
“बुद्धिवंतांचा वर्ग,ज्यांच्या मार्गदर्शनाकडे सर्वसामान्य समाज अपेक्षेनं पाहत असतो तो एकतर कमालीचा अप्रामाणिक असतो वा समाजाला योग्य दिशेकडे शिक्षित करण्यास कमालीचा उदासीन.निःसंशय आपण सध्या या घोर शोकांतिकेचे साक्षीदार आहोत.या शोकांतिकेला सामोरं जात असतांना आपल्या हातात फक्तं एव्हढंच राहतं की शोक करत म्हणावं – हे असे आहेत तुमचे नेते,ओ हिंदूंनो!”
आंबेडकरी विचारांचं सार असलेल्या बाबासाहेबांच्या ‘अनिहिलेशन ऑफ कास्ट (जातींचा विध्वंस) 1936’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर दलितांचा मुक्तीनामा म्हणून गौरविण्यात येणाऱ्या पुस्तकावर त्यावेळी गांधी व इत्तर हिंदुत्ववाद्यांनी तीव्र आक्षेप घेतला.गांधीनी त्याच्या ‘हरिजन’ या पत्रिकेतून ‘अनिहिलेशन ऑफ कास्ट’ वर जहरी टीका केली तर बाबासाहेबांनी आपल्या सडेतोड युक्तिवादानं हिंदुत्ववाद्यांना नामोहरम केलं.वरील उतारा बाबासाहेबांनी गांधीला दिलेल्या उत्तरातून घेतलाय.हा उतारा सध्याच्या बौद्ध समाजाला जसाच्या तसा लागू होत आहे..फक्त यातून शेवटचे दोन शब्द ‘ओ हिंदूंनो’ हे काढून त्याजागी ‘ओ बौद्धांनो..!_’ टाकावं लागेल…
सध्याच्या जात-जनगणनामय वातावरणात,आरक्षणाचा उपयोग घेऊन मंत्री-संत्री,इंजिनीयर,डॉक्टर,IAS,IPS, जज,वकिल,कॉर्पोरेट जगतात उच्च पदांवर इत्यादी पोहोचलेले..सुखवस्तू शहरी जीवन जगत नावावर फ्लॅट्स, गाड्या-घोड्या,जमिनजुमला इत्यादी असलेल्या तर सवर्णांच्या अत्याचाराची कसलीच धास्ती नसलेल्या बौद्धांनी स्वतःहून,जनगणनेत स्वाभिमानाने अगदी ऐटीत ‘धर्म-बौद्ध तर ‘जात-नाही/गैरलागू/निरंक’ अशी नोंद करणं आवश्यक असतांना हे अकलेचे कांदे मात्र जनगणनेत ‘धर्म-बौद्ध’ व ‘जात-महार’ लिहिण्यास आसुसलेत.हजारो वर्ष जातविरहित राहिलेल्या धम्माला जातीयवादी बनविण्यास चवताळलेत.हिंदू धर्मातील जातिभेदाची घाण बौद्ध धम्मात आणत बाबासाहेबांची धम्मक्रांतिच मातीमोल करण्यास सरसावलेत..
जनगणनेत ‘बौद्ध-महार’ न लिहिल्यास महारांची संख्या कमी होईल.त्यामुळं आरक्षणाची टक्केवारी घसरेल, दलितांच्या कल्याणार्थ आरक्षित असलेल्या शासकिय निधीत कमी येईल,दलित-आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा फायदा घेता येणार नाही,महार जातीची संख्या मांग जाती पेक्षा कमी भरल्यास आरक्षणातील उप-वर्गीकरणाने महारांना, मांगांपेक्षा कमी आरक्षण भेटेल,असे काहीबाही भ्रम समाजात पसरवत या बावळटांनी, राजगृहातील भारतीय बौद्ध महासभा,बौद्धजन पंचायत समिती यांच्या मदतीने व विजय(भाई) गिरकर,राजकुमार बडोले या संघोट्या पुढाऱ्यांच्या मार्गदर्शनात काही बेअक्कल पत्रकार,संपादकांना हाताशी धरत जनगणनेत ‘धर्म बौद्ध’ अन जात महार’ लिहिणं कसं कायदेशीररित्या बंधनकारक आहे अशा खोट्या प्रचाराची अक्षरशः राळ उठवून टाकलीय.
साधी गोष्ट आहे.खेडोपाडी समाज अजुन मागास आहे.. त्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे.सवर्णांच्या अत्याचारापासून त्यांना निश्चितपणे संरक्षण मिळालं पाहिजे.शासकिय उपयोजना निधीतून त्यांचा आर्थिक विकास घडवावा लागेल हे सर्व सूर्यप्रकाशा इतकं उघड सत्य आहे.हे कोणीही नाकारू शकत नाही.पण हे असं का आहे..? कोणा मुळे आहे..?. या समाजाला शेकडों वर्षांपासून कोणी नागवलं..?.कोणी या समाजाला अस्पृश्य ठरवलं..?. सत्तास्थानापासून दूर ठेवलं..?.निर्णय प्रक्रियेतून बाद केलं..?.गावकुसाबाहेर जोहार मायबाप करत भीक मागायला लावलं..?. कुत्र्या-मांजरापेक्षाही हीन जिवन जगण्यास भाग पाडलं..?
हिंदू धर्मातील जातीभेदानेच…हे देखील तेव्हढंच स्पष्टं आहे ना..
हिंदू धर्माने शेकडो वर्ष लादलेल्या अस्पृश्यतेच्या या गुलामीवर उतारा म्हणून इंग्रज आमदानीत जातीय आरक्षण जन्माला आलं.अस्पृश्य ठरविलेल्या जातींचा सर्वांगीण विकास घडवून त्यांना इत्तर समाजाच्या बरोबरीने उभं राहता यावं म्हणून हे आरक्षण…राजकारणात,शिक्षण क्षेत्रात व सरकारी नोकऱ्यांत.मग हे जातिनिहाय आरक्षण घेतांना अस्पृश्य गणल्या गेलेल्या जातीचं (महार) हे नाव टाकतांना ज्या धर्मानं हे नाव दिलंय त्या हिंदू धर्माचं नाव सोबत घेणं हेच संयुक्तिक अन सर्वस्वी तर्कसंगत असतांनाही जातजनगणनेत अस्पृश्य जातीच्या सोबत बौद्ध धर्म चिकटविण्याचा उद्दामपणा करण्याची गरज काय??
एवढा मोठा समाज शेकडो वर्ष अस्पृश्य म्हणून जगत होता..त्याच्या सावलीचाही हिंदू समाजाला विटाळ व्हायचा.. त्याला जातीवादाच्या कोंडवाड्यात बंदिस्त करून कायमचं मानसिक विकलांग केलं गेलं होतं त्या समाजाला मानसिक गुलामीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आरक्षण व संरक्षण दिलं जातंय ते हिंदू समाजानं त्याची ओळख ही ‘अस्पृश्य महार’ केली होती म्हणून.साऊथबोरो समिती समोर बाबासाहेबांनी दिलेल्या साक्षीत हिंदू समाजाला दोन भागात,स्पृश्य हिंदू समाज व अस्पृश्य हिंदू समाज असं विभाजन केल्याचं स्पष्ट नमूद केलं गेलं आहे.म्हणजेच आरक्षणाची व सवर्णांच्या अन्याय-अत्याचारापासून संरक्षणाची खरी गरज असलेल्या दलितांची ‘हिंदू महार’ अशी नोंद होणं आवश्यक आहे जेणेकरून हे सतत समोर राहिल की हिंदू धर्माने या समाजाला अस्पृश्य महार ठेवलं होतं न की अस्पृश्यता व जातीभेदापासून आजपर्यंत मुक्त राहिलेल्या बौद्ध धम्मानं.. ज्या कारणांसाठी जातीय आरक्षण व सवर्ण हिंदूं पासून संरक्षण हा कायदा जन्माला आलाय ती सर्व घाण हिंदू धर्मानं पसरवली होती..ना की बौद्ध धम्मानं..महार जातीला आरक्षण हे ‘महार’ जात अस्पृश्य गणल्या गेली होती म्हणून आहे..न की हा समाज इतिहासात कधीकाळी शूर नागवंशी वा बौद्ध होता म्हणून…वस्तुस्थिती अशी असतांना आरक्षण व संरक्षण मिळावं यासाठी ‘धर्म बौद्ध व जात महार’ लिहून हिंदू धर्माला त्याच्या पापातून मुक्त करणं हे सर्वार्थानं गैर व निषेधात्मक.
बडोले काय वा गिरकर काय हे संघासाठी राबणारे मजूर..बाबासाहेबांची धम्मक्रांती अन एकूणच बाबासाहेबांचे विचार उधळून टाकणं हा त्यांच्या अजेंडावरील प्रमुख डाव..बौद्ध धम्मात हिंदुत्ववादी जातीभेद घुसडून बुद्धाला विष्णूचा अवतार बनवण्यासाठी ही मंडळी तत्पर असणारच त्यात आश्चर्य नाही मात्र धक्कादायक हे आहे की त्यांना खुली साथ काही पत्रकार, पुढारी,मध्यमवर्गीय,इंजिनीयर,डॉक्टर,सनदी अधिकारी, राजगृहातील भारतीय बौद्ध महासभा,बौद्धजन पंचायत चालवणारं घराणं अन इत्तर शिकलेले दलित-हरिजन अगदी उत्साहानं देताहेत..
आरक्षण/संरक्षण याची गरज नसलेल्यांनी फक्त ‘बौद्ध’ बनावं..समाजातील तळागाळातील इतरांना योग्य ते मार्गदर्शन करत ‘हिंदू-महार’ म्हणून आरक्षण/संरक्षणाची योग्य सोय मिळवून देत त्यांनाही आपल्यासारखं उच्चपदावर घेऊन यावं..जिथं पोहोचल्यावर त्यांनाही आरक्षण/संरक्षण याची गरज उरणार नाही व ते स्वाभिमानाने ‘महार’ जात भिरकावून देत स्वतःला फक्तं ‘बौद्ध’ म्हणतील अशी उपाययोजना करणं ही काळाची खरी गरज..जातविरहित बौद्धमय भारत घडविण्याकडे आगेकूच..मात्र खऱ्या गरजूंच सोडूनच द्या..ज्यांना अजिबात आरक्षण/संरक्षण याची आवश्यकता नाही ते स्वतःच स्वतःच्या ‘महार’ या जातीय कोषातून बाहेर पडण्यास इच्छुक नाहीत.कारण याचा त्यांना स्वतःच्या कुटुंबासाठी दुरुपयोग करून घ्यायचा असतो.खऱ्या गरजू दलितांच्या हितसंबंधांचा बळी घेऊन..
उदरणार्थ 2017 साली समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यानं आपल्या मुलीला अन त्यावेळी आपला सचिव असलेल्या दिनेश वाघमारे याच्या मुलाला गरीब दलित विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असलेल्या शासकिय निधीतून विदेशाला धाडलं उच्च शिक्षणासाठी,दोन गरीब होतकरू दलित विद्यार्थ्यांच्या जागा लुबाडून. बडोले अन वाघमारे हे आपलं महारपण याच साठी सोडत नाहीत कारण सरकार-दरबारी याचा फायदा त्यांना स्वतःसाठी..स्वतःच्या कुटुंबासाठी करून घ्यायचा आहे.विधानसभा निवडणुकीत आर एस एस (RSS) चं काम चोख बजावत फडणविसला सत्तेत आणण्याची किमया साधणारा हाच तो महार आय ए एस (IAS) अधिकारी दिनेश वाघमारे.आणखीन..एक असाच स्वार्थांध आय ए एस (IAS) अधिकारी म्हणजे नागपुरातला श्याम तागडे. या महाशयानं प्रधान सचिव-महाराष्ट्र राज्य म्हणून स्वतःच्या सहीनीशी, ‘अनुसूचित जाती व नवबौद्ध यांचा विकास साधणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना शासकिय अनुदान..’ संबंधित काढलेला शासन निर्णय वापरून एकनाथ शिंदे-फडणवीसला पटवून स्वतःच्या मालकीच्या विपश्यना केंद्रासाठी तब्बल 15 कोटी रुपये हे दलितांसाठी आरक्षित शासकीय निधीतून लंपास केलेत.या 15 कोटीतला 3 कोटी असलेला पहिला हप्ता त्यानं घेतलाय.. उरलेले 12 कोटी घशात घालण्यासाठी त्याला ‘महार’ बनून रहावं लागेल हे आलंच ओघानं.. त्यामुळं श्याम तागडे आपली महारकी त्यागून जातविरहित बौद्ध बनण्यास धजावत नाही. विपश्यना,समाधी वा गूढवाद याला बुद्धाच्या शिकवणुकीचा मूळ गाभा समजणं म्हणजे कल्पनेच्या भरारीत रमणं असं म्हणत बाबासाहेबांनी विपश्यना नाकारली याची आठवण श्याम तागडेनं विपश्यनाच्या नावानं गरीब दलितांसाठी आरक्षित शासकीय निधी लुटण्याचा जो प्रताप केलाय त्या निमित्तानं करून देणं गरजेचं. विपश्यनाच्या नावानं बदमाशी करत गोळा केलेल्या आपल्या खाजगी प्रॉपर्टीला सम्यक आजीविकेचं साधन मानत ती टिकविण्याच्या हव्यासापोटी महार बनून राहणारा श्याम तागडे आता जाम ऍक्टिव्ह झालाय ते बौद्ध धम्मात महार जात घुसडण्यासाठी..आपल्या सारख्यांचा गोतावळा जमा करत त्यानं बैठका घेण्याचा सपाटा लावलाय.त्याच्या गोतावळ्यातील त्याच्या सारखीच आपमतलबी लोकं जमा झालीत.सन्माननीय अपवाद तो श्यामदादा गायकवाड यांचा.
भारतातील वर्ग..त्या वर्गातील जाती.भारतातील जाती अन त्या जातीतील पोटजाती.जातीतील वर्ग.वर्गअंत अन जातीअंत यांच्यातील परस्पर संबंध.त्या परस्परसंबंधातील द्वंद्व.. दलितांचं आरक्षण/संरक्षण.ते मिळविण्यास कुचकामी ठरलेली कायदाव्यवस्था.राज्यातील दलित अत्याचारांची प्रकरणं..त्यांचा पाठपुरावा.न्याय मिळवून देण्यास कायदेशीर मदत..बाबासाहेबांचं धर्मांतर,कामगार,चळवळी,व्यवसाय,भांडवल,धर्मांधता,राज्य दहशतवाद..इत्यादी इत्यादी इत्यादी बाबत नुसतंच पुस्तकी ज्ञान नव्हेतर प्रत्यक्ष अनुभव पदरी असलेले व अशी हजारो आरक्षणं गेली तरी चालतील पण पुन्हा अस्पृश्य/महार बनणार नाही अशी ठाम जाहिर भूमिका घेणाऱ्या दादांचं चक्क पलटी खात श्याम तागडेच्या गोतावळ्यात सामिल होणं.सबब बौद्ध ही धार्मिक ओळख तर महार ही संविधानिक ओळख अशी बिनबुडाची बाबासाहेबांच्या विचारात कुठूनही न बसणारी धारणा.जणुकाही बाबासाहेबांनी बौद्ध म्हणून दिलेली ओळख हि अर्धवट आहे.अन म्हणून बौद्धांच्या संख्याबळ विषयी लागलेला घोर.लागलेली काळजी.जात जनगणनेत जात – महार/चांभार/मांग/ढोर इत्यादी नाही लिहिलं तर आरक्षण/संरक्षण जाईल अन धर्म – बौद्ध नाही लिहिला तर बौद्धांची संख्या घटेल म्हणून बौद्ध-महार/चांभार/मांग/ढोर इत्यादी लिहिणं हेच ‘राष्ट्रीय कर्तव्य’ अशी बेवकुफीची पट्टी पढवत ही लफंगी मंडळी बौद्ध धम्मात हिंदू धर्मातील जातिभेदाची घाण घुसडण्याचा संघी डाव यशस्वी करण्यास टाचा वर करत सरसावलीत..व्याकुळ झालीत..या मंडळींच्या एक लक्षात येत नाही की जातीय आरक्षण वा संरक्षण यासाठी बनलेले कायदे/नियम आज ना उद्या या ना त्या निमित्तानं संपुष्टात येणार मात्र चिरकाल वा कायमस्वरूपी राहणार त्या बौद्ध धम्मात यांच्या नालायकपणामुळे घुसडल्या गेलेल्या जाती-पाती.. त्यांच्यातील जातीभेद अन जातींनी कलंकित झालेला भारतातील बौद्ध धम्म..
धम्म-दिक्षा घेण्याच्या आदल्या दिवशी (13 ऑक्टोबर 1956) घेतलेल्या पत्रकार परिषदेत बाबासाहेबांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, “अस्पृश्य वर्गात देखिल जातीभेद आहेत.बौद्ध धर्म स्वीकारानंतरही जातीभेद कायम राहणार नाही..कशावरून?” या प्रश्नाचं उत्तर देतांना बाबासाहेब म्हणतात: “…मी शूर आणि धीट आहे. मी लोकांना कसे वागावे,याचे आदेश देईन नाहीतर मी एकटाच बौद्ध होईन.त्यात बिघडले कोठे….?”
आजघडीला बौद्धांची संख्या कमी होतेय अशी कोल्हेकुई करत बौद्ध धम्मात जातीभेद घुसडण्याचा संघी डाव खेळणाऱ्या लफंग्यांनी बाबासाहेबांचा सारा ‘शूरपणा’ अन ‘धिटाई’ मातीमोल करून टाकली असल्याकारणाने नाईलाजानं प्रश्न विचारावा लागतोय -‘बौद्धांनों,आंबेडकरी विचारांची कूस वांझ होत चाललीय का?’
मिलिंद भवार पँथर्स.
9833830029
30 मे 2026
