घरा घरात संविधान पोहचवणारे पठाण गुरुजी

बातमी शेअर करा.

साथी चंदूभाई मेहता जन्म्शाताब्दी निमित्ताने साथी चंदूभाई मेहता समाजसेवा प्रतिष्ठान तर्फे रायगड जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक नुरखॉं पठाण यांना यंदाचा समाज प्रबोधन पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातील निगुडमाळ,ता. माणगाव या शाळेतील प्राथमिक शिक्षक नुरखॉं पठाण हे ‘घरा घरात संविधान पोहचवणारे पठाण गुरुजी’ म्हणून ओळखले जातात. संविधान प्रचारक आणि प्रसारक पठाण गुरुजी यांना प्रमुख पाहुणे महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते आणि सा. साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी समाज प्रबोधन पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
   मालेगाव येथील गाद्या बनवणाऱ्या पिंजारी कुटुंबात जन्मलेले नुरखॉं पठाण हे दारोदार कापूस पिंजून गाद्या बनवण्याचे काम करत शिक्षण घेणारे आणि त्यामुळे शिक्षणाचे महत्व जाणणारे.घरच्या गरिबीमुळे इंजिनीरिंगचे शिक्षण अर्धवट सोडून डीएड करून प्राथमिक शिक्षकाची नोकरी त्यांनी पत्करली व शिक्षण सेवक म्हणून 2008 साली रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुद्रे, (ग्रामपंचायत मांजरवणे), ता.माणगाव येथे रुजू झाले. शालेय शिक्षण एका खेडेगावात झालेल्या, सर्व सामान्य मुस्लिम घरातील मुलाला थोडेफार पडत असलेले प्रश्न तसेच मनात ठेवून शिक्षण आणि घर सांभाळण्यासाठी मिळेल ती नोकरी व काम करत जगणारा एक तरुण घरच्या परिस्थितीमुळे डीएड करून खानदेशातून चक्क रायगड जिल्ह्यात येतो, दुर्गम आदिवासी गावात शिक्षण सेवकाची नोकरी करत असताना प्रभाकर नाईक यांच्यासारखा अनिसचा कार्यकर्ता असलेला तलाठी त्याच्या जीवनात येतो आणि कलाटणी दिल्यासारखा या तरुणाचं जगच बदलून जाते.

शिक्षण पूर्ण करून नोकरीनिमित्त मालेगाववरून रायगड जिल्ह्यात आल्याबरोबरच पठाण गुरुजी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक यांच्या संपर्कात आले. मूळचा समाजात मिसळण्याचा पिंड असलेल्या पठाण गुरुजींनी अनिसच्या कामात स्वतःला गुंतवून घेतले आणि डोळस अभ्यास करून विविध संकल्पना समजावून घेतल्या. विवेकी विचारांच्या रस्त्यावर चालत असताना प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला आणि अनिस व साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम चालू केले. 2008 पासून अनिसचा कार्यकर्ता बनून विविध गावांत तसेच साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक येथे विविध शिबीरांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन विषयावर व्याख्यान द्यायला सुरुवात केली.
  इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने मिश्र वस्तीत जागा नाकारणे हा पठाण गुरुजींना इथल्या जाती व्यवस्था आणि धर्म व्यवस्थेने दिलेला पहिला धक्का होता.खान्देशात मिश्र वस्तीत लहानाचा मोठा झालेला नुरखॉं त्याच्या मुलींसाठी मिश्र वस्तीत राहायचा निर्णय घेतो तेव्हा गोरेगाव सारख्या गावात विरोध होतो.पण आज गेली 11 वर्ष पठाण कुटुंब गावातील मोहोल्यात न राहता मिश्र वस्तीत राहतंय ते गावाने जपलेल्या सलोख्याच्या प्रदेशामुळे व साठेंसारख्या सहिष्णू माणसांमुळेच! कोविड काळामध्ये कोविड झाल्यावर सामाजिक वैयक्तिक बहिष्कारचा अनुभव घेतल्यावर दलित बांधवांनी सोसलेल्या अस्पृश्यतेची जाणीव नुरखॉं यांना झाली आणि मग जात,धर्म व्यवस्था व तिच्या कारणाचे मूळ शोधताना ते संविधानाकडे पोहोचले.
  संविधानाचा अभ्यास करता करता लॉकडाऊन काळात संविधानावर आधारित छोट्या छोटया पोस्ट्स सोशल मीडियावर पठाण गुरुजी पाठवत असत. त्या पोस्ट त्यातील साध्या सोप्या भाषेमुळे व आकलन सुलभतेमुळे लोकप्रिय होत गेल्या. तसेच संविधान या विषयावर विडिओ तयार करून सोशल मीडिया वर प्रसारित करून संविधान जागृतीचे कार्य पठाण गुरुजी करोना काळात करत होते. या कालावधीत 225 पोस्ट रोज लिहिल्यानंतर त्याचे पुस्तक करायचे ठरले व नुरखॉं पठाण यांचे “आपले संविधान राज्य पद्धती नव्हे, तर जीवन पद्धती” हे संविधानाची सोपी मांडणी करणारे पुस्तक दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी प्रकाशित झाले. या पुस्तकाला भरभरुन प्रतिसाद मिळाला. दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. आणि आजपावेतो साधारण 21 हजार प्रतिंच्या माध्यमातून लोकांपर्यंत संविधान पोहोचले आहे.
   या पुस्तकानंतर पठाण गुरुजी यांनी संविधान साक्षरतेचा विडाच उचलला आणि सुरु झाला संविधान साक्षरतेचा एक अचंबित करणारा प्रवास. “घर घर तिरंगा” या उपक्रमाप्रमाणेच संविधानाच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने पठाण गुरुजींनी ‘घर घर संविधान’ हा उपक्रम शिक्षण विभागाकडून मंजूर करून घेतला. माणगाव तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट मॅडम यांनी हा उपक्रम पठाण गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबवला. आज हा माणगाव पॅटर्न 175 दिवसांचा अखंड संविधान अभ्यास, 2 लाख 40 हजार विद्यार्थी,6 हजार शिक्षक आणि असंख्य पालकाच्या उत्स्फूर्त सहभागात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका येथेही राबवला जात आहे. आणि येत्या शैक्षणिक वर्षांत माजलगाव (जि. बीड) व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्येही राबविला जाणार आहे.
संविधान प्रसाराचा काय आहे हा माणगाव पॅटर्न?

