“जो समाज विचार करतो, तोच समाज सक्षम ठरतो…!”

बातमी शेअर करा.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बौद्ध समाजातील युवक युवतींसाठी एकदिवसीय व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्याचे आवाहन
     विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बौद्ध समाजातील युवक-युवतींसाठी एकदिवसीय PERSONALITY DEVELOPMENT WORKSHOP चे आयोजन महाराष्ट्रातील जयंती उत्सव समित्या, विविध सामाजिक संस्था आणि संघटना यांनी करावे,असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे समाजात प्रचंड उत्साह, जोश आणि अभिमानाची लाट असते. हा जोश असलाच पाहिजे; कारण तो आपल्या इतिहासाचा,स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा स्मरणदिन आहे. परंतु जोशासोबत होशही तितकाच आवश्यक आहे. जयंतीचा जल्लोष जितका महत्त्वाचा आहे, तितकेच तिच्या मागील विचारांचे चिंतन आणि कृतीही महत्त्वाची आहे. दरवर्षी जयंती येते, उत्साहात साजरी होते आणि निघून जाते. परंतु प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.जयंती साजरी करण्यामागील मूळ उद्देश काय आहे ?.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी नेमके कोणते स्वप्न पाहिले होते?.त्या स्वप्नाच्या दिशेने आपण खरंच चाललो आहोत का..?
     डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना एक सक्षम,सजग आणि स्वाभिमानी समाज उभा करायचा होता.शिक्षण,समाजकारण, अर्थकारण,सांस्कृतिक,धर्म आणि राजकारण या सर्व क्षेत्रांत आत्मविश्वासाने उभा राहिलेला समाज त्यांना पाहायचा होता.शासन, प्रशासन आणि न्यायपालिका या संविधानिक क्षेत्रांत आपल्या समाजातील युवक सर्वोच्च पदांवर विराजमान व्हावेत,अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती.परंतु त्यांच्या महान कार्यानंतर गेल्या ७० वर्षांत या क्षेत्रांत मोजकेच लोक यशस्वी झालेले दिसतात, आजही बहुतांश समाज अविकसित आहे.आपल्या समाजातील युवक किती प्रमाणात सर्वोच्च स्थानावर पोहोचले आहेत?.याचे आपण वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणार आहोत का ? जर आपण हे मूल्यमापन करण्याची प्रामाणिक तयारी दाखवणार नसू, तर स्वतःला “आंबेडकरवादी” म्हणवून घेण्यात अर्थ उरत नाही. त्या शब्दाला न्याय देण्यासाठी कृतीशीलतेची गरज आहे.
   आज संपूर्ण महाराष्ट्रात जयंतीनिमित्त कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मिरवणुका,सजावट,ध्वनीव्यवस्था,सांस्कृतिक कार्यक्रम आणि जल्लोष यात मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातो. उत्सव हा नक्कीच असावा; परंतु त्या खर्चातून समाजातील पुढील पिढी घडविण्यासाठी किती कार्यक्रम राबविले जातात, हा गंभीर प्रश्न आहे.महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे, ३५५ तालुके आणि सुमारे ५३० प्रमुख शहरे आहेत. या सर्व ठिकाणी भव्य पातळीवर भीम जयंती उत्सव साजरा केला जातो. त्यामध्ये सुमारे ८८५ मोठी भीम उत्सव मंडळे कार्यरत असल्याचे गृहीत धरले, आणि प्रत्येक मंडळाचा किमान खर्च १५ लाख रुपये मानला, तर केवळ या मोठ्या मंडळांवरच सुमारे १३२ कोटी ७५ लाख रुपये खर्च होतात. मध्यम आणि लहान मंडळांचा खर्च धरला, तर एकूण खर्च सहजपणे ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो.ही रक्कम समाजाच्या उत्कर्षासाठी किती मोठे सामर्थ्य ठरू शकते, याचा आपण कधी गंभीरपणे विचार केला आहे का.? जल्लोष आणि जयजयकार करतानाच या निधीचा काही भाग समाजातील युवक-युवतींच्या बौद्धिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी वापरला गेला, तर ती खरी बाबासाहेबांना अभिवादन करण्याची कृती ठरेल.याच विचारातून बौद्ध समाजातील युवक-युवतींसाठी एकदिवसीय व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा आयोजित करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या कार्यशाळेचा उद्देश केवळ भाषण करणे नाही, तर युवकांना विचार करायला प्रवृत्त करणे, त्यांच्या क्षमतांना दिशा देणे आणि त्यांना भविष्यासाठी सक्षम बनवणे हा आहे.या कार्यशाळेमध्ये खालील प्रमुख विषयांवर सखोल आणि प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन केले जाईल.
१) आपल्या पूर्वजांची अवस्था,त्यांचा संघर्ष आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेला महान सामाजिक महासंग्राम व त्याग
२) बौद्ध समाजातील युवक आणि युवतींसमोरील आजची आव्हाने कोणती आहेत ? आणि त्या आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत?
३) विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि आजचा युवा वर्ग
४) व्यक्तिमत्त्व विकास आणि बौद्ध युवा PERSONALITY DEVELOPMENT AND BUDDHIST YOUTH
५) ध्येय निश्चिती कशी करावी? – GOAL SETTING
६) नेतृत्व विकास -LEADERSHIP DEVELOPMENT
७) निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास – DECISION POWER AND CONFIDENCE
८) भविष्यातील नियोजन-FUTURE PLANNING
९) आपण समाजासाठी काय केले पाहिजे.?
वयोगट – १६ ते २५,किमान ५० युवक आणि ५० युवती या सर्व विषयांवर सखोल विचारमंथन,प्रात्यक्षिक मार्गदर्शन आणि संवादात्मक पद्धतीने एकदिवसीय कार्यशाळा घेतली जाईल.युवक-युवतींनी स्वतःच्या क्षमतांचा विकास करून समाजासाठी सक्षम नेतृत्व कसे उभे करावे,याविषयी मार्गदर्शन केले जाईल.समाजातील पुढील पिढी सक्षम, जागरूक आणि विचारशील व्हावी,हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.जल्लोषाच्या पलीकडे जाऊन विचारांची ज्योत प्रज्वलित करण्याचा हा प्रयत्न आहे.अधिक माहितीसाठी संपर्क करा.किरण मोहिते-९५६१८८३५४९मोटिवेशनल ट्रेनर, व्याख्याते,मानसशास्त्र आणि संविधान अभ्यासक.

सागर तायडे यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *