
विशेष प्रतिनिधी अकोला :-भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात तेजस्वी अक्षरांनी नोंद झालेल्या क्रांतीवीर भगतसिंग,राजगुरू,सुखदेव यांच्या बलिदान स्मृतिदिनानिमित्त त्याग,समर्पण आणि राष्ट्रनिष्ठेच्या मूल्यांना उजाळा देणारा “शहीदांना वंदन, सामूहिक उपवास कार्यक्रम व समर्पण पुरस्कार वितरण सोहळा” देशभक्तीच्या प्रेरणादायी वातावरणात उत्साहात संपन्न झाला.भूमिपुत्र फाउंडेशन,संत वासुदेव महाराज भूमिपुत्र अभियान, श्री.वासुदेव गोशाळा व गुरुदेव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल सोनचाफा सिरसो फाटा,दर्यापूर रोड,मुर्तीजापूर येथे पार पडलेला हा उपक्रम समाज जागृतीचा दीप प्रज्वलित करणारा ठरला.
गुरुदेव सेवा मंडळ,मुर्तीजापूर तालुका यांच्या वतीने राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीतांद्वारे शहीदांना,देशासाठी शहीद झालेल्या हुतात्मा,जवान- किसान व ज्ञात-अज्ञात विरांना सामूहिक अभिवादन करण्यात आले.त्याग आणि कर्तव्यनिष्ठेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनात राष्ट्रभक्तीची नवी ऊर्जा निर्माण करणारा ठरला. या प्रेरणादायी कार्यक्रमास भूमिपुत्र फाउंडेशन चे संस्थापक,मुख्याध्यापक तथा शिक्षकनेते जयदीप सोनखासकर,ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष बबनराव देशमुख,पुणे येथील ज्येष्ठ कवी साहित्यिक गजानन कदम, निळकंठ गिऱ्हे, बाबुराव ढोले,बंडूभाऊ सांगळूदकर,प्रशांत उपाध्ये हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,गाडगे महाराज यांच्या विचारां मधून समाजसेवा,मानवता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.शहीदांचे स्मरण ही केवळ औपचारिकता नसून राष्ट्रप्रेमाच्या संस्कारांचे पुनरुज्जीवन आहे,अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.याच सोहळ्यात खडकी अकोला येथील समाजसेवक गजानन ओंकारराव हरणे यांना सन २०२६ चा प्रतिष्ठेचा ‘समर्पण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.गौरवपत्र,मानवस्त्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.गेल्या सुमारे ३५ वर्षांपासून विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून गोरगरीब,दीनदलित, दिव्यांग व वंचित घटकांसाठी निस्वार्थ सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या गजानन हरणे यांच्या कार्याचा गौरव या पुरस्कारातून करण्यात आला.
समाजसुधारक यांच्या मानवतावादी विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी सामाजिक न्याय, शिक्षण,जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन तसेच वंचित घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे.त्यांच्या समर्पित कार्याची दखल घेऊन आजपर्यंत भारत सरकार, राज्य शासन तसेच विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने शंभरहून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाल्याबद्दल विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात येत असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्वश्री रामकृष्ण खोपे,सौरभ वानखडे,गजानन उंबरकर,प्रमिला गवई,जिया भोसले, रवी देविकर आदि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला गुरुदेव भक्त,सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनेने करण्यात आली.
गजानन हरणे यांस कडून

