दुःखाचे नेमके कारण 

बातमी शेअर करा.

एक दिवस एक तरुण मुलगा तथागत बुद्धांच्याकडे आला.त्याच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. आणि बोलला माझ्या आयुष्यात फक्त दुःखच आहे.सुख कुठेच माझ्या आयुष्यात दिसत नाही त्यावर तथागत बुद्ध बोलले. कुठे आहे तुझे दुःख. मला तर दिसत नाही.त्यावर तो तरुण म्हणाला.हे दुःख माझ्या मनात आहे अंतर्मनात आहे.माझ्या आयुष्यात फक्त दुःखच आहे त्यामुळे मला काहीच करायची इच्छा नाही.

तथागत बुद्ध त्याला म्हणाले तुझ्या दुःखाचे नेमके कारण काय आहे ते मला सांग.?

त्यावर तरुण म्हणाला तथागत या दुःखाचे मूळ कारण काय आहे तेच विचारण्यासाठी मी येथे आलो आहे.

तथागत बुद्ध त्याला म्हणाले मित्रा जर दुःख तुझे आहे.तर तुझ्या दुःखाचे कारण तुलाच माहिती असायला हवे. तुझ्या दुःखाचे कारण मी कसे काय सांगू शकतो. 

आपण तर अंतर्यामी आहात. तुम्हाला सर्व काही कळते मग माझ्या दुःखाचे कारण तुम्हाला माहीतच असेल.

त्यावर तथागत बुद्ध म्हणाले हेच तुझ्या दुःखाचे मूळ कारण आहे. तू दुसऱ्याच्या विश्वासावर कारण कसे काय शोधू शकतोस. दुसरा माणूस आपल्या दुःखाचे कारण कसे काय सांगू शकेल. तू या आशेवर बसलास की दुसरा कोणीतरी येईल आणि मला या दुःखातून बाहेर काढेल. आपण दुसरा व्यक्तीवर अवलंबून राहतो तेव्हा आपण आश्रित झालेले असतो. जर त्यांनी असे केले तर आपण सुखी होऊ तसे नाही केले तर आपण दुःखी होऊ हे आपणच ठरवून ठेवतो. आणि आपल्या सुखाची दोरी दुसऱ्याच्या हाती देतो.जेव्हा आपण दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवतो तेव्हा आपला अपेक्षाभंग होतो. पण जेव्हा आपण स्वतः काहीतरी करायचे असे ठरवतो तेव्हा यश नक्कीच मिळते. मी बुद्ध असलो तरी मी तुझ्यासारखाच एक माणूस आहे मी फक्त जीवनाचे सार जाणले आहे मला जीवन जगण्याची कला अवगत आहे. त्यामुळे माझ्या मनात आता कोणतेच प्रश्न नाहीत कोणत्या शंका नाहीत. मी समाधानी आहे सुखी आहे. ज्या दिवशी तुझ्या मनातही कोणत्या शंका नसतील कोणतेच प्रश्न असतील त्या दिवशी तुला देखील मनापासून समाधान मिळेल आणि कोणत्याच बुद्धाकडे जाण्याची गरज तुला भासणार नाही.

तथागत बुद्ध पुढे म्हणाले मित्रा, तू फुल पाहिले आहेस का ?

त्यावर तो तरुण म्हणाला. हो,मी फुल पाहिले आहे. 

त्यावर तथागत बुद्ध म्हणाले फुल हे रात्री कळी असते. सूर्य जसा उगवतो तसेच त्या कळीचे फुलांमध्ये रूपांतर होते. दिवसभर हे फुल आपला सुगंध सगळीकडे पसरवीत असते.आणि संध्याकाळ होता होता पुन्हा ते कोमेजून मातीत मिसळून जाते.जर त्या फुलाला आधीच समजले की संध्याकाळी आपल्याला मृत्यूला सामोरे जायचे आहे.तर ते फुल आधीच कोमेजून गेलेले असेल.त्याप्रमाणे आपल्या समस्येला आपण आधीच कवटाळून राहिलो तर आपण भरभरून जगू शकत नाही.जर तू आजूबाजूला फक्त दुःखच बघू लागलास तर तुला कधीच सुख लाभु शकत नाही.आपल्या आजूबाजूला असलेल्या कित्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला सुख शोधता आले पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुला सुख शोधता आले तर तुझा जीवन जगण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. जीवनात सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होईल आणि तुला सुख लाभेल. हे सर्वस्वी माणसाच्या हातात असते. यामध्ये कोणी तुम्हाला मदत करू शकत नाही. यातून मार्ग मात्र तुमच्या तुम्हालाच काढता आला पाहिजे.

बुद्ध म्हणतात. मनुष्य हा विचारामुळे जास्त दुःख होतो.भूतकाळातील चुका आणि भविष्यातील चिंता यामुळे तो वर्तमान काळात दुःखी असतो. यावर एकच उपाय आहे भूतकाळातील चुका आपल्याला दुरुस्त करता आल्या पाहिजेत आणि भविष्यातील चिंता न करता वर्तमान काळात जगता आले पाहिजे. तरच आपल्याला सुखाची अनुभूती घेता येईल.आणि सुख अनुभवणे हे पूर्णपणे माणसाच्या हातात असते. 

त्या तरुणाने ते बुद्धांचे बोलणे ऐकले त्यांना पुन्हा एकदा वंदन केले आणि तो तेथून निघून गेला. संजय सखाराम पवार –9137440340खांडोत्री,तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *