेत, सात रुपयात विकत घेतले होते.
१४ ऑक्टोबर १९५६ च्या बौध्द धर्मांतरांनंतर महारकी बंद झाली. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह माझ्या बाबांनी विकत घेतलेल्या शेतामुळे सुकर झाला.गाई, म्हशी,बकऱ्या,कोंबड्या पालन करून आणि घरातील सगळे लहानथोर मंडळी आपल्याच शेतात राबून आमचे कुटुंब खाऊन पिऊन सुखी होते.प्राथमिक शिक्षक असतांना माझ्या बाबांनी, शाळेच्या सुट्यांचा सदुपयोग करून गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांच्या आश्रमात आयुर्वेद आणि युनानी शिकले. त्यांना “आयुर्वेदाचार्य” ही पदवी होती. त्यांना RMP ही त्याकाळातील मेडिकल प्रॅक्टिस करण्याचे सर्टिफिकेट पण होते. माझ्या बाबांना एकदा प्रत्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्याच्या शरीराची मालिश करण्याचे भाग्य लाभले होते असे ते सांगायचे.त्या काळी नांदुरा येथे फक्त डॉ.सीताराम घनोकार यांचा दवाखाना होता. हे आमच्या बेलूरा गावाचे होते आणि त्याकाळी बनारस हिंदु विद्यापीठातून डॉक्टर बनून आले होते.त्यांचे व माझ्या बाबांचे खूपच आपुलकीचे संबंध होते. माझ्या बाबांची मेडिकल प्रॅक्टिससाठी ह्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत होते.
आजूबाजुच्या सगळ्या ग्रामीण परिसरात मेडिकल फॅसिलिटीचा भयानक तुटवडा होता. माझे बाबा त्यावेळी दिवसा शाळेत शिक्षकी करायचे व शाळा सुटल्यावर सांध्याकाळी,रात्री बेरात्री रुग्ण सेवा करायचे.आमच्या घरी रुग्णांचे सतत येणे असायचे. अति गंभीर रुग्ण सेवा करण्यासाठी ते इतर आजूबाजूच्या गावात पायी किंवा कुणी बैलगाडी आणली तर जायचे. हे असे समाजाच्या उपयोगीतेचे कार्य साधारण १९९० पर्यंत सुरु होते. आजही मी गावाकडे गेलो तेव्हा त्यांच्या कडून नवजीवन लाभलेले लोक भेटतात आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देतात. त्यांचे औषधं म्हणजे आयुर्वेदिक, युनाणी आणि ऑलोपॅथी ह्यांचे मिश्रण.औषधच्या एका पुडीची किंमत एक आणा. साधारण चार पुड्यात रुग्ण बरा व्हायचा.गरज पडली तर ईंजेक्शन द्यायचे. त्याची फी एक रुपया असायची.अश्या अल्प किंमतीत रुग्ण बरे व्हायचे. माझे बाबा रानातून, डोंगर दऱ्यातून झाडपाला आणायचे आणि घरीच काढे,भुकटी,सव, वगैरे बनवायचे. नदीतील खेकड्यापासून बनविलेली औषधें पण मी पाहिली आहेत. त्याच बरोबर माझे बाबा जनवारांचा पण इलाज करायचे. माझे बाबा महिन्यातून एकदा गुरुकुंज मोझरी ला मनिओर्डर करायचे. किती पैसे पाठवायचे ते मला आठवत नाही पण त्यांच्या मेडिकल प्रॅक्टिस मधून कमाईचा काही हिस्सा देत असावे.माझे बाबांनी शिक्षकी पेशा निमित्त त्यावेळच्या मलकापूर तालुक्यातील तिकोडी, पातोंडा, मेंढळी, टाकरखेड आणि बुलढाणा जवळील डोमरूळ गावात वास्तव्य केले होते.
माझे मावस भाऊ बौद्धाचार्य वासुदेव नागोजी इंगळे (ह. मु. वर्तक नगर ठाणे) यांनी ही आठवण सांगीतली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे ६ डिसेंबर १९५६ साली परिनिर्वाण झाले.त्या वेळी माझे बाबा तिकोडी येथे प्राथमिक शिक्षक होते.आपल्या समाजातून भयाण यातना येत होत्या.घराघरात रडणं आणि आक्रोश सुरु होता.चूल पेटत नव्हती.प्रसंगाचे गांभीर्य ओळखून माझे बाबा,तिकोडीचे काशीराम पाटील यांना भेटून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण निमित्त तेरा दिवस दुखवटा पाळण्याचे ठरविले.त्या तेरा दिवसात दररोज संध्याकाळी बाबासाहेब ह्यांच्या जीवनावर आणि कार्यावर माझे बाबा भाषण देत होते.अक्खा गाव आणि आजूबाजूच्या गावातील लोक हे भाषण ऐकायाला येत होते.तेराव्या दिवशी सामूहिक भोजनदान झाले होते. पंगतीत उळदाची डाळ आणि भाकरी होत्या.त्यावेळी आमचे वासुदेव भाऊ आणि गावातील चार पाच मुलं कुठल्यातरी गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यांच्याकडे कुणीही पाहात देखील नव्हते एव्हढा दुःखद प्रसंग बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाने आला होता. त्या मुलांना माझ्या बाबांनी तश्याही अवस्थेत उपचार करून जीवनदान दिले होते.
