
विशेष प्रतिनिधी विक्रोळी- बौद्धजन सेवा संघ,रत्नबोधी बुद्ध विहार व्यवस्थापन समितीने शुक्रवार,दि. २६/६/२०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता राजर्षी शाहू महाराजांच्या १५२वी जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयात विद्यावाचस्पती पदवी (Ph.D.) प्राप्त केलेल्या व विद्यादानच्या पवित्र सामाजिक कार्यात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या शिक्षक,प्राध्यापक व प्राचार्यांच्या सत्काराचे नियोजन केले होते. विशेष म्हणजे एकूण ७ निवडक सत्कारमूर्तीमध्ये ५ महिला प्राध्यापिका /संशोधकांचा समावेश होता.यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ.लक्ष्मी साळवे, डॉ.जयश्री खंडागळे, ठाणे येथील के.बी.महिला महाविद्यालयाच्या साहयक प्राध्यापिका डॉ.उषा भंडारे, सावित्रीबाई फुले बी.एड.कॉलेजच्या प्राध्यापिका रुपाली सदरे-पवार,तसेच भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय सचिव डॉ.एस.के.भंडारे व सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.विष्णु ज.भंडारे यांचा बौद्धजन सेवा संघांच्या विश्र्वस्तांच्या हस्ते सन्मानचिन्ह,शाल व जेष्ठ साहित्यिक आयु.प्रेमानंद गज्वी लिखित ‘बोधी संस्कृती’ हा ग्रंथ भेट देऊन सर्वाना सन्मानित केले.त्यानंतर प्रत्येकांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना बहूजन समाजातील महिला व दुर्लक्षित घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांसह,महात्मा ज्योतिबा फुले,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निस्वार्थीपणे केलेल्या समाजकार्याचा आढावा सादर केला.

आपल्या देशाच्या लोकशाही व्यवस्थेत संविधानाचे महत्व व गौरवशाली परंपरेचा मागोवा घेताना,त्यांनी समता, स्वातंत्र,बंधूभाव,सामाजिक न्याय व नैतिक आचरण अशा समस्त प्राणीमात्राच्या कल्याणसाठी सर्वश्रेष्ठ मुल्यांवर आधारित शासनव्यवस्था चालवण्यासाठी कायद्यांची कठोर अंमलबजावणी केली तरच येणाऱ्या काळात देशातील अनेक गंभीर प्रश्न सुटतील व बहूजनांचा जगण्याचा मार्ग सुकर होईल. चातुर्वण व्यवस्थेमुळे हजारो वर्षांपासून माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार आमच्या पुर्जजाना नाकारल्यामुळेच आजपर्यंत आमच्या दोन पिढ्या प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आलेल्या आहेत,असे सकारात्मक विश्लेषण एका वक्त्याने केले.
आज बहूजन समाजातील महिला व पुरुष विविध क्षेत्रात उच्चपदस्थ पहायला मिळताना दिसतात,तसेच त्यांच्या पुढच्या पिढीतील तरूणदेखिल व्यावसायिक शिक्षण घेऊन उद्योजक,प्रशासकिय अधिकारी,वैद्यकीय डॉक्टर,अभियंता,संगणक व आय.टी.तज्ञ होताना दिसत आहे.अलीकडे काहीजण स्टार्ट अपच्या माध्यमातून उद्योजक बनताना दिसत आहेत,हे सर्व शिक्षण व आपल्या मुलांना मिळालेल्या संविधानिक हक्क व अधिकारांमुळे शक्य झाले आहे,असेही एका वक्त्याने नम्रपणे सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौध्दजन सेवा संघ,रत्न बोधी विहार संचालक मंडळाचे विश्र्वत-अध्यक्ष आयु.प्रविण केदारे सर होते,त्यांनी येणाऱ्या काळात रत्नबोधी विहारात समाजप्रबोधनाचे अनेक उत्तम उपक्रम राबविण्याचे वेळापत्रकच थोडक्यात सादर केले. तसेच जुलैपासून सुरू होणार्या वर्षावासाच्या प्रवचन मालिकेत यावेळी १००% विविध क्षेत्रातील महिलांना व्याख्यानासाठी आमंत्रित करुन त्यांचा गौरव करण्याचा मनोदय देखील त्यांनी बोलून दाखविला.संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष ऍड.दिपक पगारे सरांनी केले व संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सरचिटणीस आयु.जगदीश गवारे, उपाध्यक्ष आयुनी निर्मलाताई गवळी,खजिनदार आयु.भूपेंद्र हिरे,चिटणीस आयु.आनंद घोक्षे,आयुनी.सुवर्णाताई टिळक,आयु.अरविंद जाधव,ऍड. वैभव झेंडे,आयु.विशाल कांबळे,आयु.राजेश साळवे,आयु. शशिकांत गांगुर्डे,आयु.महेंद्र कदम,आयु.दशरथ गायकवाड यांनीदेखील भरपूर मेहनत घेतली.याशिवाय संस्थेचे आजीव सभासद व हितचिंतकांचेही सहकार्य लाभले.
आयु.प्रविण केदारे (अध्यक्ष)
बौद्धजन सेवा संघ,रत्न बोधी बुद्ध विहार,कन्नमवार नगर, विक्रोळी, मुंबई
