
विशेष प्रतिनिधी मुंबई- तुकोबांच्या अभंगांचे दाखले देत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.रफिक सय्यद पारनेरकर यांनी मुंबईतील शिक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला.मुख्याध्यापिका श्रद्धा रोहोकले लिखित भारतीय वीरांगणा या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दादर, मुंबई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉक्टरसाहेब बोलत होते.समस्त शिक्षकांवर देश घडविण्याची मोठी जबाबदारी आहे. दर्जेदार शिक्षकांच्या हाती दर्जेदार अभ्यासक्रम सुद्धा असायला हवा.अवघी एकाचीच वीण,भेदाभेद भ्रम अमंगळ,आलो उजळावया वाटा तुकोबांच्या या अभंगांचा संस्कार शाळाकॉलेजच्या विद्यार्थ्यांवर व्हायला हवा.
ज्ञानोबा माऊलींनी पसायदानात म्हटलंय भूतां परस्परे पडो,मैत्र जीवांचे.हा मैत्रभाव गेला कुठे? शाळेत रोज आपण भारत माझा देश आहे,सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा म्हणतो.रोजच्या जगण्या – वागण्यात ही प्रतिज्ञा दिसून येत नाही. स्वातंत्र्य, समता,बंधुता,न्यायाची,संविधानाची शपथ घेऊन सन्माननीय मंत्री वागतात कसे? मनामनात हा भेद येतो कुठून? बहुजनांना शिक्षणाची कवाडं खूली करणाऱ्या सावित्रीबाईंबरोबर फातिमाबी होत्या.अहिल्यानगर येथे शहाशरीफ दर्गा आहे. मालोजीराजांच्या श्रद्धेचं हे ठिकाण.त्यांनी आपल्या मुलांची नावे शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली होती.देहू येथून निघणारी तुकोबारायांची दिंडी अनगडशहा बाबांच्या दर्ग्याजवळ थांबते.शेख महंमद यांच्यासारखे अनेक मुस्लिम वारकरी संत या महाराष्ट्रात होऊन गेले. समतेचे पुरस्कर्ते आणि आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अरबी कुराणाचे मराठीत भाषांतर करून घेतले होते. शिक्षण घेत असताना या सिलॅबसची खरंतर गरज आहे की जेणेकरून कुराणात म्हटल्याप्रमाणे आपण सर्वजण एकाच माता-पित्याची संतान आहोत.आपापसात प्रेम,जिव्हाळा आणि सद्भावना रुजवण्यासाठी आणि या मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी आपली ही विरासत या नव्या पिढीच्या मनांवर बिंबवली पाहिजे. शिक्षणाच्या पदव्या मिळवत असताना माणुसकीचे, सद्भावनेचे धडे त्यांनी गिरवायला हवेत.डॉक्टर,इंजिनियर असे कोणतेही करिअर करण्यापूर्वी त्याला आधी माणूस बनवले पाहिजे.विज्ञान आणि अध्यात्म ही एकाच गाडीची दोन चाकं आहेत.माचिसने गोरगरिबांच्या चुली पेटवायच्या की कुणाची घरं जाळायची? अण्वस्त्रांचा वापर नद्या जोडून माणसं जगवण्यासाठी करायचा की माणसं मारण्यासाठी करायचा? खरंतर विज्ञानाचा दोष नसून त्याच्या वापरकर्त्यांचा दोष आहे.अशाप्रकारे विचारांची मांडणी करत डॉक्टर साहेबांनी शिक्षकांचा क्लास घेत त्यांना माणुसकीचे धडे शिकवले.जीवनाचे मर्म उलगडवून दाखवले.पारनेरकर भूषण आणि आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांच्या हस्ते देण्यात आले. डॉक्टर रफिक सय्यद पारनेरकर यांचा याप्रसंगी वारकरी भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

दरोडी गावचे सुपुत्र आणि सध्या मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले किसनराव पावडे यांनी हा कार्यक्रम घडवून आणला.शेकडो शिक्षक यावेळी उपस्थित होते.महानगर बँकेच्या गीतांजलीताई शेळके यांनी मनसंधारणातून जलसंधारण करता येते हे सांगताना त्यांनी पिंपरी जलसेन कसे पाणीदार केले याचे उदाहरण दिले.पालकत्वाची एबीसीडी त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितली.महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी साहेबराव ठाणगे यांनी गावखेड्यातील माणूस कसा बदलत गेला.माणसांच्या नात्यांची वीण कशी उसवली गेली यासंदर्भात कविता सादर केली.पूर्वाश्रमीचे शिक्षक आणि सध्या ठाणे येथे डीसीपी म्हणून कार्यरत असलेले श्री गणेश गावडे यांनी सध्याच्या परिस्थितीत शिक्षकांची भूमिका कशी असावी हे सोदाहरण पटवून दिले. लोकमत वृत्तसमूहाचे श्री विजय झिमूर आणि सकाळ वृत्तसमूहाच्या अमृता देसरडा यांचीही याप्रसंगी समयोचित भाषणे झाली.भारतीय विरांगणा या पुस्तकाच्या लेखिका श्रीमती श्रद्धा रोहोकले यांनी आपल्या मनोगतातून जिजाऊ – सावित्री या नारीशक्तीचा उल्लेख करत वाचनचळवळ कशी वृद्धिंगत होईल याविषयी मांडणी केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिशन माणुसकीचे मारुती शेरकर यांनी केले आणि आभार सेकंडरी बँकेचे संचालक श्री.भाऊसाहेब आहेर यांनी केले.
डॉ.रफिक सय्यद पारनेरकर 9423161508,पारनेर,जिल्हा अहिल्या नगर.
