दीक्षाभूमी जागेचा संघर्षमय इतिहास

बातमी शेअर करा.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या ७० व्या धम्म दीक्षा विजयी दिना निमित्ताने

दीक्षाभूमी जागेचा संघर्षमय इतिहास विशेष आत्मचिंतन परीक्षण करणारा लेख.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीच्या दिवशी आयोजित धर्मांतर सोहळ्यात लाखो जनसमुदाय सोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यानंतर देशभरातील बौद्ध धर्मांतर सोहळा दिवस हा ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून साजरा करतात. आज नागपूर मध्ये दीक्षाभूमीवर भारतातील सर्वात मोठा स्तूप उभा असून तो स्तूप देशातील सर्व बौद्धांचे उर्जास्थान बनले आहे.धर्मांतर सोहळ्याला ७० वर्षाचा काळ लोटला तरी दिवसेंदिवस दीक्षाभूमी चे महत्व वाढताना दिसते. त्यामुळे नव्या पिढीला ऐतिहासिक दीक्षाभूमीचा इतिहास माहिती असणे आवश्यक वाटते. म्हणून नागपूर येथील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते एकेकाळचे पॅन्थर आजचे प्रसिद्ध कायदे विषयक तज्ञ ऍड. नरेंद्र गोडाणे यांच्याशी ५ व ६ ऑक्टोबरला नागपूर भंडारा दौऱ्यावर असतांना सहज प्रश्न उत्तरे झाली.तेव्हा गोडाणे यांनी विचारले बाबासाहेबांनी धर्मांतरासाठी नागपूरची निवड का केली.आज जी जागा दीक्षाभूमी म्हणून ओळखल्या जाते तीच जागा कशी निवडली ?. इतर जागा का नाही?. ज्यांची माहिती नाही. ते प्रामाणिकपणे मान्य केल्यास नवीन माहिती मिळते.


    दीक्षाभूमी जागेचा संघर्षमय इतिहास माहिती आहे काय?. त्यासाठी कर्मवीर बाबू हरीदास जी आवळे यांचा जीवन संघर्ष प्रेरणादायी लक्षवेधी पुस्तक वाचा. मी ते दीक्षा भूमी बूक स्टॉल वर जाऊन ताबडतोब विकत  घेतले. दीक्षाभूमी च्या जागेचा संघर्ष वाचत असतांना इतिहासात दडलेले अनेक सत्य डोळ्यासमोर येत होते. अनेक घटना अशा असतात त्यांची चर्चा होत नाही. आणि जे सत्य आहे ते सांगितले जात नाही. सोयीनुसार सांगितले जाते.आजची पिढी जेव्हा संघर्ष करते तेव्हा उद्याची पिढी सन्मानाने जागते. आणि आजची पिढी जेव्हा लाचार होते तेव्हा उद्याची पिढी गुलाम बनते.
     धम्मदीक्षा पूर्वी ही जागा वैक्सिन इन्स्टिट्यूटने गुरांच्या चरण्यासाठी राखून ठेवली होती. या जागेचे क्षेत्रफळ १४ एकर असून पडीत असलेली ही जागा त्यावेळी खाचखळगे, दगडधोंडे, लहान, मोठी झाडेझुडपे व गवतांचे रान होती. ही जागा दीक्षा समारंभासाठी मिळविण्यासाठी २८ सप्टेंबर १९५६ रोजी रीतसर अर्ज सकाळी करण्यात आला आणि २८ सप्टेंबर १९५६ रोजीच इन्स्टिट्यूटने ‘ना हरकत पत्र’ दिले. त्यात ही अट होती की २८ सप्टेंबर १९५६ ते ११ ऑक्टोबर १९५६ पर्यंत या जागेत गुरे चरण्यास येत राहतील व १५ ऑक्टोबर १९५६ नंतर ही जागा गुरांच्या चरण्यासाठीच पुन्हा उपयोगात आणली जाईल.
     दीक्षाभूमीवर पहिला बुद्धस्तंभ १३ एप्रिल १९५७ ला एका रात्रीतून बाबू हरिदासजी आवळे यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आला. बुद्ध स्तंभ हा मेंढे गुरूजी (भिक्खू धीरधम्म) यांनी एका रात्रीत बांधला. स्तंभावरील बुद्धमूर्ती भीमराव गजघाटे रा. पाचपावली, नागपूर यांनी तयार केली. (प्रल्हाद मेंढे गुरूजी, रा. कर्नलबाग, पत्र १२ जून १९९६) सोबतच अनेक कार्यकर्त्यांनी बुद्ध स्तंभ उभारण्यास आवळे बाबूस सहकार्य केले होते.बुद्ध स्तंभास धोका पोहचू नये म्हणून एक रखवालदार आणि स्तंभा शेजारी एक लहानसे पत्र्याचे शेड उभारण्याचे ठरवले होते. त्यासाठी मेंढे गुरूजी यांनी सामानही आणले होते. परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या आदल्या दिवशी सीताबर्डी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सर्व साहित्य बेकायदेशीर समजून उचलून नेण्याचा प्रयत्न केला. नागपूरच्या नझूल तहसीलदाराने ‘लँड रेव्हेन्यू अॅक्ट’ मध्यप्रदेश सेक्शन २२९ च्या आधारे स्मारक समितीच्या बुद्ध महासभेच्या आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या प्रमुख पुढाऱ्यांवर खटला भरला.


