
‘कवी देवानंद पवार यांचा ‘सब्बे सत्था सुखी होन्तु !’ हा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित होतो आहे. या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी देवानंद पवारांचे अंतकरणापासून अभिनंदन करतो. त्यांचा ‘काळोखाला भेदणारा सूर्य’ हा कवितासंग्रह २००९ या वर्षी प्रकाशित झाला. तो संग्रह ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने’ प्रकाशित केला होता. देवानंद पवार प्रकृतीने कवी आहेत आणि मुख्यत्व त्यांनी कविता लेखनच केले आहे.
एक: देवानंद पवारांची घडण औरंगाबादेच्या नागसेनवनात झाली. नागसेनवन म्हणजे आंबेडकरी चळवळीची रणभूमीच आहे. बाबासाहेबांच्या प्रेरणांनी हा परिसर सतत हेलावत असतो. या परिसरात रूजू होणारी मने ही चळवळीतच रूजू होत असतात. प्रत्येकच मनाची इथे नवरचना होत असते, मने दुथडी भरुन वाहायला लागतात. नव्या स्वप्नांसोबत बोलण्याच्या इच्छा या मनांमध्ये निर्माण होतात. हा जिवंत परिसर इथे येणाऱ्या मनांनाही जिवंत करतो. देवानंद पवार यांचे मानसिक निर्माण या परिसरात झालेले आहे. त्यांनी आता स्वतःचे बोधीपर्ण प्रकाशन’ सुरू केले असून हे त्यांचे प्रकाशनच त्यांचा ‘सब्बे सत्था सुखी होन्तु’ हा कविता संग्रह प्रकाशित करीत आहे. कवी देवानंद पवार यांना मी या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मनापासून सदिच्छा देतो.
दोन : देवानंद पवारांनी आपल्या वैचारिक आदर्शाना एका कवितेत वंदन केले आहे. ते त्यांच्या जीवननिष्ठेवर प्रकाश टाकलेच, पण सर्वसामान्य लोकासंबंधीची त्यांची आस्थाही प्रकट होते. ‘ओवी’ या रचनाबंधातून ते आपणाला जाणवते. या कवितेतून बुद्ध, तुकोबा, जिजाऊ, छत्रपती शिवराय, जोतीराव फुले, सावित्री माई, छत्रपती शाहू, सयाजीराव गायकवाड, बाबासाहेब आंबेडकर, रमाई आणि अण्णाभाऊ साठे यांना त्यांनी वंदन केले आहे. या ओव्यांमधून कवीने लोकांच्या माणुसकीचा विकासमार्गच मांडलेला आहे.तीन : या कवितेच्या लेखनाचा उद्देश कवीने अनेक ठिकाणी मांडलेला आहे. त्यातली काही ठिकाणे अशी –
१. ‘तरीही आम्ही करतो धडपड माणसासाठी माणसं जोडण्यासाठी.’
२. ‘सब्बे सत्था सुखी होन्तु ! म्हणत निर्माण व्हावी माणसं माणसाला जोपासण्यासाठी.’
३. ‘ठिणगीकडून वणव्याकडे जाणारी वाट म्हणजे तांडा.’
४. ‘चालत राहावं प्रकाशाच्या दिशेने काळोखाचे पडदे फाडत …’
५. ‘स्वातंत्र्याचे गाणे गात अंधाराला कापत कापत भीम सैनिक निघेल हातात बंडाचे निशाण घेऊन !’
६. ‘मी त्यांना संविधान सांगतो समता, न्याय, स्वातंत्र्य सांगतो.’
७. ‘निळा, भगवा, हिरवा, पिवळा, लाल, यांना एकत्र करून गडद व्हायचंय माणसासाठी.’
ही सर्व अवतरणे हे सांगतात की, कवीला सामाजिक सलोख्याची उत्कट तहान लागलेली आहे. ही गोष्ट मला विशेषच महत्त्वाची वाटते. या ध्येयाकडे जाण्यासाठी कवीने आपल्यापुढे बुद्धाच्या प्रज्ञानाचा उजेड अंथरलेला आहे. त्याला माणसांच्या उद्धारासाठी बंधुभाव – भगिनीभाव हवा. कवी विचारमंथन नाकारीत नाही, पण आता विचारसंस्कृतीला कृतीसंस्कृतीची जोड द्यायला हवी, असे कवीला प्रकर्षाने वाटते.
“आता खूप झालं विचाराचं मंथन करून आता व्यवस्थेच्या या सिरिअल किलरला मला दीक्षा द्यायची आहे माणसाची जगात शांतता नांदावी म्हणून आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा.फक्त माणसासाठी ! फक्त माणसासाठी” बुद्धाने मानवी जीवनाचा एकमेव नायक माणूसच आहे, हे सांगितले. बुद्धिमत्ता हीच माणसाची सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. या बुद्धीनं निरर्थकांमध्ये भराऱ्या घेण्यापेक्षा फक्त माणसाची महत्ता वा माणसाचे महानायकपण मांडावे. मानवी बुद्धिमत्तेचा याहून दुसरा मोठा सन्मान कोणालाही करता येत नाही. हीच गोष्ट बाबासाहेबही सांगतात. आणि बुद्ध वा बाबासाहेब यांनी मानवी जीवनासाठी युद्धविहीनता हेच ध्येय परम मानले. हिंसेच्या मार्गाने माणसे मारता येतात. माणसे ही आणि माणुसकीची हिंसेच्या मार्गाने जगवता येत नाहीत. जीवनाला उजेडगामी करणारा हाच शहाणा (विस्डममय) सिद्धान्त आहे आणि त्याचा उच्चार कवीने प्राथम्याने या कवितासंग्रहात केला आहे.
चार : कवीच्यापुढे युद्ध आहे ते स्वाभिमानाचे ! सेल्फ रिस्पेक्टचे ! आजची धर्मांधता आणि धर्मनिरपेक्षता यातील तीव्र संघर्ष कवी मांडतो. बेरोजगारीसारखे तरुणांचे प्रश्न, झुंडशाही, शेतकऱ्यांचे प्रश्न, स्त्रियांवरील अत्याचारांचे प्रश्न असे सर्व प्रश्न सुटावेत, असे कवीला वाटते आणि त्यासाठीच कवी म्हणतो-
‘म्हणून आम्ही होतो मार्गस्थ, शिव-भीम मार्गाने ‘
आणि याप्रकारे शिवाजी राजे आणि बाबासाहेब यांच्या सर्वसन्मानदायी भूमिकांचा एकमय ध्वज खांद्यावर घेतो.
छत्रपती शिवाजी राजांनी जाती-धर्मांवरुन माणसांमध्ये भेद केला नाही. त्यांनी माणसाच्या सभ्यतेवरुन माणसाचे मूल्य ठरवले.
बाबासाहेबांनी तर एकव्यक्ती एकमूल्य सांगितले. सर्व भारतीय समान आहेत. जाती, धर्म, पंथ, प्रांत, वंश या सर्वच ओळखीपुढे ‘आम्ही केवळ भारतीय आहोत’ हा महान आदर्श ठेवला. विविधतेत जहर कालवणारी विषमता त्यांनी नाकारली. भारतीयांपुढे असे निखळ भारतमय भारताचे स्वप्न ठेवले. कवीला या उजेडाच्या दिशेच्या हाका ऐकायला येत आहेत आणि त्या हाकांच्या दिशेने कवी निघालेला आहे, असे मला वाटते.
बाबासाहेबांनी भारतातील ऐंशी टक्के लोकांना म्हणजे स्त्रिया, ओबीसी, आदिवासी, भटके-विमुक्त, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि इतर ही सर्व अधःपतितांना हे सांगितले की, ‘माझ्या संविधानाने तुम्हाला तत्त्वतः देशाचे नायक करून ठेवले आहे. तुम्ही सर्व एकत्र या आणि निवडणुकीच्या मार्गाने देशाचे शासनकर्ते व्हा… पण हे सर्व लोक व्यवस्थेने चारलेल्या जाती धर्माच्या अफूने झिंगत आहेत. त्यामुळे आपल्यातल्या चौकटी सोडायला तयार होत नाहीत. ही माणसे अन्याय सहन करीत राहतात, पण एकत्र येऊन अन्यायमुक्त भारत निर्माण करीत नाहीत. कवीने याबद्दल खंत व्यक्त केली आहे. कवीने ‘जखम’ या कवितेत’ ‘आंबेडकरवादाची’ गरज बोलून दाखविली आहे. कोरोनाच्या महामारीचा संदर्भ देऊन इतिहासातील निरंतर लॉकडाऊनचा निर्देश कवीने केला आहे. माणसांना जातीमध्ये, पोटजातीमध्ये धर्मांमध्ये आणि अहंकारांध्ये बंद केले. हे लॉकडाऊन भारतात करणाऱ्या सांस्कृतिक कोरोनाचा निर्देश कवीने केलेला आहे.
देवानंद पवार यांच्या कवितासंग्रहात असे कवीचे मन व्यक्त होते आणि ते माणसांना, माणसांच्या भल्यासाठी एकत्र गुंफणारेच आहे. ही जाती, धर्म यांनी दूषित झालेल्या आजच्या राजकारणाच्याऐवजी जाती, धर्मविहीन संविधानमय राजकारणाची प्रस्थापना करणारी कविता आहे. कवीला सदिच्छा ! सब्बे सत्था सुखी होन्तु !
काव्यसंग्रह- देवानंद पवार- पृष्ठे : 80- मूल्य : 150 ₹- बोधीपर्ण प्रकाशन, औरंगाबाद – संवाद: 9158359628- bodhiparnprakashan@gmail.com
डॉ. यशवंत मनोहर
ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत, नागपूर

