
एक कवी आपल्या निष्ठा गुंडाळून ठेवतो आणि आपल्या कवितेचा धंदा करतो. कधी जयभीम बोलतो, कधी जय अण्णा बोलतो! कधी वंचित बनतो, कधी शिवसैनिक बनतो तर कधी धनगर बनतो. जसे गिर्हाईक तशाच पुड्या बांधतो आणि जग बदलायचं सोडून स्वतःच बदलतो. आता तो भाज्या विकत नाही, तर आता तो कविता विकतो, इमान विकतो, निष्ठा विकतो आणि अल्पावधीतच लोकप्रिय होतो.
दुसरा कवी आपल्या निष्ठा बदलत नाही, आपले इमान बदलत नाही. आपल्या कविता बदलत नाही. समोर कितीही अमिषे आली तरी तो स्वतःला बदलत नाही. समोरची माती कोणतीही असो, तो आंबेडकर पेरत राहतो, बुध्द पेरत राहतो आणि इमानदारीने आपलं खडतर आयुष्य जगत राहतो. तो कदाचित अल्पावधीत प्रसिद्ध होणार नाही. पण तो अल्पावधीत लुप्तही होणार नाही. तो वाहत राहिल चिरंतन कष्टकऱ्यांच्या घामातून, शोषितांच्या हुंकारातून आणि पिडीतांच्या अश्रुतून. तो कायम स्मरणात राहील पिढ्यान् पिढ्यांना आपल्या प्रलयंकारी विद्रोहातून!
विवेक मोरे -८४५१९३२४१०,मुंबई

