मन समजून घेण्यासाठी बुद्धविचाराचा वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक : प्रा. डॉ. रत्नशिल खोब्रागडे.

बातमी शेअर करा.

‘डोपामाईन डिटॉक्स’च्या माध्यमातून नामरूप सिद्धांताचे विवेचन; संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात विद्यार्थी अभ्यास मंडळाचे उद्घाटन.
अमरावती, दि. २९ सप्टेंबर २०२६ : आधुनिक जीवनशैलीमध्ये वाढत चाललेल्या सततच्या उत्तेजना, डिजिटल माध्यमांचा अतिरेक, तात्कालिक सुखाची प्रवृत्ती आणि मनावरील त्याचा परिणाम समजून घेण्यासाठी बुद्धांनी मांडलेल्या मनोविषयक तत्त्वज्ञानाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. रत्नशील खोब्रागडे यांनी केले.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पाली आणि बुद्धिझम विभागात विद्यार्थी अभ्यास मंडळाचे उद्घाटन तसेच एम.ए. भाग–१ विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान सभागृहात उत्साहपूर्ण व वैचारिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात प्रा. डॉ. रत्नशील खोब्रागडे यांनी ‘नामरूप सिद्धांतातील नाम अर्थात मन आणि आधुनिक काळातील Dopamine Detox’ या संदर्भातून बुद्धांच्या मनोविज्ञानाची आधुनिक जीवनाशी सांगड घातली.
‘नाम’ म्हणजे मन : डोपामाईन डिटॉक्सची बौद्ध विचारांशी सांगड
प्रा. डॉ. रत्नशिल खोब्रागडे यांनी प्रतित्यसमुत्पादाचा नामरूप सिद्धांतातील ‘नाम’ या संकल्पनेचा सखोल ऊहापोह केला. मनाची कार्यपद्धती, इच्छा, आसक्ती, इंद्रियविषयक आकर्षण आणि बाह्य उत्तेजनांमुळे निर्माण होणाऱ्या मानसिक सवयी यांचे त्यांनी विश्लेषण केले.मोबाईल, सोशल मीडिया, सततचे मनोरंजन आणि तात्कालिक आनंदाच्या शोधामुळे आधुनिक माणसाच्या लक्षवेधक क्षमतेवर व मानसिक सवयींवर होणाऱ्या परिणामांचा संदर्भ देत त्यांनी ‘Dopamine Detox’ ही आधुनिक संकल्पना स्पष्ट केली. बुद्धांनी सांगितलेल्या सती, इंद्रियसंवर, संयम आणि मनोनिग्रह या तत्त्वांशी त्याचा संबंध जोडत मनाला बाह्य उत्तेजनांच्या अधीन न ठेवता जागरूकता व विवेकाच्या माध्यमातून प्रशिक्षित करण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या व्याख्यानामुळे बौद्ध तत्त्वज्ञान, मनाचे स्वरूप आणि आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्यातील संबंध विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट झाला.
पाली ही बुद्धांच्या ज्ञानपरंपरेची महत्त्वपूर्ण वाहक : प्रा. डॉ. संतोष बनसोड
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. डॉ. संतोष बनसोड यांनी पाली भाषेचे ऐतिहासिक, भाषिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. पाली ही समृद्ध ज्ञानपरंपरेची भाषा असून बुद्धांच्या मूळ धम्मविचाराचा सखोल अभ्यास करण्यासाठी पाली भाषेचे ज्ञान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
इतिहासातील बौद्ध विचार आणि वर्तमान सामाजिक वास्तव यांची सांगड घालत त्यांनी पाली भाषा व बौद्ध धम्माच्या अभ्यासाची आजच्या काळातील आवश्यकता स्पष्ट केली. प्रज्ञा, करुणा, समता, नैतिकता आणि मानवकल्याण या मूल्यांच्या संदर्भात बुद्धविचाराचे महत्त्व त्यांनी विशद केले. “पाली भाषेचा अभ्यास म्हणजे केवळ एका भाषेचा अभ्यास नसून बुद्धांच्या ज्ञानपरंपरेचा आणि मानवी कल्याणाच्या विचारांचा अभ्यास होय,” असे प्रतिपादन प्रा. डॉ. संतोष बनसोड यांनी केले.
‘५० पेक्षा अधिक विभागांमध्ये पाली व बुद्धिझम विभागाची वेगळी शैक्षणिक ओळख’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. टी. बी. रामटेके यांनी केले. विद्यापीठात ५० पेक्षा अधिक शैक्षणिक विभाग कार्यरत असून त्यामध्ये पाली आणि बुद्धिझम तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा या दोन विभागांना विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.या दोन्ही विभागांमधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून १० टक्के वाढीव प्रवेश क्षमतेनुसारही प्रवेश पूर्ण झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. पाली, बुद्धिझम आणि आंबेडकरी विचारांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असलेली शैक्षणिक रुची ही या विषयांच्या वाढत्या महत्त्वाचे द्योतक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणातून अभ्यास व संशोधनावर भर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रेखा वानखडे/पर्वतकर,समन्वयक,पाली आणि बुद्धिझम विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती उपस्थित होत्या.
अध्यक्षीय भाषणात त्यांनी एम.ए. भाग–१च्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. पाली आणि बुद्धिझमचा अभ्यास केवळ परीक्षेपुरता मर्यादित न ठेवता वाचन, चिंतन, चिकित्सक विचार, संशोधन आणि आचरणाशी जोडला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थी अभ्यास मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चर्चासत्रे, व्याख्याने, संशोधनपर उपक्रम आणि वैचारिक देवाणघेवाणीसाठी व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
     कुलगुरू व विद्यापीठ प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम
    हा कार्यक्रम संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. मिलिंद बाराहाते, कुलसचिव मा. डॉ. अविनाश असनारे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ मा. डॉ. नितीन कोळी तसेच मा. रमेश जाधव, कुलगुरूंचे स्वीय सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. विद्यापीठ प्रशासनाच्या मार्गदर्शनामुळे पाली आणि बुद्धिझम विभागातील शैक्षणिक उपक्रमांना चालना मिळत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व संशोधनात्मक विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
     प्रमुख पाहुणे शिवा प्रधान यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत सामाजिक जाणीव, वैचारिक प्रगल्भता आणि ज्ञानाचा समाजहितासाठी उपयोग करण्याचे आवाहन केले.विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, चिकित्सक विचार, नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि शैक्षणिक सहभाग वाढविण्यासाठी अभ्यास मंडळ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.कार्यक्रमाचे संचालन वैशाली कोटांगळे व द्रौपदी मोहोद यांनी केले, तर आभार प्रदर्शन अढाऊ सर यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एम.ए. भाग–२ पाली आणि बुद्धिझम विभागातील विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले. सुधाकर पाटील, अशोक भोरे, शिवदास आढाव, सुनील वंजारी, बाबुलाल शिरसाठ, निलेश जवंजाळ, देविदास मेटांगे, भिक्खू अमरावती सीलवंसलंकार, दीक्षा भगत, विजया मुळे तसेच इतर विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.
पाली भाषा, बुद्धविचार, आधुनिक विज्ञान आणि मनोविज्ञान यांचा वैचारिक संगम घडवून आणणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक ठरला. विद्यार्थी अभ्यास मंडळाच्या उद्घाटनामुळे विभागातील शैक्षणिक, संशोधनात्मक आणि वैचारिक उपक्रमांना अधिक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

भिक्खू ए सीलवंसलंकार, ७५०७८९४२०३,अमरावती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *