जीवनाचा अंत,माणुसकी जिवंत !
परस्परांच्या श्रद्धांचा सन्मान करत तीन धर्मीय कुटुंबीयांनी दिला मानवतेचा संदेश

विशेष प्रतिनिधी वाशिम – सध्या समाजामध्ये धर्म,जात,पंथ आणि विचारांच्या नावावर दुभंग वाढत असल्याच्या चर्चा सातत्याने होत असतात.सोशल मीडियाच्या गदारोळात तणावाच्या बातम्या झळकत असताना वाशीमच्या पद्मतीर्थ मोक्षधामात दि.18 मे रोजी घडलेला प्रसंग मात्र समाजमनाला आश्वस्त करणारा ठरला. माणुसकी अजूनही जिवंत आहे, परधर्माचा आदर अजूनही समाजाच्या मनामनात रुजलेला आहे आणि भारतीय संस्कृतीतील “सर्वधर्म समभाव” ही केवळ पुस्तकातील संकल्पना नसून प्रत्यक्ष कृतीतूनही जगली जाते, याचे प्रेरणादायी उदाहरण या घटनेतून पाहायला मिळाले.
सोमवारी सकाळी सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास स्थानिक पद्मतीर्थ मोक्षधाम येथे अंत्यसंस्कारासाठी एकाच वेळी तीन पार्थिव दाखल झाले.कडाक्याचे ऊन,अंगाची लाही लाही करणारे तापमान आणि असह्य उकाडा अशा वातावरणातही स्मशानभूमीत जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच शांततेचा आणि समंजसपणाचा भाव दिसत होता.अल्लाडा प्लॉट परिसरातील स्व.शिलाबाई परमेश्वर अंभोरे (वय ५६), नगीना मस्जिद परिसरातील स्व. शांताबाई विष्णू भिसडे (वय ८५) आणि चामुंडा देवी मंदिर परिसरातील स्व. प्रकाश कुंडलिक पुरी (वय ६०) यांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कारासाठी त्यांचे आप्तस्वकीय आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व.शिलाबाई अंभोरे आणि स्व. शांताबाई भिसडे यांचे सरण एकाच शेडमध्ये रचण्यात आले होते, तर स्व. प्रकाश पुरी यांच्यावर त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार नदीपलीकडील भागात दफनविधीची तयारी सुरू होती. तिन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही त्या वातावरणात एक विलक्षण संवेदनशीलता आणि परस्पर सन्मानाचे दर्शन घडत होते.यावेळी स्व.शिलाबाई अंभोरे यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी बौद्ध धर्माच्या परंपरेनुसार पंचशील आणि त्रिशरणाचे पठण सुरू होते. गंभीर वातावरणात सुरू असलेले हे पठण म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हते,तर शांतता, करुणा आणि समतेचा संदेश देणारे शब्द होते. ही विधी पूर्ण होण्यासाठी काही वेळ लागणार असल्याचे लक्षात आल्यानंतर शेजारीच अंत्यसंस्कारासाठी पूर्ण तयारी झालेल्या स्व.शांताबाई भिसडे यांच्या नातेवाईकांनी अत्यंत समंजस भूमिका घेतली.
“जोपर्यंत पंचशील आणि त्रिशरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपण थांबूया,” असा निर्णय त्यांनी स्वयंस्फूर्तीने घेतला. विशेष म्हणजे, नदीपलीकडे दफनविधीची तयारी सुरू असलेल्या स्व. प्रकाश पुरी यांच्या आप्तस्वकीयांनीही याच मानवतावादी भावनेतून आपल्या धार्मिक विधींना काही काळ विराम दिला.त्या क्षणी तेथे धर्म नव्हते,पंथ नव्हते, श्रेष्ठ-कनिष्ठ भेद नव्हते, होती ती फक्त एकच भावना,समोरच्या व्यक्तीच्या श्रद्धेचा आदर.काही वेळाने पंचशील आणि त्रिशरणाचे पठण पूर्ण झाले आणि त्यानंतर दोन्ही सरणांना एकाच वेळी चिंताग्नी देण्यात आला. त्याचवेळी स्व. प्रकाश पुरी यांच्यावरही अंत्यसंस्कार करण्यात आले. दुःखाने भरलेल्या त्या वातावरणातही उपस्थितांच्या मनात समाधानाची एक शांत लहर उमटत होती.कारण त्यांनी या दिवशी केवळ अंत्यसंस्कार पाहिले नव्हते, तर मानवतेचा उत्सव अनुभवला होता.आजच्या ध्रुवीकरणाच्या काळात छोटी छोटी कारणे पुढे करून समाजात द्वेषाची बीजे पेरली जातात. धर्माच्या नावावर माणूस माणसापासून दूर नेण्याचे प्रयत्न होतात.अशा काळात वाशीमच्या पद्मतीर्थ मोक्षधामात घडलेला हा प्रसंग म्हणजे समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ ठरावा असा आहे.
भारतीय संस्कृतीची खरी ताकद ही विविधतेतील ऐक्यात आहे.माझा धर्म श्रेष्ठ,असे सांगण्यापेक्षा तुझ्या धर्माचाही मला तितकाच आदर आहे,ही भावना अधिक मोठी असते.पद्मतीर्थ मोक्षधामातील या घटनेने नेमका हाच संदेश समाजासमोर प्रभावीपणे ठेवला.स्मशानभूमी हे अंतिम सत्याचे स्थान मानले जाते. तेथे माणसाची ओळख संपत्ती,पद, जात किंवा धर्माने होत नाही;तर तो फक्त माणूस म्हणून उरतो.रविवारी या स्मशानभूमीत घडलेला प्रसंग याच जीवन तत्त्वज्ञानाला अधोरेखित करणारा ठरला.धर्म वेगळे असले तरी दुःख एकच असते,अश्रूंचा रंग एकच असतो आणि माणुसकीची भाषा देखील एकच असते,हे या दिवशी पद्मतीर्थ मोक्षधाम ने संपूर्ण समाजाला शिकवून दिले.
आतिश देशमुख @ वाशीम