माझे पूर्वश्रमीचे काका काशीराम उमाजी इंगळे गुरुजी, कोलारा येथे काही काळ शिक्षक होते. केलारा येथील बुद्ध विहार त्यांच्या प्रेरणेतून निर्माण झाले होते. त्यांनी गृहत्याग केल्या नंतर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी माझ्या बाबांनी पार पडली. त्यांच्या कुटुंबाला स्वतःचे कुटुंब म्हणुन पालन पोषण केले. दुसरे भाऊ सोमाजी इंगळे हे सुद्धा कालांतराने भिक्षु झाले आणि त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी पण ह्यांच्यावर येऊन पडली.आमच्या बेलूरा गावात विहार बांधून झाले होते.पण समोरील जागा व्यवस्थित नव्हती.आमचे घर पण बांधायचे होते. कोसभर दुरूनच्या दगडाच्या खाणीतून दगड आणि आमच्या शेतातील चुणखडी पासून चुना,माझे बाबा स्वतः बैलगाडीत घेऊन येत होते आणि आधी विहाराचा ओटा बांधला आणि नंतर आमचे घर बांधले होते. हे सगळे बांधकाम त्यांनी आणि आमच्या घरातील सगळ्या लहानथोर मंडळींनी केले होते.
भन्ते विनय वात्सायन यांनी श्रीलंकेतून परत मायदेशी आल्यावर मोताळा येथे मुलांचे वसतिगृह निर्माण करून धम्म कार्यात वाहून घेतले होते.नामांतराचा लॉन्गमार्च,कवाडे सरांच्या नेतृत्वात नागपूर वरून सुरु झाला होता. त्या लॉन्गमार्च मधे भन्ते विनय वात्सायन ह्यांच्या नेतृत्वाखाली मोताळा येथून मार्च सुरु होऊन पुढे त्या मुख्य लॉन्गमार्च मधे सामील झाला होता. लॉन्गमार्च जालना येथे अडविण्यात आला होता. मराठवाड्यात जमावबंदी आदेश लागू झाला होता.जातीय दंगलीत मराठवाडा होर पडत होता. कसे कुणास ठाऊक पण,भन्ते विनय वात्सायन आणि आणखी दोन भन्ते विद्यापीठाच्या मुख्य कामानिपाशी पोहोचले आणि तिथे आमरण उपोषण सुरु केले. माझ्या बाबांना ही बातमी वर्तमान पत्रातून कळली.मागचा पुढचा विचार न करता त्यांनी औरंगाबाद ला जाण्याचे ठरविले.शेगाव पैठण ही बस आमच्या नांदुरा मोताळा मार्गे औरंगाबाद येथे जात होती. ती बस माझ्या बाबांनी शेम्बा येथे पकडली व ते औरंगाबाद येथे पोहोचले.
त्या बस मधे फक्त ड्राइवर कंडक्टर आणि माझे बाबा असे तीनच लोक होते. औरंगाबाद बस स्टॉप वरून त्यांनी विद्यापीठात जाण्यासाठी पायी प्रवास सुरु केला. रस्त्यावर चिट पाखरू पण नव्हते. एका पोलिसानी माझ्या बाबांना अडविले आणि त्याचे तिथं येण्याचे कारण सांगितले व विद्यापीठाकडे जाणारा रस्ता विचारला. त्या पोलिसाने रस्ता सांगितला आणि सावधान राहण्याचा सल्ला देऊन रवाना केले. पुढे छावणीत पोहोचल्यावर एक मिलिटरी जीप जवळ येऊन थांबली. त्यातून एक सैनिक बाहेर आला आणि माझ्या बाबांना तिकडे फिरकण्याचे कारण विचारले. माझ्या बाबांनी त्याला सगळी हकीकत सांगितली. त्या सैनिकांनी माझ्या बाबाला जीप मधे बसविले आणी विद्यापीठाच्या गेट समोर घेऊन गेले. तिथे काही पोलीस होते. त्या पोलिसांनी सांगितले कि, भंतेजीची तबियत बिघडली होती म्हणुन तिथे सुरु असलेलं तीन भिक्कूचे आमरण उपोषण पोलिसांनी जबरदस्तीने थांबवून त्या भिक्षुना घाटी हॉस्पिटल मधे भरती केले होते. मिलिटरी जीप मधील त्या सैनिकांनी बाबांना घाटी हॉस्पिटल मधे घेऊन गेले आणि नंतर ते सैनिक निघून गेले. बाबांनी त्या हॉस्पिटल मधे त्या तीन भिक्षुना शोधले आणि त्यांची भेट झाली. भन्ते सुस्थितीत असल्याची खात्री झाली. बाबा पाच दिवस तिथे राहून त्यांची सेवा केली आणि परत घरी आले. हे माझ्या बाबांचे जीवावर उदार होऊन केलेले हे एक सामाजिक कार्य आहे.
आमच्या शेताला लागून आमची कंबळजा नदी वाहते.आमचे सगळे कुटुंब तो पर्यंत आमच्या शेतात वस्तीला गेले होते.माझे बाबा सकाळी ४ वाजता उठून मोटेच पाणी शेताला द्यायचे आणि त्यानंतर साधारण तीन किमी असलेल्या टाकरखेड येथील शाळेत,वेळेवर पोहोचायचे.त्या काळात आमच्या गावाच्या शेजारील गाव पिंपळखुटा येथील उमाळे परिवार दरवर्षी विटा पाडायला यायचे. ८-१० परिवार असावेत. ही मंडळी आमच्या शेतात वस्तीला असायचे. कंबळजेच्या पात्रता दिवसभर विटा पडायच्या आणि रात्री गप्पा,चर्चा आणि आराम असा रोजचा कार्यक्रम असायचा.तेव्हा माझ्या बाबांनी “बुद्ध आणि त्यांचा धम्म” ह्या ग्रंथाचे वाचन सुरु केले. माझ्या बाबांची ग्रंथ उकल करण्याची पद्धत खूपच सुरेख होती. मध्य रात्र उलटून जायची तरी कुणीही जागेवरून हलायचे नाहीत.

रिपब्लिकन पक्षातील फाटाफूट माझ्या बाबांना खुप वेदना देत होती.ते नेहमी बोलतांना एकीकरणाची गरज समजावून सांगत होते. दादासाहेब रा.सु.गवई आमच्या गावात आले होते तेव्हाही प्रत्यक्ष समोरासमोर त्यांना एकीकरण करावे अशी विनंती माझ्या बाबांनी केली होती.मान्यवर कांशीराम साहेब ह्यांच्या प्रती त्यांना आदर होता. त्यांच्या त्यागाची गोष्ट ते सांगायचे.श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे नेतृत्व उदयास येत असतांना माझ्या बाबांना आनंद होत होता.बाळासाहेब नक्कीच आपल्या समाजाचा कायापालट करतील असे ते बोलायचे.मी इंजिनीरिंग झाल्या नंतर HPCL मधे नोकरीला लागलो १९९० साली. त्याच वेळी त्यांना आणि आईला मुंबईला घेऊन आलो. त्यांच्या जीवनाचा शेवटचा भाग, साधारण अकरा वर्षे,आनंदी आणि समाधानी अवस्थेत पार पडला.आमच्या एच पी नगर मधे मोठा फ्लॅट,सुंदर वातावरण होते.खुप सारी झाडी,मोठे ग्राउंड,मोठी लायब्ररी,कॅन्टीन आणि इतर सुविधा आहेत. माझे बाबा म्हणायचे कि,स्वर्ग नक्कीच ह्यापेक्षा अधिक सुंदर नसेल.त्यांनी त्यांचा वृद्धापकाळ छान पैकी जगला.
अन्नपूर्णा रामकृष्ण रजाने (आडोळ), सुकांता संपतराव तायडे (माटोडा), पुष्पा दिनेश वाकोडे (खेर्डा) त्यांच्या तीन मुली त्यांच्या त्यांच्या घरी सुखा समाधानाने जगतात. एक मुलगा (म्हणजे मी) आणि सुन (सुनीता) चांगल्या हुद्यावर काम करतात. नात आणि नातू शाळेत जातात. अश्या कुटुंबात त्यांचा जीवनाचा काळ गेला. माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात आणि वाटचाल त्यांच्या हयातीत सुरु झालेली त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली ही त्यांचीच प्रेरणा.जावाई संपतराव तायडे यांच्या अकाली निधनाने त्यांना खुप दुःख झाले. त्याच दुःखात, संपतराव तायडे यांच्या निधनानंतर दोन दिवसांनीं माझ्या बाबांची प्राणज्योत वयाच्या ८६ व्या वर्षी मालवली. आमचे संपतराव तायडे दादा ह्यांचे माझ्या वैयक्तिक जीवनातील योगदान माझ्या बाबा सामानच आहे. माझे शिक्षण (मुख्यातः इंजिनीरिंग) ही माझ्या दादांमुळेच शक्य झाले. ह्या दोघांचेही सोबत सोबत जाणे माझ्यासाठी मोठा आघात होता.माझ्या बाबांच्या पावन स्मृती आणि त्याचे अनुकरणीय जीवनकार्यें आम्हाला अनंत काळापर्यंत प्रेरणा देत राहतील. आज त्यांच्या २५ व्या सृतीदिना निमित्ताने विनम्र अभिवादन.
जयप्रकाश जानकीराम इंगळे-९८६९४१३८८२ (बेलूरा-जवळा बाजार. ह.मु.चेंबूर,मुंबई)

