
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते शासन कर्ती जमात बना.त्यासाठी कामगार,कर्मचारी अधिकारी यांनी संघटित होऊन प्रशासकीय शासन यंत्रणेवर कायम स्वरूपी दबाव ठेवा.आज आपण पाहतो आपल्याला दिलेले लोकशाहीचे जे चार स्तंभ आहेत ते सारेच महत्वाचे आणि निकोप असायला पाहिजेत होते.विशेषतः संसदीय व्यवस्था अत्यंत महत्त्वाची असल्याने आज प्रस्थापित वर्गांनी संसदीय व्यवस्थेवर मजबूत पकड मिळवून प्रशासकीय व्यवस्था, न्याय पालिका व प्रसार माध्यमे आपल्या ताब्यात ठेवल्याचे आपण पाहत आहोत,अनुभवत आहोत.आपले म्हणणारे कर्मचारी अधिकारी प्रशासकीय उच्च पदावरील सचिव त्यांच्या संघटनेचे वार्षिक सभासद व आर्थिक देणगीदार आहेत. हे आमचे आंबेडकरी विचारवंत विसरतात. त्यावर ते बोलत नाही. यातील बरेचसे सेवानिवृत प्रशासकीय अधिकारी आता सरकारच्या ध्येय धोरणा विरोधात संघटीत होत आहेत.त्याला साथ देणाऱ्या विचारवंताचे एक पेव फुटले आहे.ते महापुरुषांचे अनेक दाखले देऊन प्रत्यक्षात आपण काय केले पाहिजे होते.आणि आपण काय करत आहोत याचा मात्र बिल्कुल ही विचार करत नाहीत.त्यासाठी मग ते कधी छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणाले.तर महात्मा फुल्यांनी हे लिहून ठेवले आहे,छत्रपती शाहू महाराजांनी काय काय केले.याचा पाढा वाचुन दाखवतात.तर काही विचारवंत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा गांधीवादी विचाराचा सज्जन असो की मनुवादी विचाराचा दुर्जन असो तो बाबासाहेबांचे नाव घ्यायला थकत नाही.त्यामुळे सध्या प्रत्यक्षात काम ठप्प आहे. आणि व्हाट्सअप वर मोबाइल ह्यांग होई पर्यंत तत्वज्ञान पाजळत आहेत. पण चार लोक बसून आपल्याला प्रत्यक्षात काय करायला पाहिजे होते. याची नियोजन बद्ध आखणी करतांना दिसत नाही. शॉटकट नेता बनण्यासाठी सर्व धावपळ दिसते.मग कोणी तरी महापुरुषांना आपल्या भाषणातुन डिवचले की शांत पाण्यात दगड मारून पाणी गढूळ करून सोडतात. मग समाजात गढूळ पाण्याची चर्चा सुरु होते.टोपभर वरणात एक दोन ओंजळ भरून मीठ टाकल्यावर ते कोणाच्या खाण्याचे राहत नाही. अशीच परिस्थिती आज अ.ब.क.ड उपवर्गीकरणाने झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांचा जय जय कार करणारे खूप झाले.पण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.ते देणारी शिक्षण संस्था काढून,विध्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढणारे आज पर्यंतच्या चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या अनुभवातुन खरे फुले,शाहू आंबेडकर यांचे खरे अनुयायी दोनच होऊन गेले.एक कर्मवीर भाऊराव पाटील व दुसरे संत गाडगेबाबा त्यांनी मुले शिकवण्याचे काम हाती घेतले.शिक्षण संस्था काढली, वसतिगृह काढले.त्यात जी मुले शिकली.त्यात ही दोन प्रकार निर्माण झाले. एक वांझोटे तत्वज्ञान पाजळणारे व दुसरे शिकुन सवरुन धर्मांध व्यवस्थेच्या वळचणीत आंघोळ करणारे.
मराठा व धनगर आरक्षण हे मुळ विमुक्त भटक्या जाती जमाती,कमकुवत ओबीसी व आदिवासी समाज्या करीता फार मोठे षडयंत्र होते.त्यांचा हेतु हा की हा वर्ग सक्षम होण्या ऐवजी जितका विकलांग राहील तेवढेच त्यांना सोईचा होईल.मग अश्या वर्गाला सहजपणे विकत घेता येते.गंभीर बाब म्हणजे एससी मधील अनेक तत्वज्ञानी लोकांनी मराठा आरक्षणाला पाठबळ दिले.एक बौद्ध समाजातील व्यक्तींने मराठा व कुणबी एकच आहेत व धनगड म्हणजे धनगर असे बोलुन बाजुला झाला पण आज त्याचे दुष्परिणाम उर्वरित समाज भोगत आहे.आज अनुसूचित जाती मधील उपवर्गीकरण प्रश्नांवर कोणता मराठा बोलतो आहे?. आम्ही फक्त अति शहाणे असल्यागत वाट्टेल ते बोलतो स्टेज आणी माईक दिला की बोंबट सुटतो.समोर किती ही माणस असो,चार माणसे पुढे दिसली तरी हे आंबेडकरी विचारवंत बैल उकळल्यावर कसा ऐकत नाही अगदी तसेच बोलत सुटतात.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की बौद्धांचेअधिकार माझ्या कोटाच्या खिशात आहेत. खेदाची बाब ही आहे की बुद्ध धम्मा ची दीक्षा घेऊन ७० वर्ष (१९५६ ते २०२६ ) झालीत तरी ही बौद्धांचे अधिकार त्यांच्या कोटाच्या खिशात जशाच्या तसे पडून आहेत. कारण भारतीय बौद्ध महासभा माणूस घडविणारा कारखाना म्हणून ओळखल्या जात होती. ती बुद्धाचा जीवन जगण्याचा मार्ग सांगणारे तत्वज्ञान सांगून माणूस घडविण्याचे काम करत असतांना. ती जगण्याचे अधिकार कसे हस्तगत करावे हे शिकवत असतांना ती आता बौद्ध धम्मा त महार जात लिहण्याचे सांगते. म्हणजे बौद्धांच्या अधिकारांचे काय? हा प्रश्न आपण विचारू शकतो की नाही. ही एक मोठी समस्या झाली आहे. विशेष करून बुद्धिस्ट म्हणून जर समाजात चालविले जाणारे बुद्धिस्ट संस्कार,बुद्धिस्ट विवाह पद्धती,बौद्धांचार्य,धम्माचारी, तथा भिख्खू संघ त्यांची प्रचार प्रसार यंत्रणा त्यांची बुद्ध विहार कमेटीची मालकी हक्क असे कित्येक मुद्दे घेऊन चालणारे जगणारे दीड कोटीहून असणारे लोक एकट्या महाराष्ट्रात आहेत. बुद्धधम्माचे अभ्यासक,हितचिंतक विपस्सी साधक अशा विविध पातळ्या वर कार्य करणारे निष्ठावंत धम्म उपासक,दायक बौद्धांच्या अधिकारावर का बोलत नाही. पण महार लिहल्याने बनल्याने काय फायदा होणार हे सांगणारे बौद्धांच्या अधिकारावर कधी बोलतील?. म्हणूनच आंबेडकरी विचारवंत म्हणजे बैल उकळल्यावर कसा ऐकत नाही अगदी तसेच करतात.
बौद्धांच्या परिवर्तनवादी विचारांचे लोक व लोकांच्या चळवळी यशस्वी का होत नाहीत?.कारण फक्त चर्चा करतील, कृतीमध्ये शून्य..!.जे लोक पुढाकार घेऊन काही करत असतील,तर काही लोक फक्त बघ्याची भूमिका घेतील. स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत आणि पुढाकार जो घेतोय,त्याला मदत ही करणार नाही.चळवळीतील उपक्रमात लोकांची संख्या वाढावी, उपक्रम यशस्वी व्हावे, यासाठी मी काहीतरी केले पाहिजे? असा विचारच करत नाही. सोशल मिडियाचा चळवळीच्या प्रचार प्रसारासाठी योग्य वापर न करता रिकामटेकड्या आणि बिनकामाच्या पोस्ट करत बसतात. आपल्या कुटुंबातील लोकांना अजिबात चळवळीतील उपक्रमात सहभागी करून घेत नाहीत.फक्त कार्यक्रमांना उपस्थित राहायचे,एवढंच कर्तव्य काही लोक समजतात.चळवळीला जीवंत ठेवण्यासाठी वेळ, बुद्धी आणि पैसा देणारे लोक अपेक्षित आहेत,पण अगदी बोटावर मोजता येतील एवढेच लोक हे जर करत असतील, तर चळवळ कशी उभी राहिल आणि पुढे जाईल..? हा आपणच विचार करा…! आणि संवाद कराल ही अपेक्षा.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.