   संस्कारक्षम वयात मुलांच्या मनामध्ये संविधानिक आदर्श आणि मूल्यांची भक्कम पायाभरणी व्हावी, या एकाच ध्येयाने ‘घर घर संविधान’ हा उपक्रम माणगाव तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत राबविला जातो. केवळ संविधानाची उद्देशिका वाचून किंवा पाठ करून चालणार नाही तर तिच्या प्रत्येक शब्दामागील तत्त्वज्ञान आणि संविधानातील प्रत्येक अनुच्छेदामध्ये अधोरेखित केलेले मूल्य यांचे सखोल आकलन मुलांना आणि खरं तर समाजातील प्रत्येक घटकाला होणे अत्यावश्यक आहे. याच उद्देशाने पठाण गुरुजींनी तयार केलेल्या संविधान विषयक पोस्ट प्रथम शाळेत मुलांना वाचून दाखविल्या जातात आणि त्यानंतर त्या संबंधित पालकांच्या गटावर पाठविल्या जातात. अशा प्रकारे शेकडो शिक्षक व लाखो विद्यार्थी आणि पालक या तिन्ही घटकांना दररोज या ‘घर घर संविधान’ उपक्रमाच्या माध्यमातून संविधान साक्षर करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जात आहे.
  आज या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश येत असून,रायगड जिल्ह्यातील माणगाव व तळा तालुक्यांनंतर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम मराठी,हिंदी, इंग्रजी आणि उर्दू अशा चार भाषांमध्ये नियमितपणे राबविला जात आहे. विजय सरकटे,शिक्षणाधिकारी,कल्याण-डोंबिवली महानगरपालिका,यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि नुरखाँ पठाण यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम राबविला जात आहे.या उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणजे ‘संविधान गुण गौरव’ परीक्षा. “घर घर संविधान” या अभ्यासपूर्ण आणि सातत्यपूर्ण उपक्रमाच्या भक्कम पायावर ही परीक्षा आधारित आहे. 175 दिवसांच्या अखंड संविधान अभ्यासानंतर, 2 लाख 40 हजार विद्यार्थी, 6 हजार शिक्षक आणि असंख्य पालकांच्या उत्स्फूर्त सहभागाने 1 ते 5 एप्रिल ‘संविधान गुण गौरव’ परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा केवळ ज्ञानाची चाचणी नसून,संविधानिक मूल्यांची रुजवण, जागृती आणि जपणूक करण्याचा एक सशक्त प्रयत्न आहे,जो भविष्यात अधिक सजग, जबाबदार आणि समतावादी समाज घडविण्यास नक्कीच मोलाचा हातभार लावेल. संविधान जनजागृतीचा हा व्यापक आणि लोकसहभागातून उभा राहणारा उपक्रम निश्चितच एक प्रेरणादायी आणि अभिमानास्पद पाऊल ठरत आहे. हा केवळ उपक्रम नाही,तर संविधान जनजागृतीचा एक ऐतिहासिक टप्पा आहे. असा प्रयत्न देशभर झाला तर जागरूक,सजग आणि जबाबदार नागरिक निश्चितच घडतील. कारण आज पेरलेली ही संविधानिक मूल्यांची बीजेच उद्याच्या सशक्त,सजग आणि जबाबदार लोकशाही भारताची पायाभरणी ठरणार आहेत.  
  शालेय विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये शिकवत असतानाच पठाण गुरुजींनी स्वतः व त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन काही उपक्रम राबविले गेले.रायगड जिल्ह्यात अध्यात्मिक बैठक सध्या खूप चलनात आहे. संविधान बैठक हा संविधान जागरासाठी आगळावेगळा फॉर्म पठाण गुरुजींनी निवडला. माणगाव (रायगड) तालुक्यातील चांदोरे येथील कुणबी समाजाच्या गावात साप्ताहिक संविधान बैठक हा उपक्रम राबविण्यात आला. या बैठकीत ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता.पठाण गुरुजींनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे ‘संविधान वाचन सप्ताह’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. सात दिवसांत विविध समाजातील महिलांनी पुर्ण पुस्तकाचे वाचन उपस्थितांसमोर लाऊड स्पीकरवर करून संपूर्ण गावाला ते ऐकवलं. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य कास्ट ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ व चिंचगव्हाण ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने  “संविधान वाचन सप्ताह -2026” आयोजित करण्यात आला.