    स्मारक समितीचे कार्यवाह आर. आर. पाटील यांनी कोर्टात दीक्षाभूमीवरील स्तंभ कुणी बांधला हे माहित नसल्याचे सांगितले. कर्मवीर आवळे बाबूंनी दीक्षाभूमीवरील स्तंभ बांधल्याचे कोर्टात कबूल केले. त्यामुळे आवळे बाबूवर केस चालून शेवटी कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. त्या केसचा नंबर १२४-१-५२ ए ऑफ ५७-५८ होता. यावरून दीक्षाभूमीवरील स्तंभ उभारण्यात वर नमूद केलेल्या व्यक्तींचे बहुमूल्य सहकार्य लाभले होते. केवळ एकट्या व्यक्तीचे ते कार्य नव्हते. (प्रल्हाद मेंढे गुरूजी, रा. कर्नलबाग,पत्र ८ जून १९९६). दीक्षाभूमीची जमीन मिळावी म्हणून दादासाहेबांचे प्रयत्न होते. त्याचं बरोबर स्तूपाच्या आराखड्याची सुरवात त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ च्या ऐतिहासिक धम्मदिक्षेनंतर त्या पवित्र जागेचे भव्य स्मारकात रूपांतर करण्याची पाहिली योजना कर्मवीर भाऊराव गायकवाड यांच्याचं अध्यक्षतेखाली समिती ने आखली होती. त्यासाठी त्यांनी देश विदेशातील बौद्ध वास्तुकलेचा अभ्यास करून सांचीच्या स्तुपा सारखी रचना नागपूरला उभारण्याचा पाया रचला. 

  बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर मुंबईच्या दादर चौपाटीवर चैत्यभूमीची जमीन व नागपूरची दीक्षाभूमीची जमीन मिळावी म्हणून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी खूप प्रयत्न केले. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दीक्षाभूमीची १० बाय १० फूट जमीन देतो असे उर्मटपणे म्हटले. तेव्हा त्याविरोधात दादासाहेब गायकवाड यांनी लढा दिला.

मराठी भाषकांचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर १५ ऑगस्ट १९६१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी डॉ. आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी नागपूर या संस्थेला १४ एकर जमीन हस्तांतर केली. या विजयानंतर स्मारक समितीचे कार्यालय दीक्षाभूमी नागपूर येथे उभारण्यात आले. त्याचा शिलान्यास ३० सप्टेंबर १९६१ रोजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते बसविण्यात आला.१३ जून १९६३ रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली. तेव्हापासून दीक्षाभूमी येथील कार्याला प्रारंभ झाला. भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड हे भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या चळवळीत प्रगल्भ, विश्वसनीय व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड होते. त्याच कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे २९ डिसेंबर १९७१ रोजी निधन झाले. त्यांच्या निधना नंतर १९७२ साली आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीच्या अध्यक्षपदी रा.सू.गवई यांची निवड झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली दीक्षाभूमीचे कार्य जोरात सुरु झाले.
स्मारक समितीच्या कार्यात यशवंतराव आंबेडकर, रेवाराम कवाडे (गुरुजी ), अॅड. एन.एच. कुंभारे (समितीचे सदस्य व कार्याध्यक्ष), अॅड.डी.एम.गजभिये, सी.एम.आर मुघम, आर.आर.पाटील, वा.को.गाणार, संपतराव रामटेके आणि डॉ.स.वि.रामटेके यांचे संपूर्ण सहकार्य होते. या सर्वांची आठवण बाबासाहेबांच्या स्मारकाच्या रूपात कायम राहिली आहे.
  स्मारक उभारणीत नागपूरचे सदानंद फुलझेले यांनीही मोलाची कामगिरी बजावली आहे. बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्धधम्माची दीक्षा घेतली व लाखो अनुयायांना दीक्षा दिली त्यावेळी फुलझेले हे नागपूर महानगरपालिकेचे उपमहापौर होते. उपमहापौर या नात्याने त्यांनी दीक्षा समारंभप्रसंगी व्यवस्था करण्याची जबाबदारी पार पाडली होती.दीक्षाभूमी येथील १४ एकर जागेवर देशातील सर्वात मोठा स्तूप उभारण्यात आला. यावर तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले. स्तूपाची उंची १२० फूट असून स्तुपाचे शिल्पकार शिवदानमल आहेत. स्तूपाच्या चारही दिशेला जगप्रसिध्द सांची स्तूपा सारखे अप्रतिम तोरण द्वार उभारले आहेत. या स्तुपाचा कोनशीला समारंभ २७ जून १९७८ साली जागतिक बौद्ध परिषदेचे अध्यक्ष पूज्य भदन्त आलबर्ट एडिरेसिंगे (श्रीलंका) यांच्या हस्ते सकाळी १० वाजता करण्यात आला.अशोक विजयादशमीच्या पावन पर्वावर देशभरातून लाखो अनुयायी येथे मोठ्या श्रद्धेने येतात. नागपुरात या सोहळ्याकरिता बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक, मद्रास येथूनही लोक येत आहेत. नागपूरातील विविध वस्त्यांमध्ये जवळपास ३५० बौद्ध विहारे आहेत. हे त्यातील सर्वात मोठे आहे. या भव्य दिव्य स्तूपाचे उद्घाटन महामहिम राष्ट्रपती के.आर.नारायणन यांनी १८ डिसेंबर २००१ रोजी केले.
कर्मवीर बाबू हरिदास आवळे हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक निष्ठावंत सहकारी, आंबेडकरी चळवळीचे प्रखर नेते आणि समता सैनिक दलाचे अध्यक्ष होते.त्यांचा जन्म: १ जुलै १९१६ रोजी छावनी, कामठी (जि.नागपूर) येथे झाला.त्यांनी नागपूरमधून एल एल.बी. (LL.B.) आणि पदवीचे शिक्षण पूर्ण केले.वकिलीचा व्यवसाय करत असताना त्यांनी समाजातील गरीब व गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग केला.आंबेडकरी चळवळीतील योगदान समता सैनिक दल आणि पक्षकार्य: त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समता सैनिक दल आणि शेड्युल कास्ट फेडरेशनच्या विस्तारासाठी व मजबुतीसाठी वाहून घेतले.दीक्षाभूमीची जमीन आणि बुद्धमूर्तीची स्थापना: १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ऐतिहासिक ठिकाणी धम्म  दीक्षा दिली, त्या दीक्षाभूमीची जागा मिळवण्यासाठी आणि तेथे बुद्धस्तंभ व बुद्धमूर्तीची स्थापना करण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न व संघर्ष केला.महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य असताना त्यांनी दीक्षाभूमीच्या विकासासाठी आणि धार्मिक कार्यासाठी शासकीय ठराव आणला, ज्यानंतर शासनाने जागा देण्याचे जाहीर केले.त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू करण्यात आणि आंबेडकरी विचारांचा प्रसार करण्यात मोठी भूमिका बजावली.यासंबंधी अधिक माहितीसाठी तुम्ही दैनिक जागृत भारत आणि ॲड. हरिदास बाबू आवळे यांचे विदर्भातील दलित चळवळीतील योगदान यांसारख्या स्रोतांचा संदर्भ घेऊ शकता.कर्मवीर बाबू हरिदास आवळे यांच्याबद्दल तुम्हाला त्यांच्या दीक्षाभूमीच्या संघर्षा विषयी किंवा जीवनावरील इतर घटनांबद्दल सविस्तर माहिती हवी असे तर कर्मवीर बाबू हरीदासजी आवळे यांचा जीवन संघर्ष प्रेरणादायी लक्षवेधी आहे.आजच्या घडीला दीक्षाभूमी जागतिक कीर्तीचे प्रवित्र ऊर्जा केंद्र आणि पर्यटन स्थळ आहे.पण तिथे धम्माचे लक्षवेधी काम,प्रचार प्रसार  होतांना दिसत नाही. जागतिक कीर्तीचे भिख्खू प्रशिक्षण केंद्र आणि पर्यटन स्थळ असायला पाहिजे. दरवर्षी लाखों लोक येतात आणि कोणती प्रेरणा घेऊन जातात. तिथे तीन दिवस पुस्तकाची होणारी विक्री जागतिक विक्रम मोडणारी असते. हे दीक्षाभूमी जागतिक कीर्तीचे बनण्यासाठी त्यागी निष्टावंत अभ्यासू निस्वार्थी पदाधिकाऱ्यांची गरज आहे. त्यासाठी मोठी दुरदुष्टि ठेऊन नियोजन करून काम करण्याची गरज आहे. इतिहास माहिती असला तर इतिहास घडविता येतो. इतिहास माहिती नसला तर भूगोल होतो. आज दीक्षा भूमीची दिशा आणि दशा काय आहे. यावर गांभियाने विचार मंथन झाले पाहिजे.  दीक्षाभूमी जागेचा संघर्षमय इतिहास माहिती आहे काय?. त्यासाठी कर्मवीर बाबू हरीदास जी आवळे यांचा जीवन संघर्ष प्रेरणादायी लक्षवेधी पुस्तक वाचा.दीक्षा भूमी जागतिक दर्जाचे धम्म प्रचार प्रसार करणारे केंद्र झाले पाहिजे.त्यात तज्ञाचा सहभाग तर असलाच पाहिजे त्या बरोबर कष्टकरी त्यागी धम्म उपासक सुद्धा हवा आहे.असो..

७० व्या धम्म विजयी दिनाला दीक्षा भूमीला आलेल्या सर्व धम्म उपासक उपासिका यांना हार्दिक मंगल कामना. सर्वांचे मंगल हो!!!.

सागर रामभाऊ तायडे -९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *