
ग्रामीण जीवनातील संघर्ष, मानवी नात्यांचे भावविश्व, सामाजिक वास्तव आणि कोकणच्या मातीतून उगवलेल्या अस्सल माणसांच्या कथा जेव्हा संवेदनशील लेखकाच्या लेखणीतून शब्दबद्ध होतात तेव्हा त्यातून ‘कुडपाण’सारखा ताकदीचा कथासंग्रह जन्माला येतो. लेखक प्रकाश सकपाळ यांचा ‘कुडपाण’ हा कथासंग्रह वाचताना ग्रामीण आणि दलित जीवनाचे वास्तव साहित्याच्या केंद्रस्थानी आणणाऱ्या अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात यांच्यासारख्या साहित्यिकांनी समृद्ध केलेल्या परंपरेची प्रकर्षाने आठवण होते.या संग्रहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील अस्सल कोकणी बोलीभाषा. लेखकाने कोकणातील लोकजीवन, त्यांच्या भावना, संघर्ष, संस्कार आणि जगण्यातील रांगडे सौंदर्य यांचे अत्यंत जिवंत चित्रण केले आहे. वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्याचे आणि आशय सूचकपणे मांडण्याचे काम सायली कोंडकर यांनी आकर्षक मुखपृष्ठाव्दारे केले आहे. मुखपृष्ठावर निसर्गरम्य कोकणातील मोकळे आकाश, हिरवीगार धरती, उडणाऱ्या पक्षांचा थवा, मध्यभागी कमरेला पांढरे धोतर, खांद्यावर प्रचंड ढोल आणि हातात कुडपाण असलेला एक बलदंड, जोशपुर्ण ढोल वादक दिसतो. ‘कुडपाण’च्या कथा जशा मातीच्या गंधाने भरलेल्या आहेत, तशाच त्याचे मुखपृष्ठही कोकणच्या लोक जीवनाचा ढोल निनादवत वाचकांना त्या विश्वात घेऊन जातात. कथा वाचताना वाचक केवळ घटनांचा पाठपुरावा करत नाही, तर त्या जगण्याचा प्रत्यक्ष साक्षीदार बनतो.
‘कुडपाण’ ही कथा बाप लेकीच्या नात्यातील भावनिक पराकाष्ठेचे अप्रतिम चित्रण करणारी आहे. ‘आस्मानाला छाताड दाखवत चोर डोंगर कैक पिढ्या दिमाखात उभा होता’ या सुरुवातीच्या वाक्यापासूनच कथा वाचकाला आपल्या कवेत घेते. निसर्गाचे वर्णन, पालखीचा सोहळा, धुपारतीचा सुगंध, ढोलांचा नाद आणि ग्रामीण वातावरणाची सजीव उभारणी कथेला दृश्यात्मक बनवते. बाळनाक महार आणि काशी ही पात्रे विशेष स्मरणात राहतात. काशीच्या माहेर प्रेमातून आणि बापावरील अपार प्रेमातून लेखकाने मानवी नात्यांची भावनिक खोली अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केली आहे. जातीव्यवस्थेचा विषय कुठेही घोषणात्मक न होता सहज कथानकातून समोर येतो, हे लेखकाचे मोठे यश म्हणावे लागेल.बाळनाक महार हे केवळ एक पात्र नाही तर, तो कोकणातील लोककलेचा जीवंत वारसा आहे. त्याचे आयुष्य संघर्षमय असले तरी, त्याची कला मात्र आभाळाएवढी उंच आहे. त्याच्यासाठी ढोल हे केवळ वाद्य नव्हते तर, तो त्याचा श्वास, अस्तित्व आणि ओळख होती. तो ढोल वाजवत नाही तर, निसर्गाशी संवाद साधत असतो. तो ढोल वादकच नाही तर, एक प्रेमळ बापही आहे. काशीच्या मनात त्याच्याबद्दल अपार आदर आणि प्रेम आहे. तिला त्याच्या ढोलाचा आवाज हजारो लोकांमधूनही ओळखता येतो. काशीचा आपल्या वडिलांवरील विश्वास म्हणजे बाळनाकाच्या आयुष्यभराच्या कर्तृत्वाचा सर्वोच्च सन्मान आहे. लेखकाने त्याची व्यक्तीरेखा विलक्षण प्रभावीपणे उभी केली आहे. तो उपेक्षित समाजातील कलावंत आणि आत्मगौरव जपणारा माणूस आहे. त्याच्या ढोलवादनाचे वर्णन अप्रतिम आहे.

‘दोन झाडे’ ही कथा एका गरीब, उपेक्षित वृध्द स्त्रीची जीवन कहाणी नसून, ती ग्रामीण समाज व्यवस्था, दारिद्र्य, मानवी संवेदना, अंधश्रद्धा, सामुदायिक जिव्हाळा आणि काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या जीवनमूल्यांचे प्रभावी चित्रण आहे. कथेची नायिका फुलीबाय ही महारवाड्यात राहणारी, आयुष्यभर दारिद्र्याशी झुंज देणारी स्त्री आहे. अंगात देवचार येतो, लोकांचे रोग बरे करते, पण स्वतःचे दुःख मात्र कुणाकडेही मांडत नाही. प्रकाश सकपाळ यांनी तिच्या व्यक्तीमत्वातील निरागसता, सहनशीलता आणि जीवनावरील प्रेम अत्यंत जीवंतपणे उभे केले आहे. तिचे वर्णन इतके प्रभावी आहे की, वाचकांच्या डोळ्यांसमोर फुलीबाय प्रत्यक्ष उभी राहते.‘वचपा’ ही कथा केवळ वैयक्तिक सूडाची कथा राहत नाही, तर ती ग्रामीण समाजातील सन्मान, सत्ता आणि सामूहिक स्वाभिमानाच्या संघर्षाचा दस्तावेज बनते. अपमानाचा वचपा काढण्याच्या भावनेतून उलगडणारी ही कथा एका संपूर्ण समाजमानसाचे दर्शन घडवते.‘पंगेरा’ ही कथा संग्रहातील सर्वाधिक आशयगर्भ कथांपैकी एक आहे. एका साध्या पंगेऱ्याच्या झाडाभोवती लेखकाने स्मृती, इतिहास, माती आणि माणूस यांचे नाते उलगडले आहे. विश्राम काजूंच्या आयुष्याशी जोडलेला पंगेरा हा केवळ वृक्ष राहत नाही; तो दलित समाजाच्या स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा जिवंत साक्षीदार बनतो.‘कोकांबीची पारध’ ही कथा कोकणातील सामुदायिक लोक संस्कृती, परंपरा, अहंकार, मान सन्मान आणि गावगाड्याच्या मानसिकतेचे प्रभावी चित्रण करते. कथेमधील दृश्यात्मकता आणि रांगडी भाषा वाचकाला त्या वातावरणात घेऊन जाते. ही कथा केवळ शिकारीची गोष्ट नाही तर, ती एका काळाची, एका संस्कृतीची आणि एका जीवन पध्दतीची साक्ष देणारी जीवंत लोककथा वाटते.‘मिसळ’ ही कथा संघर्ष, यश आणि नियतीच्या क्रूर खेळाची हृदयस्पर्शी कहाणी आहे. अरुणभाई या पात्राच्या माध्यमातून लेखकाने एका सामान्य माणसाचा उत्कर्ष आणि त्यानंतरचे पतन अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. येथे ‘मिसळ’ हा पदार्थ केवळ खाद्यसंस्कृतीचे प्रतीक राहत नाही, तर तो संघर्ष, यश आणि आठवणींचे रुपक बनतो.‘येगळेचार’ ही कथा समाजाच्या उपेक्षेला सामोरे जाणाऱ्या एका अपंग व्यक्तीच्या आत्मसन्मानाचा संघर्ष मांडते. ग्रामीण जीवनातील वास्तव आणि मानवी संवेदनांचा उत्कृष्ट संगम या कथेत दिसून येतो.‘कांचन’ ही कथा ग्रामीण दारिद्र्य, बालपण, स्त्रीजीवन आणि अपूर्ण स्वप्नांची अत्यंत वेधक नोंद आहे. कथानकाचा शेवट वाचकाच्या मनावर खोल परिणाम करुन जातो.‘साव किलो पाखर’ या कथेतून लेखकाने जितू या पात्राच्या माध्यमातून बालपणातील खोडकरपणा, मानवी स्वभावातील विसंगती आणि आयुष्याच्या शोकांतिकेचा प्रवास अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे.
‘कुंडलिक’ ही संघर्ष, शिक्षण आणि मातृत्वाच्या त्यागाची प्रेरणादायी जीवनगाथा आहे. दारिद्र्य, उपासमार आणि शिक्षणासाठीचा लढा यांचे वास्तववादी चित्रण या कथेला विशेष उंची प्रदान करते.‘सुशीला’ ही कथा ग्रामीण शिक्षण व्यवस्थेचा इतिहास, स्त्रीच्या आयुष्यातील संघर्ष आणि शिक्षक व्यवसायातील निष्ठा यांचे हळवे चित्रण करते. शिक्षणामुळे गावात घडणारा सामाजिक बदल लेखकाने अत्यंत संयत आणि प्रभावी शैलीत मांडला आहे.एकूणच, ‘कुडपाण’ हा कथासंग्रह केवळ कथांचा संग्रह नाही; तो कोकणच्या मातीचा गंध, समाजजीवन, दलित अनुभवविश्व, मानवी नात्यांची ऊब, संघर्षाची धग आणि स्मृतींची ओल जपणारा एक महत्त्वपूर्ण साहित्यिक दस्तावेज आहे. प्रकाश सकपाळ यांनी आपल्या अस्सल बोलीभाषेच्या सामर्थ्यावर, सुक्ष्म निरिक्षण शक्तीवर आणि प्रभावी कथनशैलीवर आधारलेलं साहित्य निर्माण केले आहे. त्यांच्या कथा वाचकाला केवळ गुंतवून ठेवत नाहीत तर, अंतर्मुख करतात, विचार करायला भाग पाडतात, समाजाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देतात आणि माणुसकीवरचा विश्वास अधिक दृढ करतात.
वाचन मन समृध्द करते आणि लेखन त्या समृद्धीला शब्दरुप देते. मातीचा गंध जपणारे लेखक काळाच्या ओघात केवळ कथा लिहित नाहीत तर, इतिहासाची पाने जतन करत असतात. त्या अर्थाने प्रकाश सकपाळ यांचा ‘कुडपाण’ हा कथासंग्रह समकालीन ग्रामीण मराठी साहित्यातील एक उल्लेखनीय आणि दीर्घकाळ स्मरणात राहणारा समृध्द साहित्यिक ठेवा ठरतो. कोकणच्या मातीचा गंध आणि माणूसकीची उब जपणाऱ्या या कथा मराठी साहित्य विश्वात निश्चितच आपले स्वतंत्र स्थान निर्माण करतील असा ठाम विश्वास वाटतो.
कथा संग्रह : कुडपाण,लेखक : प्रकाश सकपाळ,प्रकाशन : स्पर्श प्रकाशन-किंमत : ₹ ३९०/-
मिलिंद कांबळे चिंचवलकर-९८९२४८५३४९

