
अकोले (प्रतिनिधी) फुले दांपत्यांची कर्मभूमी राहिलेल्या ओतूर (जिल्हा पुणे) येथे दिवाळीनंतर सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येणार असून या कालावधीत शिवजन्मभूमी ते फुले वाडा अशी पदयात्रा काढण्याचा मनोदयही ओतूर येथे पार पडलेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
महात्मा जोतिबा फुले यांचे हे द्विजन्मशताब्दी वर्ष आहे.१७८ वर्षापूर्वी फुले दाम्पत्याने ओतूर येथे ग्रामीण भागातील मुलींसाठी पहिली शाळा काढली होती.आजही ही शाळा जोमाने चालू असून एक ते चार या वर्गांची पटसंख्या २५० पेक्षा जास्त आहे. फुले दांपत्य या शाळेत दोन महिन्यापेक्षा अधिक काळ येथे राहिले होते.ज्ञानार्जनाचे काम सावित्रीबाई फुलेनी केले होते. फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या अनुयायांची संख्या येथे लक्षणीय आहे म्हणूनच या गावाची “सत्यशोधकांच ओतूर“ अशीच ओळख आहे. अशी पार्श्वभूमी असलेल्या या गावात रविवारी सत्यशोधकांची बैठक पार पडली. येथील भाऊ दाजी डुंबरे पाटील प्रतिष्ठानने याकामी पुढाकार घेतला होता. बैठकीस ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, अकोले, संगमनेर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार, जुन्नर येथील शंभर पेक्षा अधिक सत्यशोधक उपस्थित होते. जुन्नरचे माजी आमदार दिलीप ढमढेरे, निवृत्त पोलीस आयुक्त सुरेश खोपडे,पुणे जिल्हा परिषद सदस्या छायाताई तांबे,माजी जि.प.सदस्य मोहित ढमाले,पंचायत समिती सदस्य प्रशांत डुंबरे मा.सरपंच धनंजय डुंबरे, बाजार समितीचे उपाध्यक्ष दिलीप डुंबरे, आनंद शितोळे,निवृत्त प्राचार्य सुरेश शिंदे, निवृत्त प्राचार्य लक्ष्मण बेळे, निवृत्त प्राचार्य डॉ.बाबासाहेब देशमुख, प्रा बाळासाहेब मेहत्रे, प्रा.डॉ.गुलाबराव मंडलिक, अशोक मंडलिक, प्रविण शिंदे, सोमनाथ बाळसराफ, दिलीप डोखे, सोपान शिंदे, चंद्रकांत मंडलिक, प्रा.डॉ.विजय भगत, डॉ. कल्पना भगत, गाथा भगत, हिरालाल पगडाल व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्यशोधक समाजाचे दोन दिवसीय अधिवेशन घ्यावे, या अधिवेशनात प्रबोधनात्मक व्याख्याने व्हावीत, कोणाकडूनही चुकीच्या मार्गाने निधीसंकलन न करता सत्यशोधकांच्या देणगीतून सर्व खर्च करावा, कुठलाही राजकीय विचार मांडला जाऊ नये अशी मते यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नरेंद्र डुंबरे यांनी केले.
मांडवी नदीवर असलेल्या चिलेवाडी धरणाच्या जागेची पाहणी पावणेदोनशे वर्षापूर्वी महात्मा जोतिबा फुले व भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील यांनी केली होती, त्यामुळे या धरणास भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील यांचं तर ओतूरजवळील पिंपळगाव जोगा धरणास महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देण्यात यावं असा ठराव यावेळी मांडण्यात आला.
अशोकराव उगले ९८८१०७०५१८ यांस कडून
संपादक पुण्य वार्ता न्यूज