    “धर्म वेगळे असतील,पण रक्ताचा रंग एकच असतो.” असे मानत गेल्या अनेक वर्षांपासून बकरी ईद व शिवजयंतीनिमित्त पठाण गुरुजी रक्तदान करतात व संविधानातील बंधुतेचा संदेश कृतीतून जपण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नात इतरांनाही सामिल करून घेतात. “चला संविधानिक मूल्यांसह इफ्तार करूया”, या प्रेरणादायी संकल्पनेतून महाड येथे मशिदीमध्ये ‘समता इफ्तार’ कार्यक्रमाचे ‘शिवराय ते भिमराय समता मार्च’ या उपक्रमांतर्गत आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विविध समाजघटक एकत्र येत बंधुता, समता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमात ‘भारतीय संविधान आणि इस्लाम-समता व बंधुतेचा संदेश’ या विषयावर मार्गदर्शन करताना संविधानातील समता, स्वातंत्र्य,बंधुता आणि न्याय ही मूलभूत मूल्ये, तसेच त्यांचे इस्लामच्या शिकवणींशी असलेले साम्य व सखोल संबंध यावर पठाण गुरुजींनी प्रकाश टाकला.सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणारा आणि संविधानिक जाणीव अधिक दृढ करणाऱ्या या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
  सध्या महाराष्ट्रात मतदार यादी संदर्भात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision- विशेष सघन पुनरावलोकन) प्रक्रियेबाबत व्यापक जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. जनजागृती प्रभावीपणे राबविली गेल्यास नागरिकांचा सहभाग वाढून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक,सुलभ व निर्दोष पद्धतीने पूर्ण होऊ शकते या विचाराने पठाण गुरुजी यांनी या संदर्भात माणगाव (रायगड) येथील मा.तहसीलदार यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ सर्व सुपरवायझर यांची बैठक आयोजित केली. त्या बैठकीत पठाण गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधितांच्या सहकार्याने जनजागृतीच्या माध्यमातून SIR प्रक्रिया माणगाव तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी नियोजन करण्यात आले.प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे, हीच खरी लोकशाहीची ताकद आहे. याच उद्देशाने पठाण गुरुजी मंदिर,मशीद,चर्च,मदरसा अशा धार्मिक ठिकाणी गावातील जबाबदार व्यक्तींना एकत्र करून धर्मगुरू व गावातील सजग नागरिक यांच्या बैठका घेण्याचे काम करत आहेत. संविधान साक्षरतेपासून सुरु झालेलं काम, आज संविधानिक जबाबदारी पार पाडण्याचे प्रशिक्षणच याद्वारे नागरिकांना देत आहे.
पठाण गुरुजींचा हा प्रवास स्वभानाकडून समाजभानाकडे नेणारा,समाजात संविधानिक मूल्य रुजविताना लोकशाही बळकट करणारा,परिवर्तनाच्या चळवळीतला एक ऐतिहासिक मैलाचा दगड ठरणारा आणि म्हणूनच गौरवास्पद! जग बदलायला निघालेल्या पठाण गुरुजींची पुढील वाटचाल ही अशीच दमदार असेल व प्रबोधनाच्या वाटेवरला हा वाटसरु अशाच नवनव्या वाटा धुंडाळत राहिल यात दुमत नाही.

सिरत सातपुते-8149673929,मुंबई.

पूर्व प्रकाशित साप्ताहिक साधना १८ एप्रिल २०२६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *