रामलीला मैदानाचे शुद्धीकरण, हीं कोणती मानसिकता..?

बातमी शेअर करा.

लोकशाहीच्या भारतात राजकीय मतभेद असू शकतात, वैचारिक संघर्ष असू शकतो,एखाद्या नेत्याच्या भाषणावर आक्षेप असू शकतो; पण त्या नेत्याने सभा घेतलेल्या मैदानाचेच ‘शुद्धीकरण’ करावे लागते,ही मानसिकता नेमकी कोणत्या भारताची ओळख आहे? हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर हवन करून,गंगाजल शिंपडून मैदानाचे कथित ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या घटनेने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
   खरगे कोण आहेत, हा प्रश्न येथे महत्त्वाचा नाही. ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत,त्यांचे राजकीय विचार कोणाला पटतात किंवा पटत नाहीत,त्यांच्या भाषणावर कोणाला आक्षेप आहे किंवा नाही, हा लोकशाहीतील वादाचा विषय आहे. पण एखाद्या व्यक्तीच्या उपस्थितीने एखादे सार्वजनिक मैदान ‘अशुद्ध’ होते, अशी कल्पना मांडली जाते तेव्हा प्रश्न केवळ एका नेत्याचा राहत नाही; तो भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांचा होतो.


  भारताच्या संविधानाने माणसाला माणूस म्हणून समान प्रतिष्ठा दिली. जात,धर्म,पंथ,जन्मस्थान यांच्या आधारे माणसामाणसांत भेदभाव न करण्याची भूमिका घेतली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षांच्या सामाजिक विषमतेला आव्हान देत समतेचा मार्ग दाखविला. अस्पृश्यतेला संविधानाने स्पष्टपणे नाकारले. मग आजही एखाद्या व्यक्तीच्या स्पर्शाने, उपस्थितीने किंवा सभेने एखादी सार्वजनिक जागा ‘अशुद्ध’ होते, ही भाषा कुठून येते?
शुद्धीकरण कुणाचे करायचे आहे,मैदानाचे की मानसिकतेचे?
रामलीला मैदान हे कोणाच्या घराचे अंगण नाही. ते सार्वजनिक ठिकाण आहे. तिथे विविध जाती-धर्मांचे, विविध विचारांचे लोक येतात. राजकीय पक्ष सभा घेतात. सामाजिक संघटना कार्यक्रम करतात. सामान्य नागरिकही त्या जागेचा वापर करतात. मग एका विशिष्ट नेत्याने तिथे सभा घेतल्यामुळे ते मैदान अशुद्ध झाले, असे मानणे म्हणजे सार्वजनिक जागेलाच जातीय-धार्मिक शुद्धतेच्या कसोटीवर मोजण्याचा प्रयत्न नाही काय?.एखाद्या नेत्याचे वक्तव्य आक्षेपार्ह वाटत असेल तर त्याचा निषेध करा. कायदेशीर मार्गाने तक्रार करा.पोलिसांत जा.न्यायालयात जा. पत्रकार परिषद घ्या.लोकशाहीच्या मैदानात वैचारिक प्रत्युत्तर द्या. पण हवन करून मैदान शुद्ध करणे हा निषेधाचा कोणता लोकशाही मार्ग आहे?.याहून गंभीर बाब म्हणजे अशा कृतींना जर समाजात सामान्य मानले गेले, तर पुढे काय? उद्या एखादा दलित नेता एखाद्या सार्वजनिक विचारपीठावर गेला म्हणून त्या जागेचे शुद्धीकरण होणार का? एखादा मुस्लिम नेता गेला म्हणून? एखाद्या आदिवासी नेत्याने सभा घेतली म्हणून? एखाद्या विचारवंताने धर्माच्या रूढींवर टीका केली म्हणून?.हा प्रश्न विचारणे आवश्यक आहे. कारण इतिहासात ‘शुद्ध-अशुद्ध’ या कल्पनांनी माणसांना माणसांपासून दूर केले आहे. विहिरी वेगळ्या,वस्त्या वेगळ्या,मंदिरे वेगळी, रस्ते वेगळे आणि माणसाच्या सावलीलाही विटाळ मानण्याचे दिवस या देशाने पाहिले आहेत. संविधान आले म्हणून अस्पृश्यता संपली, असे समजणे हीच आपली मोठी चूक ठरेल; अस्पृश्यतेची मानसिकता अजूनही कुठे जिवंत असेल तर तिच्याशी लढणे ही प्रत्येक संविधाननिष्ठ नागरिकांची जबाबदारी आहे.या घटनेचे राजकारण करण्यापेक्षा त्यातून निर्माण झालेला सामाजिक प्रश्न समजून घेणे अधिक गरजेचे आहे. भाजपने या घटनेपासून अंतर ठेवले असेल, चौकशीचे आश्वासन दिले असेल, तर ते स्वागतार्ह आहे. कारण हा विषय पक्षीय राजकारणाच्या पलीकडचा आहे. अस्पृश्यतेविरुद्धची भूमिका कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नसावी; ती भारतीय लोकशाहीची सामूहिक बांधिलकी असली पाहिजे.
   आज देश चंद्रावर पोहोचत आहे, डिजिटल अर्थव्यवस्थेची भाषा बोलत आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात प्रवेश करत आहे. पण त्याच वेळी एखाद्या माणसाच्या उपस्थितीनंतर जमीन शुद्ध करण्याची गरज वाटत असेल, तर तंत्रज्ञानाने प्रगती केली असली तरी मानसिकतेने आपण किती पुढे आलो आहोत, हा प्रश्न विचारावाच लागेल.धर्म पाळण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. धार्मिक विधी करण्यासही स्वातंत्र्य आहे. पण धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली सामाजिक हीनता, अस्पृश्यता किंवा माणसामाणसातील भेदभावाला प्रतिष्ठा देता येणार नाही. संविधान हेच सर्वोच्च आहे.म्हणूनच रामलीला मैदानाच्या कथित शुद्धीकरणावर केवळ संताप व्यक्त करून थांबता कामा नये. ही कृती कोणत्याही व्यक्तीचा अपमान असेल तर तिची चौकशी झाली पाहिजे; आणि जर या कृतीमागे जातीय भेदभावाचा हेतू सिद्ध झाला, तर कायदा आपले काम केले पाहिजे.कारण भारताला आज मैदानाच्या शुद्धीकरणाची गरज नाही. भारताला गरज आहे ती मनाच्या शुद्धीकरणाची. गंगाजल शिंपडून माती स्वच्छ होऊ शकते; हवनाच्या धुराने वातावरण बदलू शकते. पण जातीय अहंकार, अस्पृश्यतेची भावना आणि माणसाला कमी लेखणारी मानसिकता कोणत्याही मंत्राने शुद्ध होणार नाही. त्यासाठी संविधानाचा विचार मनात उतरवावा लागेल.
रामलीला मैदानावर हवन झाले असेल; पण त्या धुरातून एक प्रश्न आजही स्पष्ट दिसतो आहे.मैदान अशुद्ध झाले होते की आपली मानसिकता? उत्तर मैदानात नाही.उत्तर आपल्या समाजाच्या विवेकात आहे.


रतनकुमार साळवे-9923502320संपादक -दैनिक “निळे प्रतीक” छत्रपती संभाजीनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *