भीमजयंतीचा इतिहासः

शुभ्र पांढरे धवल वस्त्र परिधान करून,हाती निळे झेंड घेत आणि जयभीम हा एकच जयघोष करताना लोकं दिसली,म्हणजे भीमजयंतीचा महोत्सव सुरु आहे, एवढं स्पष्ट होतं.केवळ देशभरातच नाही,तर अवघ्या विश्वभरात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी मोठ्या दिमाखदार स्वरूपात जयंती साजरी केली जाते.जगातील १०० पेक्षा जास्त देशामध्ये डॉ.आंबेडकरांचा जन्मदिन मोठ्या उल्हासात साजरा केला जातो. शेकडो वर्षांचा अंधकाराचा अंत म्हणजे भीमजयंती. हा मंगल दिन म्हणजे जागतिक विद्वान विश्ववंदनीय महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मौलिक विचार हे जगाने स्वीकारले आहेत. हा दिन म्हणजेच त्यांच्या विचारांचा गौरव दिन होय. आज जागतिक स्तरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरणास्थानी व स्फूर्तीस्थानी मानले जातात.या महान विद्वत्यास उल्लेखतांना वेगवेगळ्या उपाधीने संबोधले जाते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समर्थ ज्ञानी,सत्कर्मी,विवेकी,शुर-वीर,समाज सुधारक,वकील,प्राध्यापक, सामाजिक क्रांतीचे न्यायप्रीय प्रवर्तक,मानवंश शास्त्रज्ञ,तत्ववेता,जागतिक किर्तीचे बुद्धीमान युद्धवीर,मुरब्बी राजकारणी,मंत्रीपद त्यागणारे बाणेदार विधीमंत्री,कर्तबगार मजूरमंत्री,बांधकाम मंत्री,एक महान अर्थतज्ञ,राष्ट्रहित चिंतणारे थोर राष्ट्रभक्त,आणि भारतीय राज्यघटनेचे श्रेष्ठ शिल्पकार,अशा अनेक उपाधी व सन्मानाने बाबांसाहेबांना ओळखले जाते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या पृथ्वीतलारील एक असामान्य असे महामानव आहेत.उपाधीच कमी पडतील असे त्यांचे व्यक्तीमत्व आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मेकर्स ऑफ द युनिव्हर्स’ मध्ये चौथ्या क्रमांकावर मानांकन दिले.अमेरिकेत १४ एप्रिल हा दिन ‘शिक्षण दिन’ म्हणून साजरा केला जातो. कॅनडात* हा दिन ‘समता दिन’ म्हणून साजरा केला जातो.संयुक्त राष्ट्रसंघाने ‘पायोनियर ऑफ द युनिव्हर्स म्हणजे ‘विश्वाचा प्रणेता’ संबोधले.कॅनडात ब्रिटीश कोलंबीयाने ‘वर्ल्ड साईन ऑफ इक्वैलिटी म्हणजेच ‘समतेचे जागतिक प्रतिक हा सन्मान जाहीर केला.अमेरिकेने त्यांना ‘ज्ञानाचे प्रतिक’ म्हणून संबोधले. ही बाब भारतीयांसाठी गौरवशाली मानावी लागेल.आज एवढ्या मोठ्या स्वरूपात साजरा करण्यात येणारा हा भीमजयंती महोत्सव नक्की कधीपासून सुरू झाला? कुठे सुरु झाला? कोणी सुरु केला? याची माहिती थोडक्यात घेवूयाः
या बाबत आपल्याला वाटत असेल की,मुंबई,नागपूर,महू,इत्यादी पैकी एखाद्या ठीकाणांहून सुरुवात असेल,मात्र तसे अजिबात नाही.चळवळींची आणि परिवर्तनाची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला जन्मोत्सव थोर सामाजिक कार्यकर्ते सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी साजरा केला होता. यामुळे ते या जन्मदिवसाचे म्हणजे भीमजयंती समारंभाचे ते शिल्पकारच ठरतात. ही प्रथा त्यांनीच सुरू केली.खडकीच्या पत्र विभागात दलित मंडळाचे अध्यक्ष असताना, जयंतीचे औचित्य साधत, त्यांनी डॉ.आंबेडकरांची प्रतिमा चक्क हतीच्या अंबारीत ठेवली होती. यानंतर प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून, उंटावरून प्रचंड मिरवणुका काढल्या होत्या.तसेच महात्मा गांधी यांनी पुण्यात उपोषण सुरू केले होते. त्या प्रसंगी बाबासाहेब पुणे शहरात येत होते.त्यावेळी बाबासाहेबांचा मुक्काम नॅशनल हॉटेलमध्ये होता.त्यावेळीही रणपीसे यांनीच यात मोलाची कामगिरी बजावली होती. विशेष म्हणजे ते त्यावेळी सरकारी नौकरी करत होते. अशा रीतीने ते एक समाजसेवेचा वसाच घेतला होता. या प्रसंगाने आंबेडकरांच्या समर्थकांनी पुढील वर्षात राबवलेल्या प्रथेची सुरुवात झाली.
विशेष बाब म्हणजे आपल्या भारतात भीमजयंती हाच एक असा महोत्सव आहे जो सर्वात मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा केला जातो.भीमजयंती महोत्सवाच्या पूर्वी इतर कोणत्याही जयंती महोत्सवगाचे स्वरूप एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरे केल्याची उदाहरणे नाहीत.अर्थात भारतात भीमजयंती महोत्सवाचे कार्यक्रमापासूनच इतर जयंती कार्यक्रम महोत्सवाच्या स्वरुपात साजरे होण्यास सुरुवात झाली हे दिसून येते.यांचा परिणाम असा झाला की,ज्या काळात महामानवांच्या,महापुरुषांचा जन्मदिन तर सोडाच तर त्यांची ओळख सुद्धा करून द्यावी लागत होती,अशा महामानवांच्या जयंत्या सुद्धा आज मोठ्या प्रमाणात साजरे केल्या जात आहेत. याचाच अर्थ भिमाजयंतीचा उद्देश भारतात सफल झालेला आहे ही अभिमानाची बाब आहे. अशा काळात भीमजयंती महोत्सव एक असा अनोखा आनंदोत्सव होता, जो समाजातील अत्यंत मोठा सामाजिक बदल मानला जातो. ज्याला कधी माणूस म्हणून मान्यता नव्हती, तो माणूस भीमजयंतीमुळे एक शक्तिशाली रुपात समाजात वावरत होता. याचा चांगला परिणाम भारतातील इतर बहुजन समाजातील महापुरुषांची, महामानवांची त्यांच्या कार्याची ओळख होऊ लागली,आणि समाजात शीघ्र गतीने जागरुकता वाढली आणि ईतर समाजसुधारक महामानवांच्या जयंतीचे कार्यक्रम साजरे होण्यास सुरुवात झाली,हा अगदी आपल्या डोळ्यासमोरचा इतिहास आहे.
डॉ.बासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते. कायदेतज्ज्ञ अर्थशास्त्रज्ञ,राजकारणी आणि समाजसुधारक होते. त्यांनी आपले जीवन महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी तसेच अस्पृश्य किंवा दलितांविरुद्ध सामाजिक पूर्वग्रह संपवण्यासाठी,आणि देश घडवण्यासाठी समर्पित केले. देशभरात सार्वजनिक सुट्टी म्हणून पाळला जणारा हा दिवस समानता दिन म्हणूनही ओळखला जातो. कारण त्यांनी आयुष्यभर सर्व भारतीय रहिवाशांना समानता आणि कायद्यानुसार न्याय्य वागणूक मिळावी यासाठी संघर्ष केला. अर्थात या देशांतीलच नाही तर या जगातील समस्त मानव समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांचे जीवनाचे हक्क मिळवून देण्यासाठी आपले जीवनभर कार्य केलेले आहे. मग अशा महामानवाची जयंती साजरी तर होणारच. केंद्र सरकारने २०२० मध्ये या दिवसाला मोठ्या प्रमाणात मान्यता देण्यास सुरुवात केली. सध्या केंद्र सरकारचे विभाग हा दिवस सुट्टी म्हणून साजरा करत आहेत.
भीमजयंतीचा इतिहासः
बाबासाहेबांच्या जन्मापूर्वीच्या काळातील परिस्थिती म्हणजे १८९१ पूर्विच्या काळात भारतातील बहुसंख्य समाज चातुर्वण्य पध्दतीत पूर्णपणे बंधनात होता.त्यांना स्वातंत्र्याची कल्पनाही करणे अशक्य होते.ज्या जातीत,वर्गात जन्म झाला त्यातच मरणे एवढेच त्यांना माहीत होते.बाबासाहेबांच्या लढ्यास प्रत्यक्षपणे सुरुवात झाली तो काळ साधारण १९२० च्या दशकातील आहे.या वेळी संपूर्ण समाज पूर्णपणे अशिक्षित होता. अशा परिस्थितीत बाबासाहेबांनी ह्या समाजाला त्यांच्या शक्तिची आणि गुलामीची जाणीव करून दिली आणि हा झोपलेला समाज जागा झाला.त्यांच्या अस्तित्वासाठी हाती मशाल घेवून लढण्यास सज्ज झाला. मानवता, समता, बंधुता आणि एकता ह्या संकल्पना अस्तित्वात आल्या. या काळात प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली हा विखुरलेला बहुसंख्य शोषीत समाज एक झाला. त्यांच्यात प्रचंड असे मजबूत संघटन तयार झाले. बाबासाहेबांच्या एका हाकेला कोटी कोटी जनता धावून यायची. बाबासाहेबांचा एक इशारा त्यांच्यासाठी त्यांचे जीवनाचा मूल मंत्र ठरत होता. म्हणून प्रसंगी प्राणांचे बलिदान देण्याची तयारी त्या काळात होती.
१९५६ नंतरचा काळ: या काळात या देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले होते. म्हणून तो काळ संपूर्ण देशासाठी आनंदाचा काळ होता.वास्तविक पाहता एकीकडे इंग्रजांपासून येथील उच्च वर्णीयांना,तर दुसरीकडे उच्च वर्णीयांपासून येथील शोषीत समाजाला स्वातंत्र्य मिळालेले होते.या समाजाला स्वातंत्र्य नवे होते.बंदीस्त पिंजरा तोडून उडालेल्या पक्षाप्रमाणे हा समाज मोकळ्या आकाशात भरारी घेत होता.त्यांच्यात नवा जोम,नवा उत्साह होता.परंतु अशा आनंदोत्सवाच्या काळात बाबासाहेब मात्र नव्हते.त्यांचे महापरिनिर्वाण झाले.ते निसर्गात विलीन झाले.असे असले तरी ते या कोटी-कोटी जनतेच्या हृदयात विलीन झाले होते.या नैसर्गिक सत्याला स्विकारणे या समाजास अत्यंत कठीण होते.हे लोक बाबासाहेबांच्या कठोर परिश्रम घेवून केलेल्या त्या ऐहिासीक महान कार्याच्या आठवणीने अक्षरशः रडायचे.ते त्यांच्या भावना आवरु शकत नव्हते.परंतु असे असले तरी बाबासाहेबांची ताकद या समाजात प्रचंड प्रमाणात भरलेली होती.बाबासाहेबांचा उपदेश,त्यांचे विचार या समाजाचा प्राण होता आणि अशा जोशाच्या वातावरणात भीमयंती म्हणजे या समाजाचा प्राण होता. त्यांच्या जीवनाची एक नवी दिशा होती.समता,बंधुता,एकता आणि स्वातंत्र्याची पुजा होती.आपसात मतभेद, वैरभाव तर मुळीच नव्हता.प्रत्येकांच्या डोळ्यांसमोर फक्त बाबासाहेबच होते. त्यांचा उपदेश,त्यांची शिकवण,तेजस्वी दिपस्तंभ होता.
१९७० नंतरचा काळ (साधारणतः एक दशक):
भीमजयंती महोत्सवाबाबत विचार केल्यास हा काळ अत्यंत महत्वाचा आहे. याच काळात पॅन्थर सारख्या संघटनांच्या माध्यमातून या समाजाची ताकद या देशापुढेच नाही तर जगात पाहावयास मिळाली होती. त्या ताकदीची ओळख झाली होती. आणि नामांतराच्या लढ्याने तर एक इतिहासच घडवून दिला. तो इतिहास या समाजाच्या ताकदीचा,बलीदानाचा त्यागाचा आणि बाबासाहेबांवरील अपार आस्था आणि श्रद्धेचा. म्हणून या समाजाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिम्मत नव्हती. याच काळात भीमजयंतीच्या उत्सवाला अधिक मान्यता मिळाली. कारण त्यांचा प्रभाव वाढत होता. डॉ.आंबेडकरांना १९९० मध्ये मरणोत्तर सन्मान म्हणून भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार,भारतरत्न देण्यात आला आणि १९९०-१९९१ हे वर्ष ‘सामाजिक न्यायाचे वर्ष” म्हणून घोषित करण्यात आले.या बदलांमुळे आंबेडकर स्मृतिदिन अधिक व्यापकपणे ओळखला जाऊ लागला.तर दुसरीकडे या समाजात गट-तटाचे वातावरण, विकृतीकरण ई.प्रकारचे समस्या निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. अनियंत्रीत जागतीकीकरण,पाश्चात्य संस्कृतीचा शिरकाव होण्यास सुरुवात झाली होती.आणि भिमजयंती उत्सवावर होणाऱ्या परिणामांची बीजे पेरली जात होती.
आजचा काळ:आजचा समाज हा एकीकडे चातुर्वण्य आधारीत समाज व्यवस्थेतून आणि गुलामीच्या बंधनातून मुक्त झाला आहे तर दुसरीकडे भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला आहे. प्रत्यक्षदर्शी असे असले तरी बाबासाहेबांना अपेक्षीत असलेले स्वातंत्र्य येथे आहे काय हा प्रश्न आहे.स्वैराचारा स्वातंत्र्याचा गैरवापर, ईत्यादी समस्या निर्माण होतांना दिसत आहेत.परिणामी आपल्या पूर्वजांनी व्यतीत केलेला खडतर जीवन प्रवासाचा इतिहास,त्यांचे प्राणांचे बलीदान, याचा विसर पडला आहे की काय अशीच परिस्थिती दिसून येत आहे. एकता, संघटीतपणा,आपुलकी इत्यादी संकल्पना ह्या लोप पावतांना दिसत आहेत.नैतिकता, मानवता,संस्कृती या संकल्पनांची पायमल्ली होतांना दिसून येत आहे.या बाबीचा वाईट परिणाम हा आजच्या भीमजयंती उत्सवावर अत्यंत तीव्र आणि मोठ्या प्रमाणात होतांना दिसून येत आहे.म्हणून भीमजयंती उत्सवांच्या कार्यक्रमात बाबासाहेबांना अपेक्षीत वर्तन असणे आज खरी गरज आहे.म्हणून आज भीमजयंती उत्सवात स्वातंत्र्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या, कर्तव्यांचा तंतोतंत पालन होणे गरजेचे आहे.परंतु आज बाबासाहेबांच्या संदेशांची पायमल्ली होतांना दिसून येत आहे.भिमजयंतीच्या उत्सवाच्या पहिल्या मिटींगच्या दिवसापासून ते कार्यक्रमाच्या विसर्जन समाप्तीपर्यंत आयोजन नियोजनात अत्यंत आखणी पूर्वक नियोजन असणे अत्यंत आवश्यक झाले आहे. तरच कार्यक्रमात व्यत्यय येवून विस्कळीतपणा येणे अशा समस्या निर्माण होणार नाहीत. आज काही ठीकाणी भिमजयंती कार्यक्रमात दंगल घडून प्राणहानी होवून या समाजाचे फार मोठे नुकसान झाल्याची उदाहरणे दिसून येत आहेत. म्हणून या समस्यांवर वेळीच प्रतिबंध करणे काळाची गरज आहे. बाबासाहेबांच्या संदेशाचे तंतोतंत पालण करणे आवश्यक आहे. तेव्हाच भिमजयंती खऱ्या अर्थाने साजरी केली असे म्हणता येईल.
भीमजयंतीचे महत्वःडॉ.आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे आज आपणास भारतीय संविधानाच्या माध्यमातून न्याय,स्वातंत्र्य, समता आणि बंधुता अशी नैतिक मूल्ये प्राप्त झाली. सामाजिक अन्यायाविरुद्ध आंबेडकरांचा अढळ लढा आणि उपेक्षित जातीच्या हक्कांना पाठिंबा यांचा भारतातील सामाजिक सुधारणा आणि धोरणांच्या विकासावर महत्वपूर्ण परिणाम झाला आहे.शिक्षणामुळे बदल घडू शकतो या दृष्टिकोनासाठी आणि सामाजिक आणि आर्थिक गतिशीलता साध्य करण्यासाठी ज्ञानाच्या शोधाला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ.आंबेडकर ओळखले जातात. डॉ.आंबेडकरांच्या समावेशक समाजाच्या स्वप्नाला या दिवशी आयोजित अनेक कार्यक्रमांद्वारे चालना दिली जाते, हा दिवस समतेचा उत्सव म्हणून देखील साजरा केला जातो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वतेच्या महासागरात एक नजर टाकली तर त्यांच्या वैचारिक पातळीस आपणास स्पर्शन जाता येईल. डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या बालपणापासूनच त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या घटना त्यांना महामानव म्हणून सिद्ध करीत गेली. नोव्हेंबर १८९६ पासून त्यांनी शिक्षणास सुरुवात केली आणि पहिल्याच प्रयत्नात मॅट्रीक व बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याकाळी बहुजन समाजात एक विक्रम उभा केला. पुढील शिक्षणासाठी प्रसिद्ध विद्यापीठात परदेशामध्ये गेले.तेथे त्यांनी एम.ए.,पी.एचडी .,एम.एस्सी.,डी. एस्सी.,व बार- ॲट-लॉ या अत्युच्च पदव्या संपादन करून जगासमोर विद्वतेचा विश्वविक्रम उभा केला. त्याबरोबरच त्यांनी अत्यंत महत्त्वाचे लेखन केले. की ज्यामुळे त्याचा फायदा जगाला घेता आला. त्यांचा वारसा मार्गदर्शक प्रकाशाप्रमाणे काम करतो, अधिक न्याय्य आणि समावेशक समाज निर्माण करण्यासाठी चालू असलेल्या उपक्रमांना प्रेरणा देतो. उत्सवांच्या कार्यक्रमात बाबासाहेबांना अपेक्षीत वर्तन आज खरी गरज आहे. अशा महामानवास भीमजयंती दिनी विनम्र अभिवादन.
ॲड.रामरावजी मल्हारे,मो.9326144771,नांदेड
(13/04/2025)
