
विशेष प्रतिनिधी पुणे – दिनांक 24- बँकिंग क्षेत्रामध्ये बहुजन कर्मचाऱ्यांचे सशक्त संघटन उभे करण्याच्या ध्येयाने “स्वतंत्र मजदूर युनियन” च्या माध्यमातून सुरू झालेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून,युनियन बँकेतील बहुजन कर्मचाऱ्यांनी दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी ‘ऑल इंडिया युनियन बँक बहुजन एम्प्लॉईज युनियन’ स्थापन करून अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र मिळविले.या संघटनेच्या माध्यमातून दि.२४ ऑगस्ट २०२५ रोजी पुण्यातील हॉटेल सिटीओटेल,जंगली महाराज रोड,पुणे.येथे भव्य “नेतृत्व प्रशिक्षण शिबीर” उत्साहात पार पडले. या शिबिराचे अध्यक्षस्थान मा.संदिप गायकवाड,अध्यक्ष,ऑल इंडिया युनियन बँक बहुजन एम्प्लॉईज युनियन यांनी भूषविले,तर मुख्य मार्गदर्शन मा.जे.एस.पाटील साहेब,राष्ट्रीय अध्यक्ष,स्वतंत्र मजदूर युनियन यांनी केले.
शिबिरास मा.डॉ.संजय घोडके,राष्ट्रीय सहसचिव, स्वतंत्र मजदूर युनियन व केंद्रीय अध्यक्ष,म.रा.मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना,मा.संतोष कडाळे,राष्ट्रीय कार्याध्यक्ष, स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी संघटना,मा.रमेश कांबळे, मुख्य सल्लागार,स्वतंत्र मजदूर युनियन,पुणे जिल्हा,मा. अे.पी.शिंदे,अध्यक्ष,स्वतंत्र रक्षा कामगार युनियन,एच.ई. फॅक्टरी,मा.गणेश मुरकुटे,केंद्रीय उपाध्यक्ष,म.रा. मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
या शिबिरास राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच राज्याबाहेरूनही अनेक प्रतिनिधी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना मा.रुपेश नागमोडे यांनी या शिबिराचे उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की,संघटनेची नव्याने झालेली स्थापना अधिक परिणामकारक होण्यासाठी,पदाधिकारी व सदस्यांना कार्यदिशा मिळावी,तसेच इतर वरिष्ठ संघटनांच्या अनुभवातून प्रेरणा घेता यावी,यासाठीच हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.


विविध मान्यवरांनी आपापल्या मनोगतातून संघटनात्मक अनुभव मांडले :मा.डॉ.संजय घोडके यांनी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची यशोगाथा सांगत,मा.जे.एस. पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वीज कंपनीतील संघटना एका वटवृक्षासारखी कशी फुलली-फळली हे अधोरेखित केले.मा.संतोष कडाळे यांनी संघटनात्मक कार्य करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करण्याचे मार्ग स्पष्ट केले.मा.रमेश कांबळे यांनी पतसंस्थांच्या माध्यमातून सदस्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करून संघटनेला बळकटी कशी मिळते हे स्पष्ट केले.मा.अे.पी.शिंदे यांनी प्रशासनावर प्रभावी वचक निर्माण करण्याची दिशा दाखवली.मा.गणेश मुरकुटे यांनी बहुजनांना आपला दडपलेला इतिहास समजून घेण्याचे आणि कोणत्याही दबावाला न जुमानता ठामपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
मुख्य मार्गदर्शन करताना मा.जे.एस.पाटील साहेब यांनी बहुजन चळवळीचा दडपलेला इतिहास प्रकाशात आणला.रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८८४ मध्ये स्थापन केलेल्या टेड युनियनपासून आजवरचा कामगार चळवळीचा प्रवास त्यांनी सखोलपणे उलगडला.“फुले–शाहू–आंबेडकरी विचारच समाजाचे खरे तारक आहे” हे ठासून सांगत त्यांनी स्वातंत्र्य,समता आणि बंधुता या विचारांच्या आधारावर योग्य दिशेने वाटचाल ठेवली पाहिजे,असे प्रतिपादन केले.त्यांनी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने आरक्षणाच्या लढ्यात सभासदांच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्च करून न्यायालयीन लढा दिला तसेच नागपूर व संभाजीनगर येथे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारले, याचा उल्लेख करून संघटनेच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांच्या शंकांना मा.जे एस पाटील साहेबांनी समाधानकारक उत्तरे दिली व आयोजक मा.रुपेश नागमोडे व त्यांच्या टीमचे विशेष अभिनंदन केले.शेवटी आभारप्रदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.संदिप गायकवाड यांनी केले आणि “नेतृत्व प्रशिक्षण शिबीर” यशस्वीरीत्या संपन्न झाले.
गणेश मुरकुटे- ८८८८८९७१९७,पुणे यांस कडून.

